भोजन पात्रे

सुवर्णाचे पात्र

सोनं हा अतिशय श्रेष्ठ धातू आहे. तो लवकर झिजत नाही. हवा,पाणी,प्रदुषण या कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. सुवर्ण हे शरीराची झीज भरून काढतं. तसचं त्याच्या नियमित वापराणे शरीराची झीज होण्याची प्रक्रियाही मंदावते. सोन्याच्या ताटात घेतलेलं जेवण हे वात, पित्त, कफ हे वाढल्यास या तिन्ही दोषांचा नाश करणारे तसेच डोळयांना अतिशय हितकर असते. सुवर्णाच्या ताटातील जेवण हे सदैव पथ्यकरच असते. गरम मसाला घालून केलेले मांसाहरी पदार्थ तसेच थंड दूध हे नेहमी स्वर्णपात्रात ठेवावे.

चांदीचे पात्र
चांदी हा अतिशय गुणवान धातू आहे. तो अत्यंत थंड असून उत्तम पित्तनाशक आहे. डोळयांकरिता अतिशय हितकर आहे. दूध, तूप, आमरस, भाताची पेज, कडधान्यांचे सूप तसेच रस नेहमी चांदीच्या भांडयातूनच सेवन करावेत.

काशाचे पात्र

कास्य म्हणजे ताम्र व वंग या दोहोंपासून तयार केलेला धातू होय. कांस्याच्या पात्रात जेवण घेतल्यास ते बुध्दीदायक ठरते. यातील जेवणाने तोंडालाही चव येते. हे पात्र रक्त आणि पित्ताची शुध्दी करणारे आहे. दही, दह्यावरील निवळ, ताक, कढी हे सर्व काशाच्या भांडयातून घ्यावेत. आता फक्त तळपायांची आग थांबविण्यासाठी कोकमतेल लावतांना काशाची वाटी वापरली जाते.

पितळेचे पात्र

पितळेच भांडं हे वातकारक आणि रुक्ष असूनही गुणाने उष्ण आहे. कृमी कफ आणि शूल यांचा नाश करणारं आहे. भात, भाज्या, आमटी यांसारखे पदार्थ पितळेच्या भांडयातूनच करावेत. ही भांडी वापरतांना एक खबरदारी घ्यावी की ती कल्हई करुनच वापरावीत.

तांब्याचं पात्र

पाणी पिण्याचे पात्र नेहमी तांब्याचेच असावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. अलिकडे केलेल्या एका संशोधनात असे अढळून आले आहे की, ८ तास पाणी तांब्याच्या भांडयात राहिल्यास त्यातील E-coli सारख्या अनेक जंतूचा नाश होतो. Water purifier सुध्दा या जंतूंचे पूर्ण उच्चाटन करु शकत नाही.

लोह पात्र

लोखंडाचं भांडं हे बल देणारे आहे, त्यात केलेल्या पदार्थांचे पूर्ण गुण शरीराला प्राप्त करून देतं. सूज, पण्डुरोग व कावीळ या रोगांचाही नाश करतं. तूप नेहमी लोखंडी भांडयातच कढवावं.

लाकडाचे पात्र

फार पूर्वीपासून आपल्याकडे आंब्याच्या तसेच सीसमच्या लाकडापासून भांडी बनविली जात असत. लाकडाच्या पात्रात जेवण तयार केल्याने त्याची रूची वाढते व ते कफ वाढवणारेही आहे.

पत्रावळ

झाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे तसेच विष व पाप यांचा नाश करणारे आहे. आपल्याकडे पाळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जातात. काही वेळा जेवण्याकरिता केळयाच्या किंवा कर्दळीच्या पानांचाही वापर केला जातो. बंगालमध्येही हीच पध्दत रुढ आहे. आपण मात्र मागासलेली, जुनाट म्हणून या पात्रावळी हळूहळू बाद करत आणल्या आहेत. व्यावहारिक दृष्टया यांना खर्चही कमी येतो आणि ती सवय निसर्गाच्या अधिक जवळ आणणारी आहे.

मातीचे पात्र

आले, जिरे सैंधव वादून ते मातीच्या भांडयाला आतून लावून मग त्यात दही विरजावे. असे दही, ताकच काय तर त्या पासून केलेले श्रीखंडही सुवाच्य आणि पौष्टिक असते. मातीच्या मडक्यावर – खापरावर भाजून केलेली भाकरी ही सुध्दा पचायला अतिशय हलकी असते.ऍल्युमिनियम आणि हिंडालियमया धातूची भांडी आजकाल खूपच वापरात येऊ लागली आहे. यामध्ये वस्तू साठवायला हरकत नाही. द्रव पदार्थ आणि आम्ल पदार्थ मात्र यात ठेवू नयेत, उकळू नयेत किंवा शिजवूही नयेत. कारण मग असे पदार्थ कॅन्सर सारख्या रोगाचे कारण ठरू शकतात