बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार जेवणाखाणाच्या पध्दती बदलल्या आहेत. आजच्या ‘झटपट’च्या व वेगवान युगात जेवणाच्या पंगती घालायला व त्यासाठी मोकळा वेळ काढायला कुणालाही फुरसद नाही. परंतु जुन्या काळच्या मराठी पंगतींमध्ये एक शान होती. ती कशी?
पूजा-अर्चा, मंगल कार्ये आणि सणाशी निगडीत असे विधी पार पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीची गडबड उडे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग असे. चौरंगांवर चांदीची ताटे, वाटया, तांब्या-भांडी मांडली जात. ताटाभोवती सुरेख महिरपींची रांगोळी रेखली जाई. मुख्य पाहुण्याच्या ताटाभोवती फुलापानांची सजावट होई. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागे. सनईवर संगीत सुरू होई. चांदीच्या समयांचा मंदसा प्रकाश वातावरण उजळून टाकत असे.
पंचपक्वान्नांचा बेत असे. ताटात डावीकडे मीठ, लिंबू, चटण्या, कोशिंबिरी, त्याखाली भजी, पापड, कुर्डया, गव्हल्याची खीर तर उजवीकडे बटाटयाची पिवळी धमक भाजी, अळूची पातळ भाजी, डाळिंब्यांची उसळ, मध्यभागी पांढ-या भाताची मूद, त्यावर घट्ट साधे वरण व तूप, त्याच्या थोडे वरच्या बाजूला मसाले भाताची मूद दिसे. त्याच्या वरच्या बाजूला मऊ , लुसलुशीत पुरणपोळी व त्यावर साजुकतुपाची धार असे. बाजूला केशरी जिलबीचे वेढे वाढले जात. श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम यांसारखे पदार्थ वाटयांमध्ये घालून त्या वाटया ताटात उजव्या बाजूला असत. एका पदार्थाची चव दुस-या पदार्थात मिसळली जाऊ नये म्हणून एका चांदीच्या वाटीत केशराचे पाणी ठेवलेले असे. यजमानांनी ‘वदनी कवळ घेता’ ची सुरुवात केली की सर्व अतिथी त्या आवाजात आवाज मिळवीत. कुणीतरी खडया सुरात श्लोक म्हणत व जेवणाला सुरूवात होई. नऊवारी साडया नेसलेल्या गृहिणी नथी सावरत वाढायला येत. त्यांच्या आंबाडयांवर माळलेल्या सुवासिक फुलांच्या गजऱ्यांनी वातावरणात अधिक प्रसन्नता येई. आग्रह करकरून वाढप होई. तृप्तीची ढेकर देत यजमानांना ‘अन्नदाता सुखी भव’ असे आशिर्वाद देत अतिथी उठत. शेजारच्या खोलीत जाजमे अंथरलेली असत. तक्क्यालोडांना टेकून मुखशुध्दीसाठी सजलेल्या पानदानातून विडयाची पाने, चुना, कात, सुपारी, केशर, गुलकंद, किसलेले खोबरे, लवंग, जायपत्री वेलदोडा, कस्तुरी, गुंजांची पाने इत्यादी वस्तूंपासून विडा बनविला जाई व वामकुक्षीसाठी अतिथी मंडपातील जागा पकडत.
