बातम्या देता देता, आपण स्वत:च एक बातमी झालेला निवेदक प्रदीप भिडे

दूरदर्शन, मुंबई येथे वृत्तविभागामधे अनुवादक, ‘प्रौढ साक्षरता’ मालिकांमधून अभिनय निर्मिती साहाय्यक, दूरदर्शन केंद्र, मुंबई वृत्त-निवेदन : १९७४ पासून सुरवात कामगार विश्व, योगविषयक मालिकांची निर्मिती ई मर्क या जर्मन कंपनीत जनसंपर्क अधिकारी, १९७८ हिंदुस्थान लिव्हर्स : वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, १९८० मुंबई, खार येथे प्रियंका स्टुडिओची स्थापना : १९९४ डिजीटल साउंड सिस्टीमच्या साहाय्याने ध्वनीमुद्रण, कम्प्यूटर सिस्टिम मार्फत डबिंग, पहिल्या पाच स्टुडिओपैकी एक कॉर्पोरेट फिल्म्स, शॉर्ट फिल्म्सची निर्मिती व दिग्दर्शन.

Pradeep Bhide लोकांना कुठे काय चाललंय हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. प्रसार माध्यमांचं माहात्त्म्य दिवसेंदिवस वाढत आहे. सूत्र-संचालन, वृत्तनिवेदन ह्या व्यवसायांना देखील एक वलंय प्राप्त झालं आहे. श्री. प्रदीप भिडे हे, ह्या व्यवसायामधे गेली २५ वर्षे सातत्याने काम करीत आहेत. त्यांच्याशी मनमोकळी बातचीत करण्याचा योग आला. खार येथील त्यांच्या ‘प्रियंका स्टुडिओ’मधे ही बातचीत झाली. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरवात २ ऑक्टोबर १९७२ रोजी झाली. श्री. प्रदीप भिडे हे एप्रिल १९७४ पासून दूरदर्शनमधे दाखल झाले. स्व. भक्ती बर्वे-इनामदार, ज्योत्स्ना किरपेकर, स्व. स्मिता पाटील-बब्बर हे सारे प्रदीप भिडे यांचे समकालीन तसेच सम-व्यावसायिक. त्या काळात मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजीमधूनही बातम्या दिल्या जात. १९८४ पासून, जेव्हा नॅशनल नेटवर्क सुरू झाले, तेंव्हापासून, हिंदी व इंग्रजी बातम्या दिल्लीहून प्रसारीत केल्या जाऊ लागल्या. वयाच्या २१ व्या वर्षी श्री. भिडे यांनी बातम्या द्यायला सुरवात केली दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्.मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रूची होती. प्रसार माध्यमात करियर सुरू करावं असा पहिल्यापासूनच त्यांचा मानस होता.

एका चांगल्या वृत्तनिवेदकाला आवाजाबरोबरच भाषेवर प्रभुत्त्व मिळविणे जरूरी ठरते. संस्कृत भाषा ही मृत भाषा मानण्याचा प्रघात असला तरी, संस्कृतमधील श्लोक पठण, उच्चारण यामुळे वाणी स्पष्ट होते. शब्दाचा उच्चार कसा करायचा असतो, मोठा शब्द बोलताना, कुठे तोडायचा असतो, हे भाषिक बारकावे आत्मसात करणे श्रेयस्कर. अर्थाप्रमाणे विराम घेऊन शब्दफेक करता आली पाहिजे, असे सांगून श्री. भिडे यांनी ‘बातमी सादर करताना, सरळसोट वाचली तर नीरस आणि परिणामशून्य होते, यासाठी शब्दभांडार हवे. बालसुलभ कुतूहल हवे. बातम्या तटस्थपणे, पण आवाजात आवश्यक तो चढउतार, मार्दव निर्माण करून सादर केल्या तर त्या परिणामकारक होतात ‘ अशी माहिती दिली.

श्री. भिडे यांच्या पिढीपेक्षा हल्लीच्या निवेदकांना जास्त संधी उपलब्ध आहेत. श्री. सुरेश खरे हे सूत्र-संचालन व निवेदन या विषयावर वर्कशॉप्स घेतात. पुण्यामधे रंगा गोडबोले, अजित भुरे यांसारखे लोक ह्या क्षेत्रातील ट्रेनिगसाठी कार्य करीत आहेत.

