सुंदरा मनामध्ये भरली – डॉ. मीना नेरुरकर

डॉ. मीना नेरूरकर अमेरिकेत गेली २० वर्षे गायनॅकॉलॉजीस्ट म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांच्या नृत्यकलेमुळेही त्या रसिक प्रेक्षकांना माहीत आहेत. त्यांच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ह्या नाटकाने लावणी नृत्याचे पुनरुज्जीवनच केले आहे. त्यांनी लिहिलेले धन्य ती गायनॅक कला हे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले. त्यानिमित्त ही मुलाखत……

‘डॉ. मीना, तुम्ही आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या बुध्दीच्या जोरावर यश मिळवलेत याबद्दल तुमच्या धन्य ती गायनॅक कला या पुस्तकात वाचायला मिळते. आपण एक डॉक्टर होणार असे स्वप्न होते का?’
‘नाही, मला डॉक्टर व्हायचे नव्हते. माझा कल कलेकडेच होता. आर्किटेक्ट, इंटेरीअर डेकोरेटर होण्यात मला जास्त रस होता. माझ्या घराचे इंटेरीयर मीच केले आहे. घरात किंवा ऑफिसमध्ये तोडफोड करून रिनोव्हेशन करतांना मी इंटेरीयर डेकोरेटरना न बोलावता स्वत:च ते केले आहे’

‘शालेय व महाविद्यालयीन शिक्षण चालू असतांनाच तुम्ही नृत्य शिकत होतात. तुमच्या नृत्य शिक्षणाबद्दल सांगा.’
‘हिंदु कॉलनीतील रुपायतान नृत्य शाळेत दोन वर्षे नृत्य शिकायला जात होते. शिवाजीपार्कला गेल्यावर गणेश प्रसाद हे मला घरी शिकवायला येत. त्यांनी मला भरतनाटयम्, कथ्थक, मणिपुरी हे तीनही नृत्यप्रकार शिकवले. मी पाचवीत असतांना प्रथम पब्लिक परपॉर्मन्स केला तो के.इ.एम. हॉस्पीटलच्या गॅदरींगमध्ये. त्यावेळी गणेश प्रसाद कोहीनूर सिनेमात काहीतरी काम करायचे. त्यांच्या शूटींगमुळे त्या दिवशी ते उशीरा आले. मी स्टेजच्यामागे झोपून गेले होते. रात्री ११ वाजता मला उठवण्यात आलं व त्यानंतर माझ्या नृत्याला सुरूवात झाली. माझे वडील तिथे ऑनररी होते. त्यामुळेच बहुतेक मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी माझा नाच खपवून घेतला’

‘तुम्हाला चित्रकलेचीही आवड आहे व तुम्हाला त्याचेही शिक्षण घ्यायचे होते परंतु तुम्ही डॉक्टर झालात तुमच्या चित्रकलेविषयी सांगा.’
‘चित्रकलेचे शिक्षण नाही पण ब-यापैकी चित्र काढू शकते. माझ्या चित्रकलेचे उदाहरण म्हणजे मी माझ्या मुलाच्या मुंजीला स्टेजच्या मागे लावण्यासाठी काढलेल्या मोठया गणपतीचे व त्याच्या बाजुला दोन लामण दिव्यांचे चित्र.’

‘तुमचे लोकप्रभा व लोकसत्ता मध्ये प्रसिध्द झालेले लेख तसेच धन्य ती गायनॅक कला हे पुस्तक यावरून तुमचे लेखन गुणही Meena दिसतात. तुम्ही नवीन काही लिहिणार आहात का?’
‘लेखन गुण आहेत याची जाणीव ९८ सालापर्यंत नव्हती. आता दोन नवीन पुस्तकांची तयारी चालू आहे.’

