वाकी
सुशिक्षित-नागर त्याचप्रमाणे ग्रामीण अशा सर्वच भागातल्या स्त्रियांमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा हा दंडावरचा दागिना आहे. नागर उच्चवर्णीय स्त्रियांच्या वाकी सोन्याच्या, नाजूक घडणीच्या अशा असतात. तर ग्रामीण समाजात ठोसर व चांदीच्या वाकी आढळतात. सोन्याच्या वाकीमध्ये चटईच्या वाकी व रूद्रगाठीच्या वाकी असे दोन प्रकार महिलांचे विशेष आवडते आहेत.
नागबंद
हाही एक वाकीचाच प्रकार म्हणायला हवा. वेटोळे घालून बसलेली व फणा उभारलेली अशी सोन्याच्या नागकृतीच्या रचनेची वाकी ‘नाग’ अथवा ‘नागबंद’ अशा नावाने ओळखली जाते.
नागोत्र
गोल गोल वेटोळयांची भरपूर रूंदी लाभलेल्या या गोलाकार वाकीला नागोत्र असे नाव आहे. ग्रामीण व नागर ह्या दोन्ही भागात हा अलंकार सारखाच लोकप्रिय आहे. शहरी भागात हे नागोत्र सुवर्णाचं आणि नाजूक कलाकुसरीचं असतं. ग्रामीण भागात ते ठसठशीत व चांदीचं आढळतं आणि नागोत्तर ह्या नावाने ओळखलं जातं.
बाजूबंद
हाही सुरेख घडणीचा, सुवर्णाचा रत्नजडित असा दंडावरचा अलंकार आहे. तथापि हा बहुतकरून शहरी भागातच दिसून येतो. तर याच्या उलट तोळेबंद हा दागिना खेडेगावातून प्राधान्यानं वापरात असतो.
तोळेबंद – चटईच्या वाकीसारखीच जडणघडण असणारा हा भक्कम असा चांदीचा अलंकार ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे.
वेळा हाही चांगला जाडजूड आणि विशेष कलाकुसरीचा चांदीचा अलंकार तोळेबंदासारखाच ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे. आदिवासी स्त्रियांमध्येही या अलंकाराचा पुष्कळच प्रसार झालेला दिसतो. दंडावरचे प्रामुख्याने दिसणारे अलंकार एवढेच आहेत.
हस्तभूषणे वापरण्याची प्रथा ही सिंधू संस्कृती इतकी जुनी आहे. त्या काळी रविफूल, मोत्याची पोहची, घोसबाळया, जाळीच्या बांगडया, तोडे, मोत्याच्या कनग्या, पिछोडी, पाटली असे विविध प्रकार प्रचलित होते. सोन्याचे तोडे, चौकडा, तुरमनी-तुरबंदी, हिरकण्या या दागिन्याचा उल्लेख आपल्याला पेशवेकाळात अढळतो. काचेच्या बांगडयांमध्ये हे अलंकार तोडे, जाळीच्या बांगडया, पिछोडया, व पाटल्या या क्रमाने घालतात. बांगडया अथवा काकण हे मनगटावरचे सर्वात प्रमुख आभूषण. महाराष्ट्रात अगदी लहानपणापासूनच मुलींच्या हातात बांगडया घातल्या जातात. त्या काचेच्या तशाच प्लॅस्टिकच्या देखील असतात. अतिपरिचयामुळे आपण बांगडयांना विशेष महत्त्व देत नाही. परंतु महाराष्ट्र आणि दक्षिण भारत वगळता सर्व उत्तर भारतात कंकणाला ‘सौभाग्य अलंकार’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तरभारतात कुठेही मंगळसूत्राची परंपरा नाही, त्याऐवजी तिथे चुडा-चुडियाँ हेच सौभाग्य चिन्ह समजले जाते. हा सौभाग्यचुडा शंखाचा अथवा हस्तिदंताचा अखंड असा असून ‘वज्रचुडा’ म्हणूनच ओळखला जातो. आपल्या भाषेतही ‘वज्रचुडेमंडित, अखंड सौभाग्यवती’ इत्यादी वाक्प्रचार रूढ आहेत, ते याच चालीरितींवरून आलेले आहेत. अर्थात दागिना म्हणून महाराष्ट्रात काचेसारख्या सोन्याच्याही बांगडया बनवल्या जातात आणि शहरात तसेच ग्रामीण भागांत साधारणपणे सर्व स्त्रियांच्या हातात दिसून येतात.