तुम्ही अशा प्रकारची वर्कशॉप्स का घेत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना, श्री. भिडे म्हणाले, येणारे शिबिरार्थी उमेद घेऊन येतात. त्यांना आयोजकांकडून ‘जॉब’ची खात्री हवी असते. अशा लोकांना फसवणूक केल्यासारखं वाटू शकतं. निवेदन, बोलण्या-चालण्यातील कौशल्य हा व्यक्तित्त्व विकासाचा एक भाग म्हणून लोकांनी त्याकडे पाहिलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर, मराठी वर्ल्डसमवेत, ‘व्हॉईस कल्चर’वर वर्कशॉप्स घेण्याची श्री. प्रदीप भिडे यांची मनापासून तयारी असल्याचं दिसलं.

व्हॉईस कल्चर व यशस्वी निवेदक म्हणून काम करताना, योगातील क्रियांचा उपयोग होतो, असं मत व्यक्त करताना श्री. भिडे यांनी असं संगितलं की त्यांनी व्यक्तीश: तसे खास प्रयत्न केले नाहीत. ते शाकाहारी असून, सिग्रेट वा तत्सम व्यसन त्यांना नाही, तसेच तेलकट पदार्थ खाण्याची मूळातच आवड नाही, त्यामुळे आपसूकच आवाज टिकून राहिला. गेली २५ वर्षे दूरदर्शनवरून त्यांनी वृत्तनिवेदन केलं. पण तरीही ते अजून थकलेले नाहीत, की श्रोते वा प्रेक्षक त्यांना कंटाळले नाहीत.

Pradeep Bhide शाळा-कॉलेजच्या दिवसांतील मराठीच्या ओढीमुळे अनेक कादंब-या व इतर पुस्तके त्यांनी वाचली. त्या बहुश्रुततेचा त्यांना सदैव फायदाच झाला. कायमची व्यक्त होणारी रड असली, तरी आज वाचन-संस्कृती निकालात निघाली आहे, ही वस्तुस्थिती आहे, व त्याबाबतची खंत त्यांनी व्यक्त केली. नाटकांमधून कामं करताना, ते रत्नाकर मतकरी, रवी पटवर्धन यांच्या संपर्कात आले. त्यांच्या निवेदनातील कारकिर्दीचा एक ‘बेस’ आपसूकच तयार होत होता. दूरदर्शनच्या त्या वेळच्या संचालकांच्या, श्री. शास्त्रींच्या प्रोत्साहनामुळे, ते बातम्यांच्या अनुवादाबरोबरच इतरही कामात रस घेऊ लागले. प्रौढ साक्षरतेच्या विषयावरील एका मालिकेमधे, ३२ ते ३३ भाग त्यांनी शिक्षकाची भूमिका वठविली. हळुहळू ‘निर्मिती साहाय्यक’ म्हणून ते काम करू लागले. श्री. शास्त्री तसेच त्यांच्या नंतरच्या श्री. ल गो. भागवत या दोन्हीही दूरदर्शनच्या संचालकांकडून खूप शिकायला मिळालं. एकीकडे निर्मिती साहाय्यक म्हणून काम पाहात असतानाच वृत्तनिवेदन देखील सुरू होते. कार्यक्रम निर्मिती करताना, पाल्हाळ न लावता अचूक वेध घेऊन प्रभावीपणे घटना सादर करणं महत्त्वाचं. नेटकेपणा, वेळच्या वेळी काम आणि शिस्त या सा-या गोष्टी महत्त्वाच्या. व्यवस्थापनविषयक सर्व कार्यक्रम संकलित करणे, असे कार्यक्रम इंग्रजीमधून असल्यामुळे इंग्रजी व हिंदी बातम्यांसाठी काम करणे, मुलाखत घेणे, बाह्य-चित्रीकरण, या सा-यातून लघुपट तयार करण्याची कला भिडे यांनी आत्मसात केली. ‘कामगार विश्व’, त्यातून निरनिराळया उद्योग समूहांच्या व्यवस्थापनाशी संपर्क, सदाशिवराव निंबाळकर यांची योगविषयक मालिका, यातून कसकसा विकास झाला, याची माहिती ते देत राहिले.

बातम्या देण्यातलं थ्रिल मोठं आहे. एकंदर २५ वर्षांच्या बातम्या देण्याच्या अनुभवामधे नेमक्या धक्कादायक, दु:खद किंवा चित्तथरारक बातम्या देण्याचा प्रसंग श्री. भिडे यांच्यावर अनेक वेळा आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्त्या, ख्यातनाम पार्श्वगायक महमद रफी यांचे निधन, मुंबईचा भीषण बॉम्बस्फोट, अशा घटनांची बातमीपत्रे श्री. भिडे यांनीच वाचली. निवेदकाने अशा वेळी भावनाविवश होता कामा नये. त्रयस्थाच्या भूमिकेतून तटस्थ राहून बातम्या सादर करणे आवश्यक. निवेदकाला व्यक्तीश: आनंद झाला वा दु:ख झाले तरी त्याला भावनांचे प्रदर्शन करता येत नाही. अलिप्तपणा म्हणजे कोरडेपणा नव्हे. आवश्यक त्या भावभावनांतून भिजलेली बातमी लोकांच्या कानावर पडायला हवी.

२१ मे १९९१, भारतात श्रीपेरूंबदूर येथे ‘राजीव’जींची हत्त्या झाली. वृत्त संपादिका विजया जोशी यांनी भिडे यांना ‘असशील तसा त्वरीत निघून ये’, म्हणून सांगितलं. ही बातमी मुंबईत वा-यासारखी पसरली होती. मुंबई बंद. सर्वत्र स्मशान शांतता. पोलिसांच्या जीपने भिडे दूरदर्शन केंद्रावर आले. सकाळी ६.३० वाजता त्यांनी बातमी वाचली. तटस्थपणे बातमी वाचताना देखील अगदी नकळतपणे तिला एक कारूण्याची झालर होती. ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’, अशा प्रतिक्रिया त्यांना बातमी झाल्या झाल्या लगेचच मिळाल्या. १९९४ चा बॉम्बस्फोट झाल्यावर त्या दिवशी साडेसात वाजता बातम्या देण्याची जबाबदारी भिडे यांची होती. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ते दुपारी दीड वाजताच निघाले. रेल्वेने, पायी पायी असा प्रवास (अंधेरी ते वरळी) त्यांनी केला व सायंकाळी ५ वाजता पोहोचले. बातमी परिणामकारक रित्या सादर केली. त्याही परिस्थितीमधे लोकांनी त्यांच्या अचूक वृत्तनिवेदनाला दाद दिली.

पुण्यात होणा-या मातृपूजनाची बातमी मिळवून आपणहून सादर केली. सहा पिढयांपैकी पहिली आजीबाई ८५ वर्षांची तर, सहाव्या पिढीची तिची प्रतिनिधी ६ महिन्यांची ! या सचित्र बातमीचे सा-या महाराष्ट्रामधे कौतुक झाले. या बरोबरच क्वचितप्रसंगी मिलीमिटर व्यासा ऐवजी किलोमीटर व्यासाची पाईप लाईन असे गफलतीचे उल्लेखही झाल्याचे त्यांनी हसत हसत सांगितले. महमद रफी यांच्या निधनाच्या बातमीला देखील कारूण्याची छटा होती. भिडे यांनी ही बातमी सादर केली, तेव्हाही त्याला अशीच दाद मिळाली. नाटयपूर्ण वाटणार नाही, आनंद वा दु:खाचं प्रदर्शन वाटणार नाही, आणि तरीही ती बातमी रूक्ष वाटणार नाही, याचं अवधान निवेदाकाला ठेवावं लागतं.

यानंतर १९७८ साली ते ई. मर्क या जर्मन कंपनीमधे ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून काम पाहू लागले. दोन वर्षांनी त्यांनी हिंदुस्थान लिव्हर्समधे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. देश-विदेश दौरे, एकटयाच्या जबाबदारीवर अनेक अवघड काम पार पाडणे, हे सारे करताना देखील वृत्तनिवेदन सुरू राहिलं होतं.

