काव्याची समज अन् संगीताचं ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा

Sudhir Phadke बाबूजी. अक्षरे केवळ तीनच. पण सातही सूर त्यात ओतप्रोत भरलेली. प्रत्येक स्वर सच्चा. आतून आलेला. काव्याची समज अन् संगीताचं ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा. त्यांचं हरएक गाणं म्हणजे एक आगळा अनुभवच. कारण तिथं प्रतिमेपेक्षा प्रतिभा मोठी.

सुधीर फडके यांचा जन्म २५ जुलै १९१९ ला कोल्हापुरातील विनायक वामन फडके यांच्या घरात झाला. त्यांचे मूळ नाव रामचंद्र फडके. सुधीर फडके यांचे वडिल कोल्हापुरातील नामांकित वकील होते. देशभक्त व समाज सेवक असणारे फडके वकील यांना आदराने लोक ‘कोल्हापुरचे टिळक’ म्हणून गौरवित असत. संगीत व साहित्यप्रेमी फडके वकिलांच्या घरी ग्रामोफोन रेकॉर्डचा उत्तम संग्रह होता.

घरी शास्त्रीय संगीताच्या दुर्मिळ तबकडयांचा खजिना. पण ही गाणी ऐकण्याच्याही अधीच वयाच्या तिस-या वर्षापासून राम (बाबुजीचं पाळण्यातलं पहिलं नाव) दारात येणा-या भिक्षेक-यांच्या गाण्यांची नक्कल करू लागला होता. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांनी त्याला पं. वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीत साधनेसाठी धाडलं. अकराव्या वर्षी पाध्येबुवांनी रामला कोल्हापुरात भरलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिषदेत गायला लावलं आणि ह्या लहान वयात पोराने आपल्या गायकीने सा-यांना दिपवून टाकलं.

१९३० ते ३४ या काळात शिक्षणासाठी मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीत दाखल झालेल्या रामने इथेही पं. बाबुराव गोखले यांच्याकडे संगीताचे धडे सुरूच ठेवले होते. ३४ साली कोल्हापुरात परतल्यावर तो हारमोनियम वादनाच्या क्लास चालवणा-या न. ना. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण मेळयात गाऊ लागला. १९२८ सालीच आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घरची परवड सुरू झाली. या काळात रामने भाजीपाला विकला, चहापूड विकली, पण आपली जिद्द कामय ठेवली. न. ना. देशपांडेंनीच त्यांच राम हे नाव बदलून सुधीर ठेवलं याच नावाने पुढे संगीतयुगावर आपली मोहोर उमटवली.

१९४१ साली बाबुजींना एच्. एम्. व्ही. या रेकॉर्डिंग कंपनीने संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरीवर रुजू करून घेतलं. तिथून त्यांच्या संगीत कारकिर्दीस प्रारंभ झाला. ‘विझलेली वात’ या नाटकाला त्यांनी संगीत दिलं, ते त्यांचं पहिलं दिग्दर्शन होतं. ‘वंदेमातरम्’ हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. १९४६ साली त्यांनी स्नेहल भाटकरांबरोबर ‘रुक्मिणी स्वयंवर’ या बोलपटाला संगीत दिलं. त्याच वर्षी प्रभातच्या ‘गोकुळ’ या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिलं. पुढे ‘पुढचं पाऊल’, ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘प्रपंच’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘एकटी’, ‘मुंबईचा जावई’, ‘झाला महार पंढरीनाथ’ हे आणि असे कैक चित्रपट त्यांच्या स्वरसाजांनी सजले आणि संगीत दुनियेत फडके युग अवतरलं. ग. दि. माडगुळकर आणि राजा परांजपे यांच्याबरोबरची त्यांची युती मराठी रसिकांसाठी फलदायी ठरली. या त्रयीने शब्द-सूर-चित्रांचा आनंदलोक उभा केला.

बाबुजींनी भावगीतांकडे आपला मोहरा वळवला तेव्हा हा गानप्रकार इथे चांगला रुजला होता. पहिला अतिहळवेपणा आणि नजाकतीचा बहर येऊन गेला होता. या पार्श्वभूमीवर बाबुजींनी भावगीतांचा स्वतंत्र विचार केला. शब्दोच्चार स्पष्ट करणं आणि त्यांच्या वजनासकट त्यातला भाव पोहचवणं याला त्यांनी महत्त्व दिलं. कवि मंगेश पाडगावकर आकाशवाणीवर असतांना त्यांच्या ‘कधी बहर कधी शिशिर’ या गाण्याचं रेकॉर्डिंग बाबुजींच्या आवाजात झालं, ते ऐकतांना पाडगावकर अक्षरश: थरारून गेले. आपण आपलेच शब्द नव्याने ऐकतो आहोत, आपली कविता नवा जन्म घेते आहे, अशी अनुभूती त्यांना आली. पाडगावकरांच्या ‘अशी पाखरे येती’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गाण्यांना बाबुजींच्या सूरांनी अमरत्व दिलंय. शांता शेळकेंच्या ‘तोच चंद्रमा नभात’चं स्थान नभात चंद्र असेपर्यंत रसिकांच्या मनात अढळ राहील आणि माणिक वर्मांच्या ‘घननीळा लडिवाळा’ अन् ‘सावळाच रंग तुझा’ या गाण्यांची गोडी कधीही विटणार नाही. शास्त्रीय संगीताची बैठक बाबुजींच्या संगीताला असला तरी गंधर्व गायकीच्या अभ्यासाने त्यात लालित्य आलं होतं. संगीतातली नवी वळणं आत्मसात करताना एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता. त्यामुळेच बाबुजी सूरांच्या गाभ्यापर्यंत पोचू शकले.

या थोर संगीतकाराचा महिमा सांगायला एक ‘गीत रामायण’ पुरेसं आहे. १९५५ सालच्या रामनवमीपासून पुणे आकाशवाणीवरून सुरू झालेलं ‘गीत रामायण’ मराठीपणाची सांस्कृतिक खूण म्हणून आजही ओळखलं जातं. गदिमांची गीतं आणि बाबुजींची स्वररचना यांनी मराठी मनावर मोठंच गारूड केलं. या कार्यक्रमाच्याही अनेक आख्यायिका आहेत. अगदी पहिल्या ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ या गाण्यापासून. हे गीतच म्हणे रेकॉर्डिंगपूर्वी हरवलं. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता गदिमांनी ते नव्याने लिहून दिलं आणि साडेसातला बाबुजींनी त्याला चाल लावून गाऊन ध्वनिमुद्रितही केलं आणि पावणेआठला ते प्रसारित झालं. हा कार्यक्रम पुढे अनेक भाषांतून सादर झाला पण त्याच्या मूळ चालींना कोणीच धक्का लावला नाही, यातच त्याचं मोठेपण कळून येतं. ‘दवबिंदूंनी भिजलेल्या तृणपात्यांचा पायांना स्पर्श व्हावा तशासारखा अनुभव मला ‘गीतरामायाणा’तल्या सुधीरच्या गाण्यातून अनेकवेळा आलेला आहे’, असं पुलंनीच म्हणून ठेवलंय.

