नथुराम गोडसे व वादळवाट फेम शरद पोंक्षे

नाटयसृष्टीत आणि मराठी मालिकांमधून आपला ठसा उमटविणाऱ्या शरद पोंक्षे यांच्याशी मारलेल्या गप्पा…

शरद तुमचं बालपण कुठे गेलं? तुमचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण याबाबत थोडं सांगाल?
Sharad Ponkshe तसं बघाल तर माझं शिक्षण अनेक ठिकाणी झालं. अगदी माँटेसरीपासून सांगतो. कोकणात माझ्या वडिलांच्या आई-वडिलांकडे आंबव येथे माझं माँटेसरीचं शिक्षण झालं. पण ते पहिलं एकच वर्ष. तिथे शिकण्याएवढी परिस्थिती नव्हती. नंतर मिरजेला मी आईच्या आई-वडिलांकडे गेलो. तिथे मी सातवीपर्यंत शिकलो. मग आजोबा वारले, मला तिथे ठेवणं शक्य झालं नाही. आठवी ते दहावी मी मुंबईत आई-वडिलांकडे शिकलो. अकरावीत धोबीतलाव येथील एलफिस्टन टेक्निकल महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण मला त्यात काडिचाही इंटरेस्ट नव्हता.

अभिनयाच्या क्षेत्राशी तुमची ओळख कुठे झाली? या क्षेत्राविषयीची आवड तुमच्यात कशी निर्माण झाली ?
आठवीत मुंबईला आल्यावर मी आमच्या येथील स. न. वि. वि. या संस्थेच्या संपर्कात आलो आणि मग १९७८ पासून मी शालेय जीवनात असल्यापासूनच एकांकिका स्पर्धेत भाग घेऊ लागलो. माझा ओढा तिकडेच होता. मला खूप धमाल करायला मिळाली. माझी ही आवड सांभाळून करता येईल अशी नोकरी मला हवी होती. माझे वडिल बी. ई. एस. टी. मध्ये होते. तुम्हाला माहितच आहे कि बेस्टने खूप मोठे कलावंत निर्माण केले आहेत. वडिल म्हणाले कि बेस्ट मध्ये अपरेंटीसशिप करतोस का? मी लगेच हो म्हणालो. पण दहावी झाल्यावर लगेचच बेस्ट मध्ये काम झालं नाही. बारावीत जाणार तोच बेस्ट मधून बोलावणं आलं. मग माझं शिक्षण तिथेच संपलं. १९८२ साली एस. एस. सी. झाल्यावर १९८४ ला बेस्ट मध्ये अशी नोकरी मिळाली. १९८८-८९ च्या जूनपर्यंत अनेक ठिकाणी सह-दिग्दर्शक म्हणून काम केलं.

मग पुढचा प्रवास कसा झाला?
श्री. रमाकांत आचरेकर यांचे वडिल राजकपूर यांच्याकडे आर्ट-डिरेक्टर होते. त्यांनी राजकपूरच्या जवळजवळ सर्वच चित्रपटांचे आर्ट डिरेक्शन केलं आहे. स्वतः रमाकांत आचरेकर प्रतिष्ठित आर्ट डिरेक्टर आहेत. त्यांच्या हाताखाली मी असिस्टंट आर्ट डिरेक्टर म्हणून काम केले. मी ‘रंगत-संगत’ चित्रपट (गिरीश घाणेकरांचा), दत्ता केशवांचा ‘दे टाळी’, ‘धमाल बाबल्या गणप्याची’, ‘होळी रे होळी’ नावाची एक मालिका यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. माझी चांगली चित्रकला व चांगलं अक्षर याचा खूप फायदा झाला. हे सर्व करताना १९८९ साल उजाडले आणि त्याच दरम्यान मला बेस्ट मधून कायम स्वरूपी नोकरीसाठी बोलावणं आलं.

