पक्वान्ने


मोदक विविध प्रकार

पुरण पोळी

साहित्य – १ किलो हरभर्‍याची डाळ, अर्धा किलो उत्तम गूळ, अर्धा किलो साखर, १०-१२ वेलदोडयांची पूड, थोडेसे केशर, पाव जायफळाची पूड, १ फूलपात्र रवा, १ फूलपात्र कणीक, २ फूलपात्री भरुन मैदा, १ वाटी तेल, चवीपुरते मीठ.

कृती – हरभर्‍याची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून प्रेशरकुकरमध्ये शिजत घालावी. शिजतांना त्यात थोडे तेल व हळद घालावी. डाळ चांगली शिजली की टोपलीत उपसून टाकावी. सर्व पाणी निथळले की डाळीत चिरलेला गूळ व साखर घालून डाळ पुन्हा गॅसवर शिजवावी. पूरण चांगले घटृट शिजले पाहिजे. डाव पुरणात न पडता उभा राहिला म्हणजे पुरण शिजले असे समजावे. नंतर शिजलेल्या डाळीत पाव चमचा मीठ, जायफळ, वेलदोडयाची पूड व केशर घालावे व रवा भिजत घालावा. नंतर त्यात मैदा, कणीक व मीठ घालून पीठ जरा सैलसर भिजवावे. नंतर त्यात थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी. साधारणपणे पोळीच्या कणकेपेक्षा ही कणीक सैलसर असते. नंतर ह्या कणकेच्या पारीत पुरण भरून हलक्या हाताने तांदुळाच्या पिठीवर पोळया लाटाव्यात. पोळी तव्यावर टाकताना लाटण्यावर गुंडाळून टाकावी व दोन्हीकडून लालसर डाग पडेपर्यंत भाजावी.

टीप – पूरणपोळी वाढताना त्यावर भरपूर साजूक तूप वाढतात. कहींना दूधाबरोबर पूरणपोळी खायला आवडते.

गुळाची पोळी

gulachi-poli साहित्य – अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ, ५-६ वेलदोडयांची पूड, १ चमचा खोबर्‍याचा कीस, अडीच चमचा डाळीचे पीठ, २ वाटया कणीक, १ वाटी मैदा, २ लहान चमचे तूप.

कृती – कणीक, मैदा व अडीच चमचा डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गुळ किसून घ्यावा. तीळ, खसखस व खोबर्‍याचा किस भाजून घ्यावे व नंतर कुटून घ्यावे. अडीच चमचा डाळीचे पीठ थोडया तुपावर चांगले भाजून घ्यावे. वेलदोडयांची पूड घालून सर्व एकत्र मळून घ्यावे. नंतर कणकेच्या दोन लाटया जरा लाटून घ्याव्यात. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटावी. तव्यावर खमंग भाजावी. गुळाच्या पोळया गारच चांगल्या लागतात, म्हणून अगोदरच करून ठेवाव्यात. त्या थोडयाशा कडकच होतात व खूप दिवस टिकतात.

रताळ्याचे पुरण

ratalyacha-puran साहित्य – पाव किलो रताळी, पाव किलो साखर, विलायची पूड, दोन वाट्या कणिक, पोळी लाटण्यासाठी पीठ.

कृती – रताळी उकडून घ्या. कुकर मध्ये तीन शिट्ट्या करून थंड झाल्यावर साले काढा. किसणी वर लगदा करून त्यात साखर घालून शिजवा. पुरण शिजवताना जसा घट्ट गोळा होतो तसे घट्ट होई पर्यंत हलवत रहा .घट्ट गोळा थंड होऊ द्या. विलायची पावडर घाला. कणिक नेहमी सारखी भिजवून गोळा तयार करा. कणकेची पारी तयार करून त्यात पुरण भरा. पीठ पोळपाटावर पसरवून हलक्या हाताने पोळी लाटा. निर्लेप तव्यावर खरपूस शेका. चांगले तूप वरती सोडून गरम खायला द्या.

रताळी पिष्टमय पदार्थ आहे. या मधून भरपूर उष्मांक मिळतात. नेहमीच्या हरभरा डाळीचे पुरणपेक्षा चव वेगळी आणि छान लागते.

शेवयांची खीर

shevyachi-khir साहित्य – बाजारात मिळणार्‍या बारीक शेवया २ वाटया, ५ वाटया दूध, १ चमचा साजूक तूप, ५-६ वेलदोडयांची पूड, ३/४ बदामाचे काप, बेदाणे, चारोळी, १ वाटी साखर.

कृती – जाड बुडाच्या पातेलीत दूध घालून सतत ढवळत गॅसवर निम्मे होईपर्यंत आटवून घ्यावे. शेवया हाताने थोडया मोडून दुसर्‍या पातेल्यात मंद गॅसवर तुपात गुलाबीसर भाजाव्यात. भाजलेल्या शेवयांवर आटवलेले दूध घालावे, चांगले उकळले की साखर घालावी व एक उकळी येऊन साखर विरघळली की उतरवावे. गार झाल्यावर वेलची पूड व एच्छिक बदाम, बेदाणे घालावे.

घावन – घाटले

ghavan-ghatle साहित्य – तांदूळाचे पीठ, पाणी, मीठ.

कृती – धुवून सावलीत वाळवलेल्या तांदुळाचे पीठ करून घ्यावे. त्यात थोडे मीठ घालून पाण्यात किंवा दुधात भिजवावे. सपाट तव्यावर तेल घालून त्यावर ह्या पिठाचे धिरडे घालावे ह्यालाव घावन असे म्हणतात. हे घावन घाटल्याबरोबर छान लागते.

घाटले

साहित्य – ५ वाटया पाणी, १ वाटी चिरलेला गूळ, अर्धी वाटी तांदुळाचे पीठ, दीड वाटी खवलेले ओले खोबरे, अर्धा चमचा मीठ, ८-१० वेलदोडयांची पूड.

कृती – प्रथम एका पातेल्यात पाणी मोजून घ्यावे व उकळायला ठेवावे. त्यात चिरलेला गूळ, खोबरे, मीठ व वेलदोडयांची पूड घालावी. अर्धी वाटी तांदूळाचे पीठ १ वाटी पाण्यात कालवून वरील उकळत्या पाण्यात ओतावे व जरा दाटसर झाले की उतरवावे. निवल्यावर घाटले घट्ट होते म्हणून फार दाट करू नये.

टीप – भाद्रपदातील गौरीजेवणाला घावन-घाटल्याचा नैवेद्य दाखवतात.

लाल भोपळयाची खीर

lalbhoplyachi-khir साहित्य – लाल भोपळा अर्धा किलो, दूध एक लिटर, साखर ३०० ग्रॅम, वेलची, जायफळ पूड, चारोळी, काजू.

कृती – लाल भोपळयाच्या फोडी तुपावर परतून कंकरमध्ये वाफवून मिक्सरमधून ग्राईड करा. नंतर दूधामध्ये घालून साखर घालून उकळायला ठेवा. सात आठ उकळया आल्या की बंद करा, वरून वेलची, चारोळी, काजुचे तुकडे टाका. लाल भोपळयात व दूधात भरपूर कॅल्शियम असल्याने लहान मुले, गरोदर स्त्रिया व वयस्कर मंडळीसाठी ही खीर उत्तम.