गझल म्हणजे काय?
कवितेची व्याख्या करणं जसं कठीण तसंच गझलची व्याख्या करणंही कठीण. पण तिची प्रकृती आणि त्या प्रकृतीची वैशिष्टये सांगता येतील असं वाटतं. गझल म्हणजे, – अंतिम ज्ञानाच्या मौनाआधीचं संगीत. गझल म्हणजे, ध्वनींच्या कोलाहलात राहून दूरचे नाद ऐकणं, आणि मग ते इतरांना ऐकवणं. गझल म्हणजे, – मर्म जाणणं. ते जाणलेलं मर्म उलगडून दाखवणं. गझल म्हणजे, ब्रह्मांडाच्या विराट पोकळीत एका केंद्र बिंदुवर स्वत:ला स्थापन करून तल्लीन होत समाधी साधणं. गझल म्हणजे, – आपल्या शरीर आणि आत्म्यासकट एकूणच अस्तित्त्वाचं भिंग करून आसपास, भोवतालच्या विश्वाला निरखणं.
गझल आणि शेर
गझल हे केवळ एका काव्यप्रकाराचं नाव नाही, ते एका विशिष्ट विचारशैलीचं नाव आहे. ते विशिष्ट अशा जीवनदृष्टीचं नाव आहे. ते एका तिरकस प्रकृतीचं नाव आहे. अशी प्रकृती जिला पठडी मान्य नाही, जिला चाकोरी मान्य नाही, जिला दुनियेची दुनियादारी आणि तिची दंडेली मान्य नाही.
गझल म्हणजे, अशी प्रकृती जी कालसंगिनी आहे. तिचं एक पाऊल वर्तमानाच्या डोक्यावर असतं तर, दुसरं भविष्याच्या. गझल ही अशी प्रकृती आहे, जिला इतिहास नाही, भूतकाळ असतो.
गझलची ही प्रकृती ज्यातून साकार होते, तो रचनाबंधच गझलला अन्य काव्य प्रकारापेक्षा वेगळा करतो. हा रचनाबंध म्हणजे, दोन ओळींचे शेर आणि त्या शेरांनी मिळून तयार होणारे काव्यशिल्प म्हणजे, गझल.
शेर हा गझलचे अस्तित्त्वकारण व आत्मा आहे. दोन ओळींच्या समान वृत्तात प्रचितीपूर्ण तसेच प्रत्ययकारक शब्दात बांधलेलं काव्यशिल्प म्हणजे, शेर. गझलचं अस्तित्त्वं शेरावर अवलंबून आहे, पण शेर मात्र गझलच्या आधाराशिवाय स्वतंत्रपणेही उभा राहू शकतो. शेर आणि गझलेतर कविता यांच्यात प्रकृती व रचनाबंध या बाबतीत फरक आहे. – गझलेतर कविता म्हणजे, डोळयातून अश्रुंच्या धारा लावत रडणारा चेहरा, तर, शेर म्हणजे प्रचंड दु:ख सोसणाऱ्याने टाकलेला एक कासावीस नि:श्वास.
कविता कशी लिहीली जाते, किंवा ती कशी सुचते याचा जसा कुठे फर्ॉम्यूला नाही, तसंच शेर कसा सुचतो व तो कसा लिहीला जातो, याचाही काही फर्ॉम्यूला नाही. कवीवर झालेले काव्यसंस्कार, भाषासंस्कार, त्याची विचारशैली, त्याला जे काय सांगायचे आहे, ते सांगण्याची जाणवत असलेली आच आणि त्याची एकूण जगण्याची पध्दत यावरच कवीची कविता वा गझल लिहीण्याची प्रक्रिया अवलंबून असते.
प्रतीक आणि प्रतिमा ही शेराची बलस्थानं आहेत. ही बलस्थानं शेराला सौंदर्याबरोबर सामर्थ्यही प्राप्त करून देतात.
उर्दू कवींनी आपल्या भाषेतले, संस्कृतीतले, रोजच्या जगण्यातले, बोलण्या-चालण्यातले शब्द प्रतीक व प्रतिमा म्हणून आपल्या गझलांमधून योजले. मंज़िल, आंचल, दामन, वफा, मयखाना, साकी, चमन, बुलबुल, बर्क(वीज), नाखुदा(नावाडी), सफीना(नौका), नूर (उजेड), कफस(पिंजरा), इश्क(हुस्न), महफील, शमा, परवाना असे अनेक शब्द प्रतीक व प्रतिमा म्हणून आपल्या गझलांतून या कवींनी रूढ केले. आज या शब्दांचे वाच्यार्थापेक्षा कितीतरी नवीन असे अर्थ व संकेत तयार झालेले आहेत. उदाहरणार्थ, इश्क या शब्दाचे प्रेम या एका अर्थाव्यतिरिक्त माया, जिव्हाळा, पूजा, आराधना उपासना, पुरूषार्थ, ध्यास, आसक्ती असे अनेक अर्थ उर्दू गझलेत ठळकपणे रूढ झालेले आढळतात.
प्रतिमा आणि प्रतीकांच्या मांडणीमुळे एका विषयाचे विविध पदर व पैलू दाखवणे हे गझलकाराला सुकर तर होतेच पण गुंतागुंतीच्या, व्यामिश्र विषयांनाही सोप्या व आकलनीय स्वरूपात दोन ओळींच्या अवकाशात बसवणं गझलकाराला साधू शकतं.