‘अमेरिकेत रहाण्याचा निर्णय झाल्यावर प्रथम काय वाटले?’
‘अमेरिकेत आल्याचा आजतागायत कधीही पश्चाताप झाला नाही. येथील वातावरण, सचोटी, कामसूपणा, सतत नवेपणा, स्वच्छता व येथील माणसांची दुस-यांच्या भानगडीत लुडबुड न करण्याची वृत्ती यामुळे इथे समाधान मिळतं’

‘सुंदरा मनामध्ये भरली या नाटकाच्या निर्मितीचे अनुभव सांगा’
‘सुंदराचे अनुभव खुप आहेत. त्या अनुभवावरचं एक स्वतंत्र पुस्तक लिहित आहे.’

‘तुम्ही इतर कोणत्या नाटकांमध्ये सहभाग घेतलात?’
Meena ‘वा-यावरची वारात, कडवेकर मामी, विच्छा, मैना, सख्खे शेजारी ह्या नाटकांमध्ये कामे केली. आहेत. शिवाय कॉलेजमध्ये असतांना एका गुजराथी नाटकातही काम केले आहे. आधे अधुरे हे नाटकपण केले आहे.’

‘कलाभवन काय आहे.?’
‘कलाभवन ही आमची संस्था चॅरिटीसाठी काम करते फक्त प्रॉडक्शनचा खर्च घेऊन आम्ही काम करतो.’

‘तुम्ही अमेरिकेत गेलात तेव्हा आजच्यासारखी सर्वत्र मराठी माणसं नव्हती, तेव्हा तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असणार त्याबद्दल सांगा’
‘होय सुरुवातीला अनेक अडचणी आल्या पण त्यातून मार्ग काढण्यात आम्ही यशस्वी झालो. याबद्दल माझ्या पुस्तकात लिहिलं आहे.’

‘गायनॅकॉलॉजीची प्रॅक्टीस करतांना तुम्हाला अनेक अनुभव आले. अमेरिका मेल्टींग पॉईन्ट असल्याने जगातल्या अनेक देशांचे Meena नागरीक पेशंट म्हणून तुमच्याकडे आले. तरीसुध्दा आपल्या देशापासून दूर आहोत. असे विचार मनात येतात का?.’
‘अमेरिका हा मला माझाच देश वाटतो. याचं श्रेय अमेरिकन लोकांना, पेशंटना आहे. अमेरिका मला का आवडली हे तर मी लिहीलं आहेच. इथल्या लोकांनी मला भरपूर निरपेक्ष प्रेम दिलंय.’

‘तुमची मुले मोठी झाली आहेत. घरातील मराठी वातावरण व आपले संस्कार जपण्यासाठी, पुढच्या पिढीला देण्यासाठी काय केलंत?’
‘घरात मराठी बोलतो. मित्र मैत्रिणींना बोलावून सण साजरे करतो. मुलांना प्रत्येक सणांच्या गोष्टी सांगितल्या. मराठी दैवत-लता मंगेसकर, ज्ञानेश्वर, शिवाजी यांची माहिती मुलांनी देते.’

‘गायनॅकॉलॉजीमध्ये नवीन काही करावेसे वाटते का? भारतात डॉक्टरांचा कल सिझेरीन प्रसुती करण्याकडे असतो किंवा पेशंटलाही लवकर सुटका हवी असते. अमेरिकेत याबाबतीत काय विचार आहेत? ‘
‘मी एक शोध लावलाय व दुस-या शोधावर काम चालू आहे. इथे सर्व ऑपरेशनना जस्टीफिकेशन द्यावं लागतं फक्त मेडिकल कारणासाठीच सिझेरीन होतं. पैसे दोन्ही प्रसुतींना सारखेच असतात. ‘

‘तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्याचे मागे वळून बघत योग्य वर्णन केले आहेत यापुढील आयुष्यासाठी काही योजना आहेत का? नवीन नाटक किंवा लेखन?’
‘आतापर्यंत माहेरचे, सासरचे, मुलं नवरा, पेशंट या सर्वासाठी खूप केलयं आता फक्त माझ्यासाठी रंगभूमी, सिनेमा, प्रवास हे सर्व करणार आहे.

मुलाखत व शब्दांकन – सुनील कुलकर्णी