मग बेस्टच्या नोकरीचा कसा फायदा तुमच्या नाटकविषयक आवडीसाठी करून घेतलास?
बेस्ट मध्ये मला श्री. प्र. ल. मयेकरांसारखे लेखक भेटले. मग अरुण नलावडेसारखे कलाकार भेटले. विविध एकांकिकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात झाली. व्यावसायिक नाटकांमध्ये छोटे छोटे पाच ते दहा मिनीटांचे रोल करायला लागलो. मला आठवतंय, तेव्हा रु. ६० इथपर्यंत नाईट (एका वेळेला देण्यात येणारे मानधन) मिळायची.

मग तुमचा नथुराम गोडसे नाटकापर्यंतचा प्रवास कसा झाला?
Sharad Ponkshe खरं सांगतो. नाटयसृष्टी हा एक मोठा वटवृक्ष आहे. त्याच्या एखाद्या पारंबीला आपण लटकत राहायचं. ज्याला कोणीही गॉडफादर नसतो, त्याला हे करावंच लागतं. अशाच एका पारंबीला मी लटकलेलो होतो. ती पारंबी श्री. विनय आपटे यांनी वर खेचली आणि मी वर गेलो.
परंतु नथुराम गोडसे या नाटकाच्या आधी मी श्रीमती विजया वाड (निशिगंधा वाड यांच्या आई) यांनी लिहिलेले ‘ तिची कहाणी ‘ हे नाटक केले. मतिमंद मुली वयात आल्यावर घरात काय काय होते, याचे चित्रण त्यात केले होते. मी त्यात एका हिंदू घरातल्या नोकराची भूमिका केली होती. तो नोकर त्या मतिमंद मुलीच्या बरोबर कोकणातून आलेला असतो पण तो असतो मुसलमान (खरं म्हणजे भूमिका हिंदू नोकराचीच होती पण भूमिका करताना त्यात आव्हान असावं म्हणून त्या नोकराचे पात्र दिग्दर्शक कामत यांनी मुसलमान दाखवले.) आता कोकणातले मुसलमान आपली भाषा कशी बोलतात ते फार महत्वाचं होतं. माझा एक काका आर. बी. आय मध्ये आहे. त्याचा मित्र होता मुसलमान परंतु त्याची बायको कोकणातली मुसलमान. मग मी त्या माणसाला गाठले. त्याच्या बायकोकडून ती भाषा शिकण्यासाठी त्याला विनंती केली. त्याच्या बायकोला आधी नाटक म्हणजे काय इथपासून सांगावं लागलं, मग आमचं नाटक काय आहे, त्यात माझी भूमिका काय आहे हे सर्व सांगितले. मी एक मराठी वाक्य बोलायचो,मग ती ज्या पध्दतीने ते वाक्य बोलायची ते मी लिहून घ्यायचो. असं मी संपूर्ण नाटकातील माझी भूमिकाच त्या शब्दात लिहिली. मी मग त्या भाषेत बोलण्याचा सराव केला. त्या भूमिकेची खूप तारिफ झाली.

नथुराम गोडसे नाटकाविषयी थोडसं सांगाल का?
Sharad Ponkshe तसं पाहायला गेलो तर नथुराम गोडसेंच्या भूमिकेसाठी मी तिथे जायच्या आधी बरेच दिवस ती भूमिका कोण करू शकेल याचा शोध चालू होता. नाटकाचे निर्माते श्री. उदय धुरत मला एकदा भेटले. ते मला म्हणाले जा, विनय आपटयांना जाऊन भेट आणि नशीब आजमाव. नंतर एक दिवस पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मी श्री. विनय आपटे यांना जाऊन भेटलो. नाटकाचं थोडं वाचन केलं. माझं वाचन अगदी व्यवस्थित झालं. विनय आपटयांनी लगेचच त्या भूमिकेसाठी माझी निवड केली आणि मला नथुरामची भूमिका मिळाली.

त्यानंतर सात ते आठ दिवस नाटकाचं वाचन झालं. नथुराम गोडसे या भूमिकेवरील सर्व साहित्याचे मी थोडेफार वाचन केले. श्री. गोपाळ गोडसे (नथुरामांचे बंधू ) यांनाही भेटलो. जुनी वृत्तपत्रं वाचली. त्यानंतर सत्तावीस दिवस आम्ही तालीम केली आणि अठ्ठाविसाव्या दिवशी नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला तो शिवाजी मंदिरला, दिवस जुलै १०, १९९८. अतिशय उत्कृष्ट प्रयोग. अशा प्रयोगाचे भाग्य मला लाभले याबद्दल मला आनंदच आहे. शिवाजी मंदिरला लागोपाठ दोन दिवसात चार प्रयोग झाले. नाटक चालू असताना मध्येच थांबायचं, कारण लोक वंदे मातरमच्या घोषणा द्यायचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयजयकार करायचे. आम्ही कलाकार मग तेवढावेळ थांबायचो, मग प्रयोग पुन्हा चालू करायचो. नेपथ्यकार श्री. प्रविण मुळये यांनी संपूर्ण प्रयोगासाठी ग्रीक नेपथ्य म्हणजेच सजेस्टिव्ह नेपथ्य वापरलं होतं. एका प्रसंगात टेबल खुर्ची इत्यादी सामानही होतं परंतु पहिल्याच प्रयोगाला ते येऊ शकले नाहीत. मी या नाटकात सतत दोन ते अडीच तास व्यासपिठावर आहे. या नाटकाच्या आधी मी पाच ते दहा मिनीटांच्या किंवा त्याहून थोडया मोठया भूमिका केल्या होत्या. त्यात नाटकात सुरुवातीला जवळजवळ अठरा मिनीटे माझं स्वगत. मी सोडून सर्वच कलाकार, निर्माता, दिग्दर्शक तणावाखाली होते, पण मला कसलंही टेन्शन नव्हतं. कारण मला कधीच टेन्शन येत नाही. मी कधी व्यासपिठावर प्रवेश करताना थंड पडत नाही कि माझे हातपायही कापत नाहीत. अजून एक सांगतो, दिनानाथ नाटयगृहाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी एक सहकलाकार जयंत घाटे यांना हृदयविकाराचा झटका आला. पुढचे तीन प्रयोग श्री. विनय आपटे यांनी केले. नंतर नाटक बंद पडले ते विरोधामुळे.

मग नंतर काय करायचं ठरवलंत ?
या नाटकाने एक झालं, मी एकदम ‘ए’ ग्रेड कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसलो. मग छोटी कामं यायचीच बंद झाली. एक वेळ अशी होती की, आठ मालिका माझ्या एकाच वेळी चालू होत्या, चार अल्फावर तर चार सह्याद्रीवर. दुपारी साडेतीनला टिव्ही लावलास कि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला शरद पोंक्षेच दिसायचा. तुला अजून सांगतो त्या वेळेला काम करताना आम्ही आमचेच कपडे वापरायचो. एकदा तर असं झालं एका मालिकेचा शेवट व दुस-या मालिकेची सुरुवात मी सारखेच कपडे घलून होतो.

नाटक तसं महाराष्ट्रभर गाजलं, गाजतंय. बऱ्याचदा नाटक बंद पाडण्याचे प्रकार ही घडले. प्रेक्षकांमध्ये हुल्लडबाजीही झाली, असंही घडलं असेल?
तसं एकदा चंद्रपूरमध्ये झालंय. प्रयोग चालू असताना लोकांमध्ये घोषणाबाजी चालायची, लोक स्टेजवर येऊन गोंधळ घालायचे, प्रयोग थांबायचा. पुन्हा लोक शांत झाल्यावर परत आम्ही तो सुरु करायचो, असं ब-याचदा झालं. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. मी नेहमीच उपवासाच्या दिवशी सर्व प्रयोग आटोपल्यावरच उपवास सोडतो. पण त्या दिवशी या प्रकारामुळे प्रयोग लांबायला लागला. त्या प्रयोगाच्या आधी नागपूरला चार प्रयोग केले होते. त्यावेळी तिथल्या पोलिस मुख्याशी माझी ओळख झाली होती. मी त्यांना नागपूरला फोन लावला. मग नागपूरवरून हॉलमध्ये फोन आला. मग प्रयोगाला विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे यांच्यात जुंपली. हे संपल्यावर मी पुन्हा प्रयोग सुरू केला. रात्री नऊ वाजता सुरू झालेला प्रयोग सकाळी साडेसहाला संपला आणि मी पावणे सातला सकाळी उपवास सोडला आणि मग आमची बस नागपूरला आली.

