चित्रप्रगतीचा पहिला सन्मानदीप

Dadasaheb Phalke माझ्या घराच्या अंगणात पारिजात बहरत असे, त्याच्या नाजूक फूलांचा सडा झाडाखाली पसरलेला असे. त्याचा मंद, मोहक सुगंध मनमोहरून टाकत असे. आज अपार्टमेंटला अंगण नाही. तो पारिजात नाही. त्याच्या नाजूक फुलांचा सडा नाही. पण स्मृतिशेष असलेला मंद गंध आजही मन मोहरून टाकत आहे आणि आठवणीतल्या त्या लहरींवरच आजचं जीवन काहीसे सुसह्य होते आहे. या लहरींवरच केव्हातरी दादासाहेब फाळके यांच्या ‘कालिया-मर्दन’ मधला यमुनेचा डोई येतो. त्या डोहातल्या विषारी फूत्कारा सोडणा-या कालियाच्या विक्राळ फण्यावर थयथयाट करणारा बालकृष्ण आठवतो, सा-या गोकुळास भयभीत करणा-या विशाल विषवल्लीचा नि:पात करणा-या त्या बालकृष्णाचं माझ्या बालमनाला अप्रुप वाटले होते. त्र्यंबकेश्वरला जन्मलेल्या दादासाहेब फाळके यांनी चित्रपटाच्या पडद्यावर केलेले असे अद्भुत चमत्कार प्रेक्षकांना विस्मयचकित करत असत. त्या काळया श्रध्दाळू प्रेक्षकांना ते चमत्कार परमेश्वरी वाटत. त्यांच भाविक मन श्रध्देने उचंबळून येई आणि तो प्रेक्षक पुन:पुन्हा तो परमेश्वर पाहण्यासाठी त्यांचे दर्शन घेण्यासाठी चित्रगृहात येत असे. प्रेक्षकांना काय आवडते याचे अचूक ज्ञान फाळक्यांना होते आणि म्हणूनच त्यांनी आपला प्रेक्षक मिळवण्यासाठी सर्वपरिचित पौराणिक कथांचा उपयोग आपल्या चित्रपटासाठी केला. मुंबईला असतांना त्यावेळी नुकताच भारतात आलेला ‘हलत्या-चालत्या’ चित्रांचा चमत्कार पाहण्यासाठी गेलेल्या फाळके यांना पडद्यावर ख्रिस्त जीवन दिसले. त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ‘श्रीकृष्णजीवना’ चा अविष्कार पडद्यावर दाखविण्याचा ध्यास त्यांनी घेतला.

चित्रपट हा प्रकार प्रथमच प्रकाशात येत होता. त्याचा अभ्यास फाळके यांनी सुरू केला. एका बीजाचे वेलात परिवर्तन कसे होते, याचे चित्रण त्यांनी यशस्वीरित्या केले. हे चित्रण करण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागला. कारण चित्रपट तंत्र नवीन होते. ते आत्मसात करण्यासाठी स्वत:च सर्व प्रयोग करणे आवश्यक होते. चित्रतंत्राचा अभ्यास करणे आवश्यक होते. फाळके यांनी नेटाने प्रयोग केले. या प्रयोगातून त्याच्या कल्पनेला पंख फुटले. अशा लहानलहान प्रयोगातूनच १३ मे १९१३ रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ पडद्यावर आला.

त्या काळात फक्त पाश्चात्य चित्रपटच दाखवले जात असत. श्री. या.गो.उर्फ दादासाहेब तोरणे यांनी १२ मे १९१२ रोजी ‘पुंडलिक’ कॉरोनेशन चित्रगृहात दाखवला होता. पण त्याचे सर्व चित्रण एका परकीयाने केले होते. त्याच्यावरील रासायनिक प्रक्रियाही परदेशातून करून आणावी लागली होती.दादासाहेब फाळके यांनी आपले चित्रपट स्वत: चित्रित केले. रासायनिक प्रक्रियेचे गणित बसवून त्यांच्यावर प्रक्रिया केली, त्यांचे संकलनही स्वत:च केले.

दादासाहेब फाळके यांचा व्यवसाय हा सर्वार्थाने एकपात्री प्रयोग होता. कथालेखन, वेशभूषा, रंगभूषा दिग्दर्शन, चित्रण, संकलन यात ते वाकबगार झाले असे नाही तर चित्रपट्टीला (फिल्म) ठराविक अंतरावर छिद्रे पाडण्याचे किचकट कामही त्यांनी मुंगीच्या नेटाने पार पाडले. त्यांच्या मेहनतीला मधूर फळही लाभले. ‘राजा हरिश्चंद्र’ पडद्यावर आला आणि प्रेक्षकांनी त्याचं प्रचंड स्वागत केलं. चांगल आर्थिक यशही लाभलं. यानंतर ‘भस्मासूर-मोहिनी’ चा कथा घेण्याचे ठरले.

