साहित्य – १ किलो मलईचा चक्का, १ किलो साखर, १०-१२ वेलदोडयांची पूड, थोडी जायफळ-पूड, ५० ग्रॅम चारोळी, १० ग्रॅम पिस्ते, १० ग्रॅम काजू, थोडेसे केशरी रंग, थोडे दूध (साधारण १ ते दीड कप), १/४ मीठ.
कृती – पुरणयंत्राला मधली (फार मोठी किंवा फार बारीक नसलेली) जाळी लावून घ्यावी व त्यात १ डाव चक्का व १ डाव साखर यंत्रामधून फिरवून घ्यावे. थोडया दुधात खललेले केशर भिजत घालावे व थोडया दुधात केशरी रंग घालावा, नंतर हे संगीत दूध व केशर चक्क्यात घालावे व मिश्रण हाताने सारखे करावे. योग्य तो रंग आला की त्यात मीठ, वेलदोडयांची पूड व थोडे दूध घालून ढवळावे. श्रीखंड डावेने वाढता येईल इतके घट्ट असावे. चारोळ्यापैकी अर्ध्या चारोळ्या श्रीखंडात मिसळाव्यात. सर्व श्रीखंड शोभिवंत भांडयात काढून वर उरलेली चारोळी, काजू-पिस्त्याचे काप पसरावेत. श्रीखंड शक्यतो आदल्या दिवशी करावे म्हणजे मुरल्यावर अधिक रुचकर लागते.
साहित्य – अर्धा किलो मैदा, १ टे. चमचा डाळीचे पीठ, १ चमचा तांदुळाचे पीठ, ४ चमचे दही, २ लिबांचा रस, २ चमचे डालडा, ७५० ग्रॅम साखर, जिलेबी तळण्यासाठी तूप अर्धा किलो.
कृती – जिलेबी करण्याच्या आदल्या दिवशी परातीत डालडा फेसून घ्यावा, नंतर त्यात मैदा, डाळीचे व तांदुळाचे पीठ घालावे, त्यात दोन लिबांचा रस व दही घालावे व कोमट पाण्याने भज्याच्या पिठापेक्षा जरा घट्ट पीठ भिजवावे. पिठात गुठळी राहू देऊ नये. नंतर हे स्टीलच्या डब्यात घालून रात्रभर झाकून ठेवावे. दुसर्या दिवशी साखरेत २ फुलपात्रे पाणी घालून एकतारी पाक करावा. पाकात थोडे केशर, केशरी रंग व रोझ इसेन्स घालावा. लहान परातीत भरपूर तूप घालून परात गॅसवर ठेवावी. जिलेबी करण्यापूर्वी पीठ खूप घोटून घ्यावे. नारळाची करवंटी स्वच्छ करून त्यातील तीन डोळयांपैकी एक डोळा फोडून त्यात डावेने पीठ भरून परातीत जिलेबीची गोल गोल वेढी घालावीत. ५-६ जिलेब्या एका धारेने सुट्या कराव्यात. उलटून तळाव्यात व विणायच्या सुईने उचलून जरा निथळून पाक गरम असतानाच पाकात टाकाव्यात. पहिल्या जिलेब्या पाकात टाकल्या की परातीत दुसर्या जिलेब्या घालाव्यात.
टीप – थंडीच्या दिवसात एक दिवस अगोदर पीठ भिजवावे म्हणजे पीठ छान आंबते व जिलेबी चांगली होते.
साहित्य – ४ लिटर दूध, अडीच ते तीन वाटया साखर, १०-१५ वेलदोडयांची पूड, ५० ग्रॅम काजू, १० ग्रॅम पिस्ते.
कृती – प्रथम सगळे दूध उकळून घ्यावे. डावाने ढवळून साय त्यातच विरघळवावी, नंतर पितळी परात गॅसवर ठेवून, त्यात २-३ कप दूध घालून स्टीलच्या उलथन्याने ते ढवळावे. दूध आटले/किंचीत बदामी रंगावर आले की दुसर्या पातेल्यात ओतावे. अशा तर्हेने सर्व दूध आटवून घ्यावे नंतर त्यात साखर घालून ढवळावे. दूध परातीला खाली लागू देऊ नये. अन्यथा सर्व बासुंदीला जळका वास लागतो. साखर विरघळली की आटलेले दूध खाली उतरवून त्यात अर्धवट कुटलेल्या चारोळया व वेलची पूड घालून ढवळावे. नंतर तयार झालेली बासुंदी शोभिवंत भांडयात काढून त्यावर काजू, पिस्त्याचे काप पसरावेत. बांसुदी शक्यतो एक दिवस आधी करून फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे जास्त चविष्ट लागते.
