अनेक मराठी वाहिन्यांवरुन सर्व परिचित झालेलं एक नाव, हस-या चेह-याची अभिनेत्री म्हणून आणि नंतर पटकथाकार म्हणून सर्वश्रुत झालेली रोहिणी निनावे. मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी तिच्याशी झालेल्या गप्पा, तिच्यासारख्याच मनमोकळ्या भाषेत…..
रोहिणी निनावे तुमच्या बद्दल सामान्य प्रेक्षकाला माहिती असते, पण तुम्ही पडद्यावर फार वेळा येत नाही असं का?
असं नाहीये. उलट मला वाटतं, पटकथा लिहिणा-यात माझ्याच मुलाखती जास्त झाल्या असतील. मी फक्त मोठया कार्यक्रमात स्टेजवर जात नाही. मला भाषण करता येत नाही ना ? आणि दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्रात पटकथा लिहिणा-याला फारसं वलय नसतंच.
पहिल्यापासून लेखक या पठडीतील तुम्ही नाही. मग लिहायला कधी पासून सुरुवात झाली?
मी खूप आधीपासूनच लिहीत होते. माझे वडील वसंत निनावे हे स्वतः कवी असल्याने घरात तशी आवड निर्माण होणं साहजिकच. आमच्याकडे उर्दूमधील कविता, गजलांची सुद्धा खूप पुस्तके होती. उर्दू डिक्शनरी सुद्धा. त्यामुळे बरेचसे उर्दू शब्द आम्हाला चांगले समजायचे. माझ्या बाबांनाही सुरुवातीला वाटलं, करत असेल कविता, पण जेव्हा चांगल्या मोठया स्पर्धांतून पारितोषिकं मिळू लागली, तेव्हा बाबांनाही खात्री झाली की मी चांगलं लिहू शकते. बाबांची प्रतिभा निर्विवादच. त्यांची खूप इच्छा होती की निवृत्त झाल्यावर सगळा वेळ आपण याला वाहून घ्यायचं, खूप लिहायचं, पण दुर्देवाने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. ज्या दिवशी ते निवृत्त झाले, त्याच दिवशी त्यांना मृत्यू आला. आम्हां सगळ्यांना ही गोष्ट फारच लागून राहिलीय. त्यांनी मला लिहीतांना बघणं, हेही राहून गेलं. मला सहज म्हणून काहीजणं म्हणतात, “रोहिणी, तुझ्याकडून तुझ्या बाबांची इच्छा पूर्ण होतेय, नाहीतर इतक्या सातत्याने लिहीत राहणं सोपं नाही.”
मी सरकारी नोकरीत. माहिती आणि जनसंपर्क खात्यात गॅझेटेड अधिकारी. त्यामुळे नोकरी सोडून पूर्णवेळ लिहीणं मला जमलंच नसतं, परवडणारही नव्हतं. बाबा गेल्यावर तर अजिबातच शक्य नव्हतं. आम्ही तेव्हा वांद्रयात रहायचो. तेव्हाही मी लिहीत होतेच. ऑफिस सुटल्यावर इकडे अंधेरीत यायचं, भेटीगाठी काही कामं, हे सगळं करुन आई घरी एकटी असल्यामुळे घरी परतायची घाई, असं सगळं चालायचं. नंतर काही दिवसांनी आई गेली. मग मात्र पूर्ण वेळ लिहीणं सुरु केलं. माझी बहीण व भाऊ दोघेही नाशिकला आहेत. माझी भावजय शमा तर मालिकांमध्ये काम करतेच आहे. तिचं आणि माझं फार चांगलं जमतं आम्ही दोघी मैत्रिणीच आहोत.
मालिकांसाठी स्क्रिप्ट लिहीणं कसं सुरु झालं?
