बहुगुणी मिलिंद गुणाजी

milind-gunaji काही माणसे ही चतुरस्त्रतेचे लेणे घेऊन जन्माला आलेली असतात. कार्यक्षेत्र कोणतेही असो जे काम करायचे ते मनापासून आणि इतरांच्या मनाला भिडणारे याच पठडीतला चतुरस्त्र अभिनेता मिलिंद गुणाजी. अभिनय, फोटोग्राफी आणि भटकंती या प्रवासात स्फुरलेल्या कविता कागदावर उतरल्या आणि तयार झाला अल्बम ‘मन पाखराचे होई’ मिलिंद गुणाजी यांच्या कविताचा हा अल्बम नुकताच बाजारात आलाय. त्यानिमित्ताने या नव्या प्रतिभेविषयी आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पा…..

मिलिंद अभिनय आणि भटकंतीचा प्रवास कवितेकडे कसा वळला?
खरं सांगायचं तर कवितांचा आणि माझा फारसा काही संबंध नव्हता. कविता मी वाचायचो पण स्वत: कविता करेन असं वाटलं नव्हतं. एकदा मी माझ्या मित्राच्या कविता ऐकल्या आणि वाटलं असं तर मलाही सुचतं, नंतर आसपासच्या जगाकडे पाहून स्फुरलेल्या कविता लिहीत गेलो.

‘मन पाखराचे होई’ या अल्बमची निर्मिती कशी झाली?
सुरुवातील या कवितांचं मला पुस्तक काढायचं होतं. पण नंतर कळलं की कवितांची पुस्तक घेऊन वाचणारी लोकं फार कमी आहेत. त्यामुळे पुस्तकापेक्षा याची ऑडियो सिडी काढली तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचू शकते म्हणून या कविता सिडी रूपाने आणायचं ठरलं. या सिडीसाठी सहा गाणी आम्ही निवडली. या गाण्यांना कौशल इनामदार याने अप्रतिम चाली दिल्यात, त्यानंतर ‘मैत्रेय’च्या वर्षा सत्पाळकर आणि ‘सागरिका’ म्युझिक यांच्या सहकार्याने एक महिन्यात हा अल्बम तयार झाला.

मिलिंद गुणाजी आणि कविता हे समिकरण लोकांसाठी नविनच होतं, मग याच्याविषयी काय प्रतिक्रिया मिळाल्या?
सुरुवातीला जेव्हा मी कविता केल्या तेव्हा त्या मी माझ्या मित्रांना वाचून दाखवल्या त्यांना त्या खूप आवडल्या. पण मित्र हे स्तुती करणारच असा विचार करून मी त्या कविता काही अपरिचीत लोकांनाही दाखवल्या त्यांनीही या कविता आवडल्याचं सांगितलं. आत्ताही हा अल्बम लोकं आवडीने खरेदी करतायेत, आणि आवडल्याचही सांगतायेत. त्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की मिलिंद गुणाजी आणि कविता हे नवं समीकरण लोकांना आवडलय.

हा अल्बम करताना, याच्या यशाबाबत काही दडपण आलं होतं का?
milind-gunaji हा अल्बम म्हणजे या नव्या विश्वात माझं पदार्पण होतं पण त्याच्या यशाबद्दल दडपण वगैरे माझ्यावर नव्हतं कारण माझ्या आतापर्यंतच्या सर्वच कलाकृतींना पदार्पणात प्रचंड यश मिळालयं. माझा पहिला व्यवसायिक चित्रपट फरेब, माझं पहिल पुस्तक ‘माझी मुलुखगिरी’, मी अभिनय केलेला पहिला अल्बम ‘ऐका दाजिबा’ या सगळयाला लोकांनी विशेष पसंती दिली आहे. त्यामुळे गीतकार म्हणून केलेल्या पहिल्या प्रयत्नाला निश्चित यश लाभेल असं मला वाटत होतं.

आजकाल तुम्ही मराठी चित्रपट फारच कमी स्विकारता याचं नेमकं कारण काय?
मी मुळातच हिंदी चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून काम करायला सुरूवात केली. त्यानंतर एकाहून एक सरस चित्रपट आणि सशक्त भुमिका मिळत गेल्या. त्यामुळे फारसे मराठी चित्रपट करणं जमलं नाही. असलेले चित्रपट मी केले. सध्याही करतोय पण हिंदीच्या तुलनेने हे प्रमाण कमी आहे हे खरं.

हिंदी चित्रपटात तुमच्या ब-याचश्या व्यक्तिरेखा सारख्याच प्रामुख्याने ‘ग्रे शेड’च्या असतात.
याचं कारण म्हणजे ज्या भूमिका माझ्याकडे येतात त्यातल्या चांगल्या भुमिका मी निवडतो. कोणत्या प्रकारच्या भूमिका आपल्याकडे याव्यात हे आपल्या हातात नसतं यामध्ये काही ग्रेडचेही चित्रपट असतात पण भूमिका चांगली आणि महत्त्वपूर्ण असेल तर मी स्विकारतो यापूढे विविध प्रकारच्या भूमिका करायला मला निश्चितच आवडेल.

या सर्व भूमिकांमध्ये तुमची सर्वाधिक आवडीची भूमिका कोणती?
‘गॉडमदर’ या चित्रपटातली. या चित्रपटाला ६ नॅशनल ऍवार्डस् मिळाले माझ्या भुमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. जया बच्चन यांनी हा चित्रपट पाहिल्यावर मला फोन केला आणि त्यांना माझं काम फार आवडल्याचंही आवर्जून सांगितलं.

अभिनय, फोटोग्राफी, भटकंती आणि आता कविता एवढं सगळं एका वेळेला कसं मॅनेज करता?
milind-gunaji हे सगळं एका वेळेला मॅनेज करणं फारच सोप्पं आहे. कारण हे सर्व एकमेकाला पुरक आहे. जेव्हा मी शुटींगला जातो तिथं वेगवेगळी ठिकाणं पाहतो त्यामुळे भटकंतीही होते आणि फोटोग्राफी करता येते आणि एवढया सुंदर वातावरणात किंवा काहीशा वेगळया वातावरणात गेल्याने कविताही स्फुरतात.

मिलींद सध्या कोणते प्रोजेक्ट करतात आणि आगामी प्रोजेक्ट कोणते?
सध्या मी ब-याच हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या चित्रिकरणात बराच व्यस्त आहे. ‘हेराफेरी पार्ट २’, ‘जिज्ञासा’, ‘मुंबई कॉलींग’ असे अनेक प्रोजेक्ट चालू आहेत.

मराठीवर्ल्ड डॉट कॉमच्या वाचकांसाठी काही संदेश
हो नक्कीच माझ्या कालाकृती वाचा, पहा, ऐका. चित्रपट पहा. सदैव आनंदी रहा आणि इतरांवर आनंदाची उधळण करत रहा.

मुलाखत – विशाखा टिकले