सोनाली कुलकर्णी

Sonalikulkarni माझी नाट्य आणि अभिनयाची कारकीर्द आमच्या पुण्यातल्या श्रमसाफल्य सोसायटीतल्या गणेशोत्सवातून झाली. माझे दोन्ही थोरले भाऊ संदिप आणि संदेश हे सुध्दा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत. संदिपचे लेखन आणि नाट्य अभिनय ह्यापासून स्फूर्ती घेऊन आपणही नाटकात काम करावे असे मला वाटायला लागले. आमच्या अभिनव विद्यालयातही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात मी सहभागी होत असे. आई-बाबांनी आम्हा तिघांनाही अभ्यासाव्यतिरिक्त इतर ऍ़क्टीव्हिटीज् मध्ये सतत प्रोत्साहन दिले.

मी नऊ वर्षे माणिक अंबिकेकडे भरतनाट्यम शिकले. माझे ‘अरंगेत्रम’ ही झालेलं आहे. त्याचबरोबर गुजर मॅडमकडे तीन वर्षे शास्त्रीय संगीत शिकले. त्यातून थोडी अभिनयाची ओढ वाढत गेली.

मी फर्ग्यूसन कॉलेजला तिसर्‍या वर्षाला असतांना पुरूषोत्तम करंडकासाठी ‘मंजू’ नाटक बसविले होते. पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय असे तिहेरी आव्हान पेलले होते.

नाटकाचे निकाल रात्री बाराला जाहीर करतात व दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात कळतात. दुसर्‍या दिवशी परीक्षक कै. मोहन गोखले साडेसात वाजता माझ्या घरी दाखल झाले त्यांनी माझ्या अभिनयाचे कौतूक केले आणि आर्शिवाद दिले. डॉ. शरद भुताडिया ह्यांनी सुध्दा एक छोटेसे अभिनंदनपर आणि कौतूकपूर्ण पत्र माझ्यासाठी लिहून ठेवले होते. ह्या मोठया कलांकारांकडून ऐन उमेदीच्या काळात पाठीवर थाप मिळणं माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट आणि अविस्मरणीय घटना आहे.

चित्रपट
Sonalikulkarni आई-बाबांनी सतत लहानपणापासून सांस्कृतितक कार्यक्रमात भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. नृत्य, संगीत, आणि क्रीडा ह्यांच्या जोपासने बरोबर मी पुण्यात सत्यदेव दुबेजीच्या ‘इथे शोधायची मजा’ ह्या कार्यशाळेत सहभागी झाले. त्याच दरम्यान श्री. गरीश कर्नाड त्यांच्या आगामी चित्रपटाच्या नायिकेच्या शोधात होते. मुलाखत, फोटोसेशन आणि स्क्रीन टेस्ट ह्या सगळयातून माझी ‘चेलूवी’साठी निवड झाली. चेलूवीत मी झाडाची भूमिका केली होती. गिरीशजींकडून मला त्यावेळेला भरपूर शिकता आले.

त्यानंतर अमोल पालेकरांबरोबर ‘दायरा’ आणि ‘कैरी’ करण्यात खूप मजा आली. अमोलजी कुठल्याही प्रकारच्या सृजनात्मक तडजोडी करीत नाही. डॉ. जब्बार पटेलांबरोबर ‘मुक्ता’ आणि ‘डॉ. आंबेडकर’ हे दोन चित्रपट माझ्यातल्या अभिनेत्रीला सुखावून गेले. दक्षिणेतला सुपरस्टार ‘मामूटी’ह्यांच्या बरोबर काम करतांना शिकायला मिळाले.

हिंदी सिनेमाच्या मुख्यप्रवाहात ‘दिल चाहता है’ ‘प्यार तुने क्या किया’ आणि ‘मिशन काश्मीरने’ मला खर्‍या अर्थाने मोठा प्रेक्षकवर्ग मिळवून दिला आहे. अनुक्रमे फरहान अख्तर, रामगोपाल वर्मा, आणि विधू विनोद चोप्रा हे दिग्दर्शक अतिशय अभ्यासू आणि मेहनती आहेत. प्रत्येक सीनचा त्यांचा बारकाईने अभ्यास झालेला असतो. दिल चाहता है’च्या वेळेला फरहानची पत्नी ऍ़डहोना हिने माझी केशरचना आणि ‘लूक’ संपूर्णपणे बदलला. ‘लडकी है कहा’ या गाण्याने मला भरपूर प्रसिध्दी दिली. ह्या गाण्याच्या दरम्यान नृत्यदिग्दर्शिका फराहा खान आणि माझ्या सहकलाकार सैफअली खान ह्यांची मला खूप साथ होती.

गुरींदर चढ्ढांचा ‘ब्राईड आणि प्रेजूडाईज’च्या दरम्यान मला ऐश्वर्या, नम्रता, आणि प्रिया सारख्या मैत्रिणी मिळाल्या. शुटींगच्या दरम्यान लंडन आणि अमेरिकेत घालवलेला काळ अत्यंत छान होता.

मी आत्तापर्यंत मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, इग्लिंश अशा अनेक भाषेतून काम केले आहे. सुदैवाने वेळोवेळी मला वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

परभाषेत काम करतांना मी देवनागरीत डायलॉग लिहून घेते. तसेच भाषेच्या लकबी व संस्कृती जाणून घेण्याचा अधिक प्रयत्न करते. हृयासाठी दिग्दर्शकांची मदत जरूर घेते.

