मुलाखत – डॉ. अलका देव-मारुलकर
पंचवीस वर्षांहून अधिक काळापासूनची संगीताची अखंड साधना म्हणजे ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. अलका देव-मारुलकर… संगीत क्षेत्रातील दोन अत्यंत मानाच्या पुरस्कारांनी अलकातार्इंना नुकतेच सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल त्यांच्याशी साधलेला हा संवाद…
गीतांमधील आशयघनता सध्या कमी झाली आहे?
‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत’ तसेच काशी संगीत समाज व ‘आयसीसीआर’ यांचा ‘संगीतशिरोमणी’ असे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले, त्याबद्दल काय भावना आहेत?
साहजिकच आनंद वाटला, मनात कृतार्थता दाटून आली. अनेक वर्षांपासूनच्या साधनेची कदर झाल्यासारखे वाटले; पण या संगीतसाधनेत माझ्या गुरूंचे मोठे योगदान आहे. पहिले गुरू माझे वडीलच. ग्वाल्हेर, किराणा, जयपूर अशा तिन्ही घराण्यांची गायकी आत्मसात असलेले पं. राजाभाऊ देव माझे वडील. माझ्या वयाच्या चौथ्या वर्षापासून ते त्यांच्या वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत त्यांचे मार्गदर्शन लाभले, हे माझे भाग्यच. सन १९७९ ते १९९० या काळात मला दुसरे गुरू लाभले ते जयपूर घराण्याचे संगीतसाधक पं. मधुसूदन कानेटकर. त्यांची मी रूढार्थाने पहिलीच शिष्या. त्यांनी मला जयपूर घराण्याचे खास असे किमान पंचवीसेक तरी राग दिले. या दोघांनी मला रागाधिष्ठित गायकीचे सामर्थ्य मिळवून दिले. त्याची पोचपावतीच या पुरस्कारांतून मिळाली.
शास्त्रीय संगीताच्या सध्याच्या वाटचालीविषयी काय वाटते?
प्रतिभेची उणीव पूर्वीही नव्हती आणि आताही नाही. फक्त त्यासाठीचा ध्यास कमी पडतो आहे. पूर्वीसारखी शिक्षण घेण्याची, स्वत:चा विकास करवून घेण्याची वृत्ती कमी होत चालली असून, कलेकडे व्यवसाय म्हणून पाहण्याकडे कल वाढू लागला आहे. दुर्दैवाने या क्षेत्रातही लॉबीज् तयार होत आहेत. तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवायचे, मग पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला बोलावू, यासारख्या अलिखित नियमांमुळे या साखळीबाहेरचे कलावंत बाहेरच राहतात. आर्थिक सुरक्षिततेसाठी कलावंत हे करीत असले, तरी त्यातून दर्जा राहत नसल्याने काळजी वाटते.
शास्त्रीय संगीतात रागरस व रागसमय यांची बंधने झुगारून दिल्यास कितीतरी राग पुनर्जीवित होतील, असे मत डॉ. प्रभा अत्रे मांडत असतात. त्याबद्दल काय?
परंपरागत दृष्टिकोनातून पाहिल्यास उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत वेगळे आहे. कर्नाटक संगीतात अशी बंधने नाहीत. त्यात रागांची निर्मिती सप्तकातून होते. तेथे स्वरांना केंद्रस्थानी मानले गेले आहे. उत्तर हिंदुस्थानी संगीतात मात्र स्वरांबरोबरच स्वरसंगतीलाही मोठे महत्त्व आहे. राग ही एकप्रकारची ऊर्जा असते आणि त्यातील स्वरसंगतीचा शरीर, मन, आत्म्यावर परिणाम होतो. पूर्वी दिवस-रात्रीच्या प्रत्येक प्रहरात गायन होत असे. आता मात्र सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० अशा दोन सत्रांपुरतेच गायन सीमित झाले आहे. त्यामुळे तेच तेच राग गायिले जातात; पण गायकांनी आता त्यात लवचिकता आणली आहे. पहाटे वाजणारे राग सकाळच्या सत्रात गायल्यास हरकत नाही. सायंकाळचे राग रात्री गायल्यास चालू शकते; पण कोणत्याही रागाचे कधीही गायन करणे उत्तर हिंदुस्थानी संगीताला मान्य होणार नाही. परंपरा जपूनही आपण थोडे बदल करू शकतो; पण अगदीच फुटात बारा इंचाचे अंतर ठेवून चालणार नाही.
सध्या संगीतात ‘फ्यूजन’सारखे नवनवीन प्रयोग केले जात असून, ते लोकप्रियही होत आहेत. या प्रयोगांबद्दल काय वाटते?
‘फ्यूजन’ हा एक प्रयोग होऊ शकतो; पण ते परंपरेच्या आत येऊ शकत नाही. कर्नाटक व उत्तर हिंदुस्थानी संगीत जरी भारतीयच असले, तरी दोहोंची अभिव्यक्ती वेगळी आहे. पाश्चात्त्य आणि शास्त्रीय संगीत हे तर आणखी वेगळे. त्यांच्या फ्यूजनचे प्रयोग सध्या सर्वाधिक सुरू आहेत; पण त्यातून नेमके काय साध्य होतेय? मी स्वत:ही असे प्रयोग केले आहेत. कलेतील सर्जनशील कृती म्हणून हे ठीक आहे; पण त्याचा पायंडा पडू नये.
काळानुरूप संगीत शिक्षणात कोणते बदल झाले, असे वाटते? ते चांगले की वाईट?
तशी गुरू-शिष्य परंपरा हीच सर्वश्रेष्ठ आहे; पण आता कालौघात सामाजिक संदर्भ बदलल्यामुळे विद्यार्थी गुरूंकडे राहून शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे पूर्वीची व्यवस्था बदलून क्लास, कॉलेजमध्ये संगीत शिक्षण दिले जाऊ लागले आहे. संगीत ही मंचीय कला (परफॉर्मिंग आर्ट) आणि ‘आर्ट आॅफ एक्सलन्स’ आहे. कलेचे हे निकष पाळायचे असतील, तर गुरू-शिष्य परंपरेला संस्थांतर्गत शिक्षण हा पर्याय ठरू शकत नाही. गुरूच्या सानिध्यात घेतलेल्या शिक्षणाचा प्रभाव वेगळाच असतो. आता काही संस्था तसा माहोल तयार करीत आहेत. लोकांमध्ये याबाबत जागरूकता आली आहे; पण शिक्षणाचा कालावधी मात्र कमी होऊ शकत नाही. संगीत आत्मसात करणे ही प्रदीर्घ प्रक्रिया असते. त्यामुळे गुरू-शिष्य परंपरेतच वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी मुलांचे संगीत शिक्षण सुरू करायला हवे, म्हणजे ते तिसाव्या वर्षापर्यंत संपेल. असे संपूर्ण शिक्षण घेतले, तर त्या कलावंताला कलेची जबाबदारी समजेल आणि तिच्याबाबत बांधिलकीही येईल.
मुलाखत- सुदीप गुजराथी, नाशिक