मराठी इतिहास वाचण्याकरीता आवश्यक असलेली लिपी म्हणजे मोडी लिपी. ही लिपी तेराव्या शतकापासून सुरू झाली. श्री.महादेवराव यादवाचे कारकीर्दीत (इ.स. १२६० ते ११८२) हेमांद्री पंत नामक प्रख्यात महाजनी होऊन गेले. असे मानले जाते की त्यांनी लंके वरून बाजरीचे बी व मोडी लिपी आणली. हयांनी राज्यात अनेक सुधारणा केल्या, राज्यात होणारा पत्रव्यवहार जलद होण्याकरिता देवनागरीच्या लिपीत सुधारणा करून मोडी लिपी तयार केली. पुढे ती ७०० वर्षे व्यवहारात होती. केवळ मराठयांच्या राज्यातच नव्हे तर जेथे जेथे मराठी सत्ता पोहचली तिथे तिकडे मोडीचा वापर होत होता. १९४८ पर्यंत मोडी लिपी प्राथमिक शाळांमध्ये शिकविली जायची. इंग्रजांचा प्रभाव तसेच प्रेसच्या दृष्टीने गैरसोयीचे म्हणून मोडीचा वापर कमी व्हायला लागला. १९७० पर्यंत कोर्टाचे कागदपत्र मोडीत असायचे. परंतु काळानुरुप मोडी पडद्याआड गेली.
देवनागरीची लघुलिपी म्हणजे मोडी होय. बालबोध लिहितांना काना, मात्रा, वेलांटया, दिर्घ हया करीता खूप वेळ लागतो व लिहिण्याचा वेळ वाढतो म्हणून वेळ वाचविण्याकरिता लिपीची निर्मिती झाली. कागदावर सरळ रेष काढून हात कमीत कमी वेळा उचलून जलद गतीने लिहीण्याची पध्दत हया लिपीने निर्माण केली. ही अशी मोडी लिपी वाकडी वळणे घेऊन धावत पळत लिहीली जाते.
हया भाषेत असंख्य कागदपत्रे, दप्तरखाने, देशात अनेक ठिकाणी आहेत. पुणे, मुंबई, गुजरात, दक्षिणेत तंजावर येथे खूप कागदपत्रे आहेत. तसेच महाराष्ट्रात घरोघरी सुध्दा असंख्य कागद आहेत. ते वाचण्याकरिता ‘मोडी लिपी’ येणे अतिशय आवश्यक आहे. हयात असलेला मजकूर वाचल्यामुळे आपणांस खरा इतिहास कळेल. आपल्या पुर्वज्यांनी केलेल्या गोष्टीची माहिती आपणांस कळेल. अशा मोडी लिपीत लिहिलेल्या कागदपत्राचे आपल्या व्यवहारातील मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत रूपांतर करून दिले जाते.
सौ. वैशाली मो. फडणीस
शासन मान्यताप्राप्त
‘बेलबाग संस्थान’, १७७/१७८, बुधवार पेठ , लक्ष्मी रोड, पुणे ४११००२
फ़ोन ०२०-२४४९३११६, मो। ९८८१६९५५६२
ऐतिहासिक वारशाचे जतन करणे, संवर्धन करणे आणि पुढच्या पिढीकडे हा वारसा यशस्वीपणे सोपवणे, याकरता सर्वप्रथम आपला इतिहास जाणून घेणे आवश्यक ठरते. हा वारसा वर्तमान आणि भविष्य यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. ऐतिहासिक महत्त्वाची कागदपत्रे, शिलालेख, दप्तरे यांचे महत्त्व फक्त इतिहास जाणून घेण्यासाठी नव्हे तर वर्तमानातील आपले वर्तन आणि भविष्यातील आपल्या दिशा ठरवण्याच्या दृष्टीनेही आढळून येते.
शिवकालीन दप्तरे, पेशवेकालीन संदर्भ, राज्याचे महत्त्वाचे अभिलेख मोडी लिपीत उपलब्ध आहेत. त्यांचा सखोल अभ्यास करावयाचा झाल्यास या लिपीचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. सह्याद्रीच्या द-या-खो-यांत भटकणा-या दुर्गप्रेमींना तसेच इतिहासाच्या अभ्यासकांना सापडणारे शिलालेख, दुर्मीळ दस्तावेज यांवरील मोडीलिपीतील मजकुर वाचण्याकरता मोडीचे प्राथमिक ज्ञान त्यांना असणे गरजेचे असते. शिवरायांच्या कालखंडात मोडीचा वापर सांकेतिक भाषा म्हणूनही केला जात असे. अतिशय गुप्त, महत्त्वाचे संदेश शत्रुपक्षाला समजू नये म्हणून ते मोडीतून पाठवण्यात येत असत.
