सखी

संगोपन

शाळेचा महिना

प्रयोगशील किंवा पर्यायी शाळांमध्ये पाठयक्रमाच्या बरोबरीने पूरक शिक्षणावर भर दिला जातो. नेहमीच्या शाळेपेक्षा येथे मूल अधिक स्वतंत्ररित्या विचार करायला आणि स्वतःला व्यक्त करायला शिकते. अश्या शाळांमधून मुलांच्या अनेक गुणांना खतपाणी मिळून तणावविरहीत सर्वांगीण शिक्षणाला महत्त्व अधिक असते. पारंपरिक चाकोरी मोडून ह्या शाळा मार्कांच्या पलिकडे शिक्षणाचा विचार करतात. http://en.wikipedia.org/wiki/Alternative_school, http://en.wikipedia.org/wiki/Alternative_education ह्या लिंक्सवर आपल्याला पर्यायी शिक्षणाची नेमकी महिती मिळते.

भारतात पर्यायी शिक्षणाची परंपरा प्राचीन काळापासून आहे. पूर्वी गुरुकुलाची परंपरा होतीच. तेव्हा पाठ्यशिक्षणाबरोबरच जीवनावश्यक शिक्षण जसे शेती, पशूपालन, शस्त्रशिक्षण, पाककला… अश्या १४ विद्या आणि ६४ कलांप्रमाणे प्रत्येक शिष्याला आवडीचे शिक्षण देण्यात येत असे. स्वातंत्रोत्तर काळात गुरु रविंद्रनाथ टागोरांनी शाळेविषयीचे आपले विचार “There are times when it may be more educative to boycott schools rather than joining them.” अश्या परखड शब्दात व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनातली ‘विश्वभारती’ ही प्रयोगशील शाळा शांतीनिकेतन येथे उभारली. आजही ही शाळा रविंद्रनाथजींच्या विचारानुसार विद्यार्थी घडवत आहे. महात्मा गांधींजींचे विचारही चाकोरीबध्द शिक्षणापेक्षा जीवनाश्यक शिक्षण घेण्याकडे अधिक होते. त्यासाठी त्यांनी ‘नई तालीम’ शिक्षण पध्दती तयार केली.

श्री अरबिंदो, कृष्णमूर्ती, गुजरातचे गिजूभाई बडेखा, महाराष्ट्रात अनुताई वाघ, लिला पाटील अश्या शिक्षणाविषयी आस्था असणा-यांच्या विचारसरणीशी सहमत होऊन अनेकांनी प्रयोगशील शाळा काढल्या आहेत. अल्पसंख्येत का होईना पण अश्या शाळांचे स्वागत होत आहे. महाराष्ट्रातही ग्राममंगल, सृजन आनंद (कोल्हापूर), अक्षरनंदन(पुणे), आनंद निकेतन (नाशिक) ह्या सारख्या अनेक शाळा कार्यरत आहेत. http://alternativeeducationindia.net ह्या साईटवर आपल्याला अश्या प्रयोगशील शाळांची माहिती मिळते. दुर्दैवाने ही यादी पूर्ण नाही आहे.

आपल्या चिमुरडीला शाळेत पाठवण्याआधी तिला आठवले तिचे बालपण. बालवाडीच्या सुंदर आणि सुरक्षित जगातून ‘मोठया शाळेत’ जाण्याचा पहिला दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस ठरला आणि मनात कायमचा ओरखडा उठला. ओरडणा-या बाई, कंटाळवाणा अभ्यास, वर्गात बोलायचे नाही, हसायचे नाही अश्या कडक नियमांसोबत ‘मोठया शाळेची’ सुरुवात झाली. कालांतराने तिने ह्या वातावरणाशी जुळवून घेतले पण मन फारसे रमले नाही. असो तर आता आपल्या मुलीला तिने वेगळ्या वाटेने जाणा-या प्रयोगशील शाळेत घातले आहे. येथे तिची मुलगी अखंड कुठल्या तरी उपक्रमात दंग असते जसे चित्र काढणे, फुलपाखरं पकडणे, झाडावर चढणे, बागकाम करणे इत्यादी. पण त्याच वेळेला बाकीच्या मुलांना लिहीता वाचतांना पाहून ती थोडीशी विचलीतही होते. परंतु आपला निर्णय योग्य असल्याची तिची खात्री असल्यामुळे मुलीच्या शैक्षणिक प्रगतीविषयी थोडा धीर धरायचे ठरवले आहे.

प्रयोगशील शाळांबरोबरच होम स्कूलींगचा पर्याय हल्ली आपल्या देशात वाढत्या प्रमाणात आहे. होम स्कूलींग म्हणजे पाल्याने आपल्या घरी राहून अभ्यास करणे. अमेरिकेत आजमितीला १० लाखाहून अधिक मुले होम स्कूलर्स आहेत. ह्या पालक आणि विद्यार्थांचे एकमेकांमध्ये नेटवर्क आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये ही संकल्पना चांगलीच रुढ झाली असून होम स्कूलींग विद्यार्थ्यांचे हे ‘मार्केट’ इतके मोठे आहे की त्यांना लागणा-या शैक्षणिक साधनांची उलाढाल काही कोटीं मधे आहे. भारतात विशेषता मोठया शहरांमधून होम स्कूलींगचे वाढते प्रमाण आहे. प्रत्येकाची कारणे त्यामागे अनेक आहेत. काहींना आजची शिक्षण पध्दती जाचक वाटत असल्यामुळे, मुलांनी वेगळा विचार करायला प्रवृत्त करायला, अनेक विषयांची ओळख होण्यासाठी आणि सृजनशिलता वाढण्यासाठी, आसपास चांगल्या शाळेची सोय नसल्यामुळे, काही व्यक्तीगत आणि व्यावसायिक अडचणीमुळे… अश्या अनेक कारणांसाठी हल्ली भारतातले अनेक पालक आपल्या मुलांना होम स्कूलींग देत आहेत.

