मूल-मंत्र

शाळा मुलांची आणि पालकांची

जून महिना सुरू झाला की मुलांप्रमाणेच पालकांना ही शाळेचे वेध लागतात. दोघेही आपापल्या परीने शाळेची तयारी करायला लागतात. मुलांपेक्षा पूर्णत: वेगळी असते पालकांची शाळा तयारी. कारण पालकांना मानसिक, भावनिक, बौध्दिक, आर्थिक अशा वेगवेगळया पातळयांवर विविध प्रकारे ही शाळा तयारी करायची असते. आणि ज्या पालकांची मुले यावर्षी प्रथमच शाळेत जाणार असतात ते पालक हवामानखात्याप्रमाणे मुलांच्या हवामानाचा सतत अंदाज घेत कायम संभ्रमात असतात. प्राथमिक व माध्यमिक शाळेतल्या मुलांच्या पालकांचे प्रश्न तर आणखीन वेगळे असतात.

जेव्हा मूल प्रथमच शाळेत जाणार असतं तेव्हा शाळेत जाण्या अगोदर त्याची शाळेशी ओळख झालेली असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पालकांनी शाळा सुरू होण्याआधी आठवडाभर मुलाला रोज संध्याकाकाळी शाळेत, शाळेच्या आवारात फिरायला घेऊन जावे. त्याच्याशी बोलताना ‘तुझा वर्ग’, ‘आपली शाळा’, ‘आता तुझी मजा’ असा जाणीवपूर्वक उल्लेख करावा. यामुळे मुलाची शाळेविषयी उत्सुकता तर वाढतेच पण शाळेच्या पहिल्या दिवशी ती वास्तू त्याला अनोळखी वाटत नाही. रात्री झोपताना ‘शाळा’ या विषयाभोवतीच गप्पा कराव्यात. उदा:- शाळेत नवीन मित्र-मैत्रिणी भेटणार, शाळेत चित्र काढायची, नाच करायचा गाणी म्हणायची, बाई रोज गोष्टी सांगणार, तुम्हाला नवीन नवीन खेळ खेळायला मिळणार…म्हणजे तुमची मजाच किनई?

या वयोगटातील मुले शाळेत जायला उत्सुक होऊ शकतात पण प्रश्न असतो त्यांना शाळेत टिकवायचा. यासाठी अगदी साधी सोपी युक्ती आहे. पूर्वी मी रविवारची शाळा चालवत असे त्यावेळी ही युक्ती आम्हाला सापडली आणि ती चांगली यशस्वी ठरली. या वयोगटातील मुलांना एखाद्या ‘रोल मॉडेलचं किंवा सुपर मॉडेलचं’ प्रचंड आकर्षण असतं. किंबहुना त्यांचा ब-यापैकी पगडा मुलांच्या मनावर असतो. त्यामुळे काही बाबतीत ‘मुलांनी काय काय करावे’ हे त्यांना सांगणे म्हणजे आपल्या सहनशक्तीची परीक्षा पाहण्यासारखे असते. अशावेळी मुलाला ‘तू काय कर’ हे सांगण्यापेक्षा त्यांचे रोल मॉडेल काय काय करतात हे सांगितले की त्यातून नेमका मेसेज मुलांना मिळतो. मुलाचं प्रेम आणि स्पर्धा त्यांच्या रोल मॉडेलशी निगडित असल्याने, आपल्या अपेक्षित असणारे काम व्यवस्थित साध्य होते. पण लक्षात ठेवा, ही युक्ती दरवेळी वापरता येत नाही.

मुलांचं रोल मॉडेल कुणीही असू शकतं उदाहणार्थ त्यांचे आई, बाबा, बाजूचे दादा, ताई किंवा अगदी आमिरखान, शाहरूख, काजोल असं कुणीही. आम्ही पालकांनी मुलांच्या रोल मॉडेलना केंद्रस्थानी ठेवून गोष्टी तयार केल्या. उदाहणार्थ ”लहानपणी शाहरूखला शाळा खूप आवडायची. तो शाळेत जाताना नेहमी हसत जायचा आणि शाळेत गेल्यावर रडणा-या मुलांना हसवायचा. शाहरूख जाम शूर होता. शाळेत एकटा थांबायचा व बाईना पण मदत करायचा. संध्याकाळी घरी आल्यावर त्याचे आई-बाबा त्याला एक निळा बिल्ला बक्षीस द्यायचे आणि शाहरुखने असे तीस बिल्ले जमवले तेव्हा त्याच्या आईने एक मस्त मोठी रंगपेटी त्याला बक्षीस दिली. शाहरूखने अजून जपून ठेवलीय ती रंगपेटी. आपण त्याला भेटू तेव्हा नक्की मला आठवण कर हां!” ही युक्ती म्हणजे अनेक कुलुपांना चावी आहे. देखो आपका ताला खुलता है क्या? आणि नाहीच उघडलं कुलूप तर ही युक्तीची चावी थोडया वेगळयाप्रकारे घासून तर पाहा. कुलूप उघडणार हे निश्चित!

ज्यांची मुले प्राथमिक शाळेत आहेत त्यांना थोडया वेगळया प्रकारची तयारी करावी लागते. या पालकांमध्ये ‘एकच मूल’ असणारे पालक असे दोन भिन्न गट असतात. पहिल्या गटातील खूपसे पालक हे अति काळजीवाहू, संवेदनशील आणि मुलाच्या चौफेर प्रगती विषयी दक्ष व तहानलेले असतात. परिसरातील इतर मुलांच्या तुलनेत आपले मुल मागे तर पडत नाही ना याबाबत त्यांचा सतत शोध सुरू असतो. दुस-या गटातील खूपसे पालक अनुभवी असल्याने काहीसे बिनधास्त असतात. पण त्यामुळे आपल्याच दोन मुलात तुलना करण्याचा धोका इथे असू शकतो.

आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे. शाळेची तयारी समजून घेण्याच्या अगोदर ही आपल्याला मुलांची मानसिकता समजून घ्यायची आहे. गेला महिना दीड महिना मुले हुंदडत आहेत. वाचन, लेखन, एका जागी चार तास बसणे, गृहपाठ, क्लास हे सारं विसरूनच गेली आहेत. शक्यता आहे की या गोष्टींबाबत मुले फारसं चागलं बोलणार नाहीत. त्यावेळेस त्यांच्यावर रागावू नका. पटत नसलं तरी त्याचं म्हणणं ऐकून घ्या. त्या क्षणी त्याला अभ्यासाचे महत्त्व किवा जीवनातील अभ्यासाचे स्थान याबद्दल काहीही सांगू नका. तो हे मनापासून बोलत नसतो तर मनात साचलेल्या रागाला, संतापाला तो मोकळी वाट करून देत असतो. कोंडलेल्या रागाचा निचरा होणं ही त्याची त्यावेळची गरज असते. त्यातूनच तो नकळत स्वत:ला रिफ्रेश करत असतो!

पण अशावेळी जर पालकांनी उपदेशाचे फवारे मारले तर राग विझण्या ऐवजी तो आत कोंडला जातो आणि मुले धुसफुसत राहतात. पालक व मुलात छत्तीसचा आकडा तयार होतो. त्याप्रमाणे सुटीकडे पाहण्याचा पालक व मुले यांचा दृष्टीकोन पूर्णत: भिन्न असू शकतो. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या वेळी अशा घरात चक्री वादळे होतात. मुलांना वाटतं, ‘सुटी म्हणजे धमाल मजा, मुख्य म्हणजे रटाळ अभ्यासापासून सुटका आणि काहीतरी नवीन करायला – करून पाहायला चांगली संधी.’ अनेक पालकांना सुटी म्हणजे डोके दु:खीच वाटते. दिवसभर धमाल धांगडधिंगा करणारी आनंदी मुले पाहिली की त्यांना अर्धशिशी सुरू होते.

त्यांना वाटत असतं, “काय हा दिवसभर गोंधळ? मुलांनी जरा गंभीरपणे वागलं पाहिजे. सुटीचा फायदा घेतला पाहिजे वगैरे”.
शाळा सुरू होण्याच्या सुमारास अशा पालकांच्या खवट दृष्टीकोनाची सावली त्यांच्या बोलण्यातून जाणवू लागते आणि चक्रीवादळाचे रूपांतर असंतोषाच्या त्सुनामी लाटात होते.

