सुकन्या कुलकर्णी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी एक हरहुन्नरी कलाकार

१. भरत या क्षेत्रातील तुझ्या कारकिर्दीचा श्रीगणेशा कसा झाला?
कारकिर्दीची सुरवात ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या लोकनृत्याच्या कार्यक्रमातून झाली. दिवंगत श्री. मंगेश दत्त हे माझ्या भावाचे खास मित्र होते. त्यांच्याच ओळखीतून मी लोकधारा कार्यक्रमात १९८५ पासून काम करायला लागलो. या कार्यक्रमात गण, गवळण, बतावणी असे प्रकार असायचे. त्यामध्ये ‘पंच लेव्हल’ला आम्ही बरेच काही करायचो. धमाल प्रकार करायचो. लोकधारा कार्यक्रमामुळे मी, केंदार शिंदे (शाहीर साबळयांचा नातू), अंकुश चौधरी, संतोष पवार असा एक ग्रुप तयार झाला. आमचा हा ग्रुप लहान सहान कार्यक्रम करू लागला.

२. मग नाटक, एकांकिका इथपर्यंत कसा कसा आलास?
Bharat Jadhavआमच्या याच ग्रुपने एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायला सुरवात केली. पण नंतर समजलं की आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांना चांगले प्रेक्षक व परिक्षक दोन्हीही लाभतात. मग ठरवलं की महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आणि आम्ही, म्हणजे मी व अंकुश चौधरीने परळच्या ‘महर्षी दयानंद महाविद्यालया’त प्रवेश घेतला. नंतर लगेचच महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये देवेंद्र पेमची ‘प्लॅन्चेट’ नावाची एकांकिका सादर केली. त्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार मिळाला, जवळजवळ दहा वर्षांनी त्यावेळी ‘महर्षी दयानंद कॉलेज’ ने पुरस्कार खेचून आणला. नंतर देवेंद्र पेमनी आम्हाला ‘ऑल दि बेस्ट’ ची संकल्पना सांगितली. या एकांकिकेला आय्. एन्. टी. ला पारितोषिक मिळाले. चंद्रकांत कुलकर्णी व महेश मांजरेकर यांनी मोहन वाघ यांना, ही एकांकिका नाटक रूपात व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी गळ घातली.

३. ‘ऑल दि बेस्ट’ विषयी अजून विस्ताराने सांग ना…
मोहन वाघांनी ‘पृथ्वी थिएटर’च्या स्पर्धेत ही एकांकिका पाहिली व नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. त्यात माझी व अंकुशची निवड झाली, एकांकिकेमधील बहिऱ्याची भूमिका करणारा विकास कदम उंचीने कमी व तसा लहान दिसत असल्याने, त्याला निवडले नाही. रूईयाच्या संजय नार्वेकरची निवड बहिऱ्याच्या भूमिकेसाठी झाली. एकंदर या नाटकाचे १२६५ प्रयोग मी केले. पण नंतर नंतर कंटाळा आला. ‘ऑल दि बेस्ट’मधील माझी भूमिका मुक्याची. प्रयोग खूप केले. मेहेनतही भरपूर केली. पहिल्या पाचशे प्रयोगादरम्यान सारखे शो व दौरे. यामुळे माझं तर घराकडेही लक्ष नव्हतं. एक महत्त्वाची घटना म्हणजे, शिवाजी मंदिरमध्ये शो असताना, मेकअप् रूममध्ये मागून कोणी असंच बोलताना म्हटलं की, ‘तो काम चांगलं करतो रे, पण त्याचे ‘डिक्शन’ कसे असेल काही, सांगता येत नाही’. माझा आवाज व उच्चार प्रेक्षकांपर्यंत गेलेले नाहीत, हे पटकन् माझ्या ध्यानी आलं. खरं तर जरा त्रासही झाला. तेंव्हा मला वाटलं की काहीतरी वेगळं करावं. त्याच दरम्यान केदारने ‘आमच्यासारखे आम्ही’ लिहीलं. लता नार्वेकरांनी आम्हा तिघांना घेऊन हे नाटक करायचं ठरवलं.

४. ‘आमच्यासारखे आम्ही’ चा अनुभव कसा होता?
छान होता. लताबाईंनी या नाटकाच्या जाहिराती फार छान कल्या. ‘जेंव्हा मुका बोलतो, तेंव्हा…’ वगैरे… त्याचा नाटकाला बराच फायदा झाला. या नाटकातील सुरवातीच्या सीनमध्ये आवराआवरी करत असताना, माझ्या हातून वस्तू पटापट पडतात. मग मी वाक्य टाकायचो, ‘मला वाटलंच, की मी बोललो की गोंधळ होणारच. ह्यासाठी मी मुका होतो.’ हे नाटकपण खूप चाललं.

