लहानपणापासून प्रत्येक मूल अभिनय करतं. निकोप खेळकर लहान मुलांचे हावभाव अगदी सहज असतात. पोर्तुगीज चर्चजवळील अमृतकुंभ सोसायटीमध्ये आमचे घर. दादरचे वातावरण. बालपणी सोसायटीतल्या दीपोत्सवामध्ये नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा यात मी उत्साहाने भाग घ्यायचे. पण खरं तर मला अभिनयाच्या क्षेत्रात कारकिर्द करायचीच नव्हती. मला बँक कर्मचारी किंवा शिक्षिकेच्या व्यवसायामध्ये रस होता…
‘दुर्गा झाली गौरी’ हया आविष्कार निर्मित नाटकातून माझी सुरुवात झाली. सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे भरतनाटयम् शिकत होते. त्यावेळी ३०० मुलींमधून माझी या नाटकाकरिता निवड झाली. सुरुवातीला काम करण्याबाबत मी उत्सुक नव्हते. पण मैत्रिणी सोबत आहे, आणि नृत्य करायला मिळणार आहे म्हणून मी ‘दुर्गा झाली गौरी’मध्ये काम करायचं ठरवलं. इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंत हे नाटक केलं. आवडायचं. बालमोहन शाळेच्या नाटकांमधूनही मी कामं करायची… पण एका अटीवर… त्यात नृत्य करायला वाव असेल तरच! रूपारेल कॉलेजच्या कला शाखेमधून मी अर्थशास्त्राची पदवी घेतली. एकंदर स्टेजवर वावरण्यात एक गंमत वाटत होती, पण त्यात कुठेही कारकिर्द करण्याचा दृष्टिकोन नव्हता.
‘ईश्वर’ हा माझा पहिला हिंदी चित्रपट. त्याच दरम्यान ‘झुलवा’ नाटक केंलं. वामन केंद्रे दिग्दर्शक. १५ दिवसांत बसवलं. चेतन दातार सीन लिहायचा. या नाटकासाठी, सातारकडील देवदासींच्या भाषेची ढब आत्मसात करायची होती. १६ ते ४६ च्या वयातील स्त्रीच्या अनेक भावनिक छटा झुलवा मधे होत्या. प्रेम भावना, प्रेमभंग, बलात्कार… हे भावनिक पदर साकारायचे म्हणजे आव्हान होतं. सहकलाकार व दिग्दर्शकांचं साहाय्य लाभलं. ‘झुलवा’तील माझ्या अभिनयाला महाराष्ट्र राज्याचे पारितोषिक, तसेच अखिल भारतीय नाटय परिषदेची दोन पारितोषिकं, व ‘नाटयदर्पण’चे पारितोषिक मिळाले. ‘झुलवा’ हा टर्निंग पॉईंट ठरला.
गावाकडल्या गोष्टी, महानगर, कश्मकश असा सिरियल्स झुलवानंतर मिळत गेल्या. त्यानंतर २ जून ९० रोजी ‘जन्मगाठ’ नाटक चालू असताना मला अपघात झाला. brain concussion म्हणजे समाघात झाला. त्यामुळे नृत्य बंद झालं. संकटांची जणू एक मालिकाच सुरू झाली. बरी झाल्यावर नृत्य सुरू केलं, पंरतु, पुन्हा एक अपघात झाला. १० जून ९३ रोजी एका शूटिंग दरम्यान ‘मृत्युंजय’ सिरियलचा पूर्ण सेट माझ्या अंगावर पडला. पॅरालिसिस झाला. माझी वाचा गेली. सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर कुठे मला नीट बोलता येऊ लागले. या दुखण्यातून बरी होण्यासाठी माझ्यावर जे उपचार केले, त्यात जास्त स्टिरॉईडस्च्या गोळया होत्या, ‘शॉक्स्’ ची ट्रीटमेंट होती. सांधे खिळणे (जॉर्इंटस् लॉक) नरव्हस ब्रेक डाऊन असं सारं चक्र फिरू लागलं. एक नकारात्म दृष्टिकोन त्यातून मला घेरू लागला. माझे गुरू व आई यांनी या सगळयातून मला धीराने बाहेर काढलं. ‘तू नोकरी कर, सिरियल कर, काहीही कर, पण खचून जायचं नाही’ अशी प्रसंगी सक्त ताकीद तर कधी प्रेमळ समजावणी त्या दरम्यान आई करीत होती. जवळपास जून ९३ ते फेब्रुवारी ९४ पर्यंतच्या ‘गॅप’नंतर महेश भट यांची ‘जमीन आसमान’, ‘शांती’ अशा मालिकांमधून मी पुन्हा कॅमेरासमोर उभी राहिले.
या अपघात व आजारपणांतून एक चित्र स्पष्टं झालं की मी यापुढे नृत्य करू शकत नाही. एकीकडे चांगले लोक, चांगल्या भूमिका मिळत गेल्या. कसलेले दिग्दर्शक, गुणी सहकलाकार अशी जंत्री मला आपसूकच मिळत गेली. बक्षिसं, पैसे, नाव सगळंच मिळत गेल्यावर मला अभिनय हे क्षेत्र आवडायला लागलं. यात करियर करायला काही हरकत नाही, असं वाटू लागलं.
त्यानंतर ‘वारसा लक्ष्मीचा’ हा चित्रपट केला. या चित्रपटाकरिता मला फिल्म फेअर तसेच ‘फिल्म ग्रोव्हर’ असे दोन ऍवॉर्ड मिळाले. ‘सचिन’ बरोबर ‘एकापेक्षा एक’ हा चित्रपट केला. ‘ताईच्या बांगडया’ ह्या चित्रपटात देखील काम केलं. त्यानंतरचा लोकांनी उचलून धरलेला चित्रपट म्हणजे, ‘सरकारनामा’. ‘सरकारनामा’ मधील भूमिकेसाठी, पुन्हा एकवार फिल्म फेअर ऍवॉर्ड मिळाला. नाटय क्षेत्रातून एक चांगली भूमिका सामोरी आली. मी ती स्वीकारली. ‘कुसूम मनोहर लेले’ हे ते नाटक… या नाटकासाठी मला अखिल भारतीय नाटय परिषद, नाटय निर्माता संघ, नाटयगौरव, नाटयदर्पण, कालनिर्णय ही निरनिराळी पारितोषिकं मिळाली.
नंतर आलेल्या ‘पुत्रवती’ सिनेमाला देखील स्क्रीन व्हिडिओ स्टेट आयकन्, महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच कालनिर्णय ही बक्षिसं मिळाली. ‘घे भरारी’ चित्रपटाकरिता देखील महाराष्ट्र राज्य पुरस्कार मला मिळाला.
प्रेक्षकांनी मनापासून ज्यावर प्रेम केलं अशी माझी भूमिका म्हणजे, ‘आभाळमाया’ मधील प्रा. सुधा जोशीची भूमिका. ही भूमिका मला मनापासून आवडली. मूळात ही सुधा जोशीच्या मुलींची कहाणी होती. ती आकांक्षा व अनुष्काची गोष्ट होती. पण ती पण करता करता सुधा जोशीची कैफियत झाली. तिचीही कहाणी वाटू लागली. तुम्ही विचारता की, भूमिकांची निवड कशी करतेस, ‘आभाळमाया’च्या वेळी एक मजेशीर किस्सा झाला. सुधा जोशीचं जास्त काम हे तिच्या मित्राबरोबर आहे, हे मला समजलं. माझा नवरा संजय ती भूमिका करणार होता. एकत्र काम करायला मिळेल म्हणून मी ‘हो’ म्हटलं. आभाळमाया टीम म्हणजे, आता जणू एक कुटुंबिय झालो आहोत. लेखकांशी चर्चा करायला मिळते. ब-याचवेळा, माझा म्हणून भूमिकेचा जो अभ्यास झालाय, तो मी लेखक-दिग्दर्शकासमोर ठेवते. माझी बाजू मांडते. अशा वेळी दिग्दर्शक-लेखक यांच्याशी क्वचित प्रसंगी वाद होतो. काही बाबतीत दिग्दर्शक व लेखक स्वीकारशील असतात. दिग्दर्शकाला अनेक बाजूंचा व सर्वच पात्रांचा विचार करायचा असतो. कधी कधी माझं म्हणणं लखेक व दिग्दर्शक स्वीकारतात, पण मी जे वाटलं, जे दिग्दर्शकाला सांगण्याइतपत महत्त्वाचं आहे, ते सांगताना भिडस्तपणा ठेवत नाही. चर्चा केल्यानं भूमिका जास्त चांगली साकारता येते, असा माझा अनुभव आहे. ब-याच वेळा, चर्चेतून त्या व्यक्तिरेखेचे निरनिराळे पैलू उजेडात येण्यास मदत होते. ‘आभाळमाया’साठी मला म. टा. सन्मान पुरस्कार मिळाला.
