मुलाखत – दिलीप कुलकर्णी
दिलीप कुलकर्णी… कृतिशील पर्यावरणप्रेमी, व्याख्याते, लेखक… पुण्यातली टेल्को कंपनीतील नोकरी सोडून कुलकर्णी हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुडावळे गावी निसर्गाच्या सानिध्यात स्थायिक झाले. उपभोगवादी वृत्ती सोडून माणसाने पर्यावरण सुसंगत जीवनशैलीचा अवलंब केल्यास निसर्गाचा ºहास थांबू शकेल, असे मत कुलकर्णी आपल्या व्याख्यानांतून मांडत असतात. पर्यावरण विषयावर त्यांनी सुमारे वीस पुस्तके लिहिली असून, ‘गतिमान संतुलन’ नावाचे मासिकही ते चालवतात. पर्यावरण सुसंगत जीवनशैलीसंदर्भात त्यांच्याशी साधलेले हितगुज…
पुण्यातील ‘टेल्को’मधली इंजिनिअरची नोकरी सोडून कुडावळेला राहायला जावे, असे नक्की कधी आणि का वाटले?
असा नक्की एखादा क्षण सांगता येणार नाही. नोकरीत असताना अभ्यास, वाचन सुरू होते. काही सामाजिक संस्थांशी जवळून संबंध आला. ही नोकरी आपण आयुष्यभर करू शकणार नाही, याची जाणीव झाली होती. खेड्यात जावे, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन राहावे, असे वाटत होते. खरे तर नोकरीच करावयाची नव्हती; पण वडिलांनी सांगितले, नोकरी नाकारू नको, वेळ पडल्यास ती सोडता येईल; पण वय गेल्यावर नोकरी मिळणार नाही. त्यांच्या सल्ल्यानंतर नोकरीत रुजू झालो. एका अर्थाने ते चांगले झाले. त्या पाच वर्षांच्या काळात पुढच्या आयुष्यासाठी काही पैसे साठू शकले. सन १९८४ मध्ये नोकरी सोडून मी स्वामी विवेकानंद केंद्राचे पूर्णवेळ काम पाहू लागलो. आत्मज्ञान हेच जीवनाचे ध्येय असायला हवे, या विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित झालो. पुढची दहा वर्षे या केंद्राचे काम केले. त्या काळात ‘विवेक विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९० मध्ये पुणे सोडण्याचा विचार सुरू केला; मात्र तेव्हा थोरला मुलगा अमेय एक वर्षाचाच होता. त्यामुळे वडिलांनी आम्हाला पुणे सोडू दिले नाही. मग १९९३ मध्ये मी पत्नी पौर्णिमा आणि मुलासह पुणे सोडून कोकणातील पंचनदी या गावी राहायला आलो. तेथे काही मित्रांनी एक प्रकल्प सुरू केला होता. चार वर्षे राहून त्या प्रकल्पाचे काम केले; मात्र दुर्दैवाने तो प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. १९९७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील कुडावळे या गावी राहू लागलो. तेथे १० गुंठे जमीन कराराने घेतली. आमच्या मनात होते तसे मातीचे घर बांधले. घरातली जमीनही मातीने सारवलेली. पाणी शेजारच्या विहिरीवरून आणावे, या पाण्याचा पुनर्वापर करावा, सांडपाणी अंगणातल्या झाडांना सोडावे… अशी आमची पद्धत आहे.
पर्यावरण सुसंगत शैलीने जीवन जगण्याची अनेकांना इच्छा असते; मात्र प्रत्येकाला खेड्यात जाऊन राहणे शक्य नाही. त्यांनी काय करावे?
पर्यावरण सुसंगत जीवन जगण्यासाठी खेड्यात जाऊनच राहण्याची गरज नाही. आम्ही जगण्याची चतु:सूत्री तयार केली आहे, ती पाळली तरी पुरे. ही चार सूत्रे अशी : १) चैन आणि गरजा यांत भेद करावा, चैन टाळावी, गरजा कमी कराव्यात. हाव निर्माण झाली की निसर्ग पुरा पडू शकणार नाही. २) गरजेच्या वस्तूंचाही कमीत कमी वापर करावा. उदाहरणार्थ : पाणी. ३) एखाद्या वस्तूचा पूर्णत: वापर करावा. उदाहरणार्थ : कागद. कागदाच्या पाठपोट लिखाण करावे. आम्ही बसची तिकिटेसुद्धा घरी साठवून ठेवतो. तो कागदाचा कपटा तयार करण्यासाठी एक झाड तुटले आहे, याची जाणीव ठेवावी. ४) वस्तूचे पुनर्घटन व्हावे. कोणतीही वस्तू कचरा म्हणून निसर्गात जाता कामा नये. वर्तमानपत्राची रद्दी रद्दीवाल्याकडेच जायला हवी. म्हणजे त्या रद्दीपासून पुन्हा कागद तयार होईल.
