डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांची सतार…

Chandrakant Sardeshmukh नवी दिल्लीच्या ‘एन् आर आय इन्स्टिटयूट’ने २००३ सालाचा एक्सलन्स ऍवॉर्ड डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांना दिला. डॉ. सरदेशमुख यांना हा पुरस्कार भारतीय संस्कृतीची जपणूक, तिचे जतन व संवर्धन केल्याच्या अजोड कामगिरीबद्दल दिला गेला. हा पुरस्कार, भारताचे भूतपूर्व पंतप्रधान श्री. इंद्रकुमार गुजराल यांच्या हस्ते देण्यात आला. हा सोहळा नवी दिल्ली येथील, ग्रँड इंटरकॉन्टनेंटल हॉटेल येथे पार पडला.

या दिल्ली येथे पार पडलेल्या ‘अनिवासी भारतीय दिन’ तसेच ‘प्रवासी भारतीय दिना’च्या सोहळयात उत्कृष्टता पुरस्कार (एक्सलन्स ऍवॉर्ड) मिळालेल्या डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या भेटीचा योग आला. त्यांचा आजपर्यंतचा संगीतमय प्रवास, त्यांचा संगीतशास्त्राचा अभ्यास थक्क करणारा आहे. डॉ. चंद्रकांत हे प्रसिध्द सतारवादक पं. रविशंकर यांचे शिष्य. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी सतार हातात घेतली आणि वयाच्या आठव्या वर्षी खुद्द रविशंकर यांनी त्यांचा उल्लेख- ‘a sheer prodigy’ म्हणून केला. तेंव्हाच त्यांनी पं. रविशंकर आणि अन्नपूर्णादेवी रविशंकर यांच्याकडून सतारीचे धडे गिरवायला सुरुवात केली. अवघ्या काही वर्षांतच लोक त्यांच्याकडे नव्या उमेदीचे उत्कृष्ट सतारवादक म्हणून पाहू लागले. भारतात तसेच परदेशात त्यांच्या मैफली गाजू लागल्या. पण ह्या प्रसिध्दीच्या वलयाकडे पाठ फिरवून त्यांनी भारतीय संगीताच्या वैदिक परंपरेवर अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांचे वडील आणि गुरू प. पूज्य प्रभाकर सरदेशमुख महाराज यांच्या इच्छेला मान देऊन त्यांनी सामवेदात डॉक्टरेट मिळविली. सध्या जपानमध्ये स्थायिक असलेल्या डॉ. चंद्रकांत यांनी सतारवादनाच्या कार्यक्रमांबरोबरच संगीतोपचाराने रोगनिवारण यावरही बरेच संशोधन केले. गेली सहा-सात वर्षे त्यांचे जपान व ऑस्ट्रेलिया येथे संगीतोपचाराचे काम सुरू आहे. अशा या प्रतिभावान कलाकाराबरोबर झालेली एक हृद्य बातचित… मीरा मेहेंदळे या खास मराठीवर्ल्डच्या रसिक वाचकांसाठी सादर करीत आहेत…

१. तुमचे संगीताचे शिक्षण कधी सुरू झाले? संगीत हेच जीवन असे तुमच्या ध्यानात कधी आले?
वयाच्या चौथ्या वर्षापासून माझे संगीताचे शिक्षण सुरू झाले. लहान असताना मी एकदा माझे वडील व पूज्य गुरू सरदेशमुख महाराज यांच्याबरोबर श्री. आबासाहेब मुजुमदार यांच्याकडे गेलो होतो. तेथे त्यांनी आमच्यासमोर एकतारीवर सुंदर राग वाजवला. माझ्या बालबुध्दीनुसार मी विचारले की, एका तारेवर सात सुर कसे वाजतात? वयाच्या चौथ्या वर्षी पडलेला हा प्रश्न, उत्सुकता आणि वडीलांचे मार्गदर्शन ह्यामुळे मी सतार या वाद्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्यास सुरुवात केली. श्री. साबुद्दिनखान मिरजकर ह्या विख्यात सतार मेकरनी मला दीड फुटी सतार बनवून दिली आणि माझा प्रवास सुरू झाला. मला ज्या वयात समजू लागले त्या वयात मी पंडित रविशंकर आणि अन्नपूर्णादेवी यांच्याकडे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांचे वारंवार एकच सांगणे असे. लगन लागल्याशिवाय खरे सूर बाहेर पडूच शकत नाहीत. आणि तेंव्हापासून संगीताची खरी ‘लगन’ लागत गेली.

२. गुरूकुल पध्दतीवर तुम्ही काय विचार मांडला?
गुरूकुल पध्दत ही आपली एक अतिप्राचीन परंपरा आहे. ‘गुरूकुल’ हा शब्द आजकाल फक्त शैक्षणिक संस्थांना नावे देण्यापुरता राहीला आहे. त्यातील मतितार्थ लुप्त झाला आहे. आजही गुरू-शिष्य या नात्याचा खरा अर्थ जाणून गुरूकुलाची निर्मिती व वृध्दी होणे आवश्यक आहे. आपल्या शिष्याची कुवत ओळखूनच ज्ञानदान करण्याची पध्दत आहे. हाती घेतील त्या शिष्याचे सोने करणारे गुरू मात्र हवेत. देणा-याची दानत जशी महत्त्वाची तशीच घेणाऱ्याची कुवत ही आवश्यक आहे.

३. आजकाल शुध्द कर्नाटक किंवा शुध्द हिंदुस्थानी संगीतापेक्षा फ्युजन संगीत प्रकाराची रूची वाढत आहे. त्यामुळे विशुध्द संगीत प्रकारांना धोका संभवतो का?
नाही. विशुध्द संगीताला कधीही धोका संभवत नाही. उत्तर हिंदुस्थानी संगीत हे स्वरप्रधान आहे, तर कर्नाटकी संगीत हे तालप्रधान आहे. कर्नाटकी संगीत हे त्याच्या पारांपरिक पध्दतीनेच प्रस्तुत करावे लागते. तर हिंदुस्थानी संगीतामध्ये आपण आपल्या प्रतिभेप्रमाणे मूळ गाभा कायम ठेवून राग विस्तार व आलापी फुलवू शकतो. दोन्ही शैली आपापल्या परीने समृध्द आणि श्रेष्ठच आहेत. तसेच या संगीतशैली प्राचीनही आहेत. ‘जुने ते सोने’! सोन्याला अग्निदिव्यातून जावेच लागते. फ्युजनबद्दल म्हणाल तर ते फ्युजन नसून ‘कन्फ्युजन’ आहे. कुठल्याही शुध्द गोष्टीला तुम्ही आव्हान देऊ शकत नाही.

४. संगीताच्या साहाय्याने उपचार करण्यामध्ये आपला हातखंडा आहे. या संगीत उपचारपध्दती बद्दल काही सांगाल का?
आयुर्वेदाचा अभ्यास ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. माझे वडील हे निष्णात वैद्य होते. तर माझे थोरले बंधूही आयुर्वेद पारंगत आहेत. मी त्यांच्यासारखा आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास केला नसला तरी संगीत शास्त्राचा अभ्यासक आहे. कुठल्याही शास्त्राचा अभ्यास हा जगाच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. शरीराचे जसे शास्त्र आहे, तसे मनाचेही शास्त्र आहे. आयुर्वेद ज्याप्रमाणे शरीराच्या समतोलावर भर देते, त्याचप्रमाणे मनाचा समतोल राखायलाही शिकविते. मनाचा समतोल जर राखला गेला तर, शरीरातील निम्म्याहून अधिक व्याधी दूर होतील. मनाच समतोल साधण्याचे संगीतासारखे दुसरे माध्यम नाही. आजकालच्या धकाधकीच्या तणावपूर्ण आयुष्यात शरीराइतकीच मनाला निरोगी ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. संगीत हे नुसते करमणुकीचे साधन न राहता ती आपली गरज बनणे आवश्यक आहे. संगीत हे कानापुरते न राहता ते राऊळाच्या गाभाऱ्यापर्यंत म्हणजेच हृदयापर्यंत पोहाचले पाहिजे. संगीतातून उपचार हा आजकालचा शोध नाही, हे आपल्या वैभवशाली परंपरेतच आहे. मी फक्त ते आचरण्याचा व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

५. संगीतोपचार ही जर भारताची परंपरा आहे, तर भारतात त्याची एवढी अनभिज्ञता का?
आपले दुर्दैव म्हणा, किंवा परंपरेचे, पण हे कटु सत्य आहे. आपली सद्यस्थिती अशी आहे की, आपल्या वैभवशाली परंपरेला जुन्या रूढी समजून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संगीताकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जात आहे. या परंपरेमध्ये असलेले तथ्य जाणून घ्यायची उत्सुकता, इच्छा उरलेली नाही. पण परदेशात आपल्या परंपरेचा उत्सुकतेने अभ्यास होत आहे. त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम बघून ती उत्सुकता वाढत आहे. ही उपचार पध्दती शिकायलाही लोक उत्सुक आहेत. शेवटी आपल्याच परंपरांची महती आपल्याला परदेशातून वाखाणली गेल्याशिवाय कळणार नाही, अशी आपली फार टोकाची परस्वाधीनता आजकाल सर्वत्रच दिसून येते.

६. परदेशातील भारतीय कलाकारांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते का?
नाही हो. कठीण परिस्थिती कुठेही नाही. परदेशात गुणवत्तेची कदर आहे. तुमची गुणवत्ता सिध्द झाली की ते आपणहून तुम्हाला आमंत्रण देतात. आणि प्रवाहाच्या विरूध्द उगमाकडे पोहोचण्याच्या माझ्या सवयीमुळे प्रवाहाविरूध्द वाहणे हे तसे थोडे कठीणच नाही का?

७. कार्यक्रमाआधी काही खास तयारी असते का?
नाही. खास काही नाही. कुठला राग वाजवायचा हे सुध्दा ठरवलेले नसते. डोळे मिटून जे वाजतं तेच खरं. पण संगीतोपचाराची ‘ग्रुप म्युझिक सेशन्स’ असतात तेंव्हा खूप तयारी करावी लागते. २०-३० लोकांच्या समूहापुढे ‘म्युझिक हिलींग’ची प्रात्यक्षिके करायची असतात. भिन्न प्रकृतीच्या भिन्न लोकांचा अंदाज घेत सतार वाजवायची असते. खूप विचार करून ही प्रात्यक्षिके करणे अतिशय गरजेचे असते. त्यात खरी कसोटी असते.

८. ‘रिमिक्स’बद्दल आजकाल उलटसुलट चर्चा चालू आहेत. त्याबद्दल तुमचे काय मत आहे?
तुम्ही जर गीतासार लक्षात घेतलेत तर मनुष्याला ‘चेंज’ म्हणजेच बदल हवा असतो. मी स्वत: अनेक प्रयोग केले आहेत. त्याला माझा विरोध नाही. पण प्रयोगामध्ये निश्चित हेतू व डोळसपणा हवा. मी स्वत: MP3.COM या साईटवर ‘अग्निमिले पुरोहिम्’ ही ऋचा त्याच्या शब्दोच्चारांच्या महत्त्वासाठी फक्त पेटीच्या सुरांवर रेकॉर्ड केली होती. एका भारतीय मुलानेच ही ऋचा डाऊनलोड करून त्यात स्वत:च अनेक वाद्यांचे ताल-सूर घालून मला पाठवली. मी त्याला सांगितले की तुझा प्रयोग चांगला आहे, पण त्याने माझा हेतू साध्य होत नाही. त्याला ते पटले आणि त्याने ते रिमिक्स MP3.COM च्या साईटवरून मागे घेतले.

