मला उमजलेले कुमार गंधर्व

८ एप्रिल १९२४ रोजी जन्मलेल्या कुमार गंधर्वांचे खरे नाव, शिवपुत्र सिध्दरामय्या कोमकली असे होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अग्रणी समजले जाणारे कुमारजी, बुध्दीवादी विचारसरणीचे गायक होते आणि त्यांच्यासारखा महान संगीतज्ञ मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. मी त्यांचा नेहमीच एक मोठा ‘फॅन’ राहिलो आहे.

Kumar Gandharvकुमारजींची गायनशैली ख-या अर्थाने ‘ओरिजिनल’ होती. शास्त्रीय गायकीच्या ‘घराणा’ परंपरेच्या नियमांची चौकट त्यांना कधीही मान्य नव्हती. त्यामुळेच एका अर्थाने ते नेहमीच ‘वादग्रस्त’ राहीले. कुमारजींची संगीताप्रती समर्पणाची भावना, त्यांची संगीतविषयक समज, त्यांची प्रज्ञा व त्यांच्या गाण्यातील गहिरेपणा, ह्यांचे श्रेष्ठत्त्व नि:संशय वादातीत होते. पण असे असले तरीही कुमारजींचे समकालीन गायक जसे भीमसेनजी, मल्लीकाजर्नु मन्सूर, ह्यांच्याइतकी प्रसिध्दी मात्र काही त्यांना लाभली नाही.

कुमारजींचे गाणे ऐकायला तसे ‘सुगम’ किंवा ‘सोपे’ नव्हते. तरूणपणातील आजारपणामुळे त्यांचे एक फुफ्फुस काढून टाकण्यात आले होते. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा आवाज अगदी बारीक किंवा किनरा म्हणावा असा झाला होता. गाताना क्वचित प्रसंगी तो कर्कश सुध्दा वाटे.

आजारपणामुळे निर्माण झालेल्या ह्या वैगुण्यावर मात करण्यासाठी त्यांनी गाण्याची स्वत:ची एक विशिष्ट अशी ढब ‘डेव्हलप’ केली होती. गाताना शास्त्रीय संगीताच्या परंपरेला साजेश्या अशा लांब, पल्लेदार, व दाणेदार ताना घेण्याऐवजी ते छोटया छोटया परंतु ऐकायला ‘शार्प’ किंवा ‘किन-या’ वाटणा-या ताना घ्यायचे. ह्या संदर्भात कुमारजी त्यांच्या आजारपणानंतरच्या काळातील त्यांच्या खोलीत नेहमी येणा-या एका चिमणीची गोष्ट सांगत. ते म्हणत, की एक चिमणी जी आकाराने एवढी लहान असूनसुध्दा एवढा चिवचिवाट करून जर संगीत निर्मिती करू शकते तर मग मी माझ्यातील वैगुण्यावर मात का करू शकत नाही? एका प्रसंगी ते म्हणाले, ‘लांब, दाणेदार व सशक्त ताना घेऊ शकणारे गायक हे एका जलाशयातील मोठया माश्यांप्रमाणे आहेत. त्यांना आपली पोहण्याची दिशा बदलवण्यासाठी वेळ लागतो. पण मी मात्र, एका लहानश्या माश्यासारखा आहे, ज्याला आपली पोहण्याची दिशा झटकन् बदलता येते; कारण मी गाताना छोटया व आखूड ताना घेऊ शकतो.’

माझ्या मते, कुमारजींच्या गान-प्रतिभेचे दोन आगळे-वेगळे पैलू आहेत. त्यातील पहिला म्हणजे ते स्वत:च्या गाण्याचे स्वत:च्या अशा एका वेगळयाच ढंगाने विश्लेषण करीत. म्हणजे, ‘मी जे गातो आहे, ते तसेच व त्याच पध्दतीने का गातो आहे?’ ह्याचे संपूर्ण तार्किक स्पष्टीकरण ते देऊ शकत; आणि दुसरा पैलू म्हणजे, त्यांच्याकडे प्रचलित व अनवट राग, त्यांनी स्वत: निर्माण केलेले राग, मध्यप्रदेशच्या माळवा भागातील लोकसंगीत, मराठी नाटयसंगीत ह्यांचा खूप मोठा खजिना होता. ह्याशिवाय त्यांनी स्वत: चाली लावलेल्या भजनांचाही एक मोठा संग्रह त्यांच्याजवळ होता. कुमारजींनी लावलेल्या सुरेल व भावगर्भ चालींमुळेच ह्या भजनांना एक श्रेष्ठ असा सांगितिक दर्जा प्राप्त झाला आहे, ह्याची आपण नोंद घ्यायला हवी.

