संगीतकारांचा संगीतकार श्रीनिवास खळे

“श्रीनिवासचं गाणं सुरू झालं आणि गाण्याचा मुखडा पूरा झाला की हा आता आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा काही अंदाजच करता येत नाही. अंत-याच्या दोन ओळी झाल्या की आपल्याला असा प्रश्न पडतो की हा मुखडयाला परत कसा येणार? तसे सगळेच परत येतात, उडया मारत. त्यातल्या काही माकडाच्याही असतात. पण हा जो येतो तो असा की – एका डहाळीवरून फुलपाखरूं जसं दुस-या डहाळीवर जातं तसा हा अलगद मुखडयाला परत येतो आणि आपल्याला कळतंच नाही की हा येथे आला कसा!”
– पु ल देशपांडे

“एक अलौकिक संगीतकार वगैरे स्तुती केली तरी त्या स्तुतीला शब्दच नाहीत. खळे म्हणजे खळेच, त्यांनी ज्या पध्दतीने संगीत निर्माण केले तसं करणारं कोणी नाही व पुढे होईल की नाही हे नियती काय करेल ते माहीत नाही. यांच्यासारख्या चाली मला नाही येणार! यांचं मी म्हटलेले ‘लळा, जिव्हाळा शब्दच खोटे’ शिकतांना मी मनांत खरोखर घाबरलो होतो की यांच्या या गाण्यातल्या जागा माझ्या गळयातून निघतील असं मला नाही वाटत व आजही त्याच भावना आहेत”
– सुधीर फडके

खळयांनी स्वरबध्द केलेली ‘अभंगवाणी’ करत असताना पंडित भीमसेन जोशी खळयांच्या पायाशी बसले. खळे, ‘अरेरे, हे काय करतां?’ म्हणत असे काही गडबडले, तेव्हां भीमसेनजी म्हणाले ‘आत्ता, तुम्ही माझे गुरू व मी तुमचा शिष्य’.
– टाइम्स ऑफ इंडिया ३० एप्रिल २०००

“मौका मिलता तो मै खळेजीका शागीर्द बनता. इनके जितने अच्छे गीत हम जिंदगीभर बना नही सके. आप हमारी नॅशनल प्रॉपर्टी हो, आपके जैसे कलाकार अब है कहाँ ?”
– नौशाद

‘अडीअडचणी, कटकटीने आपण रडत बसतो. पण परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं तसं खळे त्यांच्या आयुष्यातील दु:खांना स्पर्श करतांच त्याचे सूर होतात व त्यातून गाणं निर्माण होते. आज बहुतेक सर्व कोणाचे तरी अनुकरण करतात. पण खळे स्व:ताचीच नवनवी शैली शोधत असतात, तेच ते दळण दळत नाहीत. खळे कुणाचं तर सोडाच, श्रीनिवास खळेचही कधी अनुकरण करीत नाहीत.’
– मंगेश पाडगांवकर

Shrinivas Khale १९५० साली रेल्वेतील नोकरीचा आलेला कॉल अजून आलाच नाही असं खोटं सांगत खळयांनी वडिलांना फसवलं नसतं तर आपण या श्रीनिवास खळे नामक संगीतातील दैवी चमत्काराला मुकलो असतो! ‘म्हणजे सर्वांनी वडिलांना फसवावं म्हणजे काही होता येतं असं नाही हो!’ . काका (खळे माझ्या वसुआत्याचे पति) त्यांचं ते टीपिकल मिश्कील हसत म्हणतात. सतत हसत रहाणं, कुणालाही – अगदी लहान, गरीब कुणी का असेना- त्यांना अतिशय प्रेमाने वागवणं, सतत नम्र व मृदु बोलणं म्हणजे आमचे दत्ताभाईकाका. आमच्या बडोद्याला नातेवाईकात, जुन्या मित्रपरिवारांत आज अजूनही श्रीनिवास खळे म्हणजे दत्ताभाईचं.