नाटकाप्रमाणे चित्रपटातही पुरूषच स्त्रीची भूमिका करत असत. चित्रपट हा हलक्या दर्जाचा व्यवसाय असल्याचा प्रवाद पसरल्यामुळे वेश्याही या व्यवसायात यायला तयार नसत. त्या काळात दादासाहेब फाळके यांनी पहिली नायिका पडद्यावर आणली. ‘भस्मासूर-मोहिनी’ त कमलाबाई गोखले यांनी नायिकेची भूमिका केली. त्यांच्या मातोश्री दुर्गाबाई यांचीही भूमिका त्यात होती. गोखले घराणे कलावंतांचे होते. कमलाबाईंचे चिरंजीव चंद्रकांत लालजी, त्यांचे नातू विक्रम गोखले आज प्रेक्षकांना परिचित आहेत. भारतातली पहिली बाल कलाकार फाळके यांनी आपल्या घरातून पडद्यावर आणली. त्याच्या मंदाकिनी या मुलीने ‘ कालिया मर्दन’ मध्ये बालकृष्णाची भूमिका दृष्ट लागेल अशी केली.

नाटक आणि चित्रपट हे एका व्यक्तीचे नसतात. ते सांघिक कर्तृत्व असते. फाळके यांना हनुमानाच्या निष्ठेने सहकार्य करणारे सोबती लाभले. त्यामुळेच दादा दाबके, पांडुरंग नाईक यांच्यासारखे छायाचित्रकार, भाऊराव दातारांसारखे कुशल वेशभूषाकार, सहदेव तपकिरे यांच्यासारखे रंगभूषाकार तयार झाले. कलावंतात गोखले घराणे उदयाला आले. वसंतराव तांबट गाजले. दादासाहेब फाळके यांनी आपला प्रेक्षक नजरेसमोर ठेवून चित्रनिर्मिती केली. मूकपट असल्याने प्रेक्षकांना सहजपणे आकलन होतील, अशा पौराणिक कथा त्यांनी निवडल्या. कथा पौराणिक असल्याने चित्रचमत्काकृतीला ट्रीक-सीन्सना भरपूर वाव होता. आकाशात झेपावणारा हनुमान, यमुनेच्या डोहातला प्रचंड कालिया असे प्रेक्षकांचे मन गुंग करणारे चित्रचमत्कार फाळके यांनी दाखवले. पण ते केवळ चमत्कारातच गुरफटले गेले नाहीत. कथेला आवश्यक असतील तेवढेच चित्रचमत्कार त्यांनी चित्रित केले.

Dadasaheb Phalke पण त्यांच्या चित्रपटांनी सर्वात मोठा आणि मूलभूत चमत्कार दाखवला तो उत्पन्नाचा. त्याच्या चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळून अमाप उत्पन्न मिळत असे. कित्येकदा तर पोती पिशव्यांनी भरून गाडीतून आणावी लागत आणि यातून चित्रपट ‘व्यवसाय’ निर्माण झाला. फाळके यांनी व्यवसाय चांगला केला, पण त्यांना व्यवहार जमला नाही. ‘व्यावसायिक’ चित्रपटांच्या निर्मितीमुळे कलात्मक चित्रनिर्मितीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. ती उणीव बाबुराव पेंटरांनी भरून काढली. दादासाहेब फाळके यांच्या अपूर्व कार्यकर्तृत्वामुळेच सेसिल पॅपवर्थ या ब्रिटिश चित्रपट निर्मिती करण्याचं आमंत्रण सन्मानपूर्वक दिलेलं होत. लंडनच्या ‘बायोस्कोप’ या चित्रपटविषयक नियतकालिकात दादासाहेब फाळके यांच्यावर लेख प्रकाशित झाले होते. फाळके यांनी हॅपवर्थ आमंत्रण आभारपूर्वक नाकारले.

पहिल्या महायुध्दाच्या काळात फाळके यांनी ‘लंकादहन’, ‘कालियार्दन’ हे मूकपट निर्माण केले. त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. एकवीस वर्षांच्या कालावधीत दादासाहेब फाळके यांनी सुमारे शंभर मूकपट निर्माण केले. त्यातील काही लघुपट होते. दादांच्या यशस्वी पावलांवर आता इतरही दमदार पावले पडू लागली होती. चित्रपट व्यवसाय वाढीस लागला होता. दिवसेंदिवस तांत्रिक प्रगतीही होऊ लागली. आतापर्यंत मुके असलेले चित्रपट बोलू लागले होते. मूकपटांची निर्मिती हळूहळू कमी होऊ लागली. प्रगतीचे पहिले पाठ देऊन चित्रव्यवसायात प्रगतीप्रथावर नेणारे दादासाहेब थकले. १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले.