देशविदेशात भारतीय संगीताचा प्रचार करीत आहेत संतूरवादक नंदकिशोर मुळे

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत परदेशात लोकप्रिय करण्यात विख्यात संतूरवादक नंदकिशोर मुळे यांचाही मोठा वाटा आहे. विशेषत: संतूर या वाद्याचे कधी नांवही ऐकले नाही अशा जगातील कानाकोप-यांत नंदकिशोर मुळे यांनी आपल्या संगीताचा वारसा पोहचविला आहे. संतूरश्रेष्ठ पंडित शिवकुमार शर्मा यांचे नंदकिशोर मुळे हे जेष्ठ शिष्य. त्यांचे बर्लिन येथे वास्तव्य असून संतूरवादनाच्या मैफिली, प्रात्याक्षिके, व्याख्याने, संगीत वर्ग यासाठी वर्षभर अमेरिका, युरोपात दौरे चालूच असतात. मात्र दर डिसेंबर-जानेवारीत ते भारतात आवर्जून येतात – आपल्या मायभूमीहून वर्षभरासाठी प्रेरणेची शिदोरी बांधून न्यायला. हा कलाकार कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मराठीवर्ल्डने त्यांच्यांशी केलेली ही बातचीत.

आपण मूळचे बडोद्याचे. आपलं घराणंही संगीतकारांचे. आपले वडिल श्री दत्तात्रय मुळे यांनी लहानपणापासूनच आपल्याला गायन, तबलावादन याची तालिम दिली. बडोद्याच्या प्रख्यात म्युझिक कॉलेजात आपण संगीताबरोबरच कथ्थक नृत्यही शिकलात. कंठयसंगीत, तबला वादन, कथ्थक नृत्य या तीन ही कलांत निष्णात असताना आपण संतूर या वाद्याकडे कधी व कसे वळलांत ?

Nandkishor Muley १९६८ साली आमच्या म्युझिक कॉलेजात किरवाणी मैफिलीत पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर वादन मी प्रथमच ऐकले. त्यावेळी पंडितजींच्या परिश्रमाने नुकतांच कुठे संतूरला शास्त्रीय संगीतवाद्य म्हणून दर्जा मिळू लागला होता. मला या वाद्याबद्दल पराकोटीचे कुतुहूल वाटले व मुख्यत: संतूरच्या श्रवणीयतेचे मला प्रचंड आकर्षण वाटले. मला हे वाद्य व त्याचा नादमधूर ध्वनी फारच वेगळा जाणवला. या मैफिलीनंतर मी त्याच ध्वनीच्या नादांत स्वरयंत्राच्या तारांना चमच्याने व नंतर जाड काडयांने झंकारून स्वर काढण्याचे प्रयत्न करायचो. वडिलांनी माझी जिज्ञासा ओळखली व संतूरचा साज विकत घेण्याचे ठरविले. परंतु त्याकाळात बडोद्याला हा साज कुठे मिळणार? कर्मधर्मसंयोगाने वडिलांच्याच एका विद्यार्थ्याकडे संतूर होते. मला तबल्यात डिप्लोमा करायला त्यावेळी २५० रुपये शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या पैशातून मी हा माझा पहिला साज विकत घेतला व स्व:ताच शिकत रियाझ करू लागलो. बडोदे सोडून मुंबईला आलो व वल्लभ संगीत विद्यालयात कथ्थक शिकवू लागलो. येथे प्राचार्य के. जी. गिंडे यांनी माझ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत व मोलाचे मार्गदर्शनही केले. पंडित शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनाच्या सर्व कार्यक्रमांना अगदी जवळून निरीक्षण करायचे व तसे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा असे कांही काळ चालले. पण तोवर पंडितजीचेच माझ्याकडे लक्ष वेधले गेले होते. त्यांनी एकदां बोलावून घेतले व तुझे संतूर ऐकव म्हणाले. मी संतूरच्या तारा जुळवल्या त्यावरच ‘साज छान जुळवलास’ अशी पहिलीच पावती मिळून गेली आणि संतूरवादनानंतर तर त्यांनी मला आपला शिष्यच करून घेतले.

गायन, तबला व कथ्थक या आपल्या तिन्ही नैपुण्याचा संतूरवादनावर कसा परिणाम झाला?
माझ्या नृत्यातील तालिमींमुळे माझ्यात एक पेशकारीची सौंदर्यदृष्टी बाणवली गेली. विशेषत: कथ्थकचा तालावर जास्त भर असतो. संतूर हे जसे गेय वाद्य आहे तसेच ते तालवाद्य ही आहे. त्यामुळे कथ्थक व तबला यातून आत्मसात झालेले तालाचे सातत्याने राखले जाणारे भान मला माझी लयकारी – विविध ताल प्रकार – परिपूर्णतेने पेश करण्यास अत्यंत मदतरूप ठरले. शिवाय संतूरवर गेय वाटावी अशी रागदारी सादर करण्यात माझ्या गायनाच्या तालिमीचे भांडवल कामी आले.