प्रत्यक्ष मारामारीचे प्रकार घडल्याचंही ऐकिवात होते, असा कुठला प्रसंग आठवतो का?
हो, कोल्हापूरला असाच एक तणावपूर्ण प्रसंग घडला होता. कोल्हापूरला प्रयोग सुरू होताच एक मनुष्य स्चेजवर आला, म्हणाला चला, सर्वांनी घरी जा, प्रयोग बंद आणि माईकला हात लावायला लागला. मग मी पण थोडा चिडलो. त्याने माईक काढला आणि मग मी पण त्याचा हात धरला. मी त्याला म्हटलं तुम्ही स्वतःला गांधींचे भक्त समजता ना मग तुम्ही आधी भाषण करा. ज्या प्रेक्षकांना तुमचं म्हणणं पटेल ते प्रेक्षक जातील व जे राहतील त्यांच्यासाठी आम्ही प्रयोग करू, आपण गांधींच्या मार्गाने जायचं. त्या माणसाचं काही चाललं नाही, मग जाताना तो जातीवाचक शिव्या द्यायला लागला. मी लगेच म्हटलं कि ताबडतोब पोलिसांना बोलवा. मग त्याने नथुराम गोडसेंच्या नावाने शिवी दिली, मग प्रेक्षकांनीही त्याला सामुहिक शिवी दिली. तो मनुष्य गेल्यावर मी प्रेक्षकांना म्हटलं कि प्रेक्षकांनी जे केलं ते चुकिचंच आहे. आम्ही कुठल्याही विचाराचा प्रचार करायला आलेलो नाही. आम्ही एक कला सादर करायला आलो आहोत. हे सर्व बोलूनच मी प्रयोगासाठी पुन्हा उभा राहिलो.

‘नथुराम’नंतर अशा प्रकारच्या नाटकांसाठी तुम्हाला किती नाटक संस्थांनी विचारले होते? एखाद्या ऐतिहासिक पात्राच्या भूमिकेशी साधर्म्य सांगणारी किंवा ऐतिहासिक पात्राची भूमिका नंतर करावीशी वाटली का?
नथुरामनंतर पुण्याच्या एका संस्थेकडून मी सावरकरांवरील नाटकात सावरकरांची भूमिका करावी अशी मागणी आली. पण मी त्याला साफ नकार दिला. मुळात मी सावरकरांसारखा दिसत नाही. त्यांच्यात आणि माझ्यात दिसण्यात जराही साम्य नाही मग उगाचच अशा भूमिका करण्यात अर्थ नाही. मध्यंतरीच्या काळात, पंतांसाठी मी ‘इथे ओशाळला मृत्यु’ या नाटकात संभाजीची भूमिका केली होती. त्याचे तब्बल आठ प्रयोग गोव्यात झाले.

मगाशीच बोलताना तुम्ही म्हणालात कि नथुरामने तुला ‘ए’ ग्रेडच्या अभिनेत्यांच्या पंक्तीत नेऊन बसवले. मग तुला कामे अगदी सहजपणे मिळायला लागली असतील….
तुम्हाला जेव्हा इंडस्ट्री योग्य त्या प्रकारे जाणते तेव्हा तुमचे मानधन वाढते. त्यात कुठल्याही मालिकेत एक किंवा दोन भूमिका असतात त्या मुख्य , मग इतर भूमिकांसाठी तुमचा विचार कोणी करत नाही. कारण त्या करायला इंडस्ट्रीत बरेच कलाकार उपलब्ध असतात. जेव्हा तुम्ही ‘ए’ ग्रेडचे अभिनेते बनता तेव्हा तुमच्या मानधनाची अपेक्षा जास्त असते. या सगळया प्रकारामुळे भूमिका मिळण्याची व्याप्ती कमी होते.