५. अभिनय करताना संवादच जास्त महत्त्वाचे असतात असं तुला वाटतं का?
Bharat Jadhav असंच काही नाही, पण ‘ऑल दि बेस्ट’मधून एक गोष्ट मात्र निश्चितपणे सामोरी आली, की, कारकिर्द म्हणून अभिनयाचे क्षेत्र निवडल्यावर, पहिलीच भूमिका मुक्याची करण्यात गैरफायदा होऊ शकतो. खरं तर मुक्याचा अभिनय कठीण आहे. आवाजातील चढ-उतार खूप मोठं साधन असतं. मुक्या माणसाला भावना दाखविताना हावभावांवरच विसंबून राहावं लागतं. पण संवाद फक्त जास्त असले म्हणजेच भूमिका चांगली असं समीकरणही मला मान्य नाही. ‘अंधांतर’चं उदाहरण देतो. अंधांतरचं स्क्रिप्ट वाचल्यावर प्रश्नात पडलो की, भूमिका करावी अथवा नाही? कारण या नाटकात मला बोलण्यासाठी मोजकीच वाक्यं होती. सगळयात मोठा सीन हा कॉमेंन्ट्रीचा होता. पण भूमिकेचं महत्त्वं लक्षात घेता, मी हे नाटक स्वीकारलं. लेखक जयंत पवार आणि मंगेश कदम यांनी मला खूप मदत केली. विशेष म्हणजे, याच नाटकासाठी मला सर्वात जास्त पारितोषिकं मिळली. या नाटकानंतर, श्रीमंत दामोदर पंत, तू तू मी मी ही नाटके केली. गजेंद्र अहिरे यांचं ‘जन्मसिध्द’ हे नाटक केलं. नाटक चांगलं होतं, पण ते चाललं नाही. माझी ‘जन्मसिध्द’मधील भूमिका एका बी. सी. कॅन्डीडेटची होती. नंतर प्रदीप पटवर्धन बरोबर, ‘चल् काहीतरीच काय’ केलं. नंतरचं माझं व्यावसायिक नाटक म्हणजे, ‘पैसाच पैसा’ पण ते फसंल. हे असं होतच राहतं. ग्राफ वर-खाली होतोच.

६. टि. व्ही. सिरियल्सचा विचार केला नाहीस का कधी?
हो. प्रतिमा कुलकर्णी यांनी मला ‘नंदू’ची भूमिका दिली. अल्फावरील ‘प्रपंच’या मालिकेतील ही भूमिकासुध्दा लोकांना खूप आवडली. आणि त्यानंतरचा मोठा प्रॉजेक्ट म्हणायचा तर ‘सही रे सही’ हा आहे.

७. सही रे सही हे काय आहे?
मी काम करत असलेलं ‘पैसाच पैसा’ विशेष चाललं नाही. केदारचंही ‘विजय दीनानाथ चव्हाण’ नावाचं नाटक अपेक्षेप्रमाणे चालत नव्हतं. मिळून काहीतरी करायचं असं आम्ही ठरवलं. ‘सही रे सही’ मध्ये संपत्तीच्या लोभाकरिता प्रत्येक नातलग नायकाच्या चेहऱ्याशी साम्य असलेली व्यक्ति शोधतो, व त्यातून उद्भवणारे मजेशीर किस्से या नाटकामध्ये आहेत. या नाटकाबद्दल केदार शिंदे खूप आत्मविश्वासाने बोलत होता. जवळजवळ सव्वा महिना दुसरं कुठलंही काम न करता, आम्ही फक्त याच नाटकाचा सराव करीत होतो.

८. सही रे सही करताना प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभ्यास केलास का?
हो. भरपूर केला. आता गलगले नावाचा जो रोल मी करतो, तो माणूस मनातील वाक्य बोलतो. असा एक प्रत्यक्षातला मनुष्य पुढयात आहे, असं मी ऐकून होतो, त्याच्या लकबी, हावभाव- एकंदर ‘गेश्चर’ या नाटकात चपखल बसलं.

९. सही रे सहीचं कौतुक खूप लोकांनी केलं असेल ना?
हो. पण सगळयात जास्त कौतुक परेश रावल ने केलं. साजीद खानने सुध्दा हे नाटक पाहिलं. त्याला ते खूप आवडलं. यांच्यासारखीच साजिद नाडीयादवालांनी देखील कौतुकाची थाप पाठीवर दिली. एकूणच या नाटकाने भरपूर काही दिलं.