ही जीवनशैली स्वीकारताना कुटुंबीयांची काय मानसिकता होती?
पत्नी पौर्णिमा ही तर माझ्याच विचारांची आहे. खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय आम्ही विवाहापूर्वीच घेतला होता. मुले हे सारे कसे स्वीकारतील, याविषयी थोडी शंका होती; पण थोरला मुलगा अमेय आणि धाकटा सृजन यांचे बालपण कुडावळेतच गेल्याने त्यांच्यावर तेच संस्कार होत गेले. असेच जगायचे असते, असे बहुधा त्यांनी गृहीत धरले असावे. अमेय आता पुण्यात बीएस्सी करतो आहे; पण त्याने अजूनही गाडीची मागणी केलेली नाही. पुण्यातही तो सायकलच वापरतो. सृजन दापोलीच्या शाळेत बसने ये-जा करतो. दोघेही शक्यतो सुती कपडेच वापरतात.
पर्यावरण सुसंगत जीवनशैलीच्या प्रचारासाठी कोणते उपक्रम राबविले जातात?
तीन गोष्टींद्वारे या जीवनशैलीचा प्रचार केला जातो. पहिली बाब म्हणजे ग्रंथलेखन. या विषयावर मी आतापर्यंत वीस पुस्तके लिहिली आहेत. दुसरे म्हणजे ‘गतिमान संतुलन’ हे मासिक पुण्याहून प्रसिद्ध केले जाते. विनावर्गणी आणि विनाजाहिरात असे या मासिकाचे स्वरूप आहे. दर महिन्याच्या २१ तारखेला ते प्रकाशित होते. त्याच्या कामासाठी आठवडाभर मी पुण्यात राहतो. तिसरे माध्यम म्हणजे व्याख्याने. दर महिन्याला ठिकठिकाणी दोन ते तीन व्याख्याने देतो. याशिवाय आम्ही जागृतीसाठी शिबिरेही घेतो. १ ते ३ दिवसांपर्यंतची शिबिरे घरातच घेतली जातात, तर काही शिबिरे डोंगरावर घेतली जातात. या शिबिरांत सर्वसामान्य नागरिकांना नि:शुल्क सहभागी होता येते. बाकीचे दिवस मी कुडावळेतच राहून वाचन-लेखन करतो. मासिकाचे लेख लिहितो. पत्नी मला त्यात मदत करते. पुस्तकांची रॉयल्टी, व्याख्यानांच्या मानधनावरच घर चालते. आता या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. पुस्तके वाचून, व्याख्याने ऐकून लोक कुडावळेला येतात. आमचे घर, जीवनशैली पाहतात. अनेक लोक तर दहा-दहा वर्षांपूर्वीचे जुने संदर्भ घेऊन येतात. अमूक ठिकाणी तुमचे व्याख्यान ऐकले होते वगैरे. कुडावळेहून परतताना त्यांनी मनात काही ना काही संकल्प केलेला असतो.
पर्यावरण सुसंगत जीवनशैलीपासून माणूस का दुरावला?
माणसाकडून होणारा उपभोगवादाचा अतिरेक हे पर्यावरणविषयक समस्यांचे मूळ कारण आहे. अतिरेकी उपभोग, त्यामुळे वाढते उत्पादन आणि त्यातून प्रचंड प्रदूषण असे हे चक्र आहे. यावर अंतिम उपाय काय? नुसते व्यवस्थेत परिवर्तन होऊन भागणार नाही. त्यासाठी उपभोगच कमी करायला हवा. उपभोगवादातून पैशांचा अतिरेकी संचय, जीवघेणी स्पर्धा, शिक्षणातील चढाओढ, धावपळ हे सारे निर्माण होते. ते टाळण्यासाठी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी. उपभोग हे जगण्याचे साधन आहे, साध्य नव्हे. स्वामी विवेकानंद हेच सांगतात. उपभोगातून व्यक्तीची आंतरिक आणि बाह्य अशी दोन्ही प्रकारची हानी होते. त्याऐवजी साधी जीवनशैली स्वीकारणे योग्य. पर्यावरणावरचा ताण कमी होण्यासाठी उपभोग आणि पर्यायाने उत्पादन कमी करावे लागेल. माणूस हे विचारात घेत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. माणसे वस्तूंचा किती अनावश्यक संग्रह करतात… कपाटभर कपडे वर्षानुवर्षे तसेच पडून राहतात. चपला-बुटांचेही तसेच. फर्निचरसुद्धा आपण अनावश्यकरीत्या साठवत राहतो. परिणामी, समस्या वाढत चालल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला आहे. पाण्याच्या वापराविषयी कोणती बंधने पाळायला हवीत?
