संस्कार

योगाद्वारे आरोग्य संवर्धन

Yoga for children व्यक्तिमत्व विकास म्हणजे व्यक्तींचा सर्वांगीण विकास. त्यामध्ये आरोग्य संवर्धन, बौध्दिक संवर्धन, भावनिक संवर्धन, चारित्र्य संचर्धन असा चारही अगांनी विकास होणे आवश्यक आहे. असा सर्व स्तरावर एकत्रित विकास होण्यासाठी आपण योगशास्त्राचा अभ्यास कसा उपयोगी पडतो ते पाहणार आहोत……

खरे पाहता जन्मत: मूल वरील सर्व पातळयांवर संतुलितच असते. व ते संतुलित रहावे अशीच परमेश्वराची योजना असते. ह्याला अपवाद केवळ जनुकीय विसंगती अथवा मानसिक व शारिरीक असंतुलीत किंवा अनैसर्गिक वाढ (मतिमंद, जन्मत: अपंग) ह्यामुळे व्यक्तिमत्वात घडणारे असंतुलन. जन्मत: संतुलित असलेले व्यक्तिमत्व मूल जसजसे मोठे होऊ लागते, त्याबरोबर बाहेरच्या जगात वावरत असताना येणारे अनुभव त्यामुळे हे संतुलन बिघडण्यास सुरुवात होते. काही वेळा परस्पर विरोधी गोष्टी करावयास मुलांना सांगितल्या जातात. ह्या गोष्टी करत असताना नकळतपणे मुलांचे व्यक्तिमत्व संतुलन बिघडत असते. ते कसे बिघडते ते पाहू……

शारिरीक पातळीवर जन्म झाल्यानंतर काही काळापर्यंत बालकाचे आरोग्य चांगले राहते. जसजसे अन्न व इतर गोष्टींशी त्याचा संबंध येऊ लागला की त्याच्या आरोग्यात फरक पडू लागतो. अन्न पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात होत असेल तर मुळातच आरोग्यात कमी बिघाड होतो. पण ते योग्य प्रमाणात होत नसेल तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. मुलांमध्ये जास्त प्रमाणात सर्दी, खोकला, ताप, पोट दुखणे असे अनेक प्रकारचे आजार दिसून येतात. ह्याचे मूळ मुलांचे अन्नपचन तसेच श्वसन ह्यामुळे निर्माण होणारे असते. अशा वेळी आहार योग्य नसेल तर प्रतिकार शक्ती कमी होते. व मूल वारंवार आजारी पडते. ही प्रतिकार शक्ती दोन कारणांमुळे कमी झालेली असू शकते.

1. वातावरण व बाह्यपरिस्थिती
2. अनुवंशिकतेमुळे (जिन्स) निर्माण होणारी कमतरता.

वरील दोन्ही कारंणासांठी योगाभ्यास उत्तम उपाय आहे. अनुवंशिकतेमुळे निर्माण होणारी कमतरता दीर्घकाळ योगाभ्यासाने ब-याच प्रमाणात आटोक्यात आणता येते. जसे अस्थमा, पोटाचे विकार (कोलायटीस गॅस) इत्यादी. उदा: अस्थमा ह्या विकारासाठी वेगवेगळे श्वसन प्रकार व प्राणायम व काही प्रमाणात आसने. जी आसने श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढविणारी आहेत.

योगासने व व्यायाम (कसरत) ह्यामध्ये बराच फरक आहे. आसनाची ग्रंथांतर्गत व्याख्या ‘स्थिर सुखम् आसनम्’ ह्या सूत्राप्रमाणे आसनाच्या आदर्श स्थितीमध्ये स्थिर सुखाचा अनुभव घेतल्यामुळे शक्तिसंचय करता येतो. त्याच प्रमाणे आसनस्थिती मध्ये श्वासावर नियंत्रण होऊन प्राणवायू शरीराच्या छोटया केशवाहिन्यांपर्यंत म्हणजेच अत्यंत सूक्ष्म स्तरापर्यंत कार्यरत होतो व त्यामुळे साधकार्यात एकंदर कार्यक्षमता वृध्दिंगत होते. ही कार्यक्षमतेची वृध्दिंगत अवस्था साधकास सर्व स्तरावर प्रगतीकारक ठरते. ह्याच्या सततच्या अभ्यासाने साधकाची कार्यक्षम वृत्ती वाढीस लागते व साधक कायम यशोमार्गावर वाटचाल करतो. आसनाच्या अभ्यासामुळे शरिरात निर्माण होणारी उर्जा ही बाहेरील प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यात मदत करते.

