कथा बिनाका गीतमालाची


विझलेला लेखक

”प्रसार माध्यमांनी दखल घ्यावी” अशी त्याची प्रतिमा असूनही केवळ पुणे-मुंबई येथील राहणारा नसल्यामुळेच उपेक्षिला गेलेला हा एक भावुक व सह्दयाचा लेखक.

”तिचा अश्रुपात पापण्यांच्या कडेला, उन्हाने वाफ होऊन गेलेल्या पाणवठयाच्या किनार्‍यावरल्या एकाकी दगडगोटयासारखा भिजून खिन्नसा उभा राहतो. त्याचा प्रतिध्वनी म्हणून ‘देवदास’ हा अस्फुट चित्कार!”

”सामान्य डागासारखा दिसणारा शाईचा थेंब टिप कागदावर ओघळला की, त्या स्पर्शाने विस्तारत जाऊन आपला वेगळा आकार घेऊन येतो, तसाच लाहोरच्या त्या रस्त्यावर उमटलेला तो अनामिकाचा आर्त आवाज या सार्‍या संगीतकारांच्या स्वरस्पर्शाने एक निराळा रंगीत देह घेउन आला आणि गुलाम हैदरच्या आयुष्यातल्या त्या क्षणाचं सोनपाखरू झालं”

यासारख्या उपमांची आणि कलात्मक वाक्यांची उधळण आपल्या चित्रपटाविषयक लिखाणामध्ये पानोपानी करणारे ‘रसरंग’चे लेखक ‘अंजनकुमार’ ऊर्फ श्रीनिवास कुलकर्णी यांचे मिरज येथे नुकतेच निधन झाले. एका बातमीत ”साहित्यिक अंजनकुमार” असा उल्लेख करून मृत्यूनंतर तरी या लेखकाला न्याय देण्याचा अल्पसा प्रयत्न वृत्तपत्राने केला. १९८० ते १९९० या दशकात चित्रपटविषयक लिखाण करणार्‍या या लेखकाने आपल्या लिखाणातून एक वेगळी शैली दाखवून चित्रपटाबद्दल, त्यातील कलावंताबद्दल लिहितांना असेही काही लिहिता येते हे वाचकांना प्रथमच दाखवून दिले होतं. चित्रपटात प्रेमी वाचकांना ते अपिल झाले होते, भावले होते. इतकेच नव्हे तर इसाक मुजावरांसारख्या ज्येष्ठ संपादकांना ते आवडले होते. म्हणून तर त्यांनी ‘रसरंग’ या चित्रपटविषयक साप्ताहिकात अंजनकुमारांच्या वेगळया भाषाशैलीतील लेखाला नेहमीच स्थान दिले.

पुणे-मुंबई येथील संपादक सहसा आपल्या प्रकाशनात पश्चिम महाराष्ट्रातील लेखकांना स्थान देत नाहीत आणि चित्रपटविषयक लिखाण तर पुणे-मंबई येथे राहणार्‍यांनीच करावे असा एक पायंडा पाडला गेला आहे. पण अंजनकुमारांनी या सर्वाला छेद दिला. मुंबईबाहेर राहूनही चित्रपट कलावंतांबद्दल वेगळया शैलीत लेखन केले.

”उदास संध्याछायेत निर्जन टेकाडावर, पालवी फुटण्याच्या प्रतिक्षेत कसंबसं तग धरून राहिलेल्या झुडपासारखा जयदेव त्याचा जीर्ण जन्म ढकलत राहिला. क्वचित कधी त्याला दिलासा मिळाला”.

पण अंजनकुमारांचे हेच एक वेगळेपण होते की, सामान्यत: चित्रपटविषयक लिखाण म्हणजे फारसे काही कसबाचे काम नाही. ते कोणीही लिहू शकतो असा एक समज सर्वत्र पसरलेला आहे. तसेच अनेकांनी सनावळया, तारखाच, कलावंताच्या जीवनातील ठळक घटना एकाखाली एक मांडून, त्यामध्ये चित्रपटांची नावे, गाण्याच्या ओळी त्यांची यादी देऊन अनेक लेखाची उतरंड रचलेली दिसून येत होती व आताही आहे. पण या भाऊगर्दीत सुध्दा आपल्या लेखनशैलीचे वेगळेपण जपणारे हाताच्या बोटावर मोजता येणारे काही लेखक होते. परंतु त्याच्याही पेक्षा आणखीन काही वेगळया पध्दतीने लिहिणारे म्हणून अंजनकुमार यांचा उल्लेख करावा लागेल.