या अशा साध्यासुध्या माणसांचे असामान्यत्व त्याच्या मार्दवी, आर्जवी स्वभावात दडलेले आहे. लक्ष्मी फारशी प्रसन्न झाली नसली तरी अगणित सन्मान, पुरस्कार यांचे प्रचंड भांडवल आहे यांच्याकडे व जणूं त्याचे ओझे खांद्यावर असल्यासारखे हे नम्र असतात. आयुष्यभर खस्ता खात, स्वत:ची व कुटूंबीयांची अनेक आजारपणं झेलत व आयुष्य विस्कळीत करणा-या अनेक घटनांना सामोरे जात हा माणूस इतकी विलक्षण कलाकृती कशी घडवू शकतो हे एक आम्हा सामन्यांना कोडंच आहे. ‘कां वेदनेत होतो हा जन्म साधनेचा’ या पाडगांवकरांच्या काव्यपंक्ती खळे ख-या ठरवतात. यांचे हात इतके कापतात की त्यांना नीट लिहीता येत नाही. मात्र हार्मोनियम पेटीवर बसले की हात थरथरणं थांबतं व ते एकदम वेगळयाच विश्वात जातात, आध्यात्मिक साधक होतात.

आज संगीतक्षेत्रात अनेकांनी गडगंज पैसा मिळविला, पण खळयांनी आपल्या कलेचा बाजार मांडला नाही व जे पदरी पडले त्यात समाधानाने राहत आलेत. या वृत्तीत मोठा सहभाग आमच्या वसुआत्याचा. रुपयाएवढं ठसठशीत लाल कुंकू, हातभर हिरवा चुडा, काळया मण्याचे ओवलेले मंगळसूत्र व त्यातील सोन्याचे दोन मणी-एक वाटी यापलिकडे तिने गुंजभर सोनं कधीही अंगाला लावलं नाही की दुसरे कुठले दागिने घातले नाही. पती हाच आपला एकमेव दागिना मानणारी वसुआत्या जे असेल त्यात सुखासमाधानाने संसार करते. काका म्हणतातही की वसुने कधी पैशासाठी माझ्यावर दडपण आणले नाही, म्हणूनच मी माझ्या संगीताशी एकनिष्ठ राहू शकलो.

लतादिदी अत्यंत जिव्हाळयाने खळेसाहेबांना अनेक प्रकारे समजावत की आपल्याला तीन मुली आहेत तेव्हां पैशाचा विचार प्रत्येकासारखा आपल्यालाही करायला हवा. खळे म्हणत ‘पण दिदी, पैशासाठी काहीही कामं घेऊन मी ती कशी करूं?’ अलिकडे अकरा चित्रपटांना संगीत देण्याची कामं नाकारली तेव्हां देखील खळे याच विवंचनेत होते. कलेशी प्रतारणा करणं त्यांना कधी होणारच नाही.

गेल्या ५०-५५ वर्षात श्रीनिवास खळयांची मोजदाद करता येत नाहीत इतकी गीतं आपण ऐकत आलोय. त्यांचीच त्यांना सगळी गाणी केव्हां, कुठे अशी आठवत नसतात. मात्र त्यांच्या संगीतक्षेत्रातील प्रवासाचे ते जेव्हां वर्णन करतात तेव्हां आपण पार रंगून जाऊन त्या काळांत जातो.

दत्ताभाई खळे बडोद्यात वाढले. दत्ताभाईची संगीताची आवड हौस म्हणून जपावी या मताचे वडिल. त्यामुळे दत्ताभाई बडोद्याच्या म्युझीक कॉलेज म्हणून आतां ओळखले जाणा-या, सयाजीराव महाराजांनी स्थापन केलेल्या भारतीय संगीत महाविद्यालयात गाण्याचे शिक्षण घेऊ लागले. जे श्री मधुसूदन जोशी त्यांना शिकवायचे. तसेच ते आतांहुसेन खाँसाहेब व फैयाज खाँसाहेबांकडे सुध्दा शिकले होते. सयाजीराव महाराजांनी आतांहुसेन खाँसाहेब, निसारहुसेन खाँसाहेब व फैयाज खाँसाहेब यांना या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेमले होते. त्यामुळे अशा विद्वानांकडे संगीत शिकण्याचे त्यांना भाग्य लाभले. १९४५ साली खळे बडोद्याला आकाशवाणीत संगीतकार होते व त्या दरम्यान ब-याच मराठी, गुजराथी, हिंदी गाण्यांना चाली लावल्या. १९५० साली रेल्वेतील नोकरी घ्यावी लागू नये म्हणून वडिलांच्या नकळत मुंबईला आले ते श्री शांताराम रांगणेकर यांच्यामुळे. रांगणेकरांनी खळयांना दोन वर्ष आधार दिला. स्वत:च्या आठ आण्यातून सहा आणे खळयांना द्यायचे, खानावळीचे महिन्याचे पैसे भरून ठेवायचे, श्री अप्पा गजने यांच्याकडे रहाण्याची व्यवस्था करून दिली होती. हे सर्व का तर हा दत्ताभाई बडोद्यात राहिला तर त्याच्या कलागुणांना वाव मिळणार नाही म्हणून. आज अजूनही खळे रांगणेकरांचे ऋण आठवून सद्गदित होतात. वडिलांनी रागवून घराची दारं बंद केली होती तेव्हां रांगणेकर व गजने ह्यांचाच आधार होता.