शहरातले लोक पाण्याची अक्षरश: नासाडी करतात. त्यात बदल करायला हवा. अन्यथा भूजलपातळीत होणारी प्रचंड घट सुरूच राहील. आपली दैनंदिन कामे कमी पाण्यात होऊ शकतात. गाडी पाण्याच्या फवाºयाने धुण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसली तरी स्वच्छ होते. बेसीनमध्ये नळ चालू ठेवून दात घासण्याची गरज नाही. मगमध्ये पाणी घेऊन ते घासता येऊ शकतात. पाण्याचा पुनर्वापर हीदेखील महत्त्वाची बाब आहे. संडासमध्ये ओतण्यासाठी, अंगणात सडा मारण्यासाठी अशुद्ध पाणी वापरावे.
अशी जीवनशैली स्वीकारताना सुरुवातीला अडचणी आल्या असतील…
हो; पण अशी जीवनशैली स्वीकारताना जाणीवपूर्वक त्रास सोसणे आवश्यक असते. ऊर्जेचे पुनर्घटन होऊ शकत नाही. तिचा कमीत कमी वापर करणे हाच उपाय असतो. त्यामुळे आम्ही ऊर्जेचा अत्यल्प वापर करू लागलो. आमच्या घरात फक्त चार बल्ब आहेत. तेदेखील आम्ही गरजेपुरतेच सुरू ठेवतो. घरात टीव्ही नाही. जगातल्या घडामोडी कळण्यासाठी फक्त एक रेडिओ आहे. मिक्सर नाही. आम्ही पाटा-वरवंट्याद्वारे वाटतो. रविद्वारे ताक घुसळतो. हे सारे कष्टाचे वाटत असले, तरी आता त्याची सवय झाली आहे. आता त्याचा एवढा त्रास जाणवत नाही. २००४ मध्ये आम्ही गॅसही परत केला. देवराईतील झाडाच्या काड्यांवर चूल पेटते. तिच्यावर आम्ही चहा वगैरे करतो. अंगणात सौरचुली ठेवल्या आहेत. त्यावर अन्न शिजवतो. यामुळे आम्हाला ऊर्जेसाठी खर्च काहीच लागत नाही.
आपली जीवनशैली सध्याच्या काळात व्यवहार्य नाही, अशी टीका होते…
खरे आहे. प्रत्येक जण खेड्यात जाऊन राहू शकत नाही, हे समजू शकतो; पण जीवनशैलीत बदल घडवू शकत नाही, हे पटत नाही. असे जगणे शक्य नसेल, तर ते शक्य करायला हवे. पॅरिस, अॅमस्टरडॅम ही शहरे आता ‘सायकलींची शहरे’ म्हणून ओळखली जातात. आपल्याकडे पुण्याची अशी ओळख होती. ती आता पुसली गेली. परदेशातील या शहरांत ठिकठिकाणी सायकली भाड्याने मिळण्याची व्यवस्था आहे. एटीएमप्रमाणे कार्ड ‘स्वीप’ केले की सायकल उपलब्ध होते. एका ठिकाणावरून घेतलेली सायकल दुसºया ठिकाणी जमा करता येते. त्या शहरांतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशी खास व्यवस्था उभारली आहे. दोन किलोमीटरपर्यंतचे काम असेल, तर मी गाडीऐवजी सायकल वापरेन, दूरच्या प्रवासासाठी खासगी कारऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करील, असे मनाशी ठरवले तर शक्य होऊ शकते. आमची जीवनशैली कितीही मागास वाटत असली, तरी हीच भविष्यातली जीवनशैली ठरणार आहे. आदिम काळात माणूस निसर्गाच्या सानिध्यात राहत असे तो अज्ञानामुळे. आम्ही निसर्गाचे चक्र जाणून घेऊन जाणीवपूर्वक निसर्गाजवळ गेलो आहोत. त्यामुळे आदिम काळातील जंगलातले वास्तव्य आणि आमची जीवनशैली यात मूलभूत फरक आहे.
स्वयंपाक चुलीद्वारे करायला हवा, असे आपण म्हणता. सर्वांनीच असे केल्यास प्रदूषण आणखी वाढेल…
हा गैरसमज आहे. पहिली गोष्ट म्हणजे, आम्ही चुलीच्या जळणासाठी लाकूडतोड करीत नाही. देवराईत झाडे तोडण्यास मनाई असते. आम्ही फक्त झाडांच्या आपोआप गळालेल्या वाळलेल्या फांद्या मोळी करून घरी आणतो. चुलीपासून निघणाºया धुरात कार्बनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तो डोळ्यांना दिसतो, त्यापासून होणारे प्रदूषण जाणवते; मात्र गॅस, पेट्रोलियम पदार्थ, वीज वापरताना त्याहून अधिक प्रदूषण होते. हाच कार्बनडाय आॅक्साईड वायू झाडे शोषून घेतात. निसर्गाचे चक्र पूर्ण होते. अन्य बाबींपासून ऊर्जा मिळवताना मात्र हे घडत नाही. त्यांच्यापासून भरमसाठ प्रदूषण तर होतेच; पण पर्यावरणाची न भरून निघणारी अमर्याद हानी होते. फक्त त्यांच्यापासून होणारे प्रदूषण डोळ्यांना दिसत नसल्याने जाणवत नाही. त्यामुळे प्रत्येकाने चुलीवर किंवा सौरचुलीवरच स्वयंपाक करायला हवा.
टीव्ही, इंटरनेट ही ज्ञानोपासनेची साधने. ती गरजेपुरती आणि विधायक कामासाठी वापरली तर काय हरकत आहे?
ही साधने नेमकी गरजेपुरती आणि विधायक कामासाठी वापरली जात नाही. बरोबर याच्या उलट होते. या साधनांमुळे प्रचंड वीज खर्च होते. ई-मेलमुळे कागदाची बचत होते, असे सारे जण म्हणतात; पण तेसुद्धा चुकीचे आहे. ‘गुगल’वर एक एन्ट्री सर्च करण्यासाठी किती युनिट वीज खर्च होते, याचा मागे कोणीतरी हिशेबच मांडला होता. घरातल्या संगणकाला लागणारी, त्या शहरातील इंटरनेट केंद्राला लागणारी वीज, पुढे उपग्रहासाठी लागणारी ऊर्जा, संबंधित संकेतस्थळाच्या कार्यालयात लागणारी वीज हा हिशेब काढल्यास इंटरनेट हे साधनही पर्यावरणाच्या दृष्टीने किफायतशीर नाही, असेच म्हणावे लागते. तुम्ही टीव्ही, इंटरनेटचे सांगत आहात, मी घरात साधा फोनसुद्धा घेतलेला नाही. फोन घेतला की उगाच शहराशी संपर्क वाढतो. धावपळ वाढते. आता पत्रव्यवहारावर महिन्यातून एक-दोन व्याख्याने ठरतात.
महात्मा गांधींनी उद्योग, भांडवलदारीला विरोध करीत खेड्याकडे जाण्याचा सल्ला दिला होता; मात्र भारतीयांनी तंत्रज्ञानाची वाट धरली आणि विकास साधला. ही प्रगती करूच नये का?
विकास म्हणजे काय, हे आधी निश्चित करण्याची गरज आहे. आता सध्या जो सुरू आहे तो विकास नव्हे, आर्थिक वाढ आहे. पर्यावरणातील संसाधनांना काही मर्यादा असतात. अमर्याद भौतिक वाढ करण्याच्या नादात माणसाला त्यांचा विसर पडला आहे. आपला देश कर्जबाजारीपणाकडे चालला आहे, विकासाकडे नाही. आपला विकासदर जेवढा वाढेल, तेवढे आपण विनाशाकडे लवकर जाऊ. विकासाचे आठ आयाम असतात. चार आंतरिक, चार बाह्य. आंतरिक आयामांत शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक, तर बाह्य आयामांत कौटुंबिक, सामाजिक, राष्टÑीय व पर्यावरणीय यांचा समावेश होतो. या साºया खूप व्यापक संकल्पना आहेत; पण तूर्त विकासाच्या नावाखाली जे सुरू आहे, ते विघातक आहे, एवढे सांगता येईल. महात्मा गांधींचे विचार लोकांना त्या काळात कळले, पचले नाहीत. आता मात्र त्यांच्या विचारांचा परदेशांत अभ्यास होतो आहे. आपल्याला आज जे कळते आहे, ते त्यांना तेव्हाच कळले होते, यावरून गांधींची दूरदृष्टी किती विलक्षण होती, हे कळते.
आध्यात्मिक बैठक पक्की असल्याने आपण ही जीवनशैली स्वीकारू शकलात?
अगदी खरे आहे. आधुनिक पदार्थविज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींची तत्त्वे सारखीच आहेत. हे विश्व अणू-रेणूंपासून तयार झाल्याचे आधी अध्यात्माने सांगितले, नंतर आलेल्या विज्ञानाने त्यावरच शिक्कामोर्तब केले. आध्यात्मिक विचारसरणीतून उपभोगवादी प्रवृत्ती कमी होण्यास मदत होते. शहरातून खेड्यात जाण्यासाठी या विचारसरणीमुळे चालना मिळाली. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचारांचाही प्रभाव आहे. मनात विचारांची बैठक पक्की असल्यास कृतिशील परिवर्तन सोपे होते.
मुलाखत- सुदीप गुजराथी, नाशिक