सुरुवातीला मालिकांमध्ये काम करायचे. प्रतिबिंब, संघर्ष, गिनीपिग, घरोघरी, अशा मालिकांमधून. लिहायला सुरूवात झाली ती खरी शीर्षक गीतांनी. संस्कार, अग्निपरीक्षा, लढा, घरकुल इ मालिकांसाठी लिहीत गेले. नंतर अधिकारी बंधूंनी पत्रकाराच्या जीवनावर लिहायला सांगितलं आणि दामिनी लिहिली गेली. लिहिल्यावर तब्बल ५ वर्षांनी ती टीव्ही वर आलीय. त्यानंतर, घरकुल, भाग्यिवधाता, अल्बम…. सुरुच झालं. अवंतिकासारखा मोठा प्रोजेक्टही झाला. ऊन-पाऊसचे २५० भागांनंतरचे भाग लिहीतेच आहे. “क्षण एक पुरे” सारखं नाटकही लिहीलं.
मग कविता लिहिणं होतं की नाही आता?
आता नाहीच होत. पण याआधी माझा ‘इंतजार’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झालाय. त्याला गुलजारनी प्रस्तावना दिलीय.
अवंतिकासारखा मोठा प्रोजेक्ट करताना काही विशिष्ट अभ्यास ? कामाची पद्धत कशी आहे?
अभ्यास काही नाही. फक्त डोळे उघडे ठेऊन माणसं, त्यांचे स्वभाव वाचायला शिकायचं. आपल्या आजूबाजूच्या माणसांतूनच व्यक्तिरेखा मिळत जातात. मला वाटतं, अशा अभ्यासातून आलेल्या व्यक्तिरेखाच प्रेक्षकांना आपल्या वाटत असाव्यात. एखाद्याच वेळी अभ्यास करावा लागतो. काही विशिष्ट व्यक्तिरेखा, उदा डॉक्टर वकील, इ. असेल तर त्याचा नीट अभ्यास करावा लागतो. त्याची विचार करण्याची पध्दत, मग एखाद्यावेळी त्याच्या चेह-यावरील भाव काय असतील, त्याच्या तोंडी कोणतं वाक्य असावं, मग त्या क्षेत्रातल्या लोकांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा, हे सगळं होतं. पण आजूबाजूच्या माणसांना वाचणं हा सगळ्यात चांगला होमवर्क आहे.
अवंतिकाचा अनुभव कसा होता?
चांगलाच होता. ती सगळ्यांच्या घरातीलच एक बनून गेली होती. हे सगळं आपल्या जवळच घडतंय, अस प्रेक्षकांना वाटणं, हेच त्या मालिकेचं यश आहे.
स्मिता तळवलकरांबरोबर कामाचा अनुभव कसा आहे?
स्मिताताईंबरोबर खूपच छान टयुनिंग जमलंय. ते आमचंच होम प्रोडक्शन आहे असं वाटतं. त्यांना मी सहज सांगू शकते की हे मला नाही आवडलं, इथे असं करुया का? इ. इ. त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे.
मालिका प्रत्यक्ष चित्रित होत असताना तुम्ही सेटवर असणं महत्त्वाचं मानता का? सेटवर जाणं कधी होतं का?
फार कमी वेळा. त्यातले कलाकार निवडणं, त्यांच्याकडून काम करवून घेणं हे दिग्दर्शकाचं काम आहे. मी माझ्या सूचना सांगतेच पण कास्टींग मध्ये नेहमीच आपल्या मनासारखं होतं असं नाही. पण अवंतिका सारख्या मालिकेत अवंतिकेलाच बदलूया म्हटलं तर चालेल? अर्थात अवंतिकेच्या बाबतीत असं होण्याचा प्रश्नच नव्हता. स्मिताताईंचं कास्टींग एवढं अचूक जमलंय. कदाचित मृणाल एवढं तिथे कुणी फिट झालंच नसतं नाटकामध्ये मात्र लेखक तसा आग्रह धरू शकतो कारण तिथे त्यामुळे कलाकृतीतील प्रतिमा स्टेज वर उतरणं महत्त्वाचं मानलं जातं. इथे तसं नाही.
