“तुम्ही चाल आधी तयार करून त्यात कवीला शब्द कोंबायला सांगता की, आधी काव्य घेऊन नंतर त्याला चाल लावता?” असा प्रश्न एका मुलाखतीत संगीतकार सी. रामचंद्र यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोक भाषेतच सांगितले.
“मी नेहमीच काव्य आधी अभ्यासून घेऊन चाल लावीत आलोय. उलट प्रकार कसा काय होऊ शकतो हेच मला समजत नाही! उद्या डॉ. श्रीराम लागू म्हणू लागले की माझ्या अभिनयाला अनुसरूनच संवाद द्या तर योग्य होईल का? नाटककाराचे शब्द जास्तीत जास्त प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यत पोहोचवणे हे अभिनेत्याचे काम. तोच प्रकार आमच्या संगीत क्षेत्राचा आहे. शेवटी कंपोझिंग म्हणजे काय? तर कवीच्या शब्दांना चालीत बांधणे म्हणजे कंपोझिंग. उलटी गंगा वाहायला लावणे अनैसर्गिक आहे मला ते मुळीच मान्य नाही.”
सी.रामचंद्र यांचे उत्तर हे त्यांच्या स्वभावानुसार होते, पण तरीही ‘अलबेला’ मधील ‘भोली सुरत….’ या लोकप्रिय गाण्याच्या चालीची जन्मकथा, हकीकत विलक्षणच आहे. ‘अलबेला’ निर्मिती अवस्थेत होता. त्यातील गाण्यांच्या चाली याविषयी बोलत सी. रामचंद्र आणि त्यांचे मित्र मास्टर भगवान एका रात्री पायीच फिरत फिरत रणजीत स्टुडिओकडे चालले होते. पलीकडेच झोपडपट्टी होती. तिथे लग्न होते. गाणे बजावणे रंगात आले होते. ‘भोली सुरत…’ चे प्राथमिक अवस्थेतील सूर त्या गाणे बजावण्यातूनच सी. रामचंद्र यांना सुचले. एक जण जे वाद्य बडवत होता त्याचा प्रभाव झिंग आणणारा होता. त्या गाण्याची सगळी नशा त्या ठेक्यात होती. ती नशा डोक्यात ठेवूनच सी. रामचंद्र घरी गेले.
दुस-या दिवशी ‘भोली सूरत…’ ची चाल त्यांनी घासूनपुसून तयार केली, पण वाद्यवृंदातील वादकांकडून त्या गावरान ठेक्याचा पंथ काही केल्या मिळत नव्हता. शेवटी सी. रामचंद्र गाडी घेऊन त्या माणसाला शोधायला स्वत: बाहेर पडले. तो आपल्या कामाला गेला होता, पण तीन तासांनंतर त्यांनी त्याला शोधून काढले. गाडीत घातले व त्याला स्टुडिओत घेऊन आले. रेकॉर्डिंग म्हणजे काय हे त्याला माहित नव्हते. त्यामुळेच तो एवढया जोरात बडवू लागला की त्यामुळेच रेकॉर्डिग अशक्य झाले. सी. रामचंद्र यांनी शेवटी त्याला स्टूडिओच्या बाहेर जाऊन वाजवायला सांगितले आणि हवा तसा रिझल्ट मिळविला. त्या माणसाचे आयुष्यातील ते पहिले आणि शेवटचे रेकॉर्डिग.
कालच्या चित्रपटगीतांच्या चाली या अशाही तयार होत असत, बांधल्या जात असत आणि एखाद्या ‘पंच’साठी संगीतकार ते मनाजोगे होईपर्यंत पुढे जात नसत. कष्ट घेऊन ते मनासारखे करीत असत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या चित्रपट संगीताचा, संगीतकाराचा विचार केला तर? …तो विषय वेगळा आहे. सी रामचंद्र यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहित आहे. म्हणूनच त्यांच्या एका सुमधूर चालीच्या गीताचा आस्वाद घेऊ या.
एकल (सोलो) गीते अण्णांनी जेवढी उत्कृष्ट दिली आहेत तेवढीच त्यांची द्वंद्व गीते पण मधूर चालीची होती व आजही ती ऐकाविशी वाटतात. १९५१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सगाई’ हा चित्रपट तसा विनोदी चित्रपट प्रकारात मोडणारा होता. एच. एस. रावेलने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रेमनाथ व रेहाना हे नायक – नायिका होते. राजेंद्रकृष्ण यांच्या गीतांना सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेली नऊ गीते तयार झाली होती. ‘चिक चॉकलेट’ हा पुढे संगीतकार झालेला कलावंत या चित्रपटाच्या संगीताच्यावेळी सी.रामचंद्र यांचा सहाय्यक म्हणून काम पहात होता. यामधील दोन द्वंद्वगीतांपैकी एक लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांनी गायलेले ‘उधर से तुम चले और हम इधर से’ हे एक गीत आणि दुसरे लता मंगेशकर व तलत महमूद यांनी गायलेले एक द्वंद्वगीत अशी दोन गीते होती. या गीतांपैकी तलत – लताच्या एका गीताचा आस्वाद घेऊ या..