आता वादळवाट मधील तुझ्या अतिशय गाजलेल्या खंडागळेच्या भूमिकेबद्दल काही सांगशील? त्या भूमिकेचा अभ्यास तुम्ही कसा केलात?
मी खंडागळेच्या भूमिकेचा अभ्यास वगैरे काही केला नाही. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी फक्त नथुरामच्या भूमिकेचा अभ्यास केला होता. सर्वसाधारणपणे नीट वाचन केलत तर आपली भूमिका तुम्ही नक्की चांगली वठवू शकता. या नाटयसृष्टीत काम करताना मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलेलो आहे. अनेक प्रकारची माणसे बघितली आहेत. वाचताना मला पात्र कसे वठवायचे आहे हे ध्यानात येते. मग काम करणंच सोपं होऊन जातं. तुम्हाला मी वठवलेले प्रत्येक पात्र वेगळे वाटेल, भूमिकेत वेगळेपणा वाटेल. खंडागळे बघताना तुम्हाला नथुराम आठवणार नाही आणि नथुराम बघताना तुम्ही खंडागळे आठवणार नाही. याला माझी बरेच वर्षापासूनची मेहनत कारणीभूत आहे.

नाटयसृष्टीत काही ठराविक माणसे आपल्याच नेहमीच्या व्यक्तींबरोबर काम करतात, याला नाटयसृष्टीत कंपूगिरी किंवा ग्रुपिझम म्हणतात, याबाबत तुझं मत काय?
तुम्ही म्हणतात त्या प्रमाणे त्याला ग्रुपिझम नसून टयुनिंग जमलेली सर्व माणसं एकत्र काम करतात असं म्हणूया. यात काहीच चुकीचं नाही. प्रत्येक कलाकाराला आपल्या सहकलाकाराबद्दल व्यवस्थित माहिती असते. त्याची अभिनयक्षमता ठाऊक असते. अशावेळी मग दिग्दर्शकाचेही काम सोपे होऊन बसते.

नाटक आणि चित्रपट या दोन माध्यमातील फरक स्पष्ट कराल. दोन्ही ठिकाणी अभिनय करताना फरक करावा लागतो का?
मुख्य म्हणजे दोन्ही क्षेत्रातील तांत्रिक बाबींची कलाकाराला संपूर्ण माहिती असायला हवी, तर अभिनय करणं सोपं होऊन शकतं. मालिका किंवा चित्रपट यामध्ये कॅमेरा कुठल्या प्रकारे आपला अभिनय टिपत आहे ते महत्वाचे. ते समजलं तर अभिनय करणे अतिशय सोपे जाते. ब-याचदा कलाकार चित्रपट किंवा मालिका माध्यमात अगदी जीव तोडून काम करतो. पण जेव्हा बघतो तेव्हा त्याला तो प्रसंग, तो भाग काहीच खास वाटत नाही. मला अशा प्रकारच्या प्रसंगातून कधी जावंच लागलं नाही कारण मी आधी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.

फारच थोडे मराठी कलाकार आहेत कि ज्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वाच्या भूमिका मिळतात. मराठी कलाकारांकडे गुणवत्ता असूनही असं का होतं?
नको तिकडे स्वाभिमान ! अभिनय एक व्यवसाय आहे, धंदा आहे. त्याकडे तशा वृत्तीने बघायला पाहिजे. बाकी ठिकाणचे कलाकार पैशाचं बोलतच नाहीत, कुठलंही काम करायला तयार असतात. मिळालेल्या एका तरी संधीचं सोनं करतात, नाव कमावतात, मग स्टारिझम दाखवतात. पण मुळात ते हे करू शकतात कारण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. आपल्या मराठी कलाकारांना सेटल होईपर्यंत, जम बसेपर्यंत चाळीशी उजाडते. मग नायकाच्या भूमिका कोण देणार? मग आपले कलाकार चरित्र भूमिका करतात, पण आता परिस्थिती बदलली आहे. आता येणारे तरुण कलाकार कदाचित अतिआत्मविश्वास दाखवत असतीलही, पण ते थोडयाफार प्रमाणात त्याची गरज आहे.