पाटल्या
पाटल्या हा प्रकार मूळचा पेशवेकाळातला. बांगडयांनंतर महिलांच्या हातात साधारणपणेदिसणारे दागिने म्हणजे पाटल्या आणि बिलवर. हे दोन्ही नग आजही घरोघरी वापरात आहेत. पाटल्या या नेहमीच्या ठराविक घडणीच्या नगालाच आपल्या महिलांनी आणखीही काही वेगळया कारागिरीची चातुर्ययुक्त जोड दिली आहे. ‘तोडीच्या पाटल्या’, ‘जाळीच्या पाटल्या’, ‘पुरणाच्या पाटल्या’, ‘पोवळ पाटल्या’, ‘मोत्याच्या पाटल्या’ असे अनेक प्रकार त्यातून निर्माण केलेले आहेत.
बिलवर
बिलवरचा मूळ शब्द अरबी भाषेतला ‘बिल्लौर’ असा आहे आणि त्याचा अर्थ पारदर्शक स्फटिक पत्थर असा आहे. स्फटिक म्हटलं की त्याला वेगवेगळया बाजू-पैलू हे असणारच. त्यामुळे पैलू पाडलेल्या बांगडीला ‘बिलवर’ असं म्हटलं गेलं असावं.
गोठ
पन्नास वर्षापूर्वीच्या काळात पाटल्या आणि बिलवर यांच्या गटात गोठ हाही दागिनाअपरिहार्यतेने असायचा. गोठ-पाटल्या-बिलवर असा त्रिकुटाचाच उल्लेख त्यावेळी वापरात, बोलण्यात असे. गोठ म्हणजे भरीव सोन्याचं गोलाकार कांबीचं वळं किंवा कडं. दुस-या महायुध्दापर्यंतच्या काळात गोठ हा दागिना पुढच्या काळात सोन्याच्या सातत्यानं चढत जाणा-या भावामुळं अस्ताला जाणं हेच क्रमप्राप्त होतं. काही काळ भरीव गोठाप्रमाणेच पोकळ गोठही अस्तित्त्वात होते, परंतु पुढे तेही नामशेष झाले. गोठ मातीचेही बनविले जात. पाटल्या, बांगडया, बिलवर हे झाले रोजच्या वापरातले दागिने. ठेवणीतले आणि प्रसंग विशेषीच वापरायचे असे मनगटावरचे अनेक दागिने आहेत.
गजरा
मोत्यांचे अनेक सर एकत्र गुंफून ते मनगटावर घातले जातात, त्या मोतीसरांना गजरा असे नाव आहे. हे सर रेशमी धाग्यांनी गुंफण्यात येतात व त्यांच्या दोन्ही टोकांना एकमेकांत अडकवण्यासाठी सोन्याचा फासा असतो. तथापि बहुधा सोन्याच्या रूंद आणि पातळशा पट्टीवर असे मोत्यांचे सर एकत्र ठेवून, मधून मधून पट्टीच्या असणा-या बारीक भोकातून तारेने अथवा धाग्यांनी बांधून ते सर या पट्टीवर कायमचेच जखडून ठेवलेले असतात. असं ‘गजरा’ या अलंकाराचे स्वरूप आहे.
जवे
जव या धान्याच्या दाण्यांसारखे सोन्याचे मणी सोन्याच्याच बांगडीवर चिकटवून या बांगडीला उठाव आणला जातो. हा एक अतिशय देखणा आणि मनोहर असा दागिना आहे. याचं मूळ बहुधा राजस्थान-गुजरात हे असावं. कारण तिथे हे जवे आणि पिछोडया अशा जोडीनं हे अलंकार वापरले जातात. त्यापैकी जवे ही बांगडी सर्वात पुढे हाताच्या तळव्याच्या बाजूला घालायची आणि पिछोडया ही सर्वात मागे कोपराच्या जवळ घालायची असा तिथं संकेत आहे. महाराष्ट्रात त्यातही प्रामुख्याने मुंबईकर महिलांनी यातल्या जवे बांगडयाच तेवढया प्राधान्यानं स्वीकारल्याचे दिसते.
दुस-या शतकापासून हातांची बोटे सजवण्यासाठी अंगठया घालण्याची सुरुवात झाली. मातीच्या, लाकडाच्या, लोखंडाच्या, विविध मुद्रा, किंवा चिन्ह असलेल्या अंगठया वापरल्या जात. अंगठयामध्ये आरसाही वापरला जात. तर्जनीत चंदन, चांदी, हस्तीदंत, सोने यांपासून बनविलेली अगंठी घालण्याची प्रथा होती. या चांदीच्या किंवा सोन्याच्या अंगठीला ‘वेढा’ किंवा ‘वळ’ म्हणतात. मधल्या बोटात सिक्का घातला जाई. रूप्याची व हि-याची अंगठी मुख्यत: अनामिकेत तर छल्ला किंवा मुदी करंगळीत घालण्याची पध्दत होती.