‘बोलक्या बाहुल्यां’चे कुटुंब – रामदास व अपर्णा पाध्ये

बोलक्या बाहुल्या म्हटलं की डोळयांसमोर येतात ते अर्धवटराव, आवडाबाई… आणि या सगळया डोला-या मागे सतत कार्यरत असणारे रामदास पाध्ये व अपर्णाताईंचे समर्थ आणि प्रयोगशील हात. दूरदर्शन पासून परदेशातील विविध प्रकारच्या अविस्मरणीय कार्यक्रमातून आपली कला सातासमुद्रापार नेणारं, आणि ‘अजूनही खूप करायचंय’ या भावनेने प्रयोगशील रहाणारं हे उत्साही कुटुंब. मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी श्री. रामदास पाध्ये व त्यांच्या बोलक्या कुटुंबाची ही खास मुलाखत.

रामदासजी, बाहुल्यांची ही वेगळी कला जोपासण्यामागची पार्श्वभूमी सांगाल?
Ramdas Father माझ्या वडिलांनी ही कला आयुष्यभर छंद म्हणूनच जोपासली. कला ही विकायची नसते या ठाम मताचे ते होते. आर्थिक चणचण ही कधीच नव्हती त्यामुळे त्यांच्या मनात तर या कलेचा व्यवसाय करावा हा विचारही कधी आला नाही. मलाही सुरूवातीला त्यांनी तेच समजावले. त्यामुळे वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासून जरी ही कला अंगी असली तरी पहिला कार्यक्रम हा वयाच्या १७ व्या वर्षी झाला, तोही आमच्या गणपती उत्सवात. आमच्या घराबद्दल बोलायचं तर माझी भावंडं, आम्ही सगळेच बाबांची ही कला लहानपणापासून अनुभवत आलोय. त्यामुळे सगळयांनाच त्यात रुची आहे. आजही एखादा प्रोजेक्ट हाती आला की तो फक्त आमच्या चौघांचाच नाही तर तो आमच्या घराचा असतो. त्याची तयारी करणं हेही एक आनंददायी काम होऊन जातं. फक्त त्यात वापरायची तंत्र ही काळाबरोबर बदलत गेली, मनापासून काम करण्याची ऊर्मी मात्र अजूनही तीच आहे.

कॅरॅक्टर बिल्डींगमधील अभ्यास, तांत्रिक गोष्टी हे सगळं कसं जमवून आणता?
maine-payal एखादं काल्पनिक कॅरॅक्टर बांधायचं तर त्यासाठीचं तांत्रिक काम हे प्रचंड असतंच. प्रामुख्याने डोळयांचे हावभाव, चेह-यावरील अवयवांची प्रमाणबध्दता, सारंच फार एकाग्रतेने करावं लागतंच पण, त्याच्या माध्यमातून आपण कोणाचं प्रतिनिधित्व करतोय हे स्पष्ट झालं की त्याच्या चेह-यावर ते सगळं मूर्तस्वरुपात आणणं हे तसं कठीण आणि आव्हानात्मक काम. त्यासाठी मी व्यावसायिक कोर्सेसही केले. त्याचा उपयोग कलाकृती उत्तम साकारण्यात होतो.

जिवंत व्यक्तींचे कॅरॅक्टर बिल्डींग करताना व ती परफॉर्म करताना कसं वाटतं, काही वेगळा अभ्यास करावा लागतो का?
जिवंत व्यक्तींची कॅरॅक्टर तयार करणं हेही आव्हानात्मकच. ती व्यक्ती खरंतर आपल्याला जेवढी माहित असते त्याहीपेक्षा जास्त अभ्यास हा करावाच लागतो. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात प्रचंड आदराची भावना असते. त्यावेळी त्याचं कॅरॅक्टर बांधताना किंवा ते परफॉर्म करताना हास्यास्पद होऊ नये याची काळजी साहजिकच घेतली जाते. अशावेळी आपले संस्कार आपल्या कलेतून दिसतात. कलेत व्यावसायिकता आणताना विशिष्ट मर्यादेपर्यंतच ती असावी. माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, कधी कधी असं होतं, आपण एखाद्या विशिष्ट हेतूने कलाकृती बनवतो. उदा. एखादा सिनेमा, एखादा व्हिडिओ आल्बम, अशा वेळी ज्याच्या साठी बनवलंय, (उदा. निर्माता) त्याचं समाधान त्या कलाकृतीने झालेलं असतं, पण माझ्या मनात वाटत असतं, ‘नाही, हे अजून चांगलं करता येईल’, पण वेळेअभावी ते होत नाही. आणि सगळयांच्या दृष्टीने ती उत्तम कलाकृती असली, तरी माझं मन खात रहातं. अर्थात सुदैवाने अशी वेळ फार कमी आलेय.

अर्धवटराव आणि आवडाबाई या अविस्मरणीय जोडीबद्दल सांगा.
अर्धवटराव आणि आवडाबाई च्या बाबतीत बोलायचं तर ती माझ्या बाबांची एक परिपूर्ण, समाधान देणारी अशी कलाकृती आहे. त्यावेळच्या साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबाचं प्रतिनिधित्व त्यातून व्हावं हा उद्देश. त्यामुळे ही जोडी पाहणा-याला कधी परकी वाटलीच नाही, अजूनही वाटत नाही. हे त्या कलाकृतीचं यश आहे.