उदा, ”बरं झालं शाळा सुरू झाली. आता सुटी विसरा आणि अभ्यासाला लागा. चांगले दिवे लावलेत. तुम्ही सुटीत…(ही फक्त सुरूवात आहे. यापुढे तेरा एपिसोड अपेक्षित आहेत)” अशी मुक्ताफळं ऐकल्यावर कुठला मुलगा आनंदाने शाळेत जाईल आणि अभ्यासाचे दिवे लावेल?

पालक आणि मुले यांच्यात दरी निर्माण होण्यास मुख्यत्वे कारणीभूत असणा-या दोन मुलभूत गोष्टी म्हणजे पालक मुलांशी बोलण्यासाठी (किंवा त्यांना सुनावण्यासाठी) वापरतात ती भाषा. आणि दुसरी म्हणजे, पालकांची देहबोली. शाळेसाठी तयारी करताना आपल्याला या दोन गोष्टींपासून तयारी करावी लागणार आहे. मुलांशी बोलतांना जर मूल समजून घेण्याची, त्याची मानसिकता जाणून घेण्यासाठी तळमळ असेल तर मग आपोबापच बोलणं सकारात्मक होतं आणि देह बोली आश्वासक होते. आपल्याला मुलांना शाळेत पाठवायचं नसून त्यांना शाळेत जाण्यासाठी तयार करायचं आहे. शाळेसाठी मुलाप्रमाणेच आपल्यालाही तयारी करायची आहे. यातली पहिली पायरी म्हणजे, आपले सुटी बाबतचे पूर्वग्रह बाजूला ठेवून मुलाशी सुटी संदर्भात गप्पा मारणे. या गप्पातूनच त्याला शाळेकडे नेणे.

दुस-या पायरीवर शाळा साहित्याची खरेदी हा भाग असतो. या खरेदीच्यावेळी मुलाची तुमच्या स्वत:शी किंवा मुलाशी तुलना करू नका किंवा विचित्र अटी घालू नका. उदा, ”केव्हढं महाग दप्तर घेतलं तुला! आम्ही तर लहानपणी कापडी पिशवी न्यायचो.” असल्या गोष्टीचं काहीही अप्रुप मुलांना वाटत नाही वाटलीच तर त्यांना पालकांविषयी सहानभूती वाटते. किंवा ”इतकी महाग स्कूलबॅग कुणाच कडे नसेल. म्हणून यावर्षी चांगला अभ्यास कर.” महाग वस्तू आणि चांगला अभ्यास यांचा परस्पर संबंध (बिचा-या) मुलांना कळत नाही. खरेदी करतांना वस्तूची उपयुक्तता आणि आपलं बजेट याची स्पष्ट कल्पना मुलांना द्या. बजेटपेक्षा महाग वस्तू मुलांसाठी खरेदी करून, आपण मुलांसाठी फार मोठा त्याग करत आहोत, असा गोड गैरसमज कृपया करून घेऊ नका. कारण यामुळे मुलांच्या अपेक्षा उंचावतात व खरेदी नंतर ‘त्यागमूर्ती ‘ पस्तावतात.

तिसरी आणि शेवटची पायरी. मुलांचा अभ्यास हा मुलांनीच करायचा असतो असा जर पालकांचा समज असेल तर परिस्थिती कठीणच आहे. मुलाची अभ्यासातील अडचण ही त्याची नसून आपली आहे आणि आपण दोघांनी मिळून ती सोडवायची आहे असा दृष्टीकोन जर पालकांनी ठेवला तरच मुलाची शिकण्याची उमेद वाढेल! आणि मुलांसोबत शिकण्याचा निखळ आनंद पालकांनाही मिळेल!!

अगदी थोडक्यात सांगायचं तर, पालकांनी शाळेची तयारी करणं म्हणजे, ”मुलांच्या यशात आणि अपयशात वाटेकरी होण्याची मानसिक तयारी करणं!”

‘मुलाला समजून घेणं म्हणजे आपल्यातच लपलेलं मूल ओळखणं’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल म्हणा.

– राजीव तांबे