अशा ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी देवनागरी लिपीबरोबरच मोडी लिपीही ज्ञात असणे गरजेचे आहे. मोडीचा प्रचार आणि प्रसार यांसाठी वयाच्या बहात्तराव्या वर्षीही श्री. मनोहर जागुष्टे कार्यरत आहेत. जागतिक मराठी परिषद आणि जागतिक मराठी अकादमीच्या सहकार्याने ‘मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळा’ची १८ जानेवारी, १९९१ साली स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मोडीच्या प्रचारार्थ संचालक या नात्याने आणि कार्यकर्त्याच्या धडाडीने श्री. जागुष्टे प्रयत्नशील आहेत. ‘आम्ही (स्वतः जागुष्टे, त्यांचे पूर्वाश्रमीचे विद्यार्थी आणि आता सहकारी बनलेले श्री. श्रीकृष्ण ल. टिळक आणि श्री. कृष्णाजी म्हात्रे) प्रयत्न करतोच आहोत. पण सरकारने मनावर घेतल्यास व्यापक प्रमाणावर हे कार्य हाती घेता येऊ शकते.’ अखंड हिंदुस्थानात ज्या ज्या प्रांतात मराठयांचे राज्य होते, त्या त्या ठिकाणी मोडी लिपीतील कागदपत्रे सापडतात. त्यांचा अभ्यास करून लिप्यांतर करणारी माणसे कमी आहेत. मोडी लिपीतील कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी जाणणारे लोक हवे आहेत. ह्या अभ्यास वर्गातूनच एखादा अभ्यासू तयार होऊ शकतो, अशी आशा श्री. जागुष्टे व्यक्त करतात.
महादेवराय यादव आणि रामदेवराय यादव या राजांच्या वेळी दरबारात असलेल्या हेमाद्रीपंत किंवा हेमाडपंत या पंतप्रधानाने १३व्या शतकात मोडी लिपी शोधून काढली, असे मानले जाते. मराठी भाषेकरीता वापरात असलेल्या देवनागरी लिपीला पर्याय म्हणून ह्या जलद लिपीचा शोध हेमाद्रीपंताने लावला असावा. यादव राजांच्या काळात व्यापारानिमित्त हेमाद्रीपंत लंकेला गेला होता. तेथून परतताना त्याने बाजरीचं ‘बी’ आणि सोन्याचा कस पाहण्यासाठी लागणारा ‘कसोटी’ दगड ह्या दोन गोष्टी महाराष्ट्रात आणल्या.
या प्रवासादरम्यान तेथील लिपींचा त्याने अभ्यास केला असावा. प्रत्येक लिपीचे मुख्य लिपी आणि जलद लिपी असे दोन भाग पडलेले (उदा. इंग्रजी ची मुख्य आणि जलद लिपी) त्याने पाहिले असावेत. यावरून त्याला देवनागरीसाठीच्या जलद लिपीचा विचार सुचला असावा. तेव्हा मूळ देवनागरी लिपीलाच वळणं देऊन, त्याची मोडतोड करून, त्यात काही सुधारणा करून मोडी लिपीची निर्मिती त्याने केली. प्रचलित देवनागरी लिपी ही काना, मात्रा, वेलांटी, उकार, इकार यांनी भरलेली होती. देवनागरी लिपीत लिहिताना प्रत्येक काना, मात्रा, वेलांटी काढण्यासाठी हात उचलावा लागतो. याउलट मोडी लिपी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सलग लिहिता येते. प्रथम एक रेषा आखून घेतात आणि त्यावर डावीकडून उजवीकडे रेषा संपेपर्यंत लिहित जातात. या लिपीचे वैशिष्टय म्हणजे यातील सर्व इकार दीर्घ आहेत आणि सर्व उकार -हस्व आहेत. भारतात जिथे जिथे मराठे राज्यकर्ता होते तिथे तिथे मोडी लिपीचा प्रचार आणि वापर झाल्याचे पुरावे कागदपत्रांद्वारे आढळून येतात.
यादवकालातील लिपीत थोडी सुधारणा होऊन ती वाचण्यास सोपी झाली. पेशवेकालातही हीच लिपी प्रचलित होती. पेशवेकालीन अक्षराला ‘चिटणीशी अक्षर’ म्हणत. ते अत्यंत सुंदर आणि नमुनेदार हस्ताक्षर असल्यामुळे त्याला तसे संबोधण्यात येई. नंतर इंग्रजांचे राज्य आल्यानंतरही मोडी लिपीच वापरात होती. त्यावेळचे त्यांचे पत्रव्यवहार मोडीतून होत असत. पण ही लिपी मुद्रणास अयोग्य आणि त्रासदायक असल्यामुळे सुमारे १९५२ नंतर तिचा वापर बंद करण्यात आला आणि अभ्यासक्रमातूनही काढून टाकण्यात आली.
मोडी लिपीत काही ठळक दोषही आढळून येतात. मोडीतून लेखन करताना त्यांमध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम दिला जात नाही. उदा. – शब्दांमध्ये अंतर न राखता ह्याचे लिखाण केले जाते. मोडी लिपