कथा बिनाका गीतमालाची


चित्रपट गीतांच्या सुवर्ण युगाची समाप्ती!

असे म्हणतात १९६० साल संपतासंपता हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटगीतांचेही सुवर्णयुग संपले. एक सहज म्हणून जरी त्या दशकावर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की त्या एकाच दशकात एकाचवेळी एकापेक्षा एक सरस असे गायक, संगीतकार, आणि गीतकार कसे निर्माण झाले? हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. आणि या सर्व कलावंतांनी आपल्या कलेतील उत्कृष्टातील उत्कृष्ट असे या दशकातच सादर केले. प्रत्येक जण टॉपवर होता आणि उत्कृष्ट अशी गीतनिर्मिती करत होता. या दशकातील ही निर्मिती बघून असे वाटते की, ढीगभर हिरे परमेश्वराने या दशकासाठी साठवून ठेवले होते आणि या दशकातच त्याने ते उधळले. त्यांचा वर्षाव आपणावर केला. यातील प्रत्येक हिरा मूल्यवान आणि तेजस्वी होता. त्याच्या कलेच्या प्रकाशाने हिंदी चित्रपटातील संगीतसृष्टी झळाळून उठली होती.

संगीतकारांमध्ये शंकर जयकिशन, नौशाद, एस.डी.बर्मन, अनिल विश्वास, ओ.पी नय्यर, रवी, रोशन, मदन मोहन, सी.रामचंद्र, वसंत देसाई, हेमंतकुमार, कल्याणजी-आनंदजी, एन. दत्ता, एस. एन. त्रिपाठी, चित्रगुप्त, सलील चौधरी, गुलाम मोहम्मद, दत्ताराम अशा सा-याच संगीतकारांनी स्मरणीय अशा मधुर चालीचे संगीत निर्माण केले. त्यांच्या संगीताला चारचांद लावला गीतकारांनी आणि त्यांच्या गीतांचे ‘चीज’ केले गायक-गायिकांनी. गीतकारांनी या दशकात लिहिलेली गीते केवळ गीते नव्हती, तर एक मधुर काव्य होते. उत्कृष्ट व प्रसंगानुरूप लिहिलेल्या त्या काव्यांमध्ये अर्थपूर्ण, आशयसंपन्न व भावदर्शी शब्दरचना होती. सारेच सरस होते. शकील, साहिर, शैलेंद्र, हसरत, मजरूह, प्रदीप, भरत व्यास, राजेंद्र कृष्ण, प्रेमधवन, पी.एल.संतोषी, कमर जलालाबादी, फारूक कैसर, जाँ निसार अख्तर, कैफी आजमी, एस. एच. बिरारी, असे सारे गीतकार शब्दसुमनांजली, काव्यांजली उधळीत गेले आणि ती मधुर वासाची फुले महमद रुफी, मुकेश, किशोर कुमार, मन्नाडे, हेमंतकुमार, तलत अझिझ, महेंद्र कपूर, रामचंद्र चितळकर तसेच लता आणि आशा, गीता दत्त, शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, सुरैय्या यांनी आपल्या मधुर स्वरांची भर घालून रसिकांपर्यंत पोहोचवली.

१९६०चे असे हे दशक संपले. १९६१ साल सुरू झाले. कोणताही काळ संपला तरी त्याच्या काही खुणा या मागे राहतातच. १९६१ साल सुरू झाल्यावरही आधीच्या सुवर्ण काळाच्या काही खुणा मागे राहिल्या. त्यातून उत्कृष्ट गीतांची निर्मिती होत गेली आणि ती बिनाकाच्या नव्या वार्षिक कार्यक्रमातून दिसून आली. अर्थात याही कार्यक्रमात आजही आपणाला ‘छान’ वाटणारी गीते सामील होऊ शकली नव्हती. ती गीते पुढीलप्रमाणे होती.

मोरी छम छम बाजे पायलिया आणि गोरी घूंघट में मुखडा, ये मौसम रंगीन समा आणि साज बजता रहे (मॉउर्न गर्ल), एक वो भी दिवाली थी (नजराना), प्यासे पंछीचे शीर्षकगीत पुछो ना हमे (मिट्टीमें सोना), जबसे तुम्हे देखा है (घराना), कोई प्यार की देखे जादुगरी (कोहिनूर), ऑसू समझके क्यू मुझे (छाया), वो भूली दास्ताँ (संजोग), मचलती आरजू (उसने कहा था) अशा या छान गीतांपेक्षा अधिक छान गीते घेऊन बुधवार दि. २० डिसेंबर १९६१ रोजी बिनाका गीतमालेच्या नवव्या वार्षिक कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला. त्यामध्ये १९६१ सालातील उत्कृष्ट अशा पुढील १७ गीतांचा समावेश होता.

३२. छोडो कलकी बाते – हम हिंदूस्थानी
३१. ओ बंसती पवन पागल – जिस देश मे गंगा बहती है.
३०. दादी अम्मा, दादी अम्मा मान जाओ – घराना
२९. बाजी किसीने प्यार की – नजराना
२८. हमे काश तुमसे मुहब्बत – मुगल-ए-आझम
२७. दो हंसो का जोडा – गंगा-जमुना
२६. जब प्यार किससे होता है – जब प्यार किससे होता है
२५. तेरे दुनियासे दूर – जबक
२४. दो सितारों का जमींपर – कोहिनूर
२३. हमारी याद आएगी – हमारी याद आएगी
२२ नीली नीली घटा – हम हिदुस्थानी.
२१. तूम रूठी रहो-आस का पंछी
२०. हा दिवाना हूँ मै – सारंगा
१९. बिखरा के जुल्फे – नजराना
१८. तस्वीर तेरी दिलमें – माया
१७. सिगांपूर चित्रपटाचे शीर्षक गीत
१६. बेगानी शादीमे – जिस देश में गंगा बहती है

१९६१ मधील या १७ गीतांपेक्षा अधिक उत्कृष्ट आणि जास्त लोकप्रिय अशा १५ गीतांना सादर करणारा बिनाका गीतमालाचा १९६१ च्या वार्षिक कार्यक्रमाचा दुसरा भाग दि. २७ डिसेंबर १९६१च्या बुधवारी प्रसारित झाला. कोणती आहेत ही १५ गीते या उत्सुकतेपोटी रसिक लोक रेडिओला कान लावून बसले होते तेव्हा त्यांना ही गीते ऐकायला मिळाली.

१५. मधुबन में राधिका नाचे रे – कोहीनूर – नौशाद, शकील, रुफी व अमीर खाँ.
१४. मैं खुशनसिब हूं मुझको किसीका – टॉवर हाऊस – रवी, असद भोपाली, लता-मुकेश.
१३. इतना न मुझसे तू प्यार बढा – छाया – सलील चौधरी, राजेंद्रकृष्ण, तलत-लता.
१२. कभी खुदपे कभी हालातपें – हम दोनो – जयदेव, साहिर, रुफी.
११. होटोपें सच्चाई रहती है – जिस देश मे गंगा बहती है – शंकर-जयकिशन, शैलेंद्र, मुकेश,
१०. हुस्नवाले तेरा जबाब नही – घराना – रवी, शकील, रफी.
९. सांरगा तेरी यादमें – सारंगा – सरदार मलिक, भरत व्यास, मुकेश.
८. कोई हमदम न रहा – झुमरू – किशोर, मजरूह, किशोर.
७. इक सवाल मैं करू – ससुराल – शंकर-जयकिशन, शैलेंद्र, रफी-लता-साथी.
६. दिल मेरा एक आस का पंछी – आस का पंछी – शंकर-जयकिशन, हसरत, सुबीर सेन.
५. मतवाली ऑखोवाले – छोटे नवाब – आर.डी.बर्मन, शलैंद्र, लता-रफी.
४. मेरा नाम राजू घराना अनाम – जिस देश मे गंगा बहती है – शंकर-जयकिशन, शैंलेंद्र-मुकेश.

आणि या १२ गीतांनंतर १९६१ मधील सर्वात जास्त लोकप्रिय अशी तीन गीते कोणती व ती कोणत्या चित्रपटातील असणार? ही उत्सुकता रसिकांना लागली. तसे पाहता या १५ गीतांपैकी १२ गीतांकडे आपण पाहिले तर चार गीते शंकर-जयकिशन यांचीच दिसून येतात. तसेच जिस देश मे गंगा बहती है ची दोन गीते या बारा गीतात दिसून आली. असे असतांना टॉपची तीन गीते- कोणती उरली असणार? लोकप्रियेतेने तिस-या क्रमांकावर व पहिल्या क्रमांकावर शंकर-जयकिशनच्याच गीतांना नेऊन बसवले तर पहिल्या व दुस-या गीतात मोहम्मद रफीचाच स्वर होता आणि जयदेवसारख्या दुर्लक्षित संगीतकाराने बाजी मारून दुसरा क्रमांक मिळविला.

हो ती तीन गीते अशी आहेत- क्रमांक ३ वर ‘जिस देश मे गंगा बहती है’ याच चित्रपटातील ”हा मैंने प्यार किया” हे लता मंगेशकर यांनी साथींच्या बरोबर गायलेले हसरतचे गीत होते. तर दुस-या क्रमांकावर ”अभी ना जाओ छोडकर” ही रफी-आशा यांच्यातील ‘हम दोनो’ चित्रपटातील लाडीगाडी होती. ते गीत साहीरने लिहिलेले आणि १९६१ चे सर्वात जास्त लोकप्रिय गीत ‘ससुराल’ चित्रपटातील हसरतने लिहिलेले, रफीने गायलेले, “तेरी प्यारी प्यारी सुरत को” अशी शब्दरचना असलेले होते.

– पद्माकर पाठक, सातारा