या काळात खळे के.दत्ता यांच्याकडे असिस्टंट म्युझीक डायरेक्टर म्हणून राहिले. ‘दामन’ सिनेमाची गाणी करतांना प्रथम लता-आशा यांची ओळख झाली. त्यानंतर ‘लक्ष्मीपूजन’ या मराठी चित्रपटाचे काम मिळाले. रात्रभरातच चार गाण्यांना चाली लावून लगेच दुस-या दिवशी पेश केल्या. छान जमलं सगळं. पण पिक्चर मध्येच बारगळलं.
मात्र १९५२ साली खळयांची पहिली रचना ‘गोरी गोरी पान’ लोकप्रिय झाली. या तबकडीच्या दुस-या बाजूला होती ‘एका तळयात होती’. गदिमांची ही गीत आशा भोसले यांनी गायली. नांव नसतांना आशाताई आपलं गाणं गायल्या याचं खळयांना फार अप्रूप वाटलं. तो होता भावगीतांचा सुवर्णकाळ. श्रीनिवास खळयांनी एकाहून एक सरस गाणी केली. ‘जाहल्या काही चुका’, ‘नीज माझ्या नंदलाला’, ‘श्रावणांत घननीळा’, ‘भावभोळया भक्तीची’, ‘सहज सख्या एकदांच’, ‘कंठातच रुतल्या ताना’, ‘रुसला मजवरती’, ‘नको ताई रुसु’……. अशी ही जंत्री बरीच लांबलचक होईल. बोलकी बाहुली चित्रपटातील ‘देवा दया तुझी ही’, ‘आई आणखी बाबा यातून’ तर जिव्हाळा चित्रपटातील ‘या चिमण्यांनो’ ‘लळा, जिव्हाळा शब्दच’ ‘प्रिया तुज काय दिसे स्वप्ना’ अशी अनेक गाणी मनामनात आजही घोळतात.

१ मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणार ही बातमी आल्यावर एच. एम. व्ही. कंपनीने चार दिवसांत महाराष्ट्राची दोन गीत करा असे खळयांना सांगितले. त्यातूनच जन्माला आली शाहिर साबळेंनी गायलेली राजा बडे लिखीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ व चकोर आजगांवकर लिखीत ‘माझे राष्ट्र महान’. ही स्फूर्ती गीतं आज महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमात आग्रहाने गायली जातात.

श्रीनिवास खळेंनी १९६८ साली एच. एम. व्ही.त संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी धरली. १९७० साली संगीत क्षेत्रात २५ वर्ष पूर्ण केली यानिमित्याने सत्कार झाला. भास्कर शेरे यांनी ‘श्रीनिवास खळे एक संकलन’ असे पु. ल.च्या प्रस्तावनेसह अनेक संगीत क्षेत्रातील नामवंताच्या ३५ लेखांचे पुस्तक प्रसिध्द केले.

१९७२ मध्ये लतादिदींना ‘अभंग तुक्याचे’ ही कल्पना सुचली. खळेसाहेबांनी तुकारामांची गाथा घेतली व २५० रचना काढल्या. पण करायच्या होत्या दहाच. ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी’ पहिल्यापासून मनांत बसलेली. मग अप्पा म्हणजे गो. नी. दांडेकरांनी निवडल्या ११६ रचना. ते म्हणाले ‘अरे, ‘श्रावणांत घननीळा’ हा शिरपेच, आतां याहून चांगलं काय?’ परत दोनअडीच तास बसून कमी केल्या व २२ रचनांवर आले. यातून १०च रचना हव्यात म्हणून वसंत बापटांची व विद्याधर गोखल्यांची मदत मागितली. त्यांनी प्रत्येकी काढल्या २० आणि १७ रचना. यातून शेवटी कमी करत खळयांनीच २० अभंग घेऊन चाली लावल्या. त्यातील दहांची निघालेली रेकॉर्ड अजरामर झाली.

