एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर माणूस ती किती निर्धाराने आणि यशस्वीपणे पार पाडू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रथितयश नाटयनिर्मात्या आणि आता सिनेनिर्मात्या लता नार्वेकर. अगदी साठी ओलांडलेली असूनही कोणत्याही छोटया-मोठया गोष्टीत त्या स्वतः लक्ष देऊन काम करतात. ‘अहो, कामाची सवय आहे मला! पाचवीत असताना वडील वारले, घरची जबाबदारी माझ्यावर आली. त्यामुळेच बहुधा छोटया-मोठया सर्व संकटांतून निभावून नेण्याची खंबीरता माझ्यामध्ये आली’. अगदी कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढणारा आणि मनाला पटेल, रुचेल तेच करणारा त्यांचा स्वभाव आपल्याला त्यांच्या प्रत्येक शब्दामधून जाणवतो. संघर्ष हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच तर रुळलेल्या वाटा सोडून त्या नाटयनिर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या. लता नार्वेकर जेव्हा या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीने कामाला लागल्या तेव्हाही (आणि आताही) ह्या (भानगडीत!) नाटयनिर्मितीच्या क्षेत्रात कोणतीही स्त्री नव्हती. प्रयोगांच्या तारखा लावणं; त्यासाठीची धावपळ; वेळी-अवेळी प्रवास; लोकांच्या गाठीभेटी; नाटकातील कलाकार, पडद्यामागचे तंत्रज्ञ, दिग्दर्शक अशी एकत्र मोट बांधणं खूप जिकरीचं असतं. त्यामुळे शक्यतो नाटयनिर्मितीकडे स्त्रिया करीअर म्हणून बघत नसाव्यात.
अशात आपल्याला प्रश्न पडतो की, मग लता नार्वेकर या क्षेत्रात कशा उतरल्या? या क्षेत्राविषयीचं लहानपणी घरातूनच बाळकडू मिळालेलं असेल तर असं काही नाहीये. उलट या क्षेत्रात उतरायला घरच्यांचा विरोधच. आईचं म्हणणं तू आपली सरळ, चारचौघींसारखं काहीतरी कर जेणेकरून घराला हातभार लागेल. पण लता नार्वेकरांच्या कुंडलीतील शुक्र strong असल्यामुळे शिक्षिका म्हणून शिकवत असतानाही त्या निर्मितीत उतरल्या. चिकित्सक समूह, राममोहन, प्रभु सेमिनरी अशा तीन शाळांमधून शिक्षिकेची नोकरी केली. शाळेत त्या गणित आणि मराठी विषय शिकवायच्या. मराठी हा बाईंचा आवडता आणि प्रभुत्वाचा विषय, नाटकांचीही आवड. पण तरीही २५ वर्षे शाळेची नोकरी करून १९९४ मध्ये व्हिआरएस स्कीम आल्यावर लगेचच व्हिआरएस घेतली, कारण आपल्या निवृत्तीमुळे कोणालातरी नोकरी मिळेल, हा त्यामागचा विचार.
‘श्री’ साप्ताहिकासाठी स्नेहांकिता नावाने नाटयसमीक्षाही बाईंनी लिहिल्या आहेत, पण ते थोडा काळ. या दरम्यान लता नार्वेकरांना वसंत कानेटकर, सुरेश खरे, शं. ना. नवरे, वि. वा. शिरवाडकर अशा दिग्गजांची नाटकं बघण्याची संधी मिळाली. त्यातूनच नाटकांविषयीची आवड वाढीस लागली आणि नाटयनिर्मितीचा ध्यास बाईंना लागला. सुरुवातीला काही नाटकांची पुन्हा निर्मिती केली. ‘मला निर्माती व्हायचं होतं, पण निर्माती म्हणून तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. मला निर्माती म्हणून चेहरा नव्हता. अशावेळी कोण मला अगदी पहिल्या खेपेची नाटकं देणार, त्यामुळे काही नाटकं मी दुस-यांदा स्टेजवर आणली’. १९८७-८८ मध्ये कमलाकर सारंग दिग्दर्शित ‘श्रध्दा’ पुन्हा स्टेजवर आणलं. बाईंच्या कामाची दखल घेण्यासाठी ‘तू फक्त हो म्हण’ आणि ‘चारचौघी’ ही नाटकं कारणीभूत ठरली. एकापेक्षा एक वैविध्यपूर्ण विषय लता नार्वेकरांनी आपल्या नाटकांतून दिले आहेत.