१०. प्रत्यक्ष सादरीकरण म्हणजे, नाटक आणि कॅमेरा हे माध्यम यामधील तुमच्या दृष्टीने कठीण माध्यम कोणतं?
माझ्या मते, सिरीयल किंवा कॅमेरासमोर कला सादर करणे, हे कठीण माध्यम आहे. ऍक्शन-रिऍक्शनचा विचार करता ते कठीण आहे. नाटकात तुम्ही केलेल्या कामाला प्रेक्षकांची त्वरित दाद मिळते. सिरियल व चित्रपटाच्या माध्यमात काम करताना, आपण अमूक एक रित्या ऍक्ट केलं तर प्रेक्षक कसे रिऍक्ट होतील याचा विचार करून अभिनय करावा लागतो.

११. चित्रपट, सिरियल्स तसेच नाटक या दोन्ही गोष्टी तू कशा सांभाळतोस?
वेळापत्रक नीट आखलेलं असलं की तसा काही प्रश्न येत नाही. काही वेळा थोडा त्रास होतो पण व्यावसायिकता सांभाळायची म्हणजे या गोष्टी त्याचाच एक भाग होऊन जातात.

१२. भरत, तू बऱ्याचशा विनोदी भूमिका केल्यास. गंभीर भूमिकांचा विचार तू केला आहेस का?
विनोदी भूमिका जास्त केल्या आहेत, ही गोष्ट खरी आहे, परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे ‘अंधांतर’मधील माझी भूमिका गंभीर होती. एक कलाकार म्हणून मला हे ठाऊक आहे की मी सगळया प्रकारच्या भूमिका करू शकतो. एक आठवण म्हणून सांगतो, ‘मी माझ्या मुलांचा’ हे विक्रम गोखले यांचे नाटक बघताना मी अक्षरश: रडलो होतो. कलाकार म्हटलं की अभिनयाचा चोवीस तास अभ्यास करावा लागतो. सिरियस रोल समजून घ्यावा लागतो. पॉझेस् वर्क आऊट करावे लागतात. प्रत्येक भूमिका आपल्यातल्या कलाकाराला एक आव्हान असते. ‘ऑल दि बेस्ट’मध्ये मी मुका आहे. नायिकेला मी ‘आय् लव्ह यू’ हे सांगण्यासाठी धडपडत असतो. बोलता तर येत नाही. हावभावांनी सांगायचा प्रयत्न सुरू असतो. प्रेक्षकांना या सीनमध्ये इतकी ‘सिंपथी’ वाटते, हीच तुमच्या अभिनयाला लोकांनी दिलेली दाद… असं मला वाटतं. कलाकाराने नाटकाची ‘थिम’ काय आहे, हे समजून नाटक करणे आवश्यक आहे. वहावत जाण्यात काही अर्थ नसतो.

१३. विनोदी नाटकामध्ये उत्स्फूर्तता असल्याने कधी कधी कलाकार बऱ्याच ऍडिशन्सही करतात. यावर तुझं मत सांगशील?
Bharat Jadhav या ‘ऍडिशन्स’ तालीम सुरू असतानाच ‘वर्क आऊट’ कराव्यात. दिग्दर्शकाला, ‘हे इथे असं घेऊ का? वाक्य अशा ऐवजी असं टाकावं का?’ हे सर्व विचारून घ्यावं लागतं. बऱ्याच वेळेला प्रयोग सुरू असताना देखील काही गोष्टी सुचतात. विश्वचषकाच्या भारत विरूध्द पाकिस्तान सामन्याच्या वेळी आमचा प्रयोग दादरच्या ‘शिवाजी मंदिर’ला होता. ‘सही रे सही’ चा लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेही या प्रयोगाला हजर होता. भारत जिंकायच्या मार्गावर होता. आम्ही ठरवलं होतं की भारत जिंकला, हे बाहेरच्या फटाक्यांच्या आधी नाटकातूनच लोकांना सांगायचे. आम्ही दोघांनी खूप विचार केला. मग योग्य त्या सिच्युएशला मी भारत जिंकला हे लोकांपर्यंत पोहोचवंलं. थिएटरमध्ये एकच जल्लोष झाला.

१४. कधी ऐतिहासिक नाटक करण्याचा विचार मनात येतो का?
तुम्ही ज्या ऐतिहासिक व्यक्तिची भूमिका कराल त्या व्यक्तिची लोकांच्या मनात एक इमेज असते. जरा देखील चूक झाली किंवा, दिसणे, पेहेराव या गोष्टींमध्ये उणीवा राहून गेल्या तर प्रेक्षकांना ते पसंत पडत नाही. तेंव्हा या क्षणी तरी ऐतिहासिक नाटक करणं, मला जरा रिस्की वाटतं.