काही जाणकारांच्या मते, भजने व लोकसंगीत गाताना कुमारजींची प्रतिभा सर्वार्थाने बहरत असे. तर काहींच्या मते, खयाल गायन करताना- जेंव्हा कुमारजी एकाच रागातील सहा वेगवेगळया स्वरचित बंदिशी वेगवेगळया लयीत गात आणि तो त्यांच्या गायकीचा परमोच्च बिंदू असे! परंतु माझ्या मते मात्र भजन असो किंवा लोकसंगीत, खयाल गायन असो किंवा नाटयसंगीत, कुमारजींची गायकी अलौकिक आणि अजोड म्हणावी अशीच होती!

गाताना कुमारजींची ‘मूड’ श्रोत्यांच्या प्रतिसादावर अवलंबून असे, आणि त्यांचे गाणे त्यांच्या ‘मूड’वर! त्यांचा मूड लागलेला असेल तर, श्रोत्यांची अक्षरश: गान-समाधी लागत असे. एवढी की गाणे सपंल्यावर भानावर येणेसुध्दा जड जाईल. परंतु ‘मूड’ नसताना कुमारजींचे गाणे अजिबात रंगत नसे, आणि हे त्यांच्या लक्षात येताच ते गाणे आवरते घेत.

कुमारजींचे गाणे ऐकताना अनेक परिचित रागांचे, मला अगदी अपरिचित असलेले, कितीतरी सुंदर पैलू माझ्या दृष्टीस पडले आहेत. आणि त्यावेळी, ‘अरे, आपल्याला ह्या रागाचा इतका सुंदर पैलू कसा माहीत नव्हता?’ असे उद्गार आपसूकच माझ्या तोंडून बाहेर पडत! जणू काही कुमारजी एखाद्या निष्णात गाईडसारखी आपल्याला, आपल्या अगदी ओळखीच्या पर्यटन स्थळाची, नव्यानेच सफर घडवीत आहेत, आणि आपण कधीही न बघितलेले अनेक ‘सुंदर’ स्पॉटस् आपल्याला दाखवीत आहेत!

कुमारजींचे राग-विस्ताराचे तंत्रही अगदी अनोखे म्हणावे असेच होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दहा- दहा मिनिटे चालणारी त्यांची आलापी, ही श्रोत्यांकरिता नसायचीच तर त्यांच्या स्वत:साठीच, एखाद्या ‘वार्म-अप् एक्सरसाईझ’ सारखी असायची. जणू काही एखादा निष्णात जादूगार, पडदा उघडण्यापूर्वी, स्टेजवर असलेल्या खुबीच्या जागा व क्लृप्त्या बरोबर आहेत की नाही, ह्यांची खात्री करून घेतो आहे, जेणे करून नंतर सादर केले जाणारे जादूचे खेळ अगदी सफाईदार व्हावेत.

कुमारजींचा ख-या अर्थाने श्रोत्यांशी संवाद बंदिश सुरू झाल्यावरच सुरू व्हायचा. चीजेच्या मुखडयातील दोन्ही ओळी ते अगदी विचारपूर्वक आणलेल्या विविधतेने सादर करीत, आणि त्यामध्ये निरनिराळया प्रकारच्या तानांचा समावेश असे.

माझ्याजवळ कुमारजींनी सादर केलेल्या राग बागेश्रीची, साधारणत: एक तासाची एक चित्र ध्वनीफित आहे. त्यामध्ये विलंबितमधील त्यांची एक स्वरचित चीज, ग्वाल्हेर घराण्याची ‘ऋतु बसंत तुम अपने उमंग सो’ ही चीज आणि बोल-ताना असलेल्या एका तराण्याचा समावेश आहे. (बोल-ताना म्हणजे, मूळ तानेतील स्वरांचा उच्चार करत घेतलेली तान; जसे, सा, नि, मप, धरे इ.)

कुमारजींच्या गायकीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजें, गाताना त्यांच्या चेह-यावर विविध भावमुद्रा उमटायच्या, आणि त्या नेहमीच चीजेतील शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या असत. अशा अर्थपूर्ण भावमुद्रांचा एक संग्रहच कुमारजींजवळ होता, असे म्हटले तरी चालेल. ह्या मुद्रा नाटयपूर्ण असायच्या पण नाटकी किंवा दिखाऊ कधीच नव्हत्या. कुमारजी गाण्यात खऱ्या अर्थाने रंगल्यावरच ह्या मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर उमटायला सुरवात व्हायची, आणि ‘कानसेन’ म्हणून आपण कुमारजींना भावलो असल्याची ती एक खूणच आहे, ह्याची पुढे श्रोत्यांनाही अनुभवाने खात्री पटायला लागायची. परंतु समोर बसलेला श्रोतृवृंद, अरसिक आणि उथळ आहे, असे जर कुमारजींना जाणवले तर मग मात्र त्यांचा चेहरा निर्विकार राहत असे.