पंडित शिवकुमार शर्मा सारख्या थोर व्यक्तीचे सानिध्य आपल्याला दिर्घकाळ लाभले. गुरुजींच्या कांही आठवणी, अनुभव ऐकायला आम्हांला आवडेल. कांही मजेशीर चुटकेही सांगा.
गुरूजींचा शिष्य या नात्याने तानपु-यावर साथीसाठी मी त्यांच्याबरोबर देशविदेशात दौ-यावर जात असे. याकाळात मी त्यांचे प्रचंड जनसमुदायासमोर व्यासपीठावरील सादरीकरण बघत असे व शिकत असे. ते साजावर स्वर कसे उमटवतात, कलामाने तारा कशा व किती प्रमाणात झंकारतात तसेच त्यांच्या वेगवेगळया रागांचे वेगवेगळे तंत्र काय वगैरे अनेक गोष्टी बारकाईने बघण्याची संधी मला मिळाली. यातूनच पुढे मला माझी स्वत:ची शैली व पेशकारी याचा विकास करता आला व एक व्यावसायीक कलाकार म्हणून स्वत:ला घडविता आले.

बरेच वर्ष माझे वास्तव्य परदेशी होते. १९८६ साली मी कुटुंबासह भारतात स्थायिक होण्यासाठी परतलो. भारतात स्थायिक होण्यासाठी परतलेल्यांना आणलेल्या वस्तूंवर कस्टम डयुटी डिपॉझीट केल्याशिवाय वर्षभर परदेशी जाता येत नाही या अटीची मला माहिती नव्हती. मी व फाझल कुरेशी दिल्लीहून युरोपच्या दौ-यावर निघालो होतो. दिल्ली एअरपोर्टवर माझे सामान व साजही चेक इन झाला होता. परंतु मला ती डयुटी डिपॉझीट केल्याशिवाय बोर्ड करून देईनात. माझ्याजवळ तेवढे पैसे नसल्याने मी मुंबईला परतलो व फाझल पुढे गेला. मी फारच विवंचनेत होतो. माझ्या गुरूजींनी हे ऐकले. तेही नुकतेच युरोपच्या दौ-याहून परतले होते व त्यांनी तेथे ठिकठिकाणी माझ्या मैफिलींचे पोस्टर्स, पब्लिसिटी पाहिली होती व मी वेळेवर तेथे पोहोचावे यासाठी त्यांनी लगेचच तेवढे पैसे उसने दिले. माझ्या गुरुजींचे हे औदार्य मी कधीच विसरणार नाही.

आम्हाला बरेचदा फार मजेशीर अनुभव येतात. एकदा जर्मनीत हॅमबुर्ग शहरांत गुरुजींची मैफिल होती. मी पुढल्या रांगेत बसलो होतो व एक जर्मनवासी, बारकासा बंगाली माझ्या शेजारी बसला होता. त्याच्यानंतर तीन चार सीटस् सोडून एक धिप्पाड, महाकाय जर्मन बसला होता. परदेशी श्रोते अत्यंत शिस्तबध्द व जिज्ञासू आहेत व तेथे मैफिलीच्या नियमानुसार संपूर्ण शांतता असते व इतरांना त्रास होऊ नये म्हणून आपल्यासारखी आवाज करणारी दाद देत नसतात. परंतु आमचे बंगाली बाबू ‘वाहवा’ ‘क्या बात है’ वगैरे दाद देत चांगलाच आवाज करीत होते. ते महाकाय जर्मन महाशय चिडत होते व नाकावर बोट ठेवून बंगाल्याला गप्प बस अशी खूण करीत होते. आपले बाबू मोशाय त्याकडे दुर्लक्ष करीत अजूनही जोरदार वाहवा करीत होते. जर्मन देखील आपल्या खूणा तितक्याच जिकिरीने करीत होते – ‘आता गप्प बस नाहीतर मी एक लाफा मारीन’ अशी खाणाखुणातील धमकी देऊन झाली. तरी बाबूजी ऐकेनात. आता हे फारच झाले – ते जर्मन गृहस्थ अतिशय कावलेले. त्यांनी खुणांच्या भाषेत अत्यंत तापून दम भरला ‘गप्प! नाहीतर तुझी मानच पिळून ठेवतो’. मी स्वत:शी हसत होतो व मान पिरगळण्यावर तर मला राहवेना, कसंबसं हसू आवरतोय. गुरुजी पण हे पहातच होते व तेही गालातल्या गालात हसत होते. मैफिलीच्या पहिल्या भागानंतर आम्ही बंगली बाबूला समजावले की शांत रहा नाहीतर खरंच त्या जर्मनची एक सणसणीत खाशील. हा म्हणजे एखाद्या लॉरेल व हार्डीतील सीन वाटावा तसा वठला होता.