१५. मराठी चित्रपट सृष्टीबद्दल काही करावसं वाटतं का?
आमच्याकडे काही कथा आहेत. संकल्पना आहेत. पण काय आहे की, तसं फायनान्स करायला कोणी पुढे येत नाही. पण एक नक्की, की चित्रपट काढलाच तर, आम्हाला विनोदी चित्रपट काढायला आवडेल.

१६. कलाकाराला सामाजिक बांधिलकीची जाणीव किती असते?
कलाकारांच्या स्वभाव भिन्नतेवर ते अवलंबून आहे. खरं तर अशी बांधिलकी कलाकाराला वाटायला हवी. सामान्य माणसांप्रमाणेच जें काही घडतंय त्याची झळ आम्हाला देखील पोहोचतेच की! आमच्या मार्गाने, कलेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत अवश्य काही चांगलं पोहोचवायचा प्रयत्न करीत असतो. आता तुम्ही जर ‘हसा चकट फू’ पहात असाल तर, त्या सिरियलद्वारे आम्ही अनेक सामाजिक समस्या विनोदाच्या अंगाने लोकांपर्यत पोहोचवतो.

१७. मानधनाच्या बाबतीत या क्षेत्रात तुमचे काय अनुभव आहेत?
मानधन हा मी कधीच वादाचा मुद्दा करीत नाही. खरं सांगायचं तर, मानधनासाठी कधीही निर्मात्यांकडे मी मिटिंगसुध्दा घेतली नाही. माझं काम बघून निर्माते आपसूकच माझं मानधन वाढवतात. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहीलो की, आपोआप सर्व योग्य तेच होतं.

१८. तू कलाकार झाला नसतास तर काय झाला असतास?
बी. ई. एस्. टी. चा कंडक्टर! अरे खरंच सांगतो. माझ्याकडे बॅचसुध्दा आहे. त्यावेळी आमच्या घरची परिस्थितीच तशी होती. वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. नोकरी हवीच होती. आणि बी. ई. एस्. टी.त काय असतं, तुमची नाटकांची हौस तुम्ही भागवू शकता. पण योगायोगाने त्याच दरम्यान मला ‘ऑल दि बेस्ट’ मिळालं. शेवटी एक कुठलं तरी ‘बेस्ट’ नशीबात होतं म्हणायचं. एक मात्र आहे. मी माझ्या आई-वडीलांचा आशीर्वाद मानतो. आम्ही मूळचे कोल्हापूरचे. आमच्यासाठी आई-वडीलांनी मुंबईला यायचं ठरवलं. इथे आणून आम्हाला शिक्षण दिलं. समाजात कसं वागायचं ते त्यातूनच शिकलो. त्यांच्यामुळेच इथवर प्रवास झाला हे खरं आहे.

१९. भरत, या सगळया धावपळीच्या आयुष्यात लग्न वगैरे केंव्हा केलंस?
Bharat Jadhav माझं ‘अरेंज मॅरेज’ आहे. ऑल दि बेस्ट करीत असताना, माझ्या मोठया वहिनीने, माझ्या पत्नीशी, सरिताशी माझी ओळख करून दिली. तिला, मी सर्व परिस्थिती समजावून सांगितली. ती बी. एम्. सी. मध्ये डॉक्टर आहे. माझ्या व्यवसायाचे, व्यस्त जीवनशैलीचे स्वरूप समजल्यानंतरही तिची पसंती होती. मग आम्ही लग्नं केलं मी घराबाहेर असताना, घराची पूर्ण जबबादारी सरितावर व माझ्या सासूबाईंवर पडते. सरिता चोखपण सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. मुलांचे संगोपन फार चांगल्या तऱ्हेनं करते. त्यामुळे घराबाहेर असताना, मला घरचं टेन्शन कधीच नसतं.

२०. भरत तुझे आवडते कलाकार तसेच आवडते खेळाडू कोणते?
अमिताभ बच्चन, कमलहसन, आमिर खान, दिलीप प्रभावळकर हे कलाकार मला आवडतात. सचिन तेंडुलकर हा माझा आवडीचा खेळाडू आहे.

२१. भरत, तुला तुझ्या चाहत्यांना काही सांगावसं वाटतं का?
मी असाच प्रामाणिकपणे काम करणार आहे. मेहेनत घेत राहणार. चांगल्या काळात चाहते सदिच्छा व्यक्त करतात, तशाच, माझ्या पडत्या काळातही प्रेक्षकांचे आशीर्वाद प्रार्थनीय आहेत.

धन्यवाद.