‘101, प्रभुकुंज, पेडर रोड’वर तमाम मराठी मनाला सुखावणारे भावस्पर्शी स्वर वास करतात. या दोनही अलौकिक स्वरांचा अभिषेक रसिकंवर अखंड चालू असतो! रसिकांच्या भावविश्वाशी पूर्णत: तादाम्य पावलेले हे दैवी स्वर म्हणजे एक लतादिदींचा तर दुसरा आशा भोसले यांचा! दोघींचेही वाढदिवस याच सप्टेंबर महिन्यातले. 8 सप्टेंबरला आशाताईचा तर 28 सप्टेंबरला लतादिदीचा वाढदिवस. या दोन्ही स्वरांनी तुम्हा आम्हा रसिकांच्या जीवनात भावोत्कट रसानुभव भरला आहे.
आज आशाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मराठी गीतांचा आढावा घेऊयात. एक गोष्ट प्रामुख्याने सांगायला हवी. हिंदीत आशाताई जेव्हा गायच्या किंवा गातात तेव्हा त्यांच्या गीतातील वैविध्य पाहून मन जसं हरखून जातं तसंच मराठीतही त्यांच्या गाण्यातील नयनरम्य इंद्रधनुष्यी रंग मनाला आतून स्पर्शून जात. पण हिंदीत काही गाणी आशाताईंनी अत्यंत पाश्चात्य शैलीत गात काही वेळा रसभंगही केलाय तो प्रकार मात्र मराठीत औषधालाही सापडणार नाही. त्यामुळे मराठीतील आशा भोसलेंची गाणी व. पु. किंवा ना. सी. फडक्यांच्या मध्यमवर्गीय नायिकेची, आपलीशी वाटतात. मराठीत आशाजी सर्वच संगीतकारांकडे समरसून गायल्या अगदी दत्ता डावजेकर (कुणी बाई काहीतरी गुणगुणले) पासून ते थेट आताच्या आनंद मोडक (एक झोका चुके काळजाचा ठोका) पर्यंत! आजही त्या त्याच उत्साहाने गातात पण मराठी पेक्षा त्यांचा कल हिंदी व त्यातही पुन्हा रॅप कडे जास्त आहे. असो, अमृतमहोत्सवाच्या काहीच वर्षे मागे असलेल्या या स्वराचा मनाला भूतकालात नेणारा ते लुभावणारा करिष्मा आपण अनुभवूयात!
जिवलगा कधी रे येशील तू
आशाजींची मराठी गाणी आठवायला गेलं की, ‘आशा-गदिमा-फडके’ या त्रयीची हमखास आठवण होते. बाबूजींनी आशा भोसले यांचा स्वर घडविला. शब्दोच्चार व लय यावर त्यांचा खूप भर असायचा. ‘माझ्या जाळयात गावलाय मासा’ या त्याच्या सुरवातीच्या काळातील गीतात त्यांनी आशाजींना कशा प्रकारे ताना घेऊन गायला शिकवले हे आशाताई आपल्या कार्यक्रमात रंगवून सांगतात.
मराठी भावगीतात ‘लताजी-पी सावळाराम-वसंत प्रभू’ ही त्रयी रसिकांना नवनवीन नजारे पेश करत असतांना ‘आशा-गदिमा-सुधीर फडके’ ही त्रयी मनोहारी शब्द-स्वर व सुरांचे अनोखे भावविश्व चितारत होती. या त्रयीची बरीचशी भावगीते चित्रपटातही सापडतात. आठवणीच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरू, खेडयामधले घर कौलारू ही रचना ऐकली की मन आजही हेलावून जाते. ज्या काळात प्रेमात सात्विक समर्पणाची भावना होती त्या काळातील तरूणींचं भावविश्व गोंजारणारी कितीतरी, हळूवार मुग्ध गाणी आशाजींच्या कोवळया स्वरातून प्रकट होतांना दिसतात. लाखाची गोष्ट चित्रपटातील ‘माझा होशील का’ या गीतात ‘नसेल माहीत कधी तुला ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते’. त्या स्वप्नांच्या आठवणी या ओठां देशील का’ या ओळींशी आशा भोसले इतक्या तन्मयतेने गातात की, श्रोत्यांच्या मनाला प्रेमातील मूक कुजनाचा अर्थ रंगवून जाते.
