घरातील वातावरण पूर्णत: शिक्षणाला महत्त्व देणारं. घरात कोणी प्राध्यापक तर कोणी शिक्षक तर कोणी मुख्याध्यापक. त्यामुळे अभिनय क्षेत्रात करियर करायचं असं काही ठरविलेलं नव्हतं. मराठीत एम.ए. करुन अथवा पीएचडी करुन साहित्यिक क्षेत्रात करियर करायचं होतं. पण बारावीला असताना ‘द क्रो’ नावाच्या एकांकिकेत काम केलं. त्या एकांकिकेत मला अभिनयाचं बक्षिस मिळालं. त्यानंतर अशा अनेक एकांकिकेत काम करत गेले. शालेय जीवनात इयत्ता नववीत असतांना मी एक बालनाटय देखिल केलं होतं. त्याचे बरेचसे प्रयोग केले. बी.ए. च्या शेवटच्या वर्षाला असताना व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक केलं ते म्हणजे ‘आईचं घर उन्हाचं’. या नाटकात मी दिलीप व नीना कुळकर्णी समवेत काम केलं होतं. या दरम्यानच रीमा लागू यांनी ‘घर तिघांचं असावं’ या नाटकाकरिता माझी निवड केली. आणि नकळतपणे अभिनय क्षेत्रातील माझा प्रवास सुरु झाला.
‘आईचं घर उन्हाचं’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगानंतर नीना कुळकर्णी मेकरुममध्ये आल्या व मला मिठी मारुन सांगितलं की, ‘खूपच छान काम केलं’ हे सांगताना त्यांच्या डोळयात पाणी होतं. हा माझ्या अभिनय क्षेत्रातील माझा अविस्मरणीय अनुभव. कारण नीनाताई ह्या विजया मेहतांच्या पट्ट शिष्या. त्या दोघींची काम करण्याची पध्दतीही एकसमान अशी आहे. त्यामुळे त्यावेळेस मला असं जाणवलं की खुद्द विजया मेहताच माझं कौतुक करत आहे. अभिनय क्षेत्रात खूप चांगल्या कलाकारांबरोबर काम करताना खूपच छान अनुभव आले. खूप काही शिकायला मिळाले. रीमाजी तर नाटकाच्या वेळेस तीन तास स्वत:ला पूर्ण विसरुन त्या नाटकाचाच एक भाग होऊन जातात. सहज सुंदर अभिनय कसा करायचा हे मला नीनाताईंकडून शिकायला मिळाले. असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यांकडून खूप काही शिकायला मिळालं. सुदैवाने मला नेहमीच चांगल्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ‘मी फुलराणी’ मधील भक्तीताईंनी जी भूमिका साकारली, तशीच भूमिका नाही पण त्यांनी जे स्थान निर्माण केलं तसं स्थान मला मिळवायचं आहे. मग ते अभिनयातून असू दे किंवा इतर दुस-या माध्यमातून असू दे. विक्रम गोखलें बरोबर कधी काम केलेलं नाही पण मी त्यांना माझे गुरु मानते आणि भविष्यात संधी मिळाली तर त्यांच्याबरोबर काम करायला नक्कीच आवडेल.
‘ताक धिना धिन’ मध्ये निवेदन करणं म्हणजे माझ्या अभिनय क्षेत्राला मिळालेलं ते अचानक वळण आहे. ‘ताक धिना धिन’ च्या निर्मात्या नीना राऊत यांना आपल्या कार्यक्रमाकरीता निवेदिका पाहिजे होती. त्यांनी मला फोन केला आणि मी त्यांना भेटायला गेले. खूपच छान आणि हलक्या-फुलक्या गप्पा त्यांनी माझ्याशी मारल्या. त्यावेळेस मला असं जाणवलं ही नाही की त्या माझी परीक्षाच घेत आहे ते. या संगीतमय कार्यक्रमात एक फेरी अशी होती की, अमुक एक हिंदी अर्थाचं मराठी गाणं कोणतं? ‘झुमका गिरा रे’ या हिंदी गाण्याचं मराठी अर्थ असलेलं गाणं कोणतं अस विचारताच मी चटकन बोलले की, ‘बुगडी माझी सांडली गं’. निवेदिकेला लागणा-या या हजरजबाबी उत्तरामुळे माझी ‘ताक धिना धिन’ च्या निवेदनाकरिता लगेच निवड झाली. मी कथ्थक नृत्यांगना असून विशारद पूर्ण केलं आहे. डॉ. राजकुमार केतकर यांची मी शिष्या आहे. त्यामुळे सूर, ताल, लय या गोष्टी माझ्या अंगात भिनल्या असल्याने त्यांचा उपयोग मला ‘ताक धिना धिन’ कार्यक्रमाचे निवेदन करताना झाला.’शुभ मंगल’ या कार्यक्रमाचे देखिल मी निवेदन केले आहे. आता मी पी.सावळाराम यांच्या गाण्यावर आधारित ‘गंगा जमुना’ या कार्यक्रमाचे निवेदन करत आहे. या कार्यक्रमाचे निवेदन करताना मला माझी २१ वर्षाची तपश्चर्या उपयोगी पडत आहे.
नाटकात काम करताना अभिनयाचं जे समाधान मिळते, ते समाधान मालिका किंवा जाहिरातीतून मिळत नाही. नाटकात काम करताना एका मर्यादेत जागेत आपलं म्हणजे नाटकाच्या कथानकांचं विश्व उभं करायचं असतं. आपला आवाज, शाब्दिक पकड, आपले हावभाव, स्वरातील तीव्रता यांचे कसब असते. ‘मी खूप नाटकात, मालिकांमध्ये जास्त काम करत नाही त्यामुळे मी माझा बराचसा वेळ माझ्या कुटूंबाला देऊ शकते. फावल्या वेळात मुलीचा अभ्यास घेणे, तिला तिच्या अभ्यासात उपयुक्त पडेल असे चार्ट तयार करणे, पेंटिंग करणे, लेखन करणे, सणवार साजरे करणे या गोष्टी मी अट्टाहासाने करते. कारण मीच जर रांगोळी काढली नाही तर माझ्या मुलीला रांगोळीचे महत्त्व पटणार नाही. आणि माझ्या घरकुलासाठी, माझ्या कुटूंबातील व्यक्तींसाठी हे सर्व प्रेमाने करणं म्हणजे मला एक प्रकारे माझं करियरच वाटतं.
मला माझ्या पतींप्रमाणेच सासरच्या मंडळींचाही पूर्ण पाठींबा आहे. लग्नानंतर सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबाची झाले आणि तीन वर्षानंतर ‘वा-यावरची वरात’ या नाटकातून रंगमंचावर आले. माझ्यात असलेल्या कलागुणांना माझ्या सासरच्या मंडळींनी नेहमीच प्रोत्साहन दिले. माझ्या क्षमतेत जे जे शक्य आहे ते करण्याची मोकळीक मला मिळाली. आणि म्हणूनच कधी मी निवेदिकेच्या, कलाकाराच्या रुपात अभिनय क्षेत्रात वावरताना दिसते. कधी ‘आठवा सूर’ सारख्या कार्यक्रमातून नृत्य करताना तर कधी ‘बकुळ फूलं’ मधून लेखन करताना दिसते. दिग्दर्शन क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असून त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.
मला मराठीचा खूप अभिमान आहे. ही भाषा आपल्या घराघरातून आहे. पण त्याच्याउलट आज आंग्ल भाषेचे प्राबल्य वाढत आहे. भाषा कोणतीच वाईट नसते. आज इंग्रजीचा वापर व्यावहारिक दृष्टीकोनातून गरज असली तरी आपल्या मायबोलीला विसरु नका. ज्याप्रमाणे टागोरांनी आपली मायबोली मनातून सोडली नाही त्याचप्रमाणे आपली मायमाऊली मराठी मनातून सोडू नका. तिला जगवा. कारण इथल्या मातीला तिचा वास आहे. आपण मनातून, घरकुलातून मराठी असाल तर आपली भाषा, संस्कृती व तिचे महत्त्व पुढच्या पिढीला पटवून द्या’.
मुलाखत व शब्दांकन – अर्चना जोगळे