‘मी नाटकांची निवड करताना प्रेक्षकांच्या भूमिकेत शिरते. प्रेक्षकांना काय आवडेल, एखाद्या विषयाला ते कसा response देतील अशा दृष्टीकोनातून नाटकाची निवड करते. नाटकाला साहित्यिक मूल्यं असलीच पाहिजेत, यावर त्या ठाम असतात’. ‘नाटकाच्या जातकुळीनुसार कलाकार, दिग्दर्शक, यांची निवड मी करते. मी खूप choosy आहे. एखाद्या विशिष्ट विषयाला अमुक एक दिग्दर्शक हवाच, असं जर मला वाटलं तर तोच दिग्दर्शक निवडते. याबाबतीत तडजोड नाही. हा दिग्दर्शक घ्या, अमुक एक कलाकार घ्या असं जर मला कोणी म्हणालं, तर मी ते ऐकून घेणार नाही’.
‘रुचेल, पटेल तेच करणार’ ह्या ब्रीदवाक्यामुळे बाईंना आधी ब-याच problems ना सामोरं जावं लागलं असेल, असं आपल्याला वाटतं. कारण तडजोड हा शब्दच माहिती नाही. ‘मला कोणाचेही favour नको होते. मी बाई होते म्हणून सहानुभूती, त्यापायी येणारे favours मला अजिबातच नको होते. एकटी बाई आहे, काय करणार करून करून! कर्जबाजारी होईल आणि माघार घेईल, अशी ह्या क्षेत्रात अनेकांची समजूत होती. पण हा त्यांचा गैरसमज असल्याचं मी सिध्द केलं’. या क्षेत्रात उतरतानाच मला खूप face करावं लागेल, हे माहिती होतं. पण त्याची सवयच आहे.
‘एक प्रसंग सांगते की, या क्षेत्रातली माझी उमेदवारी सुरू होती. शिवाजी मंदिरला पहिला प्रयोग रात्रीचा होता. कुठलीतरी तारीख दिली होती. शनिवार-रविवार हे दिवस किंवा दुपारची वेळ मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण रात्रीची वेळ मिळाली होती. रात्री प्रयोग सुरू व्हायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की, तुम्ही डिपॉझिट ठेवलेलं नाही. ते भरल्याशिवाय पडदा वर करणार नाही. अगदी सुरुवातीच्या काळातला प्रसंग होता. पण डगमगले नाही, त्यामुळेच आज इथवर पोहोचले’. अशा अनेक प्रसंगांना बाईंना सुरुवातीला सामोरं जावं लागलं. पण न डगमगता त्या आपल्याला ‘पटलं’ त्या क्षेत्रात काम करत राहिल्या. त्यांनी निर्माण केलेल्या नाटकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. ‘सही रे सही’ या नाटकाने तर प्रयोगांचे उच्चांक प्रस्थापित केले.
घरातूनच त्यांना मदत करणारं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात उतरणारं कोणी आहे का, असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण त्यांचा मोठा भाचा राजू नार्वेकर याचं गेल्यावर्षी निधन झालं. ‘एवढा मोठा पसारा मी आता सांभाळू शकेन, याची खात्री वाटत नव्हती. कारण राजूची मला खूप मदत व्हायची’.
नाटयनिर्मिती नंतर लताबाई आता सिनेमानिर्मितीत उतरल्या आहेत. ‘सरीवर सरी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सिनेमा निर्मितीतलं मला काही कळत नाही. भारतीला कळतं, तिने ह्या क्षेत्रात काम केलेलं आहे, तिला ह्या क्षेत्राची माहिती आहे. त्यामुळे तिच्यासोबत ह्या क्षेत्रात उतरले’.
‘एकतर चांगल्या नाटकांच्या scripts हातात येत नव्हत्या. आणि तेच तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण करण्यासाठी सिनेमाचं क्षेत्र मला योग्य वाटलं. सध्या मराठी चित्रपटांतून नवीन विषय हाताळले जात आहेत. माझ्यासाठी सिनेमा हे माध्यम अगदी नवीन असल्यामुळे इथे शिकायला खूप मिळेल. शिवाय नवीन माध्यमातून चांगले विषय देता येतील, हा विचार चित्रपट निर्मितीत उतरण्यामागे आहे. सध्या २ चित्रपटांच्या scripts वाचल्या आहेत. पण अजून काही नक्की ठरवलेलं नाही’.
पण एक मात्र नक्की नाटकांप्रमाणेच वैविध्यपूर्ण विषय आणि आशय असलेले तसेच रूढ वाटेने न जाणारे सिनेमा आपल्याला लता नार्वेकर यांच्याकडून पाहायला मिळतील अशी सर्व रसिकांची इच्छा आहे. त्यांना या पुढच्या वाटचालीकरता मराठीवर्ल्ड डॉट कॉम परिवाराच्या शुभेच्छा!