बहुरंगी निलकांती

‘आत्मविश्वास’ मधील कणखर आई ‘लाईफ इज ब्यूटिफूल’ ची दिग्दर्शिका, नाटकांसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळवणारी कलावंत, ‘मल्हारची’ आई आणि ‘नाना पाटेकरांची’ पत्नी ह्या आणि अश्या अनेक आयडेंटीटी असणा-या निलकांती पाटेकरांची ओळख माणूस म्हणून, एक संवेदनाशील स्त्री म्हणून अधिक गहिरी आहे. निलूताईंशी गप्पा मारण्याचा हा अनुभव समृध्द करणारा होता.

Nilkanti ‘लाईफ इज ब्यूटिफूल’ ह्या तुमच्या कलाकृतीचे सध्या खूप कौतूक होते आहे. त्याबद्दल सांगाल?
‘लाईफ इज ब्यूटिफूल’ ही डॉक्यूमेंटरी बनविण्याची प्रेरणा मला भाऊ करमरकरांच्या ‘फिटे अंधाराचे जाळे’ हे पुस्तक वाचून झाली. वल्लरी करमरकर ह्या आपल्या लेकीला सेरेब्रल पाल्सी (जन्मत: काही कारणास्तव मेंदूला धक्का पोचून आपल्या स्नायूंवरचे नियंत्रण जाणे) आहे हे ह्या कुटुंबाने हसत खेळत मान्य केले. आई, बाबा, आणि आत्या ह्यांचे अखंड परिश्रम आणि अमर्याद चिकाटीमुळे वल्लरी आज संस्कृत मध्ये एम. ए. आहे.

निलूताई सांगत होत्या, ‘करमरकर कुटूंब मला विचारांनी आणि संस्कारांनी अधिक मोठे वाटले. कुठल्याही बुवाबाजी, अंधश्रध्दा ह्या मागे न लागता आहे ते स्विकारून वल्लरीची बौध्दिक पातळी कशी वाढेल ह्यावर लक्ष केंद्रित केले. वल्लरीलाच ते आपला ‘पांडूरंग’ मानतात.’

शुटींगच्या दरम्यान मी वल्लरीला मोकळे सोडले होते. एखादा सीन समजावून सांगितल्यावर मी वल्लरीला लाडाने माधुरी दिक्षीत म्हणायचे. पुढे म्हणायचे माधुरी दिक्षीत पेक्षाही तू (वल्लरी) मोठी आहेस कारण माधुरी जे करू शकणार नाही ते तू करते आहेस. वल्लरीची कळी खुलायची आणि ती कॅमे-यापुढे मोकळी व्हायची.

सुबोध भावेचे पात्र आणण्यामागचा उद्देश काय?
वल्लरीला आत्तापर्यंत फक्त आई, वडील आणि आत्या हीच नाती माहिती होती. मैत्रीचे नाते तिच्याकरिता नवीन होते. सुबोध भावेही तिच्याशी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागला. वल्लरीच्या डोळयात तिचा निष्पापपणा जाणवतो. सुबोधशी मैत्री करताना ती कुठेही ‘फिजिकल लेव्हलला रिऍक्ट’ झाली नाही. ह्यातच माझे पुरूष पात्र निवडण्याचे यश आहे.

पुस्तक मराठीतून असताना डॉक्यूमेंटरी इंग्रजीत का?
पुस्तक वाचतांना मला जाणवलेले कमरकरांचे मोठेपण, वल्लरीचा पॉझिटीव्ह ऍटिटयूड मला ग्लोबल ऑडियन्स पर्यंत पोहोचवावासा वाटला. जगभरातल्या सेरेब्रल पाल्सी असणा-या मुलांना आणि त्यांच्या कुटूंबियांना पॉझिटीव्ह संदेश मिळावा हा त्यामागचा उद्देश होता. डॉक्यूमेंटरीचा शेवट बघताना प्रेक्षकांच्या डोळयात पाणी तरळते आणि आपल्यातल्या ‘वल्लरी’ लाही आपण अधिक सक्षम केले पाहिजे ही जाणिव होते.

काही वर्षापूर्वी निलूताई तुम्ही (रूढ अर्थाने नाही पण) शिक्षकाच्या भूमिकेत शिरला होतात आणि दहावीच्या मुलांकरिता काही शैक्षणिक सिडीज् बनविल्या होत्या. त्याबद्दल सांगा?
आपल्याकडे १०वी आणि १२वीची वर्षे मुलांकरिता अतिशय मानसिक तणावाची असतात. त्यात गणित आणि शास्त्र अधिक अवघड वाटणारे तरी हमखास मार्कांची हमी देणारे विषय आहेत.

काही शिक्षकांच्या चमूने मिळून हा अभ्यासक्रम आखला आणि संगणक ग्राफिक्स द्वारा मी त्यांची मांडणी केली. मला वाटतं ग्राफिक्सच्या सहाय्याने प्रश्न उत्तरांची ही मांडणी अधिक सोपी आणि परिणामकारक झाली. आम्ही दररोज एक तास हा कार्यक्रम दूरदर्शनवरून प्रसारित करीत असू. अश्या एकूण दोन तासाच्या दहा कॅसेट केल्या आहेत. कार्यक्रमाचे यश म्हणजे आमच्या ह्या कार्यक्रमांचा लाभ अगदी उर्दू, गुजराती, हिंदी, माध्यमातील मुलं सुध्दा घ्यायची. तसेच आदल्या रात्री मुलांच्या फोनने आलेल्या सुचनांवरून आम्ही दुस-या दिवसाचा कार्यक्रम एडिट करून प्रक्षेपण करत होतो. मला हे काम करणं वेगळ वाटलं, शंभर टक्के ‘अपील’ झालं आणि म्हणूनच ते मी अधिक ‘एन्जॉय’ करू शकले.

राज्य नाटय स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवूनही तुम्ही व्यावसायिक नाटके केली नाहीत तसेच ‘आत्मविश्वास’ च्या यशानंतरही व्यावसायिक चित्रपट केले नाहीत. असे का?
मी मुळची नाशिककर. ७०च्या दशकात कॉलेजमधे असतांना मी अनेक राज्य नाटय स्पर्धांमध्ये भाग घेतला. माझा भाऊ श्रीकांत हलदुले नाटक लिहायचा आणि मी त्यात काम करायचे. आमची दोघांची छान टिम जमली होती. ‘सिकवेन्स’ ह्या नाटकाने मला एकूण सहा पारितोषिके मिळवून दिली. ‘अशी विनंती विशेष’ साठी मला उत्कृष्ट अभिनेत्रीचे सुवर्ण पारितोषिक मिळाले. ‘तो एक स्वप्नपक्षी’ ह्या आमच्या नाटकाने एकूण अकरा बक्षिसे पटकावली. अगदी स्त्री आणि पुरूष अभिनयाचं बक्षिसही माझ्या पदरात पडलं. त्याच दरम्यान माझी आय.आय.टी ला निवड झाली पण नाटकांसाठी बी.एस.सी करायचं ठरवून मी मुंबईत दाखल झाले. स्वत:च्या पायावर उभं राहता यावं म्हणून मी दूरदर्शनमधे नोकरी करू लागले. विनय धुमाळे, विजया मेहतांकडून खूप काही शिकता आलं आणि ह्या माध्यमाचं आकर्षण वाटायला लागलं. त्याच वेळेला एकाच नाटकाचे शंभर प्रयोग प्रत्येक वेळेला नव्या उत्साहाने सादर करणे मला कंटाळवाणे वाटू लागले. दूरदर्शनच्या इतर तांत्रिक बाजूमधे मी रस घेऊ लागले.

योगायोगाने मी आणि नाना (पाटेकर) ‘अलमास अलमास’ ह्या नाटकात एकत्र काम करत होतो. तो माझ्या वडिलांची भूमिका करत होता. नाटकाच्या दरम्यान आम्ही लग्न केलं आणि नंतर ‘मल्हार’चे आगमन झाले. मुलाचे संगोपन, भरपूर लिखाण, संहिता लिहिणं असं सारं एकत्र चालू होतं. ‘मन वढायं वढाय’ ही मालिका त्यावेळेला मी लिहिली, दिग्दर्शित आणि निर्माणही केली.