‘तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते.’,
‘विकत घेतला श्याम’ या जगाच्या पाठीवर चित्रपटातील गाण्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले. तसाच रमेश देव-सीमा देव यांचा सुवासिनी चित्रपट. यात आशाची एकाहून एक सुंदर गाणी आहेत. ‘दिवसा मागून दिवस चालले, ऋतूमागुता ऋतू’, ‘जिवलगा कधी रे येशील तू’, ‘राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा’,’हृदयी प्रीत जागते जाणतां अजाणता’. … आठवायला गेल तर या त्रयीची चिक्कार गाणी आहेत.
आज कुणीतरी यावे’, ‘का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला’ ही ‘मुंबईचा जावई’ची गाणी, तसेच ‘हरी थेंब घेरे दूधाचा’, ‘या कातरवेळी पाहीजेस तू जवळी’ ही ‘लाखाची’ गोष्टची गाणी, ‘चिंचा आल्यात पाडाला’, ‘बैल तुझे हरिणावाणी गाडीवान दादा’, ‘या सुखांने या’, ‘ते माझे घर’, ही या त्रयींची गाणी आजही रसिकांना सुखावून जातात. बाबूजींकडे आशाजींनी इतर गीतकारांची बरीच गाणी गायलीत. सुधीर मोघ्यांचे ‘फिरूनी नवी जन्मेन मी’, ‘तुझ्या माझ्या संसाराला’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, जगदीश खेबूडकरांचे- ‘ मी आज फूल झाले’, ‘हवास तू हवास तू मज हवास तू’, ‘ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर’ आणि मधुसुदन कालेलकरांचे- ‘तुला न कळले मला न कळले, ‘आज चांदणे उन्हात हसले’. ही आशाजींची गाणी त्यातील वैविध्यासह लख्ख आठवतात. संत जनाबाईंची दळीता कांडीता तुज गाईन अनंता ही भक्ती रचना मनाला मांगल्यपूर्ण वातावरणात नेते. आशाजींचा स्वर मंगलमयी आहे, याची प्रचिती वसंत प्रभूंच्या गीतरचनांतूनही येते. आशाजी प्रभूंकडे खूप गाणी गायिल्या. आशाजींच्या गायकीतील भक्तीरसाचा उत्कट अनुभव आपल्याला येथेच मिळतो.
रिमझीम पाऊस पडे सारखा
वसंत प्रभूंकडे पी सावळाराम यांनीच जास्त गाणी लिहीली त्यातील बरीचशी गाणी लतादिदींच्या वाटयाला आली पण आशाजींकडे जी थोडीफार गाणी आली त्याचं त्यांनी सोनं केलं. ‘ उठी गोविंदा उठी गोपाळा’, ‘जो तो सांगे ज्याला त्याला वेड लागले राधेला’, ‘धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल’, ‘ राधा गौळण करीते मंथन हरीमुख हरीचे मनात चिंतन’, ‘देव जरी मज कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला’, ‘राधा कृष्णावरी भाळली, कुजबुज उठली गोकुळी’, ‘ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता’, ‘पंढरीनाथा झडकरी आता’,’ रिमझिम पाऊस पडे सारखा’ या गीतांनी मनाला स्मृतीगंधाचा अवीट आनंद मिळतो. या गीतीतील भक्तीरसात आशाजींचा स्वर मोठा उत्कट वाटतो. वसंत प्रभूंकडेच आशाजींनी इतर गीतकारांची गाणी गायलीत. ‘प्रभाती सूर नभी रंगती दश दिशा भूपाळी’, ‘नाम घेता तुझे गोविंद’, ‘मी मनात हसता प्रीत हसे’, ‘हे गुपित कुणाला सांगू कसे’ (रमेश आणावकर), ‘डोळे हे जुल्मी गडे रोखूनी मज पाहू नका’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ (भा. रा. तांबे), ‘दिव्यत्त्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ (बा. भ. बोरकर), वसंत प्रभूच्या संगीतात एक निरागस सात्विकता असायची. आशाजींनी त्या त्या सुरांना इथे पूर्णपणे न्याय दिला असल्याचे दिसते. श्रीनिवास खळे हा असाच एक गुणी संगीतकार ज्याने त्याच्या अफलातून संगीतातून रसिकांना न्हाऊ घातले. त्यांनीही आशाजींच्या स्वरातील अफाट रेंजचा वापर करीत अनेकानेक भावस्पर्शी गाणी दिली. गदिमांच्याच- ‘एका तळयात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिलू तयात एक’- या गीतात आशाचा स्वर काय लागलाय!
