एका ‘बिनधास्त’ दिग्दर्शकाची अविस्मरणीय ‘भेट’

मराठी चित्रपट सृष्टिची आजची अवस्था फार बिकट आहे. एकीकडे चित्रपट निर्मितीसाठी लागणारे भांडवल पुरेसे नाही, व दुसरीकडे सतत बदलत राहिलेल्या सामाजिक गरजा, सामाजिक वास्तव यांच्याशी जुळवून घेताना, आलेले अपयश यामुळे मराठी चित्रपट सृष्टिला अवकळा आली आहे. या सा-या प्रतिकूलतेशी झगडताना, निरनिराळया त-हांनी परिस्थितीशी दोन हात करताना, आपलं यशाचं पान आपल्या पध्दतीनं लिहून काढणारा मराठीतील अग्रणी सिने-दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी. नुकताच त्यांचा ‘भेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रत्येक प्रॉजेक्टमधे प्रयोगशील राहून, विविध माध्यमातून कलेचा ठाव घेणारा एक समर्थ दिग्दर्शक. मराठी वर्ल्डच्या वाचकांसाठी श्री. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिलेली ही खास मुलाखत. ‘जिगिशा क्रिएशन्स’ या त्यांच्या कार्यालयामधे, सहज, खेळकर वातावरणात त्यांच्याशी दिलखुलासपणे बातचीत झाली.

Chandrakant Kulkarni श्री. चंद्रकांत कुलकर्णी त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात व एकापाठोपाठ एक निर्माण केलेल्या नाटय-सिनेकृतींविषयी ते मनापासून बोलत होते. ‘मी मूळचा मराठवाडयाचा. शिक्षणाकरता औरंगाबाद येथे आलो. कॉलेज, तिथल्या वक्तृत्त्व स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा यातून स्वत:ची ओळख पटत गेली. केवळ हौस म्हणून नाटकात काम करता करता समवैचारिक एकत्र आलो. चारचौघांसारखीच ही सुरुवात असली तरी, त्यातून एक ग्रुप मात्र वेगळा बनला. २०-२२ वर्षांपूर्वी, बीजगणित घेऊन बी. एस्. सी. झाल्यावर जर्नॅलिझम आणि ड्रामा या विषयांचे पदवी शिक्षणही एकीकडे घेत होतो. जवळ जवळ ५० ते ५५ नाटकं मी बसविली. प्रत्येक नाटक हा एक अनुभव होता. प्रत्येक नाटक काहीतरी शिकवून जात असे. एकापाठोपाठ एक करत १० जण मुंबईला आलो. सुरुवातीला ‘सकाळ’ या वृत्तपत्रात नोकरी करत असताना, राज्य नाटय स्पर्धा, व्यावसायिक नाटकं, यामधील आमचा रस दिवसेंदिवस वाढत होता. नाटक करता करता त्यातून वाढत राहिलो. आमच्या जाणीवा जसजशा बदलत गेल्या, तसतशी आम्ही स्थापन केलेली, ‘जिगिषा’ देखील पुढे जात राहिली. प्रसिध्दीपेक्षा कलेच्या ओढीनं, जगण्याच्या शिकण्याच्या उर्मीनं इथे आलो, हे महत्त्वाचं. ‘रंग उमलत्या मनाचे’ हे वसंत कानेटकरांचं नाटक आम्ही व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. ते लोकप्रिय झालं. व्यावसायिक दृष्टया यशस्वी झालं. त्यामागून मग एकापाठोपाठ ‘चारचौघी’, ‘डॉक्टर, तुम्ही सुध्दा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘प्रिय आईस’ ही चार नाटकं एका वर्षात आणली. ती सगळीच यशस्वी झाली. ‘चारचौघी’नं तर इतिहास घडवला. यानंतरच्या काळामधे, ‘गांधी विरूध्द गांधी’ हा लँडमार्क ठरलेला विषय हाताळण्याचा अनुभव फारच विलक्षण होता. हे नाटक मी तीन भाषांमधे दिग्दर्शित केलं. यात माझ्या मेहेनती इतकंच, नाटककाराचही यश आहे. महेश एलकुंचवार, प्रशांत दामले, शाम मनोहर, या सारख्या दर्जेदार नाटककारांची नाटकं बसविली. ‘ध्यानीमनी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ही नाटकं आणली. या नाटकांनी मी समृध्द झालो. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, प्रायोगिक नाटकांचे विषय समांतर रंगभूमीवर आणण्याच्या घडामोडीमधे माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा सहभाग राहिला. सुरवातीला ‘८ मार्चचं नाटक’ असा सूर ज्याबाबत लावला गेला, त्या ‘चारचौघी’ नाटकाचे गेल्या १० वर्षांच्या काळात १००० प्रयोग झाले. ही बाब फार बोलकी आहे. ‘वाडा चिरेबंदी’, ‘भग्न तळयाकाठी’, आणि ‘युगान्त’ ही ट्रायालॉजी स्टेजवर आणली. यामधील सर्व कलाकारांनी ९० दिवस मानधनाशिवाय तालीम केली. हे ८ तासांचं नाटक, कलेच्या दृष्टिने पाहाता देखील एक प्रयोग आहे. यामधे मला तीन नेपथ्य, चार तासांच्या स्पॅन मधे म्हटलं तर तीन वेगळया आणि म्हटलं तर एकात्म अनुभव देणा-या कलाकृती सादर करण्याची संधी मिळाली.

