आपकी अदालत, प्रिया तेंडुलकर टॉक शो या कार्यक्रमांद्वारे दूरचित्रवाणीच्या छोटया पडद्यावर आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी रजनी आणि मराठी साहित्यविश्वात कथांनी आपली स्वतंत्र मोहर उमटवणारी बंडखोर लेखिका प्रिया. प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या. वडिलांतील बंडखोरपणाबरोबरच सर्जनशीलता व लेखनगुणांचा वारसाही घेऊन १९ ऑक्टोबर १९६० रोजी जन्माला आली.
लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. पण त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, पंचतारांकित हॉटेलात स्वागतिका, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका – अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या.
वडिलांबरोबर त्या नाटयसृष्टीत आल्या पण नंतर तेथे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ‘तो राजहंस एक’ हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी ‘बेबी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘सखाराम बाईंडर’, ‘कन्यादान’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘फुलराणी’ आदी नाटकांत भूमिका केल्या. शिरिष पै यांच्या ‘कळी एक फुलत होती’ या नाटकात वयाच्या अठराव्या वर्षी काम करण्याची संधी त्यांना लाभली.
बासू चतर्जींनी तिला ‘रजनी’ या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडुलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले. अगदी अलीकडे त्यांनी ‘प्रिया तेंडुलकर टॉक शो’ सुरू केला. या ‘शो’त त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांना स्थान दिले. त्याचबरोबर ‘अडोस-पडोस’, ‘जिंदगी’, ‘खानदान’, ‘बॅ. विनोद’, ‘हम पाँच’, ‘दामिनी’ यांसारख्या मालिकांतून त्यांनी आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले.
श्याम बेनेगल यांना १९७४ साली ‘अंकुर’ चित्रपट बनवताना त्यातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिला घ्यावेसे वाटले आणि ही अभिनेत्रीही बनून गेली. ‘गोंधळात गोंधळ’, ‘माळावरचं फूल’, ‘मायबाप’, ‘देवता’, ‘राणीने डाव जिंकला’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘माहेरची माणसं’, ‘सस्ती दुल्हन महँगा दुल्हा’, ‘कालचक्र’, ‘माझं सौभाग्य’, ‘हे गीत जीवनाचे’, ‘और प्यार हो गया’, अशा चित्रपटांत, त्यांनी भूमिका केल्या. गुजराती मराठी चित्रपटांतील काही भूमिकांबद्दल त्यांनी अभिनयाचे पुरस्कारही मिळवले.
आपल्या चित्राची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती. बी. ए. झाल्यानंतर जे. जे. मधून चित्रकला विषयातील प्रशिक्षणही दोन वर्षे घेतलेल्या प्रियाला केवळ चित्रकला शिक्षिका व्हायचे नव्हते. ‘जन्मलेल्या प्रत्येकाला’ हा तिचा कथासंग्रह दमाणी साहित्य पुरस्कार देऊन गेला. ‘जगले जशी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘जावे तिच्या वंशा’ आदी पुस्तकांनी तिला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळवून दिला. एक वेगळया वाटेने जाणारी कथालेखिका म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला.