६ वर्षांच्या संगीत कारकिर्दीत २०००हून अधिक मराठी गाणी गायलेल्या, गाण्यांतून सतत विविधता देण्याचा प्रयत्न करणा-या एका गुणी गायिकेशी मारलेल्या मनमोकळया गप्पा…..
ऐका दाजिबामुळे तुम्ही प्रकाशझोतात आलात, पॉप गायिका अशी ओळख निर्माण होण्याची भीती वाटली नाही का ?
नाही, अशी भीती नाही वाटली. ऐका दाजिबाच्या आधीदेखील मी ब-याच रिमिक्स अल्बमसाठी गायले होते. या क्षेत्रात मला माझी स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज वाटली. पार्श्वगायनातून अशी ओळख निर्माण व्हायला खूप वर्षं जावी लागली असती. शिवाय पार्श्वगायनासाठी संधी मिळणंही तितकसं सोपं नाही. आणि भीतीचं म्हणशील तर मी फक्त एकाच पठडीत स्वतःला अडकवून घेतलेलं नाही.
मराठी मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असल्यामुळे घरून काही विरोध झाला का?
अजिबात नाही, घरच्यांना माझी आवड माहिती होती. त्यामुळे एकदा या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर वेगवेगळया प्रकारचे प्रयोग करावे लागणार हेही घरच्यांना माहिती होतं. मला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता.
तुम्ही गाण्यांमध्ये कशाप्रकारे विविधता देण्याचा प्रयत्न करता
ऐका दाजिबामुळे मला व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी मिळाली यात शंकाच नाही. पण तरीही रिमिक्स किंवा पॉप अल्बम एवढयापुरतचं मला अडकून पडायचं नव्हतं. मी कितीतरी अभंग, लहान मुलांसाठीची गाणी, मराठी गाणी गायले आहे. स्व. आरती प्रभूंच्या गाण्यांची प्रेमाच्या गावा जावे तसंच ही सांज सुखाने अशा अल्बमसाठीही गायले आहे. पण लोकांच्या लक्षात फक्त दाजिबाच राहिलं त्यामुळे तुम्ही जरी विविधता दिली तरी ते लक्षात राहत नाही.
त्याचं काय कारण असावं
लोकांना जे आवडतं ते देण्याकडे आजकाल म्युझिक कंपन्यांचा कल असतो. जरा वेगळया पठडीतली गाणी देण्याची त्यांची तयारीच नसते. अभंग, भजन, लहान मुलांसाठीच्या कॅसेटस्, मराठी गाण्यांच्या कॅसेटस् निघाल्या तरी त्याचं मार्केटिंग नीट केलं जात नाही, लोकांपर्यंत पोहोचतचं नाही.
ऐका दाजिबा ही मूळ कल्पना कोणाची?
सागरिका कंपनी, मी व अवधूत गुप्ते आम्ही फक्त सुरुवातीला एवढचं ठरवलं होतं की काहीतरी फ्रेश द्यायचं. पण नक्की काय हे काही ठरतचं नव्हतं. जवळजवळ २ वर्षांची आमची मेहनत त्या अल्बमच्या मागे आहे. मार्केटमध्ये पंजाबी धर्तीवरचे बरेच अल्बम होते. म्हणून मराठीच्या धर्तीवर काही करता येईल का याचा आम्ही विचार करत होतो. मराठी-हिंदीचं असं मिश्रण ही कल्पना तेव्हा नवीनचं होती, आणि लोकांनाही ती तितकीच आवडली.
पुढच्या अल्बमची तयारी चालू आहे का?
नुकतचं नाथा पुरे आता आणि सरीवर सरी या मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन केले. तसंच सवाल माझ्या प्रेमाचा साठीही पार्श्वगायन केले. याशिवाय स्व. आरती प्रभूंच्या गाण्यांची एक कॅसेट, ही सांज सुखाने असे काही मराठी गाण्यांचे अल्बमही केले. पुढचा अल्बम करायचा आहे एवढं नक्की, अजून काहीचं ठरलेलं नाही, पण यावेळीही वेगळं काहीतरी द्यायचंय.
पार्श्वगायनात नाव कमवायचे असं का?
स्वतःची ओळख या संगीत क्षेत्रात निर्माण करण्यासाठी अल्बमचा उपयोग होतो. यामध्ये तुम्ही विविध प्रयोग करून स्वतःला सिध्द करू शकता. एकदा तुम्ही स्वतःला सिध्द केल्यानंतर मग पार्श्वगायनाच्या प्रयोगांसाठी तुमची तयारी होते.
पार्श्वगायन करताना तुम्हाला त्या त्या संगीतकार, गीतकारांच्या शैलीनुसार, गाण्याच्या व प्रसंगांच्या मागणीनुसार आवाजात बदल करावे लागतात. गाण्याच्या प्रकारानुसार आवाज बदलता आला पाहिजे. हे सगळयात जास्त चॅलेंजिंग आहे, यामुळे तुमच्या अनुभवांच्या शिदोरीतही भर पडते. विविधतेसाठी मी पार्श्वगायनावरच लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे.
मराठीवर्ल्डच्या वाचकांना काही संदेश
मराठी भावगीतांचा तो काळ पुन्हा जिवंत करण्यासाठी चांगल्या मराठी गीतकारांना, संगीतकारांना प्रोत्साहन द्यावे. चांगल्या मराठी गाण्यांच्या पुनरुज्जीवनासाठी समस्त मराठी माणसांनी प्रयत्न करावे, अशी मी विनंती करते..
मुलाखत व शब्दांकन – श्रुती डेगवेकर