कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोटयाशा खेडयात बालपण गेलेले आणि करवीर नगरीचा अभिमान आपल्या प्रत्येक बोलण्यावागण्यातून जाणवून देणारे जगदीश खेबुडकर. प्रतिभावंत कवी, लोकगीताचे काव्यबीज बालपणापासून मनात आणि आत्म्यात पेरले गेलेले, आणि त्यामुळेच प्रत्येक कलाकृती ही त्या त्या वेळची श्रेष्ठ ठरलेले. वयाच्या पंचाहत्तरीतही तितकेच उत्साही आणि समरसून आयुष्य जगणारे कवी. मराठीवर्ल्डच्या वाचकांशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांतून उलगडलेले कवी जगदीश खेबुडकर……….
लहानपणापासूनच वडिलांच्या शिक्षकी पेशामुळे मराठीचे बाळकडू घरातच पाजले गेलेले. अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही चांगल्या पद्धतीने माध्यमिक शिक्षण शहरात जाऊन घेतले. शालेय जीवनापासूनच कथा-नाटय-काव्यामध्ये रस घेणा-या खेबुडकरांनी विश्वभारती सारख्या मेळाव्यातून रुपये एक, इतक्या नाममात्र मानधनावर आपली कला जोपासली. मोठी संकटे सुद्धा या छंदाला भेदू शकली नाहीत आणि वयाच्या १६व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोर पेटते घरही त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेले आणि जन्माला आली-“मानवते तू विधवा झालीस!”
यानंतर त्यांची प्रतिभा उत्तरोत्तर फुलत गेली. मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय असल्याने लोकगीतांवरील प्रभुत्व त्यांच्या काव्यातून दिसू लागले. पुणे आकाशवाणीने त्यांची ५० नवीन गाणी स्विकारुन एक नवे दालन त्यांना उघडून दिले. आणि १९५६ साली त्यांचे पहिले भक्तीगीत रेडिओवर प्रसारित झाले.
नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी ते ऐकले आणि त्यांना चित्रपट गीते लिहिण्यासाठी बोलावून घेतले. १९६० साली “रंगल्या रात्री अशा” या चित्रपटासाठी खेबुडकरांना प्रथम लावणी लिहिण्याची संधी मिळाली आणि करवीरनगरीच्या प्रतिभेचा वारसा भिनलेल्या या कलावंताने “नांव गांव कशाला पुसता……मला हो म्हणतात लवंगी मिरची…” ही फर्मास लावणी लिहिली. ती आली, तीने पाहिले, आणि ती जिंकली. १९६० सालचे प्रतिष्ठेचे रसरंग फाळके पारितोषिक या लावणीला मिळाले.
यानंतर भालजी पेंढारकरांच्या “साधी माणसं”, “मोहित्यांची मंजुळा” सारख्या चित्रपटासाठी लिहिण्याची संधी दिली आणि “ऐरणीच्या देवाला वाहिलेली ही ठिणगी” गेली ४० वर्षे अजूनही तेवढीच धगधगतेय, जराही तेज कमी न होता. या गीताने त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोप-यात तर पोचवलेच, पण अनंत माने, दत्ता माने, कमलाकर तोरणे, यांच्या चित्रपटातून मागणीचा ओघ वाढतच गेला आणि त्यांनी १९७३ साली व्ही. शांताराम यांच्या “राजकमल” पर्यंत मजल मारली. या चित्रमहर्षींनी खेबुडकरांना विचारले,”तुम्ही ज्यांना गुरु मानता अशा ग.दि. माडगूळकरांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बसवू इच्छितो, तुम्हाला जमेल का?” त्यावर “मी कोल्हापूरी मातीचा अभिमान आणि तुमचा विश्वास व्यर्थ घालवणार नाही.” असे उत्तर दिले आणि “पिंजरा” या १०० व्या चित्रपटासाठी ११० गीते लिहून दिली. त्यातील ११ गीते चित्रपटासाठी निवडली गेली आणि ही सारी गीते आजही रसिकांना तितकीच ताजी वाटतात.
या ४६ वर्षात अंदाजे ४०० चित्रपटासाठी गीतांचे सर्व प्रकार जगदीश खेबुडकरांनी हाताळले. बालगीतापासून प्रेमगीते, नांदी, पोवाडा, भक्तीगीते, अंगाई गीते, किर्तन, वासुदेव, कोळीगीत, गण, गौळण, वग, हादग्याची गाणी, भजन… असे अनेक प्रकार हाताळले. सर्व थरांतल्या, सर्व वयोगटांसाठी अविस्मरणीय अशी गीतरचना सातत्याने त्यांच्याकडून होत आली आहे.
शिक्षकी पेशामध्ये असल्याने आपल्या हाताखालच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत राहिले. त्यापैकी अनेक विद्यार्थी आता भारतभर अनेक प्रकारच्या उच्च पदांवर कार्यरत आहेत.
खेबुडकर म्हणतात, “प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे या प्रतिभेला शब्दसामर्थ्य मिळते इतकेच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते, यापेक्षा ती किती दिवस टिकते, याला जास्त महत्त्व आहे नाहीतर अशी कितीतरी पुस्तके, चारोळ्यांच्या रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकते आणि आठवणीत राहते ते खरे काव्य.”
अत्यंत साधे तितकेच स्वाभिमानी असे हे व्यक्तिमत्व. जवळजवळ १०,००० पुस्तके संग्रही ठेवून संतांच्या गाथेपासून आजच्या नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकापर्यंत सगळ्याचा व्यासंग असलेला हा थोर कवी. संत एकनाथांची प्रत्येक कलाकृती सामाजिक भान ठेवून जन्माला आलेली, आणि म्हणूनच खेबुडकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाची. गदिमा, बा.सी. मर्ढेकर, भा.रा. तांबे ही त्यांची आदराची स्थाने. त्यांच्या मते भा.रा. तांबे हे कदाचित असे एकच कवी आहेत ज्यांनी काव्यरचना करताना वृत्तछंदाचा कोणताच प्रकार वर्ज्य मानला नाही. प्रत्येक प्रकारामध्ये त्यांच्या रचना आहेत.
अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाने आता पंचाहत्तरी ओलांडली आहे. गेल्या तीन पिढया त्यांची गाणी रसिकतेने मनात साठवून ठेवत आहेत, तर चौथी पिढी त्यांच्या आगामी १३ चित्रपटांची गाणी ऐकून तृप्त होत राहील यात शंका नाही.
पुन्हा भेटण्याचं त्यांचं आग्रहाचं निमंत्रण स्वीकारुन या मनानेही तेवढया मोठया कवीला शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेतला.
मुलाखत आणि शब्दांकन – प्रणिता नामजोशी