तो – बालनट, दिग्दर्शक, निर्माता अशा अनेक भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा.
ती – पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार घेऊन सुध्दा भारंभार चित्रपट न स्वीकारता काही मोजक्याच पण लक्षणीय भूमिकांमध्ये ठसा उमटवणारी.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया सबनीस ह्यांची जोडी ‘रील लाईफ’ मधून ‘रियल लाईफ’मध्ये एकमेकांची साथीदार झाली आणि आता तर लग्नानंतर ब-याच कालावधीनंतर ‘नच बलिये’ ह्या नाचाच्या रियालिटी शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांची वहावा मिळवत आहे. मराठीवर्ल्डने दोघांशी मारलेल्या दिलखुलास गप्पा.
‘नच बलिये’च्या निमित्ताने नाचण्याचा अनुभव कसा होता? हे सांगतांना सुप्रिया दिलखुलासपणे कबूल करते, ‘नाचाचं प्रशिक्षण घेतलं नसताना सुध्दा सचिन बरोबर नाचण्यात आव्हाहन आहे. आणि हो, त्याचबरोबर नव-यावरचं प्रेम सुध्दा मला व्यक्त करता येतयं.
स्पर्धेत दर्जेदार नृत्य सादर कण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतोय. तसेच आमच्या मुलीला श्रियाला आई-बाबांचा अभिमान वाटावा आणि प्रेक्षकांच्या पसंतीस आम्ही उतरावं असच आम्हाला नाचायच आहे. परीक्षकांबरोबर प्रेक्षकांच्या मतांचाही विचार केला जाणार आहे.’
सचिन उत्साहाने सांगतात, ‘मी शम्मीकपूरचा जबरदस्त फॅन आहे. त्यांच्यासारखे नाचता यावे म्हणून मी अगदी दोन वर्षांचा असल्यापासून प्रयत्न करायचो. पुढे चित्रपटात नाचलो. पण ह्या शोच्या निमित्ताने नाचतांना एक वेगळच थ्रील अनुभवतो आहे.’
सचिन-सुप्रियाच्या कारकिर्दीचा आढावा घेतांना आपणा सर्वांना माहितच आहे की सचिनने अभिनयाचे धडे ‘हाच माझा मार्ग ऐकला’ द्वारे श्री. राजाभाऊ परांजप्यांच्या तालमीत गिरवले. त्यानंतर अनेक मराठी-हिंदी चित्रपटांत बालनट म्हणून सचिनची यशस्वी कारकिर्द होती. आत्तापर्यंत सचिनने मराठी, हिंदी, भोजपूरी, इंग्रजी ह्या वेगवेगळया भाषांतून २०० चित्रपटांतून कामे केली आहेत.
त्याउलट सुप्रिया सबनीसांच्या घरात अतिशय सांस्कृतिक आणि मध्यमवर्गीय वातावरणात वाढली. मुंबईच्या ‘परांजपे विद्यालयात’ शिकणारी सुप्रिया तिच्या बाबांच्या प्रोत्साहनामुळे वक्तृत्व, कथाकथन, नाटय अश्या अनेक स्पर्धांत भाग घ्यायची. सुप्रिया पाचवीत असतांना दर शनिवारी तिचे बाबा शाळेतला स्पर्धांचा सुचना फलक बघायला जायचे. एका शनिवारी न जमल्यामुळे सुप्रियाला स्पर्धेत भाग घेता आला नाही. उशीर झाला ह्या कारणास्तव वर्गशिक्षिकेने स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. सुप्रियाचे बाबा तिला घेऊन थेट मुख्यध्यापिकेकडे गेले आणि सुप्रियाची पाठ असलेली नाटयछटा त्यांना ऐकवली. मुख्याध्यापिकांनी सुप्रियाचे हे गुण ओळखून दहावी पर्यंत पुढील प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यास तिला प्रोत्साहन दिले. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे आणि सुधा करमरकर ह्यांच्या सारखे दिग्गज सुप्रियाला परिक्षक आणि मार्गदर्शक लाभले होते.
सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर ‘किलबिल’ ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही ‘तरुण’ म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली.
सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने ‘नवरी मिळे नव-याला’ द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली. १९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली.
पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही. सुप्रिया ह्याबाबत मनमोकळे मत मांडते,’ लग्नानंतर मी काही वर्ष संसाराला प्राधान्य दिलं. त्यातच श्रियाच्या जन्मामुळे मी अधिकच गुंतले. तिचे संगोपन हेच माझं प्राधान्य होतं पण तरी सुध्दा जमेल तसे चित्रपट, आणि टि.व्ही. सिरीयल्स केल्याच की’ त्यातच सचिन म्हणतात, ‘खरं तर सुप्रियाने चित्रपटात काम करावं अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. पण माझ्या आईने सांगितलं, ‘तिच्यातल्या कलावंताला मारु नकोस.’ मलाही ते पटलं ‘माझा पती करोडपती’, ‘कुंकू’, ‘अशी ही बनवाबनवी’ अश्या ब-याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या ‘तू तू मै मै’ टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. नुकताच येऊन गेलेला ‘नवरा माझा नवसाचा’ ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली.’
सचिन-सुप्रिया ह्यांचे काम करतांना चित्रपटाच्या सेटवर संबंध अत्यंत व्यवसायिक आहे. बायको म्हणून सचिन सुप्रियाला गृहित धरत नाही. तसेच तिच्या सूचनांना प्राधान्य देतात. त्याउलट सुप्रियाला सचिन दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतात तेव्हा निश्चिंत वाटते. काही वर्षापूर्वी सुप्रियाने संजय छेलचा ‘खुबसुरत’ केला. त्याचबरोबर अमिताभ बच्चन बरोबर ‘ऐतबार’ मधे त्यांच्या पत्नीची भूमिका केली. ‘ऐतबार’ चित्रपट कसा मिळाला हे सांगतांना सुप्रिया सांगते की, तिचा ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट पहाण्यासाठी अमिताभ बच्चन आले होते. त्यांनीच सुप्रियाचे नाव ‘ऐतबार’साठी सुचविले. चित्रपटांच्या बरोबरीने ‘तू तू मै मै’, ‘क्षितीज ये नही’, ‘शादी नंबर वन’, ‘कभी बिबी कभी जासूस’ ह्या टि.व्ही. मालिकाही केल्या.
सचिनचे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक म्हणून अष्टपैलूत्व सिध्द झालंच आहे. पण त्याला स्वत:ला दिग्दर्शकाची भूमिका अधिक आवडते, पण त्याचबरोबर तो हे नमूद करतो की निर्माता स्वत: असल्यास दिग्दर्शक म्हणून अधिक स्वातंत्र्य आणि समाधान मिळतं. दिग्दर्शक म्हणून तडजोडी कमी कराव्या लागतात आणि निर्मीतीचा आनंद घेता येतो.
नाटक, चित्रपट आणि टि.व्ही. मालिका ह्यामधे सचिन चित्रपटाला अधिक प्राधान्य देतो. प्रेक्षकांची स्मरणशक्ती विचारात घेता ‘चित्रपट’ हा इतिहास ठरतो. त्याउलट सुप्रियाला नाटक अधिक अव्हानात्मक वाटते. तसेच तिच्यामते चित्रपट करतांना तांत्रिक गोष्टी माहित असाव्यात नाहीतर माहिती नसतांना अभिनय चांगला असला तरी खुलून येईलच असे नाही.
सुप्रियाचे वैशिष्टय असे की ती भूमिकेत सहज शिरते आणि भूमिकेतून बाहेर आल्यावर अभिनेत्री म्हणून न वागता साधेपणाने राहते. त्यामुळे कोणाला ती ‘स्टार’ वाटत नाही ह्याचे फायदे आहे तसे तोटेही आहेत.
दोघांच्यामते श्रियामुळे त्यांचे आयुष्य ख-या अर्थाने पूर्ण झाले आहे. सचिन म्हणतो, ‘श्रियामध्ये सुप्रियाचा प्रेमळपणा, स्पर्धात्मक दृष्टीकोन आणि चक्क गालाला पडणा-या खळयासुध्दा हुबेहुब आहेत.’
सरते शेवटी मराठीवर्ल्डच्या वाचकांना संदेश देतांना सचिन-सुप्रिया म्हणतात ‘मराठी भाषेवर प्रेम करा. मराठी साहित्य नाटक आणि चित्रपट ह्यांचा आस्वाद घ्या. पण, प्रेक्षकहो, मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा आणि आम्हा कलावंताना प्रोत्साहन द्या.’
असे हे जोडी नं १ असणारे सचिन-सुप्रिया! कलेचा वारसा दोघेही पुढच्या पिढीपर्यंत पोहचवत आहेत. त्यांच्या दर्जेदार कलाकृती भविष्यात पहायला मिळो ही शुभेच्छा!
मुलाखत – पूर्णिमा पारखी