ज्या वेळेला मी काम स्वीकारते त्यावेळेला दिग्दर्शक तसेच त्यातील पात्रांच्या व्यक्तिरेखेला अधिक महत्व देते. त्याच मुळे न पटलेल्या सिनेमांना मी ठामपणे नाही म्हणू शकले. लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांवर आणि माझ्या गुणांवर माझा विश्वास आहे. मला नाटक, चित्रपट, आणि मॉडलिंग ही तिन्ही माध्यम आवडतात. कारण तिन्ही माध्यमांचे ‘चॅलेजेस’ वेगळे आहेत. मी मुख्यत: कामाला महत्व देते, माध्यमांना नाही. भविष्यात कधीतरी मला दिग्दर्शन करायलाही आवडेल.

आगामी आकर्षण
मी ‘फुको डी सु मी’ म्हणजेच ‘फायर ऑफ माय हार्ट’ हा इटालियन चित्रपट करते आहे. ‘लंबेरतो लंबेरतिनी’दिग्दर्शीत ह्या चित्रपटात मी ‘ग्रेझीला’चे पात्र रंगवत आहे. चित्रपटात माझ्या बरोबर ऍ़केउमी पुरस्कार विजेते हॉलीवुड दिग्गज ‘ओमार शरीफ’ आहेत. चित्रपटासाठी मी इटालियन भाषा आणि त्यांच्या लकबी शिकून घेतल्या.

त्याचबरोबर मी एक गुजराती आणि एम.एफ.हुसेन ह्यांचा चित्रपट करते आहे.

छंद
Sonalikulkarni मला चित्रपट,नाटक ह्याचबरोबर लिखाण करायला आवडते. माझ्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पत्र लिहीत असते. ई-मेलच्या ह्या युगात पत्रात ओथंबलेल्या भावना मला अधिक भावतात. पोस्टाच्या पाकीटावर लिहिलेले आपलं नाव पाहून मी आजही लहान मुलांसारखे हस्ताक्षरातले पत्र अधीरपणे वाचते.

पत्र लिखानाबरोबर मला माझे विचार आणि अनुभव लिहायला आवडतात. मला कविता सुध्दा करायला आवडतात. मला वाचनाचीही आवड आहे. सध्या मी विजय तेंडूलकरांची कादंबरी ‘एक आणि दोन’ आणि मिलींद बोकील ह्यांची ‘शाळा’, सानियाचे ‘ओमियागे’ वाचून संपवले. मला अजून मेघना पेठे ह्यांचे ‘नातिचरामी’ वाचायचे आहे.

मला चटपटीत खायला खूप आवडतं. पण माझ्या आताच्या व्यवसायानिमित्त मी खाण्याबाबत अधिक सतर्क झाले आहे. मी साधारण रोज चाळीस मिनीटं जीममध्ये जरुर घालवते. लहानपणापासून क्रीडा, नाच आणि व्यायाम करत असल्यामुळे मी शुटीग दरम्यान अतिशय उत्साही असते तसेच माझा स्टॅमिनाही टिकून राहतो.

आवड
Sonalikulkarni रंग – आकाशी. आकाशाचा समुद्रात परावर्तीत झालेला रंग मला आवडतो.
कपडे – सर्व रंगांचे कपडे आणि प्रकारचे कपडे आवडतात. स्कर्ट, पंजाबी ड्रेस, साडया असे ‘फेमिमाईन’ कपडे अधिक आवडतात.
ठिकाण – पुणे-मुंबई हायवे, समुद्र किनारे, गड मला अजून कोकण पट्टा ग्रीस आणि ऍ़मस्टरडॅम पाहायचे आहे.
सहकलाकार – सैफअलीखान, अमीरखान, प्रिटी झिंटा,ऐश्वर्या राय….यादी खूप मोठी होईल.
दिग्दर्शक – अमोल पालेकर, फरहान अख्तर, विधू विनोद चोप्रा, राजगोपाल वर्मा, सुमित्रा भावे…अगदी मी काम केलेल सगळे. जुन्या जमान्यातले सत्यजीत रे तसेच शेजारींचे.
मला सुधीर घोष, ऋतुपर्ण घोष, मणिरत्नम, गौतम घोष, ह्यांच्याबरोबर काम करायला आवडेल.
कलाकार – काजोल, मला तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. माधुरी दिक्षीत, नसीरुद्दीन शहा, अमिताभ बच्चन,ऍ़न्ड्री हेपबर्ग.
मेकअपमन – श्रीधर, माझा स्वत:चा मेकअपमन
फोटोग्राफर – अमलेंदू चौधरी, ह्या माझ्या मित्राने माझे पहिले फोटोसेशन केले होते
पदार्थ – पाणीपुरी, भेळ, शेवपुरी, चिवडा कुठलेही चटपटीत पदार्थ
भाषा – माझे मराठी भाषेवर अत्यंत प्रेम आहे. पण ह्या प्रेमाचे प्रदर्शन किती करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. इंग्रजी ही ‘ग्लोबल भाषा’ असल्याने ती शिकणे आवश्यक आहे. मी माझे इग्रंजी सुधारावे म्हणून व्याकरण, ‘व्होकॅबलरी’ कडे जास्त लक्ष दिले. तसेच काही इंग्रजी नाटक केली.

सध्या जे इंग्रजाळलेले मराठी सगळीकडे बोलले जाते. त्याची मला अत्यंत चीड आहे. गरज म्हणून आणि प्रोफेशन म्हणून इग्रंजीचा वापर मान्य आहे पण निदान घरी तरी शुध्‍द मराठी बोलेले पाहिजे तरच मराठीचे अस्तित्व टिकून राहील.