संकेत आणि शर्मिका

आपली दोन्ही मुलं कला क्षेत्रात नाव कमावतांना बघून प्रत्येक आईवडिलांना कौतूक वाटणं साहजिकच आहे. व्यवसायाने डॉक्टर असणा-या जोशी दांपत्याची संकेत आणि शर्मिकाही मुलं सरधोपट मार्गाने न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्रात आगेकूच करीत आहेत. ‘स्वर संकेत’ कार्यक्रमा निमित्ताने संकेत आणि शर्मिकाची कला बघण्याचा योग आला. ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे’ हया गीताने कार्यक्रमाची सुरूवात करून संकेत जोशी या युवकाने भक्तीगीते, चित्रपट गीते, नाटयगीते सादर करून आपले कौशल्य दाखवून दिले. हिन्दी चित्रपटातील गाणी, कव्वाली, गझल व शास्त्रीय संगीतही त्याने अत्यंत प्रभावीपणे सादर केली. त्याचीच धाकटी बहिण शर्मिकाने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शर्मिकाच्या सूत्रसंचालनात सहजता होती, शेरो शायरी होती व मनोरंजनही होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठीवर्ल्डने जोशी कुटूंबीयाशी मारलेल्या गप्पा.

sharmika आम्ही आमच्या कार्यक्रमातून आमची कला सादर करतो व आम्हाला रसिक प्रेक्षकांची दाद मिळते याचे श्रेय आईवडिलानांच आहे कारण आमच्या अगदी लहानपणीपासून आमच्या कलागुणांची वाढ होण्यास ते प्रयत्नशील राहीले’ संकेत आणि शर्मिका यांनी नम्रपणे सांगितले. संकेत मुंबईच्या सोमय्या महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनीयरींगच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असून त्याला अमेरिकेतील अरीझोना युनीव्हर्सीटीमध्ये एम.एस. कॉम्प्युटर्सच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. शर्मिका १२वी च्या वर्गात शिकत आहे. त्यांच्या संगीत साधनेमुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले नाही. त्यातही त्यांची उत्तम प्रगती आहे.

संकेतने वयाच्या ४थ्या वर्षापासून ‘धडाका’, ‘मैफल’, ‘बरसती स्वरांच्या धारा’ अशा कार्यक्रमातून भाग घेऊन आपली कला सादर केली आहे. १९९३ मध्ये औरंगाबाद येथे’लोकमत रंगारंग’ कार्यक्रमातही संकेतने आपली कला सादर केली. याच कार्यक्रमात शर्मिकानेही भाग घेतला. तत्कालीन गृहमंत्री राजेंद्र दर्डा यांनी या बालकलाकारांना संगीतकार कल्याणजी यांच्यासमोर आपली कला सादर करण्याची संधी दिली आणि त्यांच्या कलाकार म्हणून वाटचालीस सुरूवात झाली. संकेतचे संगीताचे शिक्षण गुरू श्री. विश्वनाथ ओक याचेकडे चालू होते.श्री. कल्याणजी यांचेकडूनही मार्गदर्शन होत होते. शर्मिकाची वाटचाल सूत्रसंचालनाकडे चालू होती.

कल्याणजी भाईंनी त्यांच्यातील गुणांना विकसीत केले. ‘आम्ही औरंगाबादहून वरचेवर मुबंईस येत होतो. मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत होते. अखेर आमची औरंगाबादची प्रॅक्टीस सोडून आम्ही ठाणे येथे रहावयास आलो.’ डॉ. वंदना जोशी सांगत होत्या. संकेत आणि शर्मिका अनेक वर्षे कल्याणजी आंनदजीच्या ‘लिटल वंडर्स’ कार्यक्रमात सहभागी होते. 1995या पुणे फेस्टीवलमध्ये संकेतने आपले गाणे सादर केले तर शर्मिकाने सूत्रसंचालन केले.

sanket ‘संकेतच्या गायनाला अनेक स्पर्धामध्ये बक्षीसे मिळाली आहेत’. अखिल भारतीय जैन संगीत स्पर्धा, टीव्हीएस सारेगाम, हैद्राबाद येथील ‘भजन संध्या’ यामध्ये त्याला बक्षीसे मिळाली आहेत व संगीत प्रेमींची शाबासकीही. डॉ. राजन जोशी आपल्या मुलाबद्दल कौतुकाने सांगत होते. शर्मिकाचं सूत्रसंचालन ४०व्या फिल्मफेअर ऍवार्ड फंक्शनमध्ये अनेक मान्यवरांच्या कौतुकाचा विषय ठरले. ‘दो हजार एक’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून शर्मिकाने कामही केले होते. ‘लिटल वंडर्स’च्या अमेरिकेतील अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिनेच केले होते. शेखर सुमन यांच्या ‘मुव्हर्स ऍन्ड शेकर्स’ मध्येही तिला निमंत्रित केले होते.

माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या समोर त्यांच्या कविता सादर करण्याची संधीही शर्मिकाला मिळाली. अनेक मान्यवरांनी शर्मिकाचे सूत्रसंचालनाबद्दल कौतुक केले आहे. संकेत आणि शर्मिका आपआपल्या कलेच्या विकासासाठी प्रयत्न करीत असतात. हिंदी गाणी गाताना उर्दु शब्दांचे उच्चार योग्य असावेत यासाठी संकेत उर्दु भाषा शिकला आहे.

शर्मिका आपले सूत्रसंचालन अधिक अभ्यासपूर्ण व्हावे म्हणून प्रयत्नशील असते. संकेतला एक यशस्वी कॉम्प्युटर इंजिनीयर व गायक व्हायचे आहे तर शर्मिका आपल्या सूत्रसंचालनात सर्वोत्कृष्ट होण्याचे स्वप्न बाळगून आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठीवर्ल्डच्या शुभेच्छा.