कुमारजींच्या कालखंडातील गायकीत, चीजेतील शब्द, म्हणजे स्वरांना स्वार होण्यासाठी केवळ एक माध्यम आहे असे मानले जाण्याचा प्रघात होता. त्यावेळच्या गायकांकडून चीज म्हणताना, त्यातील शब्द बरेचदा अस्पष्ट उच्चारले जायचे. परंतु कुमारजींच्या लेखी, संगीतात शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व होते. गाताना त्यांचे शब्दोच्चार अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट व्हायचे. (जसे, ‘शुभ घडी’ उच्चारताना, त्यातीन ‘भ’ आणि ‘घ’ ह्या अक्षरांवर ते नेहमीपेक्षा जरा जास्त वजन द्यायचे.)

त्यांच्या स्वरचित चीजेतील शब्दांमधून कुमारजींच्या जीवनातील अनुभवाचे व भाव-भावनांचे नेहमीच प्रतिबिंब पडलेले दिसायचे. शास्त्रीय संगीतातील गायकी, सुरवातीच्या काळात, अगदी अशीच म्हणजे शब्दप्रधानच होती, परंतु गायनाच्या निरनिराळया शैलींचा जसाजसा विकास होत गेला तसतसे गाण्यातील शब्दांचे महत्त्व कमी होत गेले आणि त्यांचा गाण्यातील भावाशी एक अर्थपूर्ण असा संबंध, राहीनासाच झाला. – नाही म्हणायला मुघल दरबारात काही खुशमस्क-या वृत्तीचे गायक शब्दप्रधान गायकी सादर करायचे, परंतु त्यात इतर भावनांपेक्षा, आपल्या बिदागीवर डोळा ठेवून, राजावर उधळलेली स्तुती-सुमनेच जास्त असायची.

उत्तुंग गानप्रतिभा असलेल्या कुमारजींच्या गायकीत शब्द व अर्थाला खूप महत्त्व होते. कुमारजी असे मानत की लोकसंगीतात निसर्ग व जीवनातील अगदी मूलभूत घटकांचे व भावभावनांचे जे प्रतिबिंब पडलेले आहे, त्यातूनच शास्त्रीय संगीत विकसित झालेले आहे. आणि बहुधा ह्यामुळेच त्यांनी, लोकसंगीत अतिशय काळजीपूर्वक ऐकून, त्यातून नवनवीन राग शोधून काढण्याचे ‘सांगितिक साहस’ केले असावे.

ह्या नवीन रागांना त्यांनी ‘धुन उगम राग’ असे नाव दिले होते. आणि त्यातील बरेच राग- जसे राग मधुसुरजा, अहिमोहिनी, सहेली-तोडी, बीहड भैरव, लगन गंधार, संजरी, मालवती ह्यांना आता शास्त्रीय संगीतातून मान्यता मिळाली आहे. आणि ह्याचा उल्लेख आपल्याला ‘राग निधी’ सारख्या आधुनिक संगीतविषयक ग्रंथात सापडेल.

कुमारजींच्या गायकीचा आणखी एक वैशिष्टयपूर्ण पैलू म्हणजे, लोकसंगीताच्या सादरीकरणात कुमारजींना विशेष रस होता, आणि त्यावर आधारित अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले होते. ह्या कार्यक्रमात एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित राग आणि लोकसंगीताचा समावेश असायचा. त्यापैकी ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, आणि ‘ऋतुराज’ हे कार्यक्रम खूप गाजले होते. ह्यातील ‘ऋतुराज’ हा होळी उत्सवाशी संबंधित कार्यक्रम होता. गेली कित्येक वर्षे ह्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग मी होळीच्या सुमारास मित्रांसोबत बसून ऐकतो आहे, आणि त्याचा मनमुराद आनंद लुटतो आहे. ‘गीत वर्षा’ हा वर्षा ऋतुवर आधारित असाच एक बहारदार कार्यक्रम! पावसाळयातील एखादा सुटीचा दिवस आपल्याला घरी बसूनच ‘एन्जॉय’ करायचा असेल तर, ‘गीत वर्षा’ ऐकावा. ह्यात सुरवातीला राग मारवामध्ये स्वरबध्द असलेले तृषित धरित्रीचे आणि त्यानंतर वर्षा ऋतुतील मेघांचे आगमन व त्यामुळे सृष्टीत सगळीकडे पसरणारा आनंद व चैतन्य ह्यांचे सुरेख व सुरेल वर्णन आहे. त्यानंतर राग मियॉ-मल्हार मधील एक दीर्घ बंदिश आहे. ह्या कार्यक्रमातील शेवटची रचना ‘हीरा मोती निबजे’ ही असून ती राग ‘जलधर बसंत’ वर आधारित आहे. ह्यामध्ये वर्षाऋतुच्या आगमनाने सुखावलेल्या आणि हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या वसुंधरेचे अगदी जिवंत भासणारे निसर्ग-चित्र रंगविण्यात आले आहे.