१९७५ मध्ये पं. भीमसेन जोशींची ‘अभंगवाणी’ ही रेकॉर्ड निघाली त्यावेळी अण्णा (भीमसेन जोशीं) अत्यंत नम्रपणे खळयांना गुरू मानून त्या रचना शिकायचे. पुढे १९८४ साली श्रीनिवास खळयांनी ‘राम-श्याम गुणगान’ रचली. ही रचना पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी एकत्र गायली. १९९३ साली महाराष्ट्र सरकारने खळे यांना ‘लता मंगेशकर’ पुरस्कार देऊन गौरविले.

१९९५ मध्ये खळयांच्या संगीतातील कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हां हृदयेश आर्टस् ने सत्कार केला व संगीतकार नौशाद यांनी सुवर्ण तबकडी दिली. आजवर ८१ गायक-गायिकांकडून खळयांनी गाऊन घेतलेय म्हणजेच गाणी शिकवलीत. पण खळयांचं संगीत वेगळंच आहे. स्वररचना व लयकारी यांची सांगड घालतांना भलभल्या गाणा-यांना कठीण जातं. खुद्द सुधीर फडके कबूली देतात की यांच्या गाण्याच्या काही जागा आपल्याला जमतील असं वाटत नाही. पण खळे पुन्हां नम्रपणे म्हणतात की प्रत्येकजण आपापल्या परीने चांगलंच गातो. माझी गाणी सर्वच गायक-गायिकांनी उत्तमच गायलीत. कविता कृष्णमूर्तीच्या मेहनतीचे ते खूप कौतुक करतात. तसेच आपल्या सुरेल पध्दतीने व तितक्याच – खळयांनी केलेल्या गाण्यांच्या – लयकारीने सुरेश वाडकर गीत अतिशय परिपूर्णतेने सादर करतात याचा खळयांना अत्यंत आनंद वाटतो.

श्रीनिवास खळयांनी ज्या सहा चित्रपटांना संगीत दिले ते आहेत ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘बोलकी बाहुली’, ‘जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘सोबती’, ‘पळसाला पाने तीन’. चित्रपटांपेक्षा ध्वनीफिती करणंच खळयांना मानवतं. ‘चित्रपटांत कथानकाप्रमाणे जावं लागतं व कथानकच ठीक नाही तर मी संगीत कसं देणार ? इतक्याखाली मी कां उतरूं? पैशासाठी मी स्वत:ला कां विकू?’ खळे विचारतात. ध्वनीफितीत आपल्याला स्वातंत्र्य असते, ते म्हणतात. त्यामुळे थोडं काम मिळालं तरी चालेल पण चांगलं काम करावं, चरितार्थ चालेल एवढा पैसा बसं झाला या मताचे खळे.

गेल्या काही वर्षातील त्याचे काम म्हणजे त्यांनी संगीतबध्द केलेले ‘भाववीणा’ हे वीणा सहस्त्रबुध्देंचे, ‘चलो चलो सखियाँ’ ही सुरेश वाडकर – कविता कृष्णमूर्ती यांचे, ‘वृंदावन’ हे देवकी पंडितचे, दोन अभंगाच्या कॅसेटस् सुरेश वाडकरांच्या. यावर्षी सुरेश वाडकरांच्या ‘दिनाची माऊली’ व ‘अमृताची वेली’ यांना खळेंनी संगीत दिलेय. आता उल्हास कशाळकरांसाठी हिंदी भजन करीत आहेत.

३० एप्रिल २००० ला श्रीनिवास खळयांची वयाची पंच्याहत्तरी अथर्व प्रतिष्ठानने साजरी केली व बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंगेश पाडगांवकर म्हणाले की हा पुढील २५ वर्ष निर्मितीशील आयुष्याचा सत्कार आहे. असंच स्वर्गीय संगीत निर्माण करीत रहाण्याचे त्यांचे आश्वासनच आहे.

निवडक श्रीनिवास खळे
आपल्या स्वत:च्या प्रिय रचना कोणत्या विचारले तेव्हां खळेसाहेबांना फार कठीण झालं! पण तरी माझ्या आग्रहास्तव त्यांनी आपल्या आवडीची अशी खालील गाणी काढली.