Pradeep Bhide हा नंतर स्वीकारलेला व्यवसाय, पहिल्या व्यवसायाशी सुसंगत होता काय, यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ग्राहकांच्या किंवा लोकांच्या कंपनीच्या उत्पादनांविषयी निरनिराळया तक्रारी वा अडचणी असू शकतात. पाच वर्षातील कंपनीच्या प्रकल्पांची माहिती, प्रॉडक्ट लॉचिंगची माहिती, कंपनीची मिल्क कोऑपरेटिव्ह, किंवा, फास्ट मुव्हींग कंपनी असल्यामुळे प्रसार-माध्यमांना कंपनीची भूमिका वेळोवेळी समजावून सांगणं – जनसंपर्क अधिकारी हा फिक्सर आहे -, असं लोकांना वाटतं, व ते खरं देखील असतं. त्यामुळे वृत्तनिवेदन, आणि जनसंपर्क ही आपली दोन्हीही कामं परस्पर-पूरकच होती, असा खुलासा भिडे यांनी केला. जनसंपर्क अधिकारी असताना, भिडे यांचा देशविदेशच्या बडया मंडळींशी, पत्रकारांशी, नामवंतांशी संपर्क आला. सृजनशीलता वाढीस लागली. त्याचा परिपाक म्हणजे, स्वत:चं काहीतरी वेगळं करावं, स्वतंत्र व्यवसाय करावा, हा निर्णय त्यांनी घेतला. आपल्या कन्येच्या नावानं, त्यांनी ‘प्रियंका स्टुडिओ’ सुरू केला. हा डिजिटल साऊंड सिस्टीमचा स्टुडिओ असून, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण आहे. कॉम्प्यूटर पध्दतीने येथे ध्वनीमुद्रणाची सोय असून, निरनिराळया साऊंड ट्रॅक्सचं मिक्सींग येथून करतात आणि हवा तसा ‘इम्पॅक्ट’ मिळवतात. फिल्म निर्माते, जाहीरात निर्माते इथे बुकिंग करून, आपापले रेकॉर्डिंग करून घेतात.

या अनुशंगाने कॅसेट कंपन्याच्या परिस्थितीविषयी विचारले असता, श्री. प्रदीप भिडे यांनी, म्युझिक उद्योजकांवर फार गंभीर परिस्थिती आली आहे, असे सांगितले. कॅसेटची जागा सी. डी. ने घेतली असून, त्यातदेखील एम्. पी. थ्री अशी व्हर्जन्स येत आहेत. या नाविन्यावर काहीही उपाय नाही, ते अपरिहार्य आहे, असं ते म्हणाले. असं असलं तरी, रेकॉर्डिंग स्टुडिओमधे लोक येतच राहतात. सतत काही ना काही प्रॉजेक्ट तिथे सुरू असतो. श्री. भिडे स्वत:देखील निरनिराळया कॉर्पोरेट फिल्म्स बनवितात. कॉर्पोरेट फिल्म्स बनवताना, संकल्पना त्यांची असते. ध्वनीमुद्रण अर्थातच त्यांच्या स्टुडिओमधे होतं, परंतु कॅमेरा व इतर जरूरी ते तंत्रज्ञ ते मागवून घेतात.

एक परिचित चेहरा असल्यामुळे खासगी आयुष्यात अडचणी येतात का?, याबाबत त्यांनी नकारात्म उत्तर दिलं. अगदी सहज हवा तिथे वडापाव खाणं, वा पर्यटन करणं, अशा कुठल्याही गोष्टी ते मनमोकळेपणे करतात. लोकसंग्रह करण्याची त्यांची आवड असल्याने, त्यांना कधीही प्रसिध्दीचा बाऊ वाटला नाही. कुलू मनालीच्या त्यांच्या सफरीच्या दरम्यान एक अध्यात्मिक गुरू भेटले होते, त्याची आठवण देखील त्यांनी सांगितली.

लघुपट बनविताना, दिवसरात्र काम करून तो लघुपट एअरवर जाईपर्यंत प्रचंड धावपळ असते. प्रत्येक व्यवसायाच्या स्वत:च्या अशा गरजा असतात. व त्या पुरवता पुरवता, आपण यशाचं एक जाळं विणू शकतो. या सर्व प्रवासात कुठेही चिंता वा दबाव न जाणवण्याचं, अपयशाचं भय न वाटण्याचं संपूर्ण श्रेय ते आपली पत्नी सुजाता हिची उत्तम साथ, व नेहमीच भावबळ वाढविणारे अक्षय आणि प्रियंका ही मुलं यांना प्रांजळपणानं देतात.