चित्रपटांची सुरुवात कशी झाली हे सांगताना, कुलकर्णी म्हणाले, ‘१९९५ सालापासून मी चित्रपट माध्यमामध्ये काम करू लागलो. डॉक्यूमेंन्ट्रिज्, ऍड फिल्म्स्, दूरदर्शनवर नाटक बसविणे यातून एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाण्याचा प्रवास सुरू होता. प्रामाणिक प्रयत्न आणि अभ्यास यातून, सिनेमा निर्मिती क्षेत्राकडे वळलो. वयाच्या मानाने समृध्द अनुभव मिळाल्यामुळे सर्व थरांतील कलावंतांच्या – अगदी प्रभाकर पणशीकरांपासून तो संजय नावर्केर यांच्या देखील संपर्कात आलो. सगळया ठीकाणचं ट्रेनिंग सगळीकडे वापरू शकलो. डिबेटच्या शिस्तीचा फायदा म्हणजे, जेंव्हा माझं नाटक फ्लोअर वर जातं, तेंव्हा ते तोंडपाठ असतं. यातून मला अभिप्रत असणारी गुणवत्ता आपसूकच कलाकार देतो.’

बिनधास्तचा अनुभव सांगताना, श्री. कुलकर्णी यांनी, बिनधास्त च्या यशामधे संस्थेच्या शिस्तीचा, अभ्यासाचा, सिन्सेरिटीचा आणि कसून मेहेनतीचा भाग होता हे सांगितले. एक थ्रीलर धम्माल एन्टरटेन्मेन्ट असा चित्रपट काढायचा होता आणि त्याच्या यशामधून आमचं उद्दीष्ट साध्य झाल्याचं स्पष्टच आहे. लग्नानंतर मैत्रीणींशी नातं टिकून राहाणं कठीण असतं, या एका सूत्राने, सर्व थरातून फार चांगला प्रतिसाद खेचून आणला. एकंदर ३६५ मुलींचा या चित्रपटाच्या निर्मितीमधे सहभाग होता. हिंदीच्या तोडीस तोड खूप मोठा सिनेमा उभा राहिला, एक नवी कन्सेप्ट. दोन मैत्रिणींच्या टु-गेदरनेसची ही थीम होती. दक्षिणेतील प्रियदर्शन या दिग्दर्शकाने तामिळ, मल्याळम्, तेलुगु आणि कन्नड या चार भाषांमधे ही फिल्म पुन्हा बनविली. त्यालाही उदंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. एका मुलाखतीच्या निमित्ताने प्रियदर्शन यांनी आवर्जून सांगितले की, बिनधास्तचा स्क्रिनप्ले हा हिचकॉकच्या तोडीचा स्क्रिनप्ले आहे. मैत्री संपते. पण सस्पेन्समुळे एक फन्, चॅलेंज कायम राहिला, हे बिनधास्तचं यश. बिनधास्तची सक्सेस स्टोरी ध्यानीमनी नसताना देखील खूप मोठी ठरली. ‘बिनधास्त’ मधे सगळीच मजा आली. इतकी की प्रेक्षक देखील चित्रपट गृहाबाहेर पडले तरी शेवटचा सस्पेन्स जाहीर करत नसत. तुम्हीच पाहा ना सिनेमा, असं सांगत. ही देखील एक गंमत.

नाटक आणि चित्रपट यांच्यातील फरक काय असे विचारल्यावर श्री. चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ‘प्रत्येक माध्यमाचं सामर्थ्य वेगळं असतं. नाटक बघताना आपण आपल्यावर अंधार करून घेतो आणि २०*२० च्या चौकटीतल्या उजेडात जे घडतंय त्यात रममाण होतो. सिनेमामधे, कोणतेही दृष्य अगदी जवळून पाहाता येते. नाटकामधे दिग्दर्शकाचा डायरेक्ट कंट्रोल राहात नाही, तर चित्रपटामधे, प्रत्येक फ्रेम मधे काय दाखवायचं याचा निर्णय दिग्दर्शक घेतो. कंपोझिशन, संगीत, सेट, लाईट, याची संपूर्ण स्वायत्तता सिने-दिग्दर्शकाला आहे. त्यामुळेच आधी बाग, मग लगेचच्या दृष्यात घर, झोपडपट्टी, मग महाल हे दाखवता येतं. नाटक जास्त अवघड आहे, कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात दिग्दर्शकाचा तसा ‘डायरेक्ट होल्ड’ राहात नाही. काळ, अवकाश, आणि ऍक्शन यांचा एकात्म परिणाम नाटकाच्या केंद्रवर्ती असतो, तर, सिनेमामधे त्रिमीती असते, सान्निधता समीपता असते. कॅमे-यामुळे फार जवळून एखादी गोष्ट टिपता येते. सिनेमा हा लार्जर दॅन लाईफ चे दर्शन घडवतो, तर आजूबाजूचे वास्तव नाटक प्रत्यक्षात दाखवतं. नाटक हा जिवंत अनुभव असतो, त्याच्या प्रयोगाची पावती ताबडतोप तिथल्या तिथेच मिळते, तर सिनेमा हा एकतर्फी जिवंत अनुभव असतो.

चित्रपटांच्या व्यापात व्यस्त झाल्याने आता नाटक करण्यात कितपत स्वारस्य आहे, असे विचारल्यावर चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, मी कायमच नाटकाशी निगडीत राहणार. त्या माध्यमाशी रिलेट होत राहणार. बटाटयाची चाळ, व्यक्ति आणि वल्ली हे मी आज देखील करतोच आहे. चित्रपटांमुळे मी जास्त व्यस्त झालोय हे खरे आहे, पण १९९९ पर्यंत ‘चाहूल’ हे माझं नाटक चालू होतंच. एक सामर्थ्यशाली माध्यम म्हणून नाटक मला कायमच जास्त ओढ लावतं.

Chandrakant Kulkarni चित्रपट चांगला बनण्यासाठी काय महत्त्वाचं, कथा, पटकथा की दिग्दर्शन – यावर उत्तर देताना ते म्हणाले, सिनेमाचं समीकरण फार वेगळं असतं. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद चांगल्या विषयाप्रमाणेच त्याच्या हाताळणीवर देखील अवलंबून आहे. जो अनुभव द्यायचाय त्याची क्रमवार मांडणी, व खूप स्ट्राँग व्हीज्युअल्स ही आवश्यक ठरतात. म्हणूनच कथा व दिग्दर्शनापेक्षा स्क्रीनप्ले खूप महत्त्वाचा. बिनधास्तचा दाखला देत ते पुढे म्हणाले, ‘कॉलेजमधील मैत्रिणींच्या खोडया आम्हाला दाखवायच्या होत्या. त्यामधून कॅरेक्टर्स एस्टाब्लिश करायची होती. पण त्यामुळे तोच तोचपणा येऊन जवळ जवळ ४५ सीन्स लांबत होते. प्रवासात असताना मला एकदम एक कल्पना सुचली. हेच सारं जर गाण्यात दाखवलं तर … लगेचच त्या थीम वर गीतकारानं गीत लिहीलं, आणि सारे शॉटस् एकवार लावून एका गाण्यात आशय सांगून मोकळा झालो. झर्रकन् स्टोरी पुढे सरकली… सांगायचा मुद्दा हा आहे की, स्क्रीनप्ले चं काम शेवटपर्यंत चालू असतं. सिनेमाची पटकथा ही हस्तलिखिताची सातवी ते आठवी आवृत्ती असते.

चित्रपट दिग्दर्शकानं लोकांच्या आवडीचा विचार करून पावलं उचलावीत का, यावर श्री. चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ‘आपल्याला जे करायचंय ते, आणि जनकौल याचा अंदाज असावा. प्रेक्षकांची आवड बघावी पण, त्यांचा अनुनय करू नये. प्रेक्षक काही अनुनय करायला सांगत नाहीत, त्याच बरोबर हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, केवळ प्रेक्षकांना आवडला, म्हणून एखादा चित्रपट चांगला किंवा वाईट ठरत नसतो.

भेट विषयी माहिती सांगताना श्री. चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, अल्फा मराठी वाहिनीसाठी पिंपळपान ही मालिका बनवत असताना, मराठीतील दर्जेदार कादंब-यांना टी. व्ही. मालिकांच्या रूपात पेश केले. पिंपळपानच्या संदर्भात ‘भेट’ही रोहिणी कुलकर्णी यांची केवळ ६० पानांची एक लघुकादंबरी वाचण्यात आली. त्यामधील नॅरेशन व मांडणी मधून हे जाणवलं की ही मालिका नाही तसेच हे नाटक देखील नाही. हा तर सिनेमा आहे. होम वर्क केलं. त्याचं पेपर-वर्क खूप छान झालं. १९ दिवसांत संपूर्ण सिनेमा आम्ही ३५ एम् एम् वर ‘शूट’ केला. मराठी चित्रपट म्हणून कुठेही दर्जाशी तडजोड केली नाही. बिनधास्त पेक्षा एक टोटली वेगळी फिल्म बनविली. यावेळी नवा अनुभव म्हणजे ती ‘जिगिषा’नंच प्रॉडयूस केली. पहिल्यांदाच आम्ही वितरणही करून बघत आहोत. वातावरण तपासून पाहात आहोत. स्वत:ला देखील तपासून पाहात आहोत.