तात्या विंचूचं पात्र हे तर त्या सिनमापलिकडे जाऊनही चर्चेचा विषय झालं आहे. या कलाकृतीबद्दल काही सांगाल?
महेश कोठारे आणि मी जेव्हा या व्यक्तिमत्त्वावर काम करायला सुरूवात केली तेव्हा प्रथम आग्रह असा होता की हे कॅरॅक्टर गोड, नाजूक दिसलं पाहिजे. त्यासाठी मी जवळ जवळ ९ प्रतिकृती तयार केल्या आणि दहावी बाहुली आमच्या मनासारखी झाली. संपूर्ण सिनेमामध्ये या प्रतिकृतीचे ७ नमुने वापरले गेलेत. तात्या विंचूच्या प्रत्येक सीनमध्ये मी, अपर्णा लपलेलो आहोत. वळचणीत, अडचणीच्या जागी, कुठेही बसून, उभं, आडवं राहून सीन केलेत. कारण तात्या ‘ऑपरेट’ करताना आपण न दिसणं हे महत्त्वाचं होतं. या ‘तात्या’ ने आम्हाला, ‘झपाटलेला’ च्या सगळया टीमला खूप समाधान दिलंय.

तात्या जेव्हा मरतो, त्या सीनसाठी वेगळा बाहुला बनवला. त्याची असहाय्यता त्याच्या डोळयांतून दिसणं महत्त्वाचं होतं, ते आम्हाला साधता आलं असं वाटतं. त्यानंतर इतर भाषांतूनही हा चित्रपट केला गेला, संपूर्ण पटकथा जशीच्या तशी, फक्त भाषा, कलाकार वेगळे. पण मराठीतला जिवंतपणा, समाधान फार कमी मिळालं. कदाचित आपल्या भाषेच्या जिव्हाळयामुळे, किंवा मराठी हीच त्याची खरी ओळख असल्यानं मला असं वाटत असेलही.

विष्णुदास भावे हे महान रंगभूमीकार भारतात होऊन गेले. त्यांनी लाकडी बाहुल्यांच्या सहाय्याने द्रौपदी स्वयंवर प्रथम स्टेजवर आणले. त्यांच्या बाहुल्याचे कलेक्शनही तुमच्याकडे आहे. तुम्ही स्टेज शो करतानाही त्यांचा वापर केलाय ना?
हो, विष्णुदास भावेंच्या त्या लाकडी बाहुल्या जेव्हा मी स्टेज वर आणल्या तेव्हा त्यांचे पणतू, जे स्वतः नव्वदीच्या घरातले आहेत, मला स्वतः इथे भेटायला आले, आणि सांगितलं, ‘तू खूप चांगलं काम करतोयस. उद्यापासून भावे आडनाव लावत जा.’ त्यांचं समाधान मला खूप मोठा आशिर्वाद देऊन गेलं.

परदेशात या कलेला खूप वाव आहे ना?
Padhye Family परदेशात पपेट्री/वेंट्रीलोकिझमला प्रचंड मागणी आणि वलयही आहे. आपल्या इकडे खरंतर ते लक्षातही येत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांचाच एक ग्रह झालाय की ही कला आपली नाहीच, परदेशातून आपण ही शिकलोय. हा ग्रह चुकीचा आहे, हे आपल्याला आणि त्या परदेशीयांनाही कळलं पाहिजे, त्यांनी उदो उदो केल्यावर एखाद्या आपल्याकडे असणा-या गोष्टीचं महत्त्व कळतं, ही आपली एक मानसिकता झालीय. यासाठीच केवळ मी ‘इनर व्हॉइस’ लिहिलं आणि त्याचं प्रकाशन अमेरिकेत केलं. आपल्या संस्कृतीत ज्या ज्या उत्तम कला आहेत त्या त्या आपण दुस-याला माहीत करुन दिल्या पाहिजेत, आणि महत्त्वाचं म्हणजे ते सगळयांना कळलं पाहिजे.

परदेशातले ऑडिओ-विज्युअल शो काही वेगळा अनुभव देतात?
परदेशातले ऑडिओ-विज्युअल शो हे सगळेच यशस्वी झालेत. जिथे इंग्लिश भाषा कळते अशा ठिकाणी इंग्लिश तर दुबईसारख्या ठिकाणी, जिथे विविध देशातील प्रेक्षकवर्ग असतो, तिथे ऑडिओ-विज्युअल शो करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी आपलं सारं कौशल्य पणाला लागतं. फक्त संगीत व हावभावांच्या माध्यमातून कला सादर करणं हे खूप आनंददायीसुध्दा असतं.