आजकाल समीक्षक येणा-या तरुणांच्या गुणवत्तेविषयी सतत आरडाओरड करत असतात कि त्यांच्यात एनर्जी भरपूर आहे, उत्स्फूर्तता भरपूर आहे पण अभिनयात कमी पडतात…..
सध्या मी तशा एकांकिका फार कमी बघतो. मध्यंतरी मी सवाई एकांकिका स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले. मी बक्षिस समारंभाआधी जाहिरपणे सांगितले कि बरेचसे सिरियल्समध्ये काम करणारे तरुण कलाकार वगैरे (प्रथितयश कलाकार) ज्यांनी या वर्षी येथील एकांकिकेत काम केली आहेत त्यांना आम्ही बक्षिसं दिली नाहीत परंतु ज्यांची पाटी कोरी होती त्यांना बक्षिसं दिली आहेत. तेव्हा प्रेक्षकातले बरेचसे कलाकार उठून गेले होते.

पण मग या असल्याप्रकारामुळे येणारे तरुण कलाकार तसेच समीक्षक तुझ्यावर टिका करतील असं नाही वाटत का?
मी कधी फिकीर नाही करत. या इंडस्ट्रित कोणी कोणाचं नशीब घडवू शकत नाही. एखादा मनुष्य दुसऱ्यासाठी सिनेमा काढू शकतो. पुढे त्या मुलाचं टॅलेंट व त्याचं नशीब या जोरावरच तो पुढे जाणार.

तुम्ही आता हिंदी चित्रपटसृष्टितही शिरकाव केला आहात, तिथला अनुभव सांगाल?
मराठी कलाकाराला हिंदी चित्रपटसृष्टीत भरपूर मान मिळतो. हिंदी कलाकार तसे मराठी कलाकारांबरोबर काम करताना भरपूर काळजी घेतात, कारण मराठी थिएटर आर्टिस्ट अभिनय चांगलाच करतो हे त्यांना माहित असतं.

तुझं कुठल्या मराठी कलाकाराबरोबर टयुनिंग जमतं?
बरेच आहेत, पण मोहन जोशी, विक्रम गोखले यांच्याशी सगळयात मस्त टयुनिंग जमतं. प्रसाद ओक बरोबर ही माझे सूर चांगलेच जुळतात.

तुम्ही जाहिरात क्षेत्रातही चमकला आहात, त्या क्षेत्राबद्दल सांगाल.
जाहिरातींचं क्षेत्र एकदम मस्त आहे. त्यात पैसाही चांगलाच आहे. दुसरीकडे महिनाभर काम करून जे मिळतं ते या क्षेत्रात एका दिवसात मिळते. तीस ते साठ सेकंदाची जाहिरात असते. त्यात वेळेत काय सांगायचे आहे ते अतिशय काळजीपूर्वक सांगावं लागतं. दिग्दर्शकाचा अभ्यास अफलातून लागतो. तुला जाहिरातीत एक संपूर्ण कथा साठ सेकंदात मांडावी लागते. मी क्रोसिन, रिंगगार्ड इत्यादी बऱ्याच जाहिरातींचं काम केले आहे.

