सामाजिक विषय हाताळणारे आणि ते विषय तितक्याच समर्थपणे पडद्यावर जिवंत करणारे नवीन पिढीतील दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी मराठीवर्ल्डला दिलेली मनमोकळी मुलाखत
चित्रपट करताना ते ग्रामीण किंवा घरगुती विषयांपुरतेच मर्यादित न ठेवता वेगवेगळे विषय तुम्ही हाताळलेत, ह्याबद्दल थोडसं सांगाल का ? ‘नॉट ओन्ली ‘चा विषय कसा सुचला ?
माणसांच्या जाणीवा महत्त्वाच्या असतात. विविध क्षेत्रातील आपल्या ह्या जाणीवा आपण प्रतिबिंबीत कशा करतो, हेही तितकचं महत्त्वाचं असतं. चित्रकार, शिल्पकार, अभिनेते, लेखक यांसारखे कलाकार आपल्या कलाकृतींमधून ह्या जाणीवाच प्रतिबिंबीत करतात. कलाकारांना सामाजिक भान असते. लेखकांना तर हे भान अधिक असते. मी मूळतः एक लेखक आहे, त्यामुळे माझ्या चित्रपटांना सामाजिक दृष्टीकोन असतो.
आधुनिक म्हणायचं झालं तर ते तंत्रज्ञानाच्या संदर्भात म्हणावं लागेल. आत्ताचा मराठी सिनेमा हा तांत्रिकदृष्टया जास्त विकसीत झालेला आहे. माझ्याकडे विषय होते, फक्त आर्थिक प्रश्न होता. आर्थिक प्रश्न सुटल्यामुळे मला वेगवेगळया प्रकारचे चित्रपट करता आले.
आणि नॉट ओन्ली चित्रपटामागचा विचार मला एका मांजरीवरून सुचला. आमच्याच एका सहका-याच्या मांजरीची पिल्लं बोक्याने खाल्ली आणि त्यानंतर मांजरीची झालेली अवस्था मी स्वतः बघितली आहे. हे तर प्राण्यांच्या बाबतीत मग माणसांच्या बाबतीत काय होत असावं, याचा मी विचार केला. शोषण हा खरा नॉट ओन्लीचा मुख्य विषय आहे. या सिनेमामध्ये विविध स्तरांतील स्त्रिया होत्या, पण त्यांच्यातही एक समान धागा होता शोषणाचा. यासंदर्भात फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषांचाही विचार करता येऊ शकतो. शोषण हा एक अटळ आणि सगळयांच्याच रोजच्या जीवनातील भाग आहे. आपण सगळेजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शोषण करत असतो किंवा आपलं शोषण होत असतं.
एखादी कलाकृती किंवा विषय मांडण्याच्या दृष्टीकोनातून कोणतं माध्यम अधिक जवळचं वाटतं? चित्रपटांनंतर टिव्ही किंवा जाहिरातींकडे वळण्याचा काही विचार आहे का?
असा फरक करणं कठीण आहे, पण मला चित्रपटाचं माध्यम अधिक जवळचं वाटतं. मी लहानपणापासून वेगवेगळया प्रकारच्या गोष्टी रंगवायचो, प्रत्यक्ष घडलेली घटना आणि मी केलेलं वर्णन यात खूप तफावत असे. एखाद्याला ती गोष्ट रंगवून सांगताना प्रत्यक्ष चित्र माझ्या डोळयांसमोर उभं राहायचं. मला लहानपणापासून कलप्नाचित्रण करायची सवय होती. तेव्हा मी ठरवलं की जे लिहितोय ते प्रत्यक्ष डोळयांसमोर बघायचं. यामुळेच मला चित्रपटांचं माध्यम अधिक भावतं. मात्र एखादा चांगला प्रस्ताव आला तर दूरदर्शन किंवा जाहिरात या माध्यमांचा नक्की विचार करीन.
या क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात कशी झाली ?
महाविद्यालयीन शिक्षणासाठी रुईयामध्ये प्रवेश घेतला. याच कॉलेजमधील विविध कार्यक्रम, एकांकिका, नाटक यांमधून भाग घ्यायला सुरुवात केली. वर्षाला पाच-सहा एकांकिकांमधून कामं केल्याने खूप अनुभव मिळाला. ‘आईचं घर उन्हाचं’ हे व्यावसायिक रंगभूमीवरील माझं पहिलं नाटक. मालिकांसाठीही मी खूप लिखाण केलं, काही मालिकांसाठी हजार-बाराशे भागांपर्यंत लिखाण केलं. कारण त्यावेळी माझ्याकडे काहीही
पैसे नव्हते. पण नंतर मात्र याचा कंटाळा आला. कामात तोचतोचपणा जाणवू लागला. यातूनच मग चित्रपटांकडे वळलो. मात्र मी कुठल्याही माध्यम संस्थेशी संलग्न नव्हतो.
मराठी चित्रपटांनंतर हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमध्येही काम करायला आवडेल का ?
मराठी आणि इतर भाषा असं विशिष्ट भाषेचं बंधन मी मानत नाही. माझी मातृभाषा मराठी आहे, याचा मला अभिमान आहे पण त्याचा अट्टाहास मी धरत नाही. मला सिनेमाच्या माध्यामातून जे काही सांगायचं आहे ते योग्य पध्दतीने मांडणारी, सिनेमाच्या तंत्राची भाषा वापरण्याकडे माझा कल असतो.
हिंदीच्या मुख्य प्रवाहातील काही सिनेमांप्रमाणे सवंग सिनेमा करण्यासाठी मी हिंदीत जाणार नाही. काही हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स मला आल्या होत्या पण मी त्या नाकारल्या. मला सुबुध्द सिनेमा करायचा आहे, भाषेचं बंधन न मानता. मुळातून मी लेखक असल्यामुळे सामाजिक विषय मी अधिक हाताळले आहेत.
गीतकार म्हणूनही तुमची ओळख या क्षेत्राला झाली आहे, त्याबद्दल काही सांगाल का ?
कविता मी पूर्वीपासून लिहीत होतो. कृष्णाकाठची मीरा, नॉट ओन्ली मिसेस राऊत, पांढर, सैल या चित्रपटांसाठी मी गाणी लिहिली आणि योगायोगाने मला प्रत्येक वेळेस पारितोषिकेही मिळाली. पारितोषिकांमध्ये राज्यशासनाच्या दोन पुरस्कारांचा समावेश आहे.
वृंदा गजेंद्रही याच क्षेत्रात आहेत, एकमेकांना कामात पाठिंबा देणं, सूचना करणं कितपत शक्य होतं ?
सकाळी उठल्यानंतर आपापल्या कामांना लागेपर्यंत जो वेळ मिळतो त्यावेळी आमच्यात विविध मुद्दे चर्चिले जातात. काही निर्णय, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण, चर्चा हे सर्व या सकाळच्या वेळेतच शक्य होतं. माझ्या प्रत्येक कलाकृतीत आणि निर्णय यांच्यामध्ये तिचा सहभाग असतोच. ही टू मेन कॉन्फरन्स मला महत्त्वाची वाटते.
स्वतः दिग्दर्शन करता करता अभिनयाकडे वळण्याचा काही विचार केला का ?
सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर कामं केली. तरीही स्वतः अभिनय करावा असं नाही वाटलं. अभिनेता म्हणून करियर करावं असं कधी नाही वाटलं.
भविष्यातील प्रकल्पांविषयी आम्हाला काही माहिती द्याल का ?
सार्वभौमिक विचारांवर चित्रपट करायला मला आवडेल. मराठी चित्रपटांच्याबाबतीत मात्र भौगोलिक, शैक्षणिक, आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार मराठी लोकांच्या मानसिकतेत फरक आढळतो. कोल्हापूर, धुळे इथला मराठी प्रेक्षक तर मुंबई, पुणे किंवा अमेरिका, इंग्लंड येथील मराठी प्रेक्षक या दोघांच्या मानसिकतेत फरक असू शकतो. अशा सर्वांना भिडणारा सिनेमा बनवावा, ही माझी धडपड असेल.
सहकारी तत्त्वावरील एका चित्रपटाची तयारी चालू आहे. याशिवाय द्विभाषिक चित्रपट बनवण्याचीही माझी इच्छा आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराचे दुष्परिणाम आपल्याला जाणवू लागले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून देणा-या चित्रपटाची तयारी चालू आहे. save the planet च्या धर्तीवर हा चित्रपट मला बनवायचा आहे.
दिग्दर्शक म्हणून कोणते कलाकार आवडतात ? त्यांच्याविषयीचा एखादा किस्सा सांगाल का ?
अशी नावं सांगणं खरं तर कठीण आहे, कारण मराठीत खूप मेहनती लोकं आहेत. मोहन जोशी, रीमाताई यांसारखे ज्येष्ठ कलाकार तर मिलिंद शिंदे सारखा अभ्यासू नट, श्रेयस तळपदे ज्याचं कामावर अचूक लक्ष असतं अशा काही मंडळींचा मला उल्लेख करावासा वाटतो. मिलिंद गुणाजी, भरत जाधव ही देखील बडेजाव न करणारी माणसं आहेत.
मृण्मयी लागूच्या संदर्भातला एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात आमचे कोकणात चित्रिकरण चालू होते. एकाच दृश्याचं चित्रिकरण करायचं असल्यामुळे सलग तीन दिवस पावसात तेच ओले कपडे प्रत्येकवेळी घालून तिने चित्रिकरण पूर्ण केलं. हा किस्सा मी मुद्दाम सांगितला, यावरून कळून येतं की आपल्याकडे न कंटाळता, मन लावून काम करणारी माणसं आहेत.
नवीन पिढीचा मराठी भाषेकडे कल कमी होत चालला आहे, यासंदर्भात तुम्ही मराठीवर्ल्डच्या वाचकांना काय संदेश देऊ इच्छिता ?
मी काही संदेश देण्याएवढा मोठा नाही, पण कल कमी होतोय असं म्हणणं थोडं एकांगी होऊ शकतं. सध्याच्या युगात एकापेक्षा अधिक भाषा बोलता येणं गरजेचं आहे. म्हणून मराठी माणूस कुठे कमी पडतो असं नाही. मराठी माणसांकडे माहिती असते, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असते. येणा-या काळात मराठी माणसाची अधिक प्रगती झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आजही माझं आवडतं पुस्तक बालभारतीच आहे.
मुलाखत व शब्दांकन – श्रुती दिगवेकर