कलाकारांच्या घर-संसाराबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते. प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं. गाडी, बंगला, नोकर-चाकर, मोठं घर हे सारं असावं. अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना जोडीदार समंजस असावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. नुसता पैसा असून उपयोगाचा नाही. दोघांतील वैचारिक देवघेव महत्त्वाची. माझ्या सासरच्या घरी, सुरुवातीपासूनच अभिनयाबाबत आस्था होती. पारसेकर, रावते, सुरेश खरे इ. मान्यवर माझ्या सास-यांचे मित्र. त्यामुळे त्यांना या क्षेत्राची चांगली माहिती होती. एक सासूरवाशीण म्हणून, सून म्हणून मला कधी अडचण आली नाही. माझ्या सासूबाई व मी, आमचं मैत्रिणीचं नातं आहे. आपलं काही चुकल्यास आई ओरडते, तेव्हा आपण ‘आई’ म्हणून गप्प राहतो. मग सासूबाईंनीच काही सांगितलं तर राग येणं गैर आहे. खरं बघायचं तर कुणाचेच विचार सारखे नसतात. मतभेद झाले तर, आम्ही दोघी स्पष्टपणे एकमेकींशी बोलतो. माझे पती संजय मोने, हे याच क्षेत्रातील असल्यामुळे, या क्षेत्रासकट इथलं वातावरण, टायमिंग हे सारं त्यांना ठाऊक आहे. आमचं क्षेत्रं एकच असल्याने वाद झाले तरी मिटतात. ‘हे’ समंजस आहेत, म्हणून, त्यांचा इतका पाठींबा आहे, म्हणून मी करियर करू शकते. आम्हाला ‘ज्युलिया’ नावाची एक वर्षाची छोटी मुलगी आहे.
तुम्ही विचारता की, अलिप्त राहून काम करता येतं का? माझ्या मते अलिप्त राहून काम करता येत नाही. जे कलाकार अलिप्त राहून काम करू शकतात, ते खूप थोर म्हणावे लागतील. आपण जी भूमिका करीत आहोत, त्याच्याशी काही क्षणांपुरतं तरी एकरूप व्हावच लागतं. नृत्यामध्ये एक श्लोक मी शिकले. अभिनय कसा करावा, याविषयीचा तो श्लोक आहे.
यतो हस्त: ततो दृष्टि:। यतो दृष्टि: ततो मन:
यतो मन: ततो भाव। यतो भावस्ततो रस:॥
अभिनय करताना, जिथे हात तिथे दृष्टि, जिथे दृष्टि तिथे मन, जिथे मन तिथे भाव व जिथे भाव तिथेच रसाची निर्मिती होते. हृदयापाशी भिडतं, तेंव्हाच तुम्ही ते साकार करू शकता. ‘स्विच ऑफ’, ‘स्विच ऑन’ची खुबी प्रत्येक कलाकाराने आत्मसात केली पाहिजे. दुर्गा झाली गौरीच्या वेळचं सांगते. सुलभाताई, प्रेमा मावशी खूप शिस्तीच्या. आमचा सीन झाला, की स्टेजवरून खाली येऊन चक्क आम्ही अभ्यासाला बसायचो व पुन्हा ‘एन्ट्री’ला यायचो. हे संस्कार खोल कुठेतरी रूजले. घरी असते, तेव्हा फक्त सून, आई, व बायको असते. अभिनेत्री असते, तेव्हा फक्त अभिनेत्री असते. अभिनयाच्या ठिकाणाहून एक्झिट घेतली की मी फक्त ‘सुकन्या कुलकर्णी’ असते. हे सवयीनं हळुहळू जमतं.