बेबी डिनो हा माझा मैलाचा दगड ठरलेला शो आहे. तसेच तांत्रिक दृष्टीने पाहिलं तर ‘हॅटस ऑफ’ हा त्या अर्थाने हाय-टेक शो आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं एकूणच प्रस्थ फार मोठं असतं. तिकडे परदेशात तर सामानाचे दोन ट्रक, मग एका बसमधून एक ग्रुप, आणि मग आम्ही सगळे, असे सगळं अमेरिकेसारख्या देशात एका टोकाकडून दुसरीकडे फिरतो. तिथे ते सगळं उभं करणं, तपासून बघणं. कारण कार्यक्रम चालू झाल्यावर चूक दुरुस्त करणं अशक्य असायचं. प्रत्येकाने आपापलं काम चोख केलं की त्याचं समाधान प्रत्येकाला जाणवून देणं, हे महत्त्वाचं होतं. कारण कार्यक्रमामध्ये आपण कुठेच दिसणार नाही, आपण सगळे पडद्यामागचे कलाकार आहोत, आणि तरीही, प्रत्येकाचं काम योग्य वेळेत आणि बिनचूक होणं गरजेचं असतं हे कोणाच्याही मनावर सुरूवातीला बिंबवणं तसं कठीण असतं. प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपण सगळयांना दिसलं पाहिजे जे साहजिक आहे, आणि इतर क्षेत्रांमध्ये ते शक्य आहे, जे इथे नाही. अर्थात आम्ही कार्यक्रम संपल्यावर प्रेक्षकांना आमच्या सगळया तंत्रज्ञांची ओळख करुन देतोच.

आपल्या कार्यशाळा कशा चालतात ?
Group Puppets आम्ही २ ते ३ दिवसांची कार्यशाळा घेतो. यात पपेट्री या कलेच्या प्राथमिक माहितीपासून बाहुल्यांचा तांत्रिक उभारणी, शब्दभ्रम, संहिता लेखन, इथपर्यंत सारे काही शिकवले जाते. एखाद्या वेळेस खूप क्रिएटीविटी असणारी मुलं येतात. अर्थात अजूनही तसा प्रतिसाद नाही. कारण या कलेला खूप मेहनत करावी लागते. सहनशक्ती खूप लागते. दुसरं कारण या कला प्रकारात तुम्हाला स्टेजवर येण्याची संधी खूप कमी मिळते. तुम्ही तुमच्या बाहुल्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत असता. त्यामुळे अजून हवं तसं वलय मिळत नाहीये.

अपर्णाताई, तुम्ही घर आणि कला सादरीकरण ह्यांचा मेळ कसा साधता?
घरातील सगळीजण आम्हांला पाठिंबा देतात. आमचं एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे कामाच्या वेळा ऍडजस्ट करणं जमतं. मी स्वतः स्क्रिप्ट लिहिते. बरेच संदर्भही चाळावे लागतात. आमच्या दोघांच्या संवादांची तयारी घरातली कामं करताना सुध्दा आम्ही करतो. अगदी भाजी करता करता सुध्दा आमचा सराव होतो.
रामदास पाध्येंचा मुलगा सत्यजीत चीही यात तोडीस तोड सहभागाची तयारी होती. हळूहळू तोही गप्पांत सहभागी व्हायला लागला होता.

सत्यजीत, आता तूही तुझ्या सहभागाबद्दल सांग.
मी पोद्दार कॉलेजला असल्यापासून सगळया सांस्कृतिक कार्यक्रमांतून बरेच कार्यक्रम केलेत. अर्थात सगळयात वेगळी कला असल्याने कॅम्पसवर तेवढं आकर्षणही असतं. आयत्या वेळी कार्यक्रम सादर करणं, नॅक कमिटी समोर इतर कार्यक्रमांच्या बरोबरीने पपेट शो करणं हे सगळं खूप आनंद देणारं होतं. या निमित्ताने खूप बाहुल्या बनवल्या. स्टेज शो, पथनाटय अशासाठीही काल्पनिक पात्र बनवली. कल्पनाशक्तीला प्रचंड वाव देणारं हे क्षेत्र आहे. मलाही अजून खूप मेहनत घ्यायची आहे.

नवीन कुठचे प्रकल्प चालू आहेत?
एका मोठया टीव्ही चॅनलसाठी मालिका चालू होतेय. त्यात १००% पात्रं ही बाहुल्या आहेत. त्याचं काम चालू आहे. खरंतर परदेशात या कलेला खूप प्रतिसाद मिळतोय. तिथल्या सारखी प्रशिक्षण संस्था आपल्याकडे काढावी अशी इच्छा आहे. खूप काम करायचं आहे अजून. खूप दिवसांत मराठीतून कार्यक्रम केले नाहीत. आता मात्र करावं असं वाटतंय.

एका समाधानी आणि कलेशी प्रामाणिक अशा कुटुंबाला भेटल्याचा आनंद झालाच, पण कलेची व्यावसायिकता जागरुक ठेवतानाच आपल्या अभिरुचीशी, संस्कारांशी प्रतारणा करावी लागत नाही, ही गोष्ट अत्यंत समाधान देऊन गेली. त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देऊन या बोलक्या कुटुंबाचा निरोप घेतला.

मुलाखत व शब्दांकन – प्रणिता नामजोशी