पं भीमसेन जोशी :
राजस सुकुमारा (अभंगवाणी)
देवी प्रपन्नार्ती हरे, प्रसीद (भजनामृत – वैष्णोदेवीची)
सुमति सीताराम (राम श्याम गुनगान)

विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा (अभंगवाणी)
नमो नमो दुर्गे सुखकरणी (भजनामृत – वैष्णोदेवीची)
कृपा सरोवर कमल मनोहर (राम श्याम गुनगान)

क्रिष्ण क्रिष्ण कहिये उठी भोर (क्रिष्ण कहिये, राम जपीये)
बाजे रे मुरलियाँ (राम श्याम गुनगान – लता मंगेशकर बरोबर)
रामका गुणगान करिये (राम श्याम गुनगान – लता मंगेशकर बरोबर)

वसंतराव देशपांडे :
बगळयाची माळ फुले
राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द

सुधीर फडके :
लळा जिव्हाळा शब्दच खोटे
माझी अगाध प्रिती

लता मंगेशकर :
श्रावणांत घननीळा बरसला
कमोदिनी काय जाणे तो परिमळ (अभंग तुकयाचे)
या चिमण्यांनो
चुकचुकली पाल एक
भेटी लागे जीवा,
श्याम घन घनश्याम (राम श्याम गुनगान)
राम भजन कर (राम श्याम गुनगान)

आशा भोसले :
एका तळयात होती
गोरी गोरी पान ,
प्रिया तुज काय दिसे,
पाण्यातले पहाता,
चंदाराणी

हृदयनाथ मंगेशकर :
लाजून हांसणे
गेले ते दिन गेले

उषा मंगेशकर :
आज अंतर्यामी भेटी
खिन्न या वाटा दूर पळणा-या
त्या तुझिया चिंतनांत मन माझे गुंतू दे

सुमन कल्यानपूर :
देवा दया तुझी की
मी चंचल होऊन आले ,
बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
पहिलीच भेट झाली (अरूण दाते बरोबर द्वंद्वगीत)

अरूण दाते :
शुक्रतारा मंद वारा (सुधा मल्होत्रा बरोबर द्वंद्वगीत)
हात तुझा हातांत धुंद ही हवा (सुधा मल्होत्रा बरोबर द्वंद्वगीत)
सर्व सर्व विसरू दे (आशा भोसले बरोबर द्वंद्वगीत),
प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी

माणिक वर्मा :
एक तारी गाते
तव भगिनीचा धांवा ऐकूनी

मालती पांडे :
कशी रे तुला भेटू मला वाटे लाज
कशी ही लाज गडे मुलखाची

सुलोचना चव्हाण :
कळीदार कपूरी छान, कोवळं पान

शमा खळे :
टप टप थेंब वाजती
दिवसभर पावसात असून, सांग ना आई,

संजीवनी खळे :
एक होता काऊ
चांदोमामा चांदोमामा भागलास कां

सुषमा श्रेष्ठ :
किलबील किलबील पक्षी बोलती
विहीणबाई, विहीणबाई
करा आतां गाई गाई

बकुळ पंडित :
उगवला चंद्र पुनवेचा
प्रीति सुरी दुधारी

देवकी पंडित :
मनमोहन अब जाग उठो
क्रिष्णा जलमे भीगले पगले
श्यामकी रट अब लागी
हरीकी प्रीत जगी

शोभा गुर्टु :
जागो बंसीवाले (मीराबाई)
मेरी नजरमे मोती आयो (कबीर)
मारे घर आवो (मीरा)

वीणा सहस्रबुध्दे :
तेजोमया हे चिन्मया
अजूनी फुले फुलतात ना
किती किती सांगून पाहिल,े
आत्मरूप ओंकार
सुरेश वाडकर :
धरिला वृथाच छंद,
देखो री आज प्यारी
काळ देहासी आला खाऊं,
अजहू न निकसे प्रेम कठोर
पंढरीसी जावे,
न लगे चंदना, पुसावा परिमळ

कविता कृष्णमूर्ती :
नाम लिया हरिका जीसने
ऐ री मै तो दर्द दिवानी ,
सावनीयाँ मन भाया रे (सुरेश वाडकर बरोबर)
चलो चलो सखीयाँ (सुरेश वाडकर बरोबर)

मुलाखत- सुरेखा सुळे