भावविभोर गायकीची देणगी लाभलेल्या कुमारजींचा चाहता वर्गही खूप मोठा होता. पण असे असले तरी समाजातील ज्या स्तरात, लोकांना संगीतविषयक जाण होती, त्याच स्तरातील लोकांचा त्यांच्या चाहत्यांमध्ये समावेश होता. पुणे आणि मुंबईतील काही मराठी भाषिक भागात, कार्यक्रम सादर करायला कुमारजींना विशेष आवडत असे. ह्याउलट ‘कॉस्मॉपॉलीटन’ संस्कृती असलेल्या दक्षिण मुंबईशी, जसे त्यांच्या समकालीन (मल्लिकार्जुन मन्सूर वगैरे) गायकांचे सूर जुळलेत, तसे कुमारजींचे काही जुळले नाहीत.

माझ्या मते कुमारजींचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम, मी चेंबूरच्या एका शाळेत अशाच एका रविवारी ऐकला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी ‘राग देसकार’मधील ‘आयो मिलनको जी’ ही चीज सादर केली होती. समोर बसलेला श्रोतृवृंद संगीतातील खरा-खुरा दर्दी होता, आणि ज्या ज्या वेळी कुमारजी समेतील तार सप्तकाच्या षड्जावर यायचे, त्या त्या वेळी श्रोते ‘वाहवा’ अशी उत्स्फूर्त दाद द्यायचे. असा अविस्मरणीय कार्यक्रम आता होणे नाही!

सन १९९२ मधे कुमारजींनी इहलोकीचा निरोप घेतला. त्या सुमारास त्यांची प्रकृती म्हणावी तशी चांगली नव्हती. ह्यानंतरच्या आयुष्यात आपण गाऊ शकणार नाही, असे बहुधा त्यांच्या मनाने घेतले असावे. आणि म्हणूनच त्यांचा जगण्यातला रसही कमी झाल्यासारखा झाला होता. कुमारजींचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम दि. २२ नोव्हेंबर १९९१ रोजी, मुंबईत नेहरू सेंटर येथे झाला होता. कुमारजी स्टेजवर येऊन स्थानापन्न होईपर्यंत मी समोरच्या रांगेत येऊन बसलो होतो. हा कार्यक्रम म्हणावा तसा काही रंगला नाही, आणि लवकर आटोपता घेण्यात आला. ह्याचे कारण कुमारजींचा आवाज नीट लागत नव्हता आणि त्यामुळे स्टेजवर, त्यांच्यासमवेत बसलेली त्यांची कन्या कलापिनी काहीशी चिंतीत दिसत होती. परंतु सुरुवातीला गाताना कुमारजींना काहीश्या कष्टप्रद भासलेलया राग जयजयवंतीनंतर त्यांच्या अवाजात एकदम जादुई परिवर्तन झाले. आणि मग त्यांनी राग सिंदुरामध्ये एक अप्रतिम चीज सादर केली. पण त्यातून कुमारजींनी व्यक्त केलेले जे भाव मला जाणवले, त्याने मात्र माझ्या हृदयात कालवाकालव झाली. कारण कुमारजींच्या आयुष्यातील आता फार कमी दिवस उरले आहेत, अशी काळजाचे पाणी करणारी एक शंका माझ्या मनाला शिवून गेली. आणि नेमका हाच संदेश कुमारजींनी प्रकृती बरी नसतानाही, त्यादिवशी आपल्या गाण्यामार्फत, श्रोत्यांच्या हृदयापर्यंत अगदी समर्थपणे पोहोचवला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी कुमारजी ह्या जगात नव्हते…

मूळ इंग्रजी लेखक – सुनील मुखी, मराठी अनुवाद – जयंत खानझोडे