मुलाखत – अशोक सराफ
मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये आपल्या छोट्याशा भूमिकेतून छाप पाडणारी प्रिया बापट पुढे ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ मध्ये प्रभावीपणे काम करून अभिनय क्षेत्राबाबत एक करिअर म्हणून गंभीरपणे पाहू लागली. त्यानंतर ‘आनंदी आनंद’ आणि ‘शुभंकरोती’ या मालिकांमध्ये तिची मुख्य भूमिका होती. त्यानंतर ‘अधुरी एक कहाणी’ आणि मग झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ मध्ये केलेल्या निवेदिकेच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. ‘काकस्पर्श’मधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. “मी गंभीर भूमिका सुद्धा करू शकते” हे तिने दाखवून दिले. चला तर मग बघुया प्रिया आपल्या अभिनय क्षेत्रातील वाटचालीबद्दल काय म्हणतेय….
अभिनय क्षेत्रात आवड कशी निर्माण झाली?
मी लहानपणापासून शाळेत असताना नाटकांत काम करायची. माझ्या शिक्षिका विद्या पटवर्धन यांनी मी सहावीत असताना जब्बार पटेल यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटात लहानपणीच्या ‘माईसाहेबांच्या’ भूमिकेसाठी माझे नाव सुचवले. त्यामुळे मी या अभिनय क्षेत्रात आले.
अभिनय क्षेत्राला घरून पाठींबा होता का?
हो होता.
पहिला ब्रेक कधी मिळाला?
ज्या चित्रपटात मी गंभीरपणे काम केले तो म्हणजे ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’.
आतापर्यंत कुठले प्रोजेक्ट्स केलेत?
‘आनंदी आनंद’ आणि ‘शुभंकरोती’ या मालिकांमध्ये माझी मुख्य भूमिका होती. त्यानंतर ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकांमध्ये किशोरी गोडबोलेंच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. त्यानंतर ‘नवा गडी नवा राज’ हे नाटक माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. आणि ‘काकस्पर्श’ माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा चित्रपट ठरला.
झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ मध्ये केलेल्या निवेदिकेच्या भूमिकेमुळे मी घराघरात पोहचले.
याआधी अभिनय प्रशिक्षण कुठे घेतले होते का?
नाही. ‘अर्थशास्त्र’ विषयामध्ये माझी पदवी झाली आहे. तर पदव्युत्तर पदवी मी ‘मास मीडिया’ मध्ये केली आहे.
नाटकांमध्ये काम केले आहेस का?
हो. लहानपणापासून नाटकांमध्ये काम करत आले आहे. माझं व्यवसायिक सर्वांत जास्त हिट नाटक ‘नवा गडी नवा राज’ हे आहे. ह्या नाटकाने त्यावर्षीची सर्व पारितोषिके पटकावली होती.
‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ मधला तुझा अनुभव कसा होता?
मी ११वीत होते तेव्हा ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ मध्ये काम केले आणि टी.वाय. मध्ये असताना ‘लगे रहो मुन्नाभाई’ केला. एकूण अनुभव खुपच सुंदर होता. पण तेव्हा मी अभिनयाच्या बाबतीत फारसे सिरीअस नव्हते. आपल्याला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे असंही माझ्या मनात नव्हते.
बॉलीवूड बद्दल तुझे काय मत आहे? पुन्हा संधी मिळाल्यास तू काम करशील का?
नक्कीच काम करेन. पण त्यासाठी मी फारशी उतावीळ नाहीये. चांगल आहे तेच करायचं आणि कन्टेटीव्ह काम करायचं आहे.
आगामी प्रोजेक्ट्स बद्दल काय सांगशील?
‘आम्ही ट्रॅव्हलकर’ हा स्टार प्रवाह वरचा पहिला इंटरनेशनल ट्रेव्हल शो मी होस्ट करतेय. त्याचप्रमाणे ‘नवा गडी नवा राज’ या नाटकावरील चित्रपटाचे शूटिंग मी आत्ताच पूर्ण केले आहे.
शूटिंगमुळे घरच्यांसाठी वेळ मिळतो का?
माझे माहेरचे आणि सासरचे सर्वच लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. मोकळी असले की स्वयंपाक करायला खूप आवडतो.
अभिनेत्री नसतीस तर?
खूप पर्याय समोर होते. नेव्ही, कॉर्पोरेट सेक्टर, जाहिरात क्षेत्र किंवा कॅमेराच्या पाठीमागे असे कशात तरी मी काम केलेच असते.
सिनेमा, नाटक की सिरिअल?
तिन्ही क्षेत्राचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. ठराविक असे काहीच नाही. पण तिन्ही क्षेत्रात काम करायला आवडेल.
तुला या क्षेत्रात येण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागला?
माझ्या नशिबाने काहीच नाही. खरं तर तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी नशीबाची ही तितकीच गरज असते. २५% नशीब आणि ७५% मेहनत या क्षेत्रात गरजेच असत.
या क्षेत्रात येणा-या लोकांना काय सांगशील?
स्वतःवर विश्वास ठेवा. खरे वागा. ग्लॅमरच्या मागे धावू नका. यश हे येत जात राहील पण तुम्ही मेहनतीने काम करत राहा आणि आपल्या कामात प्रामाणिक राहा.
मुलाखत- आशिष कोकरे