प्रसारमाध्यमांविषयी मनमोकळी चर्चा करताना, टि. व्ही. मालिका ही रोज घरात येणा-या वर्तमानपत्राप्रमाणं असते. तर चित्रपटाला त्यापेक्षा जास्त ‘सेल्फ लाईफ’ असतं असं ते म्हणाले. चांगला चित्रपट स्मरणात राहतो. पुन्हा पाहाता येतो. हल्ली भारंभार मालिका झाल्या असून, तेच तेच लोक काम करताना दिसतात. तेच तेच सीन व तीच तीच स्थित्यंतरं दिसत राहतात. एकंदरच हल्ली ‘एंटरटेनमेंट’ प्रचंड वाढली आहे, असे श्री. भिडे म्हणाले. तेहलका.कॉम हा स्टंट होता का, याविषयी आपलं मत व्यक्त करताना श्री. भिडे म्हणाले, गोष्टी का उजेडात आल्या, हा भाग तूर्त बाजूला ठेवला तरी, शस्त्रांस्त्रांच्या खरेदीमधे भ्रष्टाचार होतो, ही चूकच आहे. आपला देश भ्रष्टाचारामधे फार वरच्या क्रमांकावर आहे. जोवर हया भ्रष्टाचाराचा समूळ नाश होत नाही, तोवर, आपला देश पुढे येणं फार कठीण आहे. डॉ. नारळीकरांसारख्या माणसांनी मंत्री होणं ही काळाची खरी गरज आहे, पण अशी कुठलीही सोय आपल्या राजनीतीमधे नाही.

नवीन पिढीचं भवितव्य काय? यावर भाकित सांगताना ते म्हणाले, नव्या पिढीसमोर पहिल्या मानाने जास्त आव्हानं आहेत. राजकीय परिस्थिती समाधानकारक नाही. ‘ब्रेन ड्रेन’ झाला आहे. शेवटी लोक जे ‘डिझर्व्ह’ करतात, ते सरकार लोकांना मिळतं.
बदलत्या सामाजिक वास्तवातून भाषिक अंतराय देखील वाढतो आहे. मराठीतील उच्च मध्यमवर्गीय इंग्रजी माध्यामाच्या आस-याने वावरतो आहे. झोपडपट्टीतील पालक मराठीची निवड करतात. वेळोवळी ज्या ज्या बोली लोक बोलतील त्या मराठीला स्वीकाराव्या लागतील. निरनिराळे आघात पचवत, रिचवत, पण तरीही मराठी पुढेच जाईल. मराठी व इंग्रजी मिळून मिंग्लीश, आणि हिंदीच्या संपर्कात इंग्रजी येऊन हिंग्लिश अशी भाषिक रूपे स्वीकारावी लागतील. कॅसेट व्यवसायाचं भवितव्य अंधारात असल्यामुळे, नवीन गीतकार व संगीतकारांना आता वावच राहिला नाही. पण तरीही मी आशावादी आहे. नवीन पिढी म्हणजे, नवे उत्साहाचे झरे. त्यांना नवे मार्ग शोधावे लागतील. चोखाळावे लागतील. कदाचित त्यातूनच नवनवे कलाप्रकार जन्म घेतील. २५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात अनेक स्थित्यंतरं त्यांनी पाहिली व त्यामधूनच माणसं ‘वाचण्याचं’त्यांचं कसब, समाजाची नस शोधण्याची अभ्यासू वृत्ती ही सतत जाणवत राहिली.

‘फोडीले हे भांडार, धन्याचा हा माल । मी तो हमाल भार वाही ॥’ – एका वेगळया संदर्भात ज्ञानेशाच्या या ओवीचा प्रत्यय अनेक वर्षे श्री. प्रदीप भिडे घेत होते, व आहेत, आणि त्यातूनच वृत्त निवेदनासारख्या क्षेत्रामधे देखील भार वाहता, वाहता, कित्येक प्रकारचे अक्षय ज्ञानकण कसे साठवता येतात, कल्पनांच्या कित्येक कोटी कशा हाताशी लागतात, याचा एक दाखला श्री. प्रदीप भिडे यांच्या भेटीमधून गवसला

मुलाखत व शब्दांकन – सौ अनघा दिघे