१९७७ साली अमेरिकन शिक्षक जॉन हॉल्टने Growing Without Schooling ह्या त्याच्या बॉस्टनहून प्रसिध्द होणा-या मासिकात unschooling विषयी प्रथम लिहीले आहे. हे मासिक संपूर्ण जगभरात कुतूहलाचा विषय होते. जॉनचे तत्व आहे Teach Your Own म्हणजेच स्वयंशिक्षणावर त्याचा भर आहे. त्याच्यानुसार फक्त वाचता येणे, गणिते सोडवणे ह्यात विशेष कौतूक काहीच नाही. महत्त्वाचे काय तर तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेणे. उदाहरणार्थ कार कशी चालते?, बर्गर बनविण्यासाठी कोणते पदार्थ लागतात? धान्य कसे पिकवले जाते? असे आणि अनेक प्रश्न होम स्कूलींग करणा-या मुलांकडून जॉनला अपेक्षित आहे. जॉन हॉल्टची वेबसाईट www.holtgws.com अतिशय वाचनिय आहे. जगभारातल्या अनेक देशात होम स्कूलींगला मान्यता आहे तर जर्मनी सारख्या देशात होम स्कूलींग कायदाने मान्य नाही. ह्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी – http://en.wikipedia.org/wiki/Homeschooling

बहुतेक वेळा असा प्रश्न उपस्थित होतो की होम स्कूलींग करणा-या मुलांचा अभ्यास कसा, केव्हा, कुठे घ्यायचा, त्यांना समजले आहे की नाही ह्यासाठी परिक्षा घ्यायची का? कधी आणि कशी घ्यायची? ह्यासाठी नेटवर अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत. काही साईट्सनी अभ्यासक्रम ठरवून दिले आहेत. आपण त्या साईट्सचे सभासद झाल्यास आपल्याला अभ्यासक्रम ईमेलने कळवला जातो. ह्यातल्या ब-याच साईट्सचे सभासदत्व शूल्क देऊन घ्यावे लागते तर त्यातील काही भाग विनाशूल्क असतो. काही पालक शालेय पाठ्यक्रमाची पुस्तके, इंटरनेट व त्या विषया संबंधीची पुस्तके आणून त्याप्रमाणे पाल्यांचा अभ्यास घेतात. वयानुसार विद्यार्थी दहावी आणि बारावीची परिक्षा National Institute of Open school (NIOS) ह्या संस्थेतर्फे देऊ शकतात. येथे विद्यार्थी आपल्या आवडीनुसार मुख्य पाच विषयांचा अभ्यास करुन परीक्षा देऊ शकतो. येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थाला कुठल्याही शाखेत त्याच्या गुणवत्तेनुसार प्रवेश घेता येतो. www.nios.ac.in ह्या त्यांच्या संस्थेच्या साईटवर आपल्याला अधिक माहिती मिळू शकते.

होम स्कूलींग करणा-या मुलांच्या पालकांचे मते सर्व पालकांना दिशा दाखविणारी आहेत. मल्लिका आणि मोहिनी ह्या दोन जुळ्या मुलींचे वडील आनंद बारीया ह्यांचे म्हणणे आहे की त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना शाळेतून काढून घेतले कारण त्यांना जाणवले की ते व त्यांची पत्नी घरीच त्यांना अधिक चांगले शिक्षण देऊ शकतात. बंगलोरचे दाम्पत्य संगीता आणि सतीश ह्यांना शाळांबदल नाखूषी नाही. परंतु त्यांच्या मुलीला शाळेत जायचे असल्यास तिने प्रयोगशील शाळेकडेच वळावे असे आवर्जून सांगतात. त्यांची दोन्ही मुले सध्या घरीच शिक्षण घेत असून सकाळचे तीन तास गणित, इतिहास, भूगोल शिकण्यासाठी राखून ठेवले आहे. कानडी आणि हिंदी शिकण्यासाठी मात्र दोन्ही मुलांनी क्लास लावला आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणा-या अनिल मोटवाणींनी सकाळच्या अभ्यासाची सुरुवात आपल्या चार वर्षाच्या माहुलीला गेट वे ऑफ इंडीया फिरायला घेऊन जाण्याने होते. ह्या त्यांच्या सकाळच्या सत्रात निसर्ग, भूगोल, इतिहास, काव्य अश्या अनेक विषयांना स्पर्श केला जातो. अश्या प्रकारचे अनुभव वाचायचे असल्यास
http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1059622&pageid=3 ह्या लिंकला भेट द्या.

शिक्षणाविषयी पालकांचे अनेक मतप्रवाह दिसून येतात. आपल्या पाल्यांचा कल पाहून त्याच्याकडे आहे ते जास्तीजास्त फुलविण्यासाठी शाळा आणि शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावतात ह्यात शंकाच नाही. त्यानुसार आपल्या पाल्याने कुठे व कसे शिकावे हा प्रत्येकाने घ्यायचा निर्णय आहे.
हॅपी स्कूलींग !

– भाग्यश्री केंगे