ज्या ज्या कलावंतावर अंजनकुमार लिहीत गेले त्या त्या कलावंताच्या कलेबरोबरच त्याची मानसिकता, त्याची भाव आंदोलने, अंत:करणातील खळबळ टिपत गेले, परकाया प्रवेश विद्या अस ते म्हणतात पण अंजनकुमार परमन प्रवेश विद्या जाणत होते की काय कोण जाणे. त्यामुळेच त्यांनी चक्क गुरूदत्त बोलत आहे ही कल्पना सुरू करून त्यांच्यावर ‘आमेन’ ही कादंबरी लिहिली. ज्यामध्ये त्यांनी गीतादत्तची सुध्दा असहाय्यता, “कुणीही कलावंताच्या कैफाला अश्रूंचं अर्ध्य देण्यापलीकडं त्यांच्या स्त्रीच्या हातात उरतं काय?” यासारख्या शब्दांनी व्यक्त केली. तर मीनाकुमारी व गुरूदत्तच्या भेटीचा प्रसंग चितारल्यावर अंजनकुमार लिहितात ”तिची पावलं तिच्या शायरीतल्या अक्षरांसारखीच हळूहळू पुढं सरकत होती.” गुरूदत्त कोणालाच समजला नाही..कुणालाही नाही..गुरूदत्त गुरूदत्तलाही समजला नाही…ही गुरूदत्तची व्यथा अंजनकुमारांनी ज्या पध्दतीने मांडली होती.

मीनाकुमारीवरील ‘शायरा’ कांदबरी लिहून तिच्या जीवनातील घटना आपल्या डोळयांपुढे साकारत ते आपल्याला मीनाकुमारी कशी होती हे सांगताना लिहितात, “इथली प्रत्येक गजल चांदण्यांची! प्रत्येक महाल चांदण्यांचा…शेज चांदण्याची..थेंबाचं पात्र चांदण्याचं! सगळे पहारे चांदण्याचे. काय सांगू?” एक मुक्त मीनाकुमारी इथं चांदण्यात अशी बंदिस्त आहे अशी मीनाकुमारी ते कांदबरीतून आपल्या भेटीला आणतात. त्यावेळी ते अंजनकुमार केवळ चित्रपटविषयक लेखन करणारे लेखक राहत नाहीत तर ते साहित्यिक बनतात आणि म्हणूनच त्यांच्या चित्रपटविषयक लिखाणाला एक साहित्यिक दर्जा प्राप्त होतो. चित्रपटांनी, त्यातील गाण्यांनी त्या कलावंतांच्या कलानी अंजनकुमारांना भरभरून दिले, सावरले, म्हणून त्यांनी चित्रपट कलावंतांवर लिहिले आणि हे लिहितांना त्यांना या कलावंताबद्दल आस्था होती. कारण त्यांना माहित होते की, ”या कलावंतांचे आयुष्य हा एक पारदर्शी रेशीम आवरणाखालचा काचमहाल. दिवेलागणीला असंख्य रंगांचे लोट घेऊन तो पेटून उठतो. आत गाणं सुरू असतं. साज असतो, सजण असतो, स्वप्न असतं, व्यसनं असतात. या सार्‍यांबरोबर त्या झगमटाखालच्या अंधारात कुठंतरी सामान्य माणसाचा अतृप्त आत्माही असतो. बाहेरून पाहणार्‍याला गाणं तेवढ दिसतं. माणूस नाही…”

आणि हा माणूस दाखविण्याचा प्रयत्न अंजनकुमारांनी आपल्या चित्रपटविषयक लेखनातून केला आहे म्हणून तर त्यांच्या दीपरेखा प्रकाशनाच्या ‘आमेन’, ‘शायरा’ या मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद दिल्लीच्या राजकमल प्रकाशनाने प्रसिध्द केला. त्यांची विझलेला दिवस, आशिकाना, काळीजखुणा, ही पुस्तके मॅजेस्टिक प्रकाशन, दीपरेखा प्रकाशन यासारख्या नामवंत प्रकाशकांनी प्रसिध्द केली. डैलिना, सिक्वेन्स, गंधर्व मोहिनी ही त्यांची पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मनोहर, अपराध, पाठलाग, धनंजय यासारख्या मासिकातून साप्ताहिकातून लिहित लिहित हा लेखक रसरंग, चंदेरी यासारख्या चित्रपटविषयक पण साहित्यिक मूल्य असलेले एक वेगळे साहित्य मराठी साहित्य, साहित्य शारदेच्या मंदिरात अर्पण करून महायात्रेला निघून गेला. ” प्रसार माध्यमांनी दखल घ्यावी” अशी त्यांची प्रतिभा असूनही केवळ पुणे-मुंबई येथील राहणारा नसल्यामुळेच उपेक्षिला गेलेला हा एक भावुक व सह्दयाचा लेखक….

“विदा – ए – दोस्त,
चूप हूं तो नाहक लोक हसते है,
बहार आकर चली जाये,
तो किसीको गम नही होता”
असे सांगतच या दुनियेतून निघून गेला.

– पद्माकर पाठक, सातारा