चांगल्या मालिका नंतर ओढत नेल्यासारख्या वाटतात आणि असं प्रत्येक चांगल्या मालिकेचं होतं, असं का?
ते मात्र विचारु नकोस. खूप वाईट वाटतं, कलाकारांच्या वैयक्तिक अडचणी, मध्येच सोडून जाणं, सगळ्या गोष्टींना सांभाळावं लागतं. इथे प्रत्येकजण व्यवहारी, व्यावसायिक असतो. मग हे सगळं करताना कॉम्प्रोमाईज कुठे, तर कथानकाशी. त्याचा परिणाम मग मालिका रटाळ होण्यात होतो. इथे आपण खरं काही करु शकत नाही. त्यातही आपल्या मराठीपेक्षा हिंदीत फार वाईट अनुभव येतात. माझा, आता लिहीणं हा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे. हे असं क्षेत्र आहे जिथे एकाच प्रोजेक्टवर अवलंबून रहाता येत नाही. एक वेळी कमीत कमी दोन प्रोजेक्टस हातात ठेवावेच लागतात. चांगल्या कलाकृतींचं मनापासून कौतुक झालं की बरं वाटतं. तसं कौतुक करणारी आणि प्रोत्साहन देणारी मोहन जोशी, शंकर वैद्यांसारखी माणसंही आहेत. तोंड देखले बोलणारेही आहेत. समोरच्याने दिलेले कौतुकाचे खरे शब्द कोणते आणि खोटे कोणते तेही कळतं. पण काही दिवसांनी अशा पातळीवर पोचायचंय जिथे माझी कलाकृती जशीच्या तशी पडद्यावर उतरेल.
मालिकांच्या दर्जाबाबत काय सांगाल? कारण हल्लीच्या मालिका एकाच पठडीतल्या असतात. त्यातही स्त्रीचीभूमिका एकतर अत्यंत दुबळी नाहीतर खलनायिकेच्या भूमिकेत असं का?
सामान्य प्रेक्षकाला हे सगळंच आवडतं असं नाही म्हणणार मी. पण मला असं वाटतं, स्त्रियांच्या बाबतीत आयुष्यात ब-याच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. सगळीकडे मन मारणं, ऍटजस्ट करणं हे होतच आलंय अजूनही होत रहाणार आहे त्यामुळे जेव्हा एखादं कॅरॅक्टर आपल्या मनातली, काही अंशी बंडखोर म्हणा, प्रतिमा घेऊन समोर येतं, उदा आपल्याला त्रास देणा-याचा सूड घेणारी स्त्री, मग ती खलनायिका का असेना. कुठे तरी एखादीच्या आयुष्याशी ती घटना जोडलेली असते शक्य असतं तर आपणही असंच केलं असतं, असं कुठेतरी वाटून मग अशा प्रकारच्या मालिकांना प्रतिसाद मिळतो आणि मग त्याच पठडीतल्या मालिका येत राहतात.
दुस-या बाजूला अभिरुचिसंपन्न प्रेक्षकांसाठी लिहीलं गेलं तर एकतर ते पडद्यावर यायला खूप व वेळ लागतो आणि सहज स्वीकारलं जात नाही. आणि म्हणूनच प्रतिमा कुलकर्णींसारख्या प्रतिभावान लेखिकेच्या मालिका जेव्हा लवकर संपल्या जातात तेव्हा खूप वाईट वाटतं.
आणखी कोणत्या प्रकारचं लिखाण करायची इच्छा आहे?
अभिरुची संपन्न प्रेक्षकांसाठी त्या क्लासचं लिखाण करायची इच्छा आहे पण अजून बराच वेळ लागेल. नाटकही लिहायचंय. एका प्रतिभावान अभिनेत्री व लेखिकेशी खूप मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. मराठीवर्ल्ड तर्फे तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देउन तिचा निरोप घेतला.
मुलाखत व शब्दांकन – प्रणिता नामजोशी