प्रीतीच्या प्रांतात कधी सुख मिळते, तर कधी दु:ख. कधी हास्य ओठावर खेळते, तर कधी नयन अश्रूंनी भरून येतात. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे असतात, पण वाटेत अनंत अडचणी असतात. त्यामधून दोघांची प्रीती कितीही प्रामाणिक असली तरी तिच्या भाळी मिलन नसतेच. कुठेतरी तुकडया तुकडयांनी सुख मिळते. या प्रकारामुळे ओठावर शब्द येतात. बघा आम्ही कसे जीवन जगलो, या प्रेमाच्याबाबतीत काय घडले तर…
तो म्हणतो,
मुहब्बतमें ऐसे जमाने भी आए
कभी रो दिये हम कभी मुस्कुराए
आणि त्याला साथ देत ती पण याच दोन ओळी म्हणते. गाण्याचे धृपद पूर्ण होते.
बघा ना, या प्रेमामध्ये कसे दिवस आमच्या वाटयाला आले. कधी आम्हाला अश्रू ढाळायला या दिवसांनी भाग पाडले, तर कधी हास्याची लकेरही (क्वचितच) वाटयाला आली. ते गीत पुढे नेताना ती म्हणते,
मुहब्बतकी ऑखोंके अश्कोंको चुनकर
किसीने पलकपर सितारे सजॉए
मुहब्बतमें ऐसे जमाने भी आए
आमच्या प्रेमभरल्या नेत्रातील अश्रूंना निवडून आम्ही (कधी आमच्या) पापण्यांवर (त्या अश्रूंचेच) तारे सजवले, ता-यांची सजावट केली. म्हणजे प्रेमात दु:ख वाटयाला आले तरी ते त्याच्या प्रेमामुळे आले. त्यामुळेच आम्ही ते स्वीकारले, मिरविले, ही उपमा वापरून ती या कडव्यात सांगते तेव्हा तो ध्रृपदाची ओळ गुणगुणतच म्हणतो,बनाया था एक आशिया दो दिलोंने जमानेकी ऑधीने तिनके उडाये मुहब्बतमें ऐसे जमाने भी आये.
(आमच्या दोघांच्या) दोन मनाने प्रीतीचे कसे एक छान निवासस्थान, घरटे (आशिया) तयार केले होते. (पण हाय रे दुर्देवा) या जगाच्या, समाजाच्या ( विरोधाच्या) वादळाने आमच्या त्या घरटयाच्या सर्व काडया उडवून लावल्या. आमच्या प्रीतीचे घरटे उद्ध्वस्त केले.
असफल प्रीतीचे हे गान पुढे नेताना अखेरच्या टप्यावर ती म्हणते,
मुहब्बत चुकी है तो फरियाद लाकर
मुहब्बतपे इल्जाम आने ना पाए
मुहब्बतमें ऐसे जमानेभी आए
कभी रो दिये हम कभी मुस्कुराए
(आता आपली ही) प्रीती संपली आहे, व्यर्थ ठरली आहे, निष्फळ झाली आहे. (म्हणून आपण एक) प्रार्थना (आपण करू या की, ज्या योगे या आपल्या सच्चा) प्रीतीवर कोणतेही आरोप केले जाऊ नयेत.
(खरोखर, बघा ना की) प्रेमात आम्हाला कसे दिवस आले? की आम्ही कधी सुखावलो आणि (आता) दु:खही आमच्या वाटयाला आले. असफल प्रेमिकांच्या ह्दयाची स्पंदने गीतकार राजेंद्रकृष्ण यांनी मोजक्या पण प्रभावी शब्दात व्यक्त केली आहेत आणि सी. रामचंद्र यानी पण ती संगीतात बांधताना किती छान चाल लावली आहे. सुरेख पण मोजक्याच वाद्यांचा मेळ कसा सुंदरपणे साधला आहे. एकाच चित्रपटात एक द्वंद्वगीत रफींकडून व एक तलतकडून गाऊन घेतले आहे. कारण गीताचा, त्यातील शब्दांचा आशय, या गीतातील विध्द ह्दयाच्या भावना तलतच्याच आवाजात किती प्रभावी वाटतात. मखमली स्वरांचा हा जादूगार व त्याचाच स्वर संगीतात गुंफणारा सी. रामचंद्र यांच्यासारखी पारखी नजरेच्या संगीतकार या सर्वांच्या एकत्र परिणामांमुळेच हे गीत कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा एकदा ऐकावेसे वाटते.
– पद्माकरजी पाठकजी, सातारा