काळाच्या ओघात नवी प्रतीकं, नव्या प्रतिमा निर्माण होत असतात. ही नवी प्रतीकं नवे संकेत निर्माण करतात, तसेच कधी कधी आधीचे संकेत व्यापकही करून जातात. हे सारं अभिव्यक्तीच्या नितांत गरजेतून होत राहातं. या प्रक्रियेतूनच गझलची आपापल्या कालखंडात एक विशिष्ट शैली विकसित होऊन रूढ होत असते. एका अर्थी गझल हा मनाची, प्रतिभेची फार दमछाक करणारा काव्यप्रकार आहे, असं वाटतं.
गझलचा प्रत्येक शेर धारदार, पीळदार असायला हवा, हा गझलच्या मूलभूत संकेतामधला महत्त्वाचा संकेत.
गझलकारा स्वत:ला सत्याचा केंद्रबिंदू मानीत नाही. जिथे सत्य आहे, तिथे तो मी चा केंद्रबिंदू मानतो. हे सत्य आपल्यात नसून ते अन्य कुठेतरी आहे, असा गझलकाराचा विश्वास असतो. सभोवार पसरलेल्या ब्रह्मांडात हे सत्य आहे, असा ठाम विश्वास बाळगून गझलकार त्या सत्याचाच वेध घेत असतो. गझलकाराच्या प्रवृत्तीत आधी निर्माण होत असते ती, ब्रह्मांडातल्या या सत्याचे दर्शन घेण्याची लालसा. सत्याच्या दर्शनामधे झोकून देऊन त्यात विलीन होणं ही गझलकाराची अंतीम इच्छा असते.
गझल व कविता यातील फरक
कविता ही नर्तन आहे, गती आहे. कविता आपल्यातल्या जिज्ञासा, कुतूहल उत्सुकतेच्या प्रेरणाबळामुळे गतीमान होते. ‘पुढे काहीतरी आहे, जाऊन पाहायला हवं, काय बरं असेल?’ अशा प्रकारची तिची उत्सुकता असते. पण तिच्यासमोरची वाट संपत आल्याचं दृष्टीस पडूनही, आता यापुढे असून असून काय असणार, याचा तिला अंदाजही येत नाही आणि अंताजवळ येऊन पोहोचते तेंव्हा, ‘अरे, वाटच संपली की’ असा तिला आश्चर्याचा धक्काही बसतो. कवितेच्या प्रवासाचा आरंभापासून अंतापर्यंत मागोवा घेतला तर, एक आलेख काढता येऊ शकतो, जो तिच्या विकसनाचे टप्पे दाखवू शकेल.
गझल ही सतत मूर्त आणि अमूर्त या दोन टोकांच्या दरम्यान विविध रूपाने प्रवास करीत असते. तरीही गझले हे स्थैर्य आहे, क्रियेचं समापन किंवा विसर्जन आहे, गझल ही समाधी आहे, असंही म्हटता येईल. ही विधानं परस्पर विसंगत वाटतात, परंतु, शब्दरूपाने साकार होण्यापूर्वी गझल एका विशिष्ट पुंजरूपात अस्तित्त्वात आलेली असते. दोन भिन्न अवकाशात ती आपले कार्य करते. एक जड तर दुसऱ्या चैतन्यमय अशा अवकाशात. चैतन्यमय अवकाशात कार्य करताना ती ऊर्जापुंजांच्या स्वरूपात असते. जड अवकाशात साकार होताना ती शब्दांच्या माध्यमात येते. हे ऊर्जापुंज स्मृति, विचार, स्वप्न, चिंतन, भविष्यवेध, अन्वेषण, विश्लेषण, अनुभूती, आकलन, दर्शन, व्याख्या, शोध, तर्क, दृष्टांत अशा गुणधर्माचे असतात. हया उर्जापुंजांची निर्मिती कशी होते? या ऊर्जापुंजांची निर्मिती ही गझलच्या समाधी अवस्थेतूनच होते. हया ऊर्जापुंजांमार्फत गझल ही सत्त्वं शोधते आणि त्या सत्त्वांची ‘शेरां’च्या साहाय्याने मांडणी करते. म्हणजे एकतानता, चिंतन हा गझलचा स्थायीभाव ठरतो. म्हणूनच म्हणतो, गझल म्हणजे, अंतिम ज्ञानाच्या मौनाआधीचं संगीत. गझल म्हणजे, ध्वनींच्या कोलाहलात राहून दूरचे नाद ऐकणं आणि मग ते इतरांना ऐकवणं…
चंद्रशेखर सानेकर
‘लाजरी’ दिवाळी वार्षिक,
‘आविष्कार पब्लिकेशन्स’,
मुंबई यांच्या सौजन्याने
चंद्रशेखर सानेकर यांची एक गझल
तुझ्या सुगंधाहून निराळी अशी फुले मी आणू कुठली?
हे फूलराणी सांग मला तू तुला फुले मी माळू कुठली?
वेड तुला लागलेच माझे यात मला तर शंका नाही
फक्त मला हे समजू दे मी करू तुझ्यावर जादू कुठली?
कुणाकुणाची नावे घेऊ … कुणाकुणाची नावे गाळू …?
कथा-कहाण्या अनेक माझ्या, तुला नेमकी सांगू कुठली?
जरी तुझा मी कौल मागतो, प्रश्न भरोशाचा आहे हा
माझी बाजू अनेकपदरी, तुझ्यापुढे मी मांडू कुठली?
समीप येता कसे अचानक गमावले मी तुला, मला तू?
दोष कोणता समजू माझा, चूक तुझी मी मानू कुठली?
तुला हाक मी देतो तेंव्हा तुला तुझा उंबरा दिसे, मग
वचन तुला मी देऊ कसले, शपथ तुला मी घालू कुठली !
– चंद्रशेखर सानेकर