‘भेट’ चा विषय युनिव्हर्सल आहे. एक उत्तम भारतीय कथा असून ती इतर भाषांत देखील पाहण्यासारखी होईल, असे सांगून श्री. चंद्रकांत कुलकर्णी यांनी अशी नोंद केली की, नाटक काळाबरोबर जात राहिलं आणि मराठी सिनेमा मात्र काळाच्या मागे राहिलाय. मराठी सिनेमाच्या बाबतीत, ‘लास्ट स्टेज ला कॅन्सर डिटेक्ट झाल्यासारखी गत आहे’ – सिनेमाच्या तांत्रिक त्रुटी, टी. व्ही. चॅनल्सचा वाढलेला राबता, आणि बदलत चाललेल्या मराठी वातावरणातील पडसादांची नोंद न घेतल्यामुळे मराठी जाणीवांपासून मराठी सिनेमा दूर राहिला. मराठीच्या प्रेक्षकाचा निश्चित थांग लागत नसल्यामुळे मराठीमधे सिनेमा काढणे हा एक जुगार झाला आहे.

अभिनेत्याच्या गुणांविषयी बोलताना ते म्हणाले, अभिनेता हा मनाने फार चांगला माणूस असला पाहिजे. त्याची बौध्दिक कुवत चांगली असावी. तो स्वीकारशील, विनम्र असावा. नटाचे वाचन दांडगे असावे. सांगकाम्या नटांपेक्षा शंका असणारे नट मला आवडतात, असे सांगून नटाकडे शब्द संपदा असणे ही फार मौलिक गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

आगामी प्रकल्पांबाबत बोलताना, दोन हिंदी चित्रपट सुरू असून, ‘माहौल’ या चित्रपटाचे लेखन श्री. विजय तेंडुलकर करीत असून, ‘ख्वाब’ हा दुसरा चित्रपट श्री. प्रशांत दळवी लिहीत आहेत. नाटकाचा प्लॅन आहे, त्याचबरोबर एक चांगली साहित्यविषयक मालिका लवकरच येत आहे, असे सांगून, ‘सिनेमाचे य: विषय डोक्यात आहेत, पण त्यातही श्री. अमिताभ बच्चन यांच्यासाठी मी एक संकल्पना राखून ठेवली आहे, आणि त्यांच्यासारख्या बुजुर्ग व संवेदनाक्षम नटाबरोबर कलानिर्मितीचा आनंद लुटण्याचा माझा मानस आहे.’ – एक मनस्वी स्मित करीत, श्री. कुलकर्णी सांगत होते.

आपल्या यशाचं गमक सांगताना ते म्हणाले, प्रत्येक वेळी चूझी राहिलो. कलेच्या क्षेत्रात तुमच्या हातात एक कल्चरल व्हेटो राहिला पाहिजे. मी मला जे पटतं, जे योग्य वाटतं तेच करीन, हे कुणाही समोर सांगण्याची, कुवत असायला लागतें. ‘नाही’ देखील म्हणता येणे महत्त्वाचे. बिनधास्त सारखा चित्रपट हिंदीतून करण्यासाठी मला ऑफर आल्या. पण त्या मी स्वीकारल्या नाहीत. काहीतरी वेगळे साकारण्याचा एक ध्यास मला आहे. यश हा योगायोग नसतो. त्याकरता ट्रेनिंग आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टमागे विचार, पूर्वतयारी, अभ्यास पाहिजे.

ऍनिमेशन तेंव्हाच वापरणे योग्य असते, जेंव्हा ती तुमच्या कथेची गरज असते. आधुनिक तंत्रज्ञान हवेच पण पहिली गरज म्हणजे उत्कृष्ट प्रतीचा कॅमेरा.

मराठीवर्ल्ड डॉट कॉमच्या प्रकल्पास शुभेच्छा देऊन, ‘निदान मराठी माणसाने तरी मराठी सिनेमा पाहावा, तसेच कल्पनांची देवाण घेवाण हा इंटरनेट चा उद्देश असावा, यामधे, ‘क्रीएटिव्ह रीसोर्र्स पर्सन’ म्हणून मराठीवर्ल्ड डॉट कॉम ला जॉईन व्हायला मला आवडेल.’ असा विश्वासक अभिप्राय त्यांनी मराठीवर्ल्ड डॉट कामला दिला.

मुलाखत व शब्दांकन – सौ अनघा दिघे