भारतीय आहारात षड्रस म्हणजे गोड, आंबट, तिखट, कडू , खारट आणि तुरट या चवींना महत्व मात्र, अति मिरची खाई त्याला मूळव्याधी, अती गोड खाई त्याला मधुमेह बाधा. अति आंबट खाल्ल्यास खोकला. शिळे खाईल तो आळशी, सुस्त होता. यात कोणत्याही चवीचा अतीरेक का टाळावा, हे सांगितले आहे. जसे चवीचे विविध प्रकार तसेच भोज्य, भक्ष्य, चोष्य, लेह्य व पेय असे खाद्यपदार्थांचे वर्गीकरण. भोज्य म्हणजे भात, डाळ, भाज्या, भक्ष्य पदार्थांत चर्वण करून खाण्याचे-म्हणजे भाकरी, पोळी हे पदार्थ मोडतात. लेह्य म्हणजे पंचामृत, चटणी, लोणची यांसारखे चाटून खाण्याचे पदार्थ. चोष्य म्हणजे चोखून खाण्याचे, तर पिण्याचे पदार्थ म्हणजे पेय. पुन्हा हे पदार्थ ठराविक क्रमात खाण्याबद्दलही आपण बरेच आग्रही आहोत. सोमेश्वराच्या ‘मानसौल्हासा’त पदार्थ वाढण्याचा क्रम सांगितला आहे. सर्वप्रथम साधा भात, त्यानंतर क्षीरौधन म्हणजे दूध-साखर घालून केलेला भात आणि त्यावर साजूक तूप. नंतर क्रमांक येतो-फळे आणि आंबट-गोड पदार्थांचा, मग वेगवेगळी पेय त्यासोबत शिखरिणी, घट्ट दही यांसारखे पदार्थ सर्वात शेवटी ताक. बौध्द भिक्षूंना कोणत्या क्रमाने अन्न वाढण्यात आले, याचे वर्णन इत्सिंग याने केलेले आहे. सर्व प्रथम गौतम बुध्दांनी मान्यता दिलेल्या आठ पेयांपैकी एक देण्यात आले. त्यानंतर जेवतांना सर्वात आधी आल्याचे दोन तुकडे व किंचित मीठ दिले. मग भात, त्यावर वरणाचे पाणी व साजूक तूप वाढण्यात आले. इतर पदार्थ, फळे, तूप, साखर देण्यात आले. जेवतांना सोबत थंड पाणी किंवा कोंमट पाणी, ताक, आंबील होते. जेवतांना स्वाद आणि आरोग्य या दोन्ही गोष्टिचा विचार करणे आवश्यक मानले जाई. म्हणूनच मिता हारावर भर दिलेला आढळतो. गौतम बुध्दांनी आपल्या भिक्षूं मिताहार सांगितला आहे. जो दिवसातून दोनदा जेवतो, तो ज्ञानी, बुध्दिवान मानला जाई. गृहस्थाने दिवसातून दोनदा फक्त ३२ घास खावेत, म्हणजे तो आपली कर्तव्ये उत्साहाने पार पाडू शकतो असा समज होता. महाभारतात मिताहारामुळे सहा गोष्टी प्राप्त होता असे म्हटले आहे. त्या म्हणजे आरोग्य, आयुष्य, बल, सुख, निकोप संतती व खादाड म्हणून लोकनिंदा न होणे. जेवतांना चित्तवृत्ती प्रफुल्लित असावी याकडेही कटाक्ष होता. सुरेख रंगसंगती साधलेले ताट, त्याभोवती तेवढीच सुंदर रांगोळी, उदबत्तीचा घमघमाट आणि पदार्थांचा सुवास यामुळे भूक चाळवली नाही तरच नवल. पण या सर्वांचा आस्वाद एकटयाने घेण्यात काही गंमत नसते सोबत मित्रमंडळी, पैपाहुणे असेल तर अधिकच बरे.
जेवणापूर्वी म्हणायचे श्लोक
वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदर भरण नोहे, जाणीजे यज्ञ कर्म
सीताकांत स्मरण, जयजय राम, पार्वती पतये, हरहर महादेव
ब्रह्मैवतेन गंतंव्यम् ब्रह्मकर्म समाधिना ॥
अर्थ – ब्रह्मातून आलेले हे अन्न एखादया समीधेप्रमाणे, ब्रह्माच्या यज्ञामध्ये आम्ही अर्पण करतो. ब्रह्माच्याच अग्नीत, ब्रह्माचीच ही आहुती देतो. ही आहुती ब्रह्मालाच पोहोचते, व हे मात्र जेवण नसून, ब्रह्माचेच कर्म आहे, आणि यामुळे साक्षात ब्रह्मच समाधान पावते.