‘गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहीनी आणं’, ‘देवा दया तुझी ही’, ‘चंदाराणी कागं दिसतेस थकल्यावणी’, ‘ प्रिया तुजं काय दिसे स्वप्नात…’ ही गाणी आशाने काय सुंदर गायलीत. खळयांच्या एका गीतावर आर डी. बर्मन तथा पंचम अगदी लुब्ध झाले होते गीताचे बोल होते- ‘पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे’, पंचम खळयांकडे नेहमी त्या गाण्याची फर्माईश करायचेय.
तरूण आहे रात्र अजूनी
सुधीर फडके, वसंत प्रभू, खळे यांच्या प्रमाणेच आशाजींच्या मराठी गीताला फुलवले ते पं. हृदयनाथ मंगेशकरांनी! हृदयनाथांची चाल मूळातच खूप कठीण त्यातील आलाप, तराणे त्याहून अवघड. पण आशाजींनी अक्षरश: हे आव्हान स्वीकारत हृदयनाथांची अवघडात अवघड गाणी कमालीची गेयतापूर्ण केली. त्या स्वत: सांगतांत, ‘तरूण आहे रात्र अजूनी’, ‘राजसा निजलास का रे’ हे हृदयनाथांच्या कठीण गीतांपैकी एक आहे. आरती प्रभूंची काहीशी गूढ, दुर्बोध गाणी ही आशाजींनी मदमस्तपणे गायली ‘ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना’, ‘समईच्या शुभ्र कळयां’, ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’, ही गाणी आशाजींची मराठी मैफल गाजवून सोडतात. सुरेश भटांनी व्यक्त केलेली फिर्याद ‘मी मज हरवून बसले गं’, ही आजही आपला गोडवा अजून टिकवून आहे, ती त्यामागच्या रंगरंगील्या आवाजामुळेच!
ऋतु हिरवा ऋतु बरवा
आशाजींच्या इतर काही गाजलेल्या रचनांचा आढावा आता घेऊयात. यशवंत देवांकडील- ‘विसरशील खास मला दृष्टीआड होता’, ‘तू दूर दूर तेथे हूर हूर मात्र येथे’ पु.लं.नी संगीतबध्द केलेले ‘नाच रे मोरा अंब्याच्या वनात’…. ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘खुलविते मेंदी माझा रंग गोरा पान’, ‘देव जरी कधी भेटला’, ‘फुलले रे क्षण माझे फुलले रे’, ‘मना तुझे मनोगत’, ‘आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी’, ‘ऋतु हिरवा ऋतु बरवा’, ‘या डोळयांची दोन पाखरे फिरतील तुमच्याभोवती’, ‘स्वप्नातल्या कळयांनो’, ‘रूपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना…’ -ही लुभावणारी यादी न संपणारी आहे…
आशाजींच्या अफाट गाजलेल्या ‘बुगडी माझी सांडली ग’ आणि ‘रेशमाच्या रेघांनी…’ या दोन लावण्यांना कसे विसरता येईल? दीनानाथांच्या पावलावर पाऊल ठेवत आशाजींनी काही नाटय गीतेही गायली. ‘मधुमीलनात या’, ‘जगी या खास वेडयांचा पसारा’, ‘ परवशता पाश दैव जाणे’, ‘कठीण कठीण किती पुरूष हृदय बाई…’ अशाताईनी नाटयगीतात आणखीही बहर आणला असता… असो. अमृतमोहत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या आशाताईंची हिदी गाणी आपण नेहमीच ऐकतो. पण आज विसरत चाललेल्या या मराठी गीतांना वाढदिवसानिमित्त पुन्हा पुन्हा आठवणे म्हणजे आपली संस्कृती समृध्द करणेच आहे नाही का? आशा भोसले यांचे वाढदिवसानिमित्त
अभिष्टचिंतन व मन:पूर्वक शुभेच्छा.
– धनंजय कुलकर्णी