दिग्दर्शक आणि अभिनेता सचिन पिळगांवकर त्यावेळेला ‘आत्मविश्वास’च्या संहितेवर काम करत होता. मध्यवर्ती भूमिकेसाठी त्याला माहिती नसलेला चेहरा पण कसदार अभिनय करणारी कलावंत हवी होती. माझा ‘गोकुळ’ हा लघुपट बघून सुप्रिया (सचिनची पत्नी) आणि सचिनच्या आईने माझे नाव सुचवले आणि मी ‘आत्मविश्वास’ केला. तिशीत असताना साठीतल्या जवळपासची मध्यमवर्गीय आई साकारतांना खूप समाधान मिळालं. नंतर ब-याच ऑफर आल्या पण मनाजोगतं वाटेना म्हणून चित्रपट केले नाहीत.

त्यानंतर ‘पपा’ म्हणजे अरविंद देशपांडेंना श्रध्दांजली म्हणून ‘एक डोह अनोळखी’ हे नाटक ‘आविष्कार’साठी दिग्दर्शित केलं. सुलभा देशपांडे आणि विनायक पैं ची भूमिका असणारं हे नाटक अतिशय भावनाप्रधान होतं. ह्या नाटकानेही अनेक बक्षिसे पटकावली.

आता ‘लाईफ इज ब्यूटिफूल’ नंतर काही इंग्रजीत डॉक्यूमेंटरीज् दिग्दर्शित करते आहे. तसेच नाना पाटेकर निर्माण करीत असलेल्या आणि प्रकाश झा दिग्दर्शक असलेल्या संहितेच काम चालू आहे.

काय वाचायला आवडते?
कॉलेजच्या दिवसात मी ‘फिक्शन’ मधे रमायचे पण आता मला ‘रियालिटीज्’ वाचायला जास्त आवडतात. मला आत्मचरित्र वाचायला आवडतात. नुकतेच मी ‘मर्लॉन ब्रँडोचे’ आत्मचरित्र वाचले. मला महाभारतातील पात्रे किंवा शिवाजींबद्दल वाचायलाही आवडते कारण ही माणसे काळाच्या खूप पुढे होती. मला चित्रपट पाहायला आणि त्यानंतर वाचायलाही आवडते. अलिकडेच मी ‘सिडनी लुमेट’चे चित्रपटांच्या तांत्रिक बाजूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक संपवले. मी अभ्यास म्हणून ही चित्रपट बघते. मला ‘स्टेप मॉम’ आणि त्यातला ‘ज्यूलिया रॉबर्टस’ चा अभिनय खूप भावला. मला अलिकडे आलेले मराठी चित्रपटही अजून पहायचे आहे.

मराठीवर्ल्डच्या वाचकांना काय संदेश?
मी सा-या जगभर फिरले पण आपल्या सारखी संस्कृती कुठेही नाही. जपानला गेले असतांना तिथल्या सहका-याला म्हटले ‘तुम्ही सारे एका चेहेरेपट्टीचे आणि संस्कृतीचे पण आम्ही भारतीय मात्र वेगवेगळया संस्कृतीचे आणि चेह-याचे एकत्र नांदतो आहोत.’
आपल्याकडची बुध्दीमत्ता कुठेही नाही. हा पण, आपण मराठी लोक थोडे परधार्जीणे असतो. तो अवगुण आपण सोडला पाहिजे. परदेशात स्थायिक होण्याचा विचारही मी करू शकत नाही. मला भारतात आणि तेही मराठी कुटूंबात जन्माला घातल्याबद्दल मी परमेश्वराची ऋणी आहे.

पाटेकरांचा गणेशोत्सव हा एक चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय आहे.
गणेशोत्सवाबद्दल बोलतांना निलूताई भावूक होऊन म्हणतात, “गणेशोत्सव ही माझ्या सास-यांनी सुरू केलेली प्रथा आम्ही समर्थपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत. दहा दिवस नित्य वेगळया फुलांची आरास हे पाटेकरांच्या गणपतीचे वैशिष्टय. हजारो लोक स्वत:हून आमच्या घरी येऊन बाप्पांचं दर्शन घेतात, जेवतात, गप्पा मारतात. विसर्जनाच्या वेळी मी अगदी नऊवारी, नथ ह्या पारंपारिक वेषात असते. गणपतीचे हे दहा दिवस मंतरलेले असतात.”

मुलाखत व शब्दांकन – भाग्यश्री केंगे