साहित्य – अर्धा किलो पॉलिशचे पांढरे तीळ, अर्धा किलो चिक्कीचा गूळ, अर्धा पावशेर डाळे, अर्धा पावशेर सोललेले शेंगदाणे, अर्धा वाटी खोबर्याचा किस, ७-८ वेलदोडयांची पूड.
कृती – तीळ भाजून घ्यावेत, नंतर गुळाखेरीज सर्व वस्तू एकत्र करून त्याचे दोन भाग करावेत, गूळाचेही दोन भाग करावेत. जाड बुडाच्या पातेल्यात गूळ घालून गॅसवर ठेवावा. थोडया वेळात गूळ पातळ होईल, सतत गूळ हलवत रहावा. गूळ पातळ झाला की त्यात एक चमचा तूप घालून वरील तिळाच्या मिश्रणाचा एक भाग व शेंगदाणे व वेलदोडयांची पूड घालावी. जरा हलवून तूप लावलेल्या ताटात वरील मिश्रण ओतावे. लगेचच छोटे छोटे लाडू वळावेत. हे लाडू कडक पण कुरकुरीत होतात.
साहित्य – २ भांडी हरभरा डाळ, २ भांडी गूळ, अर्धे जायफळ पूड, ५-६ वेलदोडयांची पूड, २ वाटया कणीक, ४ टेबलस्पून कडकडीत तेल, चिमूटभर मीठ.
कृती – हरभरा डाळ निवडून धुवून शिजवून घ्यावी व चाळणीवर टाकून पाणी निथळून घ्यावे. डाळ डावाने एकजीव घोटावी व गूळ घालून पुरण शिजवावे, त्यात जायफळ व वेलदोडे पूड घालावी, हे पुरण वाटायचे नसते म्हणून डाळ चांगली घोटून घ्यावी. २ वाटी कणकेत चिमूटभर मीठ व ४ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून कणीक घट्ट भिजवावी व झाकून ठेवावी. कणकेचे सारखे पुरीसाठी १७ ते १८ गोळे करावेत व एका गोळयाची पुरी लाटावी.
शिजवलेले १ टेबलस्पून पुरण पुरीच्या मधोमध ठेवावे व पुरीच्या दोन्ही बांजूनी पुरणावर घडी घालावी, लांबट आकार होईल. मग बाजूच्या दोन्ही बाजूंची घडी एकमेकांवर घालावी. चौकोनी आकाराची दिंड तयार होतील, अशी सर्व दिंड करावीत. मोदकपात्रात किंवा चाळणीत मलमलचे फडके टाकून दिंड ठेवावीत व पाण्याच्या वाफेवर मोदकपात्रात अथवा कुकरमध्ये उकडावीत. उकडलेली दिंड साजूक तुपाबरोबर खायला द्यावीत, वरील साहित्यात १८ ते २० दिंड होतील. हे नागपंचमीचे खास पक्वान्न आहे.
साहित्य – ३ वाटया जाडसर दळलेली कणीक, २ वाटया चिरलेला गूळ, ६ टेबलस्पून तेल, चिमूटभर मीठ, खायचा सोडा, अर्धी वाटी साखर (भरपूर गोड आवडत असल्यास).
कृती – पातेल्यात अर्धी वाटी पाणी, गूळ व साखर एकत्र करून गूळ विरघळेपर्यंत पाणी उकळवावे. त्यात ६ टेबलस्पून तेल घालावे व पाणी परातीत घालावे. कोमट झाल्यावर चिमूटभर सोडा घालून कणीक घालून व पीठ भिजवावे व त्या पिठाचे पेढ्याएवढे गोळे करून त्यांना दिव्याचा आकार द्यावा. चाळणीवर मोदकपात्रात मलमलचे फडके टाकून त्यावर दिवे ठेवून पाण्याच्या वाफेवर अथवा कुकर मधे उकडावीत. साजुक तुपाबरोबर खायला द्यावेत.