कलावंत म्हणून बाबुजींचा प्रवास असा समृध्द झालेला असला तरी त्यांनी स्वत:ला कलावंत म्हणवून घेण्यापेक्षा राष्ट्रभक्त म्हणवून घेणं जास्त पसंत केलं. त्यांनी हिंदूराष्ट्राचं स्वप्न पाहिलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मनस्वी प्रेम केलं. त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग लहानपणीच चेतवलं गेलं होतं. वकिली पेशातल्या वडिलांकडे खटला लढवण्यासाठी, सल्ल्यासाठी क्रांतिकारक येत. त्यांच्या गप्पा ते भान हरपून ऐकत. स्वा. सावरकर रत्नागिरीस १९२४ ते ३७ या काळात स्थानबध्द असताना बाबुजींना त्यांच्या वडिलांनी सावरकरांच्या भेटीस नेलं होतं. या भेटीत सावरकरांनी त्यांना ‘मला काय त्याचे’ आणि ‘मोपल्यांचं बंड’ ही पुस्तकं भेट दिली. या भेटीने बाबुजींच्या व्यक्तिमत्वावर मोठा परिणाम झाला. पुढे ११५४ साली ते दादरा नगरहवेलीच्या मुक्तीलढयात उतरले. यात त्यांच्या पत्नी ललिता फडके यांनीही त्यांना साथ दिली. पुढे गोवा भारतात विलीन झाला तरी स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांची पोर्तुगीजांनी सुटका केली नव्हती. तेव्हा ‘वीर मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन करून बाबुजींनी त्यांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न केले. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि थोडयाच दिवसात आणखी एक स्वातंत्र्य सैनिक डॉ. तेलो मस्कारेन्हस यांचीही सुटका झाली. एका दलित स्त्रीवरच्या अन्यायाची तड लागावी म्हणून बाबुजींनी हुतात्मा चौकात उपोषणही केलं होतं. या उपोषणात त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांनाही सामिल करून घेतलं होतं. या सगळयातून त्यांची समाजाप्रति असलेली बांधिलकीच दिसून येते.

याच बांधिलकीतून आणि सावरकरांच्या प्रेमातून त्यांनी त्यांच्यावर भव्य चित्रपट निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. हा चित्रपट पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांनी पराकोटीची शर्थ केली. आपल्या मनातलं चित्र पडद्यावर यावं, हा त्यांचा हट्ट होता. त्यापायी त्यांनी अनेकाचे रोष पत्करले. वाद ओढवून घेतले. टीका सहन केली. पण अंतिमत: स्वतंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पडद्यावर आला.

आपलं एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्याची, कृतार्थतेची भावना घोऊन बाबुजी गेले आहेत. आपलं अमूल्य संगीतधन नव्या पिढीकडे सोपवून ते गेले आहेत. ही अक्षयधनाची पोतडी उघडून पाहताना ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर राहू दे’ एवढंच आपण म्हणू शकतो.

सुधीर फडके यांना लाभलेले पुरस्कार

१९६२-६३ पहिल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘प्रपंच’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार
१९६३-६४ सुधीर फडके निर्मित (श्रीराम चित्र) ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटास राष्ट्रपती रौप्यपदक
१९६३-६४ ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपटास महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात दुसरे पारितोषिक
१९६७-६८ ‘संथ वाहते कृष्णामाई’साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार
१९६८ सूरसिंगार संसदेतर्फे ‘भाभी की चुडियाँ’ या चित्रपटातील ‘ज्योती कलश छलके’ या गीतासाठी स्वामी हरिदास पुरस्कार
१९६८-६९ चित्रपट ‘आम्ही जातो आमुच्या गावासाठी’ उत्कृष्ट संगीतकार
१९७० ‘मुंबईचा जावई’ चित्रपटातील ‘प्रथम तुझ पाहता’ ह्या गीताच्या स्वररचने बद्दल सूरसिंगार संसदेचा स्वामी हरिदास पुरस्कार
१९७०-७१ ‘मुंबईचा जावई’ चित्रपटातील ‘प्रथम तुझ पाहता’ ह्या गीताच्या स्वररचने बद्दल सूरसिंगार संसदेचा स्वामी हरिदास पुरस्कार चित्रपट ‘धाकटी बहिण’ उत्कृष्ट पार्श्वगायक
१९७४-७५ चित्रपट ‘कार्तिकी’ उत्कृष्ट पार्श्वगायक
१९८१ संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९९६ उष:प्रभा अधिष्ठाना तर्फे चित्रपती कै. व्ही. शांताराम स्मृती गौरव पुरस्कार
१९९६ कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे ‘गोदावरी गौरव’
१९९६ चतुरंग प्रतिष्ठानातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार
१९९७ संस्कार भारती तर्फे (कोल्हापूर) ‘करवीर भूषण’ पुरस्कार
१९९९ माणिक वर्मा प्रतिष्ठानातर्फे ‘माणिकरत्न’ पुरस्कार.