भारतीय पारंपारिक संगीताबरोबर आपण पाश्चात्य संगीताचीही सांगड घालता ती कशी? सध्या कोणते नवीन उपक्रम घेतले आहेत?
१९८७ सालापासून मी मींटा या स्विडीश झाज ग्रूपमध्ये आहे व यात फाझल कुरेशी आणि चार स्विडीश संगीतकार आहेत. आम्ही युरोपातील ब-याच झाज फेस्टीवलमध्ये कार्यक्रम केलेत व भारतातही दोनदां आलोय. आमच्या ‘हॉट समर’, ‘नंदूज डान्स’ ‘फर्स्ट समर’ इत्यादि सीडीज् बाजारात आहेत. माझ्या संतूरवादना बरोबर का प्युटरने काढलेले ध्वनी मिश्रीत करण्याचा एक अनोखा उपक्रम आताच पूर्ण झाला आहे. मी अनेक झाज व जागतिक संगीत ग्रूप बरोबरही काम करीत आहे. अजून एक वैशिष्य़ठपूर्ण उपक्रम म्हणजे हिंदुस्तानी व कर्नाटकी शास्त्रोक्त संगीत परंपराना एकवठण्याचा.

याचबरोबर मी कांही शैक्षणीक उपक्रमातही असतो. अमेरिकेतील फ्लोरीडा स्टेट मधील स्टेटसन युनिवर्सिटी आणि रोलिन्स कॉलेज मध्ये हे उपक्रम घेतो तसेच तेथील शाळांमधून भारतीय संगीत शिकवले जावे याकरिता काम करीत आहे. अभारतीय लोकांना सहज शिकता यावे व आपल्या संगीतात त्याना रस वाटेल अशा अत्यंत सोप्या पध्दती करण्याकडे माझा भर असतो. यासाठी मी शास्त्रोक्त रागांवर आधारीत छोटया छोटया सींफनीज बनवतो.

परदेशी वास्तव्य करणारे भारतीय संगीतकार म्हणून आपल्याला काय वाटते ? आपले तेथील काय अनुभव आहेत? यापुढे आपले काय प्लान आहेत?
परदेशी वास्तव्य करणारा भारतीय संगीतकार म्हणून मला मी भारताचा सांस्कृतिक राजदूत असल्यासारखे वाटते व माझ्या मातृभूमीबाहेर आपल्या अमोल पारंपारिक संगीताचा ठेवा पेश करतांना मला स्वाभाविक अभिमान वाटतो. मला वाटतं परदेशी श्रोते व विद्यार्थ्यांना मोठया सबुरीने भारतीय शास्त्रसंगीतातील बारकावे आम्ही समजवायला हवेत. हे आपल्याकडे सांगण्याची तितकी गरज नसते कारण आपण लहानपणच्या अंगाई गीतांपासून ऐकत येतो कांही ना कांही तरी संगीत, ज्याच्या मूळाशी शास्त्रीय संगीत निगडीत असते व त्यामुळे आपल्याला संगीताची समज काहीशा स्वाभाविकतेनेच येते. परदेशांत आम्हांला त्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण व त्यांच्या पारंपारिक संगीतापेक्षा काहीसे वेगळे अशा पध्दतीने भारतीय संगीताची ओळख करून द्यावी लागते.

माझा अनुभव असा की माझ्या विद्यार्थ्यांना माझे संगीत शिकवणे व समजावणे फार आवडते व चटकन पोहचते. याचे कारण मी या विद्यार्थीवर्गासाठी योग्य अशा शिकवण्याच्या पध्दती, तंत्र विकसीत केले आहे. आणि माझे संगीत या लोकांना कसे भावते याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर हे – अमेरिकेतील माझी एक श्रोती माझ्या संतूरवादनातील किरवाणी रागाच्या आलापावर योगीक ध्यान धरते. आपल्या शास्त्रसंगीतात आध्यात्मिकतेचेही एक मूळ आहे हे बहुश्रुत आहेच.

माझ्या २२ वर्षाच्या परदेशातील वास्तव्यात तेथील सांस्कृतीक मुख्यत: सांगितीक वैविध्यापासून माझाही बराच फायदा झाला. अनेक संगीत रचना करून त्या अनेक सींफनीज व फ्यूजन म्युझिक कार्यक्रमात पेश करण्याच्या मला अमूल्य संधी लाभल्या, अनेक सन्मान, पुरस्कारही मिळाले. परदेशात असे विविधप्रकारे सामोरे गेल्यामुळे मी पारंपारिक राहूनही इतर संगीतकलांकडे खुल्या दिलाने पाहू शकलोय. यापुढेही ब-याच सींफनीज लिहीणे, पेश करणे व मला शक्य होतील तितक्या शैक्षणिक संस्थातून हिंदुस्तानी संगीताचे कोर्सेस सुरू करणे वगैरे मी करीतच राहीन. नवनव्या कल्पना, नवनव्या रचना, नवनव्या उपक्रमांचा कधीच तोटा नसतो, फक्त प्रत्येकाची आपापली वेळ यावी लागते. ज्यामुळे क्षुब्ध मने शांत व्हावीत, वैरभाव मिटून समभाव नांदावा.