मूल-मंत्र

बेस्ट ऑफ लक!

घरात दोन मुले असतील तर त्यांचे आपापसातील रूसवे फुगवे आणि फुटकळ भांडणं हा रूटीनचाच भाग आहे. तरीसुध्दा अनेक पालकांना वाटतं की ‘फक्त आपलीच मुलं भांडतात फार, शेजार्‍यांच्या घरात शांतता अपरंपार’. खरं सांगतो हे काही खरं नाही.

घरातील मुले कधीच एकमेकांशी जराही भांडत नाहीत, एकमेकांवर रूसत नाहीत, गप्पा मारताना, खेळताना आपलं वेगळं मत मांडत नाहीत किंवा आई वडिलांना विश्वासात घेऊन एकजण दुस-याविषयी काहीही सांगत नाही असं असल्यामुळे घरात असणारी शांतता ही भयावह शांतता आहे. हे काही चांगल्या निरोगी घराचे लक्षण म्हणता येणार नाही.

घरात भावाभावांनी किंवा भाऊबहिणींनी आपापसात एकमेकांवर थोडफार रागावणं, चिडणं किंवा चुटूकपुटूक भांडणं हा सुध्दा त्यांच्यासाठी एक बौध्दिक व्यायामच आहे. मुलं स्वतंत्रपणे आपलं वेगळं मत मांडतात, आपल्या मताशी प्रामाणिक राहून जुळवून घ्यायला नकार देतात किंवा काही प्रमाणात हट्टीपणा करतात तेव्हा भांडणाची पहिली ठिणगी पडते.

आपापसात जर भांडण सुटले नाही तर मग त्यांच्यातील एकजण त्याक्षणी घरात उपलब्ध असणार्‍या आई किंवा बाबांच्या सुप्रीम कोर्टात दाद मागायला जातो. या पॉईट पर्यंत भांडण ठिणगीच्या स्वरूपातच असते. दोघांनाही अपेक्षा असते की आपलेच म्हणणे मान्य होईल. ज्याने अगोदर कोर्टात धाव घेतली आहे त्याला जरा अधिक खात्री असते इतकेच.

आता सगळी कसरत त्या न्यायाधिशाला करायची असते. कारण त्या ठिणगीचे वणव्यात रूपातंर व्हायला फार वेळ लागत नाही. सुप्रीम कोर्टात गेल्यावर न्याय काय मिळतो यापेक्षा ही ‘आमच्याकडे व आमच्या महत्त्वपूर्ण भांडणाकडे पाहण्याचा न्यायाधिशांचा दृष्टीकोन काय आहे?’ यालाच त्या दोघांच्या दृष्टीने अधिक महत्त्व असते. व त्यावरच घरातील पुढचे हवामान अवलंबून असते.

आपण एका घरात डोकावून पाहू.

पार्थ आणि रूपाली याचं नेहमीप्रमाणे क्षुल्लक कारणावरून भांडण झालं. आईने दोघांसाठी पोहे करून ठेवले होते. ”पार्थने जास्ती पोहे खाल्ले आणि मला फक्त चमचाभरच ठेवले. हा नेहमीच असं का करतो पण याला कुणीच काही बोलत नाही. मला आता भूक लागलीय. मला काहीतरी गरम खायला करून दे आणि त्याला मात्र अजिबात देऊ नकोस” असं रूपालीचं म्हणणं होतं.

”मला जेवढी भूक होती तेवढे पोहे मी खाल्ले. आणि समजा रूपालीने कमी खाल्ले असते व पोहे उरले असते तर तू मलाच ओरडली असतीस की. आणि मी फक्त चमचा भरच जास्त खाल्ले असतील, ही रूपालीच खोटं बोलतेय. आणि हो, तिला जर का तू काही खायला देणार असशील तर ते मलाही हवं आहे. मला पण भूक लागलीय” असा पार्थचा युक्तीवाद होता.
आई नुकतीच कामावरून दमून आली होती. घरी आल्या – आल्या न्यायनिवाडा करण्याच्या मन:स्थितीत ती नव्हती.

”ऑफिसात मर – मर काम करायचं आणि घरी येऊन तुमची भांडणं सोडवायची, एवढीच कामं आहेत का रे मला? आता आपण एक सोनं मोजायचा तराजू आणू. आणि दोघांनाही खायला देताना मोजून मापून देऊ. आणि एवढे पोहे हडपून सुध्दा तुम्हाला भूक लागली असेल, तर मग आता मलाच खा! म्हणजे माझी तरी सुटका होईल. दिवसभर हुंदडायचं तर भुका का नाही लागणार? हां सांगा, शाळेचा, क्लासचा अभ्यास झाला?” आईने अशी एके फॉर्टीसेव्हन सुरू केली आणि मानसिकदृष्टया मुले जख्मी झाली.
मुले दुखावली गेली.
घरातलं वातावरण बिघडलं!

हाच प्रसंग वेगळयाप्रकारे घडला असता तर……
”हे बघ पार्थ, जे खायला करून ठेवलं असेल ते दोघांनी एकमेकांच्या संमतीने अर्ध-अर्ध वाटून घ्यायचं. समजा रूपालीनेच असं केलं असतं आणि तुला कमी मिळालं असतं तर चाललं असतं का?
आणि उद्यापासून तुमच्यासाठी थोडं जास्तीचे खाणं करून ठेवीन हां. चला, तुमच्याप्रमाणे मला पण भूक लागलीय. आपण सगळे मिळून पटपट काहीतरी खायला करू या.

मग खाताना मला सागां आज तुमचा अभ्यास काय – काय झाला?” आईने असं म्हणताच घरातील चक्री वादळाचे गुलाबी थंडीत रूपातंर झाले असणार हे काही वेगळं सांगायला नको. मुलांवर प्रेम करणारे न्यायाधिश, मुलांची भाडणं सोडवताना कधीही एके फॉर्टीसेव्हन वापरत नाहीत. तर ते आपल्या न्यायाधिशांच्या खुर्चीतून खाली उतरतात व मुलात मूल होतात. अशा ‘मित्र न्यायाधिशावर’ मुले नितांत प्रेम करतात.

पालकांसाठी गृहपाठ – वरील दोन प्रसंगांपैकी कोणता प्रसंग तुम्हाला अधिक ओळखीचा वाटतो, हे मनातल्या मनात ठरवा. हे दोन प्रसंग मुलांना सांगून त्यांचे ही मत विचार. तुमचे मनातले उत्तर बरोबर आले तर तुम्हाला पन्नास टक्के मार्क मिळाले. पण मुलांच्या मदतीने जर तुम्ही न्यायाधिश पदाचा राजीनामा देऊ शकलात तर तुम्हाला शंभर टक्के मार्क मिळाले असं समजा. माझ्यातर्फे तुम्हाला ‘बेस्ट ऑफ लक’!

‘घरातल्या मुलांना न्याय, तेव्हा न्यायाधिशांना बाय-बाय’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.
– राजीव तांबे