जसे आजकालच्या जीवनात आपण वातावरणातील प्रदुषणाचा अनुभव घेत असतो. पाण्यातील प्रदुषण पचनसंस्था बिघडवते, हवेतील प्रदुषण श्वसन संस्थेवर वाईट परिणाम करते. प्रगत राहणीमानामुळे मज्जासंस्था (पाठीचा कणा), पचनसंस्था पर्यायाने उत्सर्जन संस्था व रक्ताभिसरण संस्था यामध्ये झालेला बिघाड ह्याचा परिणाम म्हणून मन फक्त शारिरीक व्याधींमध्ये अडकून राहते. पर्यायाने कला व्यासंग, मनोबल, छंद, आत्मविश्वास ह्या पैंलूंची जोपासना होत नाही. प्रगत राहणीमानामुळे निर्माण होणा-या दोषांना वेळीच आळा घातल्यास प्रगत राहणीमानाचा उपभोग घेता येऊ शकतो.

आजच्या सर्वसाधारण परिस्थितीमुळे मुले शाळा व क्लास ह्यामध्येच दिवसभर अडकलेली असतात. व राहिलेला वेळ दूरदर्शन वरील कार्टून मालिका पाहणे व कॉम्प्युटर गेम खेळणे यातच व्यस्त असतात. त्यामुळे शारिरीक लवचिकपणा कमी होतो, डोळयांची क्षमता कमी होते, मज्जारज्जूंची कार्यक्षमता कमी होते. परिणामी अगदी लहान वयापासून पाठदुखी, डोकेदुखी, चष्मा लागणे अशा अनेक प्रकारच्या विकृती निर्माण होतात.

ह्या विकृती दूर करण्यासाठी योगाभ्यासात सर्वप्रथम सूर्यनमस्काराला प्राधान्य दिले आहे. जो सर्वांगीण सुंदर व्यायाम आहे. त्याच्या अभ्यासामुळे श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्था, उत्सर्जन संस्था ह्यांच्यावर एकत्रित परिणाम होऊन त्या कार्यक्षम होतात. सूर्यनमस्कारा बरोबर पूरक हालचाल (पी.टी. चे प्रकार) संथपणे करणे आवश्यक आहे. ह्या विशिष्ट प्रकारे केलेल्या शारिरीक हालचालींमुळे आलेली सहजता, त्याचप्रमाणे आसनात स्थिर झाल्यामुळे मानसिक स्थिरता निर्माण होते. त्यामुळे एकाग्रता आणि मानसिक शांतता ह्यांचा अनुभव मुलांना नकळतपणे येऊ लागतो. ह्याला जोड म्हणून काही श्लोक अथवा स्तोत्रे ह्यांचे पठण वाणी उच्चारण सुधारण्यास मदत करते.

आसनांच्या अभ्यासातील सर्वसाधारणपणे उष्ट्रासन, योगमुद्रा, पश्चिमोतानासन, त्रिकोणासन, विरासन, पवनमुक्तासन या आसनांमुळे शरिरात कार्यरत असणा-या सर्व संस्थांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. ताडासन यासांरख्या आसनांमुळे उंची संवर्धन होते. वृक्षासनासारख्या आसनाने तोल सांभाळण्यासाठी आवश्यक असणारी एकाग्रता वाढीस लागते. अशी अनेक आसने वेगवेगळे अंतर्बाह्य सुपरिणाम घडवून आणतात. ह्यातून मुलांचे आरोग्य संवर्धन चांगल्याप्रकारे होते. त्याचबरोबर प्रत्येक मुलाची शारिरीक क्षमता व मानसिक क्षमता लक्षात घेऊनच आसनांची निवड व त्याचा क्रम ठरविणे अत्यंत महत्वाचे आहे.

– सौ. चारूता प्र. फाळके

मुंबईच्या चारूता फाळके हयांनी योग विषयाची पदवी प्राप्त केली असून, त्या योग-प्रशिक्षक आहेत. निरनिराळया रोगांवर त्या योग-पध्दतींचा वापर करून उपचार सुचवितात, तसेच मुलांच्या व्यक्तित्त्व विकासाकरिता कार्यशाळा घेतात.