जाहिरातींचे चित्रीकरण होतानाही किंवा जाहिरातीची संकल्पना मांडतानाही अनेक मजेशीर प्रसंग घडत असतील?
तसं नाही पण क्रोसिनच्या जाहिरातीबद्दल सांगतो. आठवते ती जाहिरात? मी टॅक्सी ड्रायव्हर, ट्राफिक जॅम, हॉर्नचे आवाज, कोणीतरी गाडीतून उतरून कटकट कर, कोणीतरी ड्रायव्हरच्या कानाजवळ येऊन पाँ करतो, मग एक माणूस येऊन सांगतो कि क्रोसिन लो.. मग मी म्हणतो कि क्रोसिन सरदर्द के लिए? पागल है क्या? परत तो मनुष्य म्हणतो भय्या क्रोसिन लो, सरदर्द के लिए नई निकली है… एवढीच जाहिरात पण दिग्दर्शक शांतनूला हे काही ठीक वाटेना. त्याने मला एका पंचलाईनसाठी विचारलं…. म्हणाला पंचलाईन मंगता है…. आम्ही दिवसभर खूप गोष्टी केल्या पण काही जमेना. दिवसही सरायला लागला. शेवटी ठरलं कि जसं लिहिलं आहे तसं करायचं. पुन्हा सुरुवात केली. मी टॅक्सी ड्रायव्हर, बाहेरच्या माणसाने विचारले सरदर्द हो रहा है? मी सहज बोलून गेलो नही हाथ चिपक गया है… या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे शांतनूने खुर्चीतून उडी मारली व म्हणाला यही मांगता है. ती जाहिरात आम्ही शूट केली व लोकांना आवडलीही.

तुझ्या ड्रिमरोलबद्दल सांगशील?
तसं सांगता येणार नाही पण मी मराठीत ज्या भूमिका केल्या आहेत त्या मला हिंदीत कराव्या असे वाटते. हिंदीत ते रोल खूप लोकांपर्यंत
पोहोचतील.

तुम्ही गेल्या वीस वर्षापेक्षाही जास्त काळ या नाटयक्षेत्रात काम करीत आहात. तुमच्या पुढच्या योजना?
निर्माता बनायचं स्वप्न आहे. चित्रपट, मालिका काढायचं स्वप्न आहे.

कलाकाराला सामाजिक बांधिलकी असावी याबाबत तुझं मत काय?
असावी निश्चितच. कारण कलाकार जे काही सादर करतो त्याचा परिणाम प्रेक्षकांवर होतोच. म्हणून सामाजिक बांधिलकी जरुरीची आहे. तुम्हाला सिस्टीम, मग ती सामाजिक असो, राजकिय असो वा कशीही ती बदलायची असेल तर त्यात राहूनच काम करायला हवं मगच तुम्ही सिस्टीम मधील लोकांना वाईट गोष्टी करण्यापासून परावृत्त करू शकाल.

पुरस्कार, पुरस्कार समारंभ या बाबतचं मत काय?
जेव्हा नथुरामला पुरस्कार मिळत नाही, तेव्हा त्यात काही अर्थ नाही. मला वादळवाटला मिळाला पण नथुरामला माझं नामांकनही नव्हतं.

विनोदी भूमिकांचा विचार केला आहेस?
स्पष्ट सांगतो, शंभर पीजेंपासून तयार होणाऱ्या नाटकात काम करण्यात स्वारस्य नाही. लेखक चांगला हवा, तर नक्की करीन. देवराम खंडागळेच्या रोल मध्येही मी विनोदी झालर द्यायचा प्रयत्न करतोच.

प्रतिमा कुलकर्णींच्या झोकातल्या भूमिकेबद्दल सांगशील.
तो रोल करताना माझं निरीक्षण कामाला आलं. प्रतिमा छान संवाद लिहिते, छान प्रसंग चित्रित करते. ती एकेक क्षण उचलते. आपण जेव्हा ते बघतो तेव्हा अरे … असं तर आपल्या घरातही घडतं असं आपण सहज म्हणून जातो.

हिंदीत कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायची इच्छा आहे?
तसे खूप आहेत पण ब्लॅक बघितल्यावर संजय लीला भन्साळींकडे काम करायची इच्छा आहे.

कुठल्या कलाकाराबरोबर काम करण्याची इच्छा आहे?
श्री. अमिताभ बच्चन

नवीन येणा-या तरुण पिढीला काय सल्ला देशील?
म्हणजे मी तरुणच आहे अजून! त्यांनी चार ते पाच वर्षं हौशी रंगभूमीवर काम करायला हवे. सिरियल्स करण्याचा साधा विचारही या काळात त्यांनी करू नये. खूप स्पर्धेत भाग घ्यावा, खूप शिकायला मिळतं.

मुलाखत व शब्दांकन – मंदार माईणकर