९. सध्या सर्वच क्षेत्रात झपाटयाने बदल होत आहेत. कॅसेटची जागा सीडी, तर सीडीची जागा ‘ऑन लाईन’ म्युझिक घेत आहे. अशा परिस्थितीत ‘लाईव्ह शो’चे महत्त्व कमी होते आहे का?
नाही. मला असे वाटत नाही. माझा अनुभव फार निराळा आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर माझ्या कॅसेटस्, सीडीज्, MP3.COM वरील ऑन लाईन म्युझिक प्रसिध्द आहे. पण माझे देशी-विदेशी जे कार्यक्रम होतात, त्यात तरूण पिढी मला अधिकाधिक ऐकत आहे. स्वरांचा खरेपणा व आनंद ज्याला अनुभवायचा असेल, तो अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबरच- किंबहुना जास्तच- लाईव्ह शोज् ना हजर राहणे पसंत करेल.

१०. परदेशात तुमच्या कार्यक्रमांनंतर लोकांची प्रतिक्रिया काय असते? खास करून भारतीय प्रेक्षकांची?
मी १९८२ पासून परदेशात कार्यक्रम करतो आहे. पण हे सांगावसं वाटतं की, संगीताच्या किंवा माझ्या दुर्दैवाने औषधाला सुध्दा भारतीय प्रेक्षक तिथे नसतो. भारतीय सरकाचा कुठल्याही प्रकारे मला पाठींबा नाही. परदेशीयांची प्रतिक्रिया म्हणाल तर ते प्रचंड उत्सुक आणि आश्चर्यचकित झालेले असतात.

११. रसिकांची प्रतिक्रिया तुम्हाला किती महत्त्वाची वाटते? त्यांच्या सूचनांचा तुम्ही किती विचार करता?
सूचना म्हणाल तर, सूचनांचे कायम स्वागतच आहे. रसिकांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. जपानमध्ये मी अनेक शाळांमध्येसुध्दा कार्यक्रम केले आहेत. तेथील प्रथेप्रमाणे शाळेत झालेल्या कार्यक्रमांवर मुलांनी निबंध लिहायचा असतो. त्यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या असतात. आश्चर्य म्हणजे अजूनही भारताची प्रतिमा ही कुंभमेळा, वाघ, साप अशीच आहे. पण परदेशीयांच्या मनातही भारताबद्दल आदर असलेली पिढी निर्माण होत आहे. जेवढी उत्स्फूर्च दाद मिळते, तेवढीच शिकायची इच्छाही प्रदर्शित केली जाते.

१२. चाहत्यांच्या भरपूर मेल्स तुम्हाला येत असतील. लक्षात राहीलेला एखादा किस्सा सांगाल का?
मला येणा-या पत्रांचे वर्गीकरण केले तर एक वर्ग आश्चर्यचकित झालेल्यांचा आहे. त्यांना सतार ऐकून काही वेगळाच अनुभव मिळाला आहे. काही जणांना माझ्यासारखी सतार शिकाविशी वाटते, तर काहीजण पुढे नवीन काय येणार त्यावर डोळा ठेवून असतात. IT industryतील काही अमेरिकन्सची मला पत्रे आली आहेत की, कामाबरोबर, पार्श्वभूमीला चंद्रकांतांची सतार असेल तर, कामाचा ताण, क्षीण बिलकुल जाणवत नाही. या सर्व चाहत्यांना उत्तर देण्याची इच्छा असूनही वेळेअभावी ते जमत नाही, याची खंत आहे. पण अद्ययावत तंत्रज्ञानामुळे हे चाहतें बऱ्याच जास्त प्रमाणात माझ्याशी, किंवा मी त्यांच्याशी संपर्क साधू शकतो.

१३. तुमच्या पुढील संकल्पांविषयी काही सांगाल का?
छोटया का होईनात, पण ठिकठिकाणी संगीत शाळा काढण्याची माझी इच्छा आहे. माझ्या वेबसाईटच्या मार्फत- www.darshanam.com मार्फत, संगीताची सैध्दान्तिक बाजू मी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. परंतु प्रॅक्टिकल पोहोचण्याकरिता संगीत शाळा उपयुक्त ठरतील.

१४. भारतामध्ये पुढचा कार्यक्रम कधी?
तुम्ही कधीही बोलवा. आम्ही येऊच!

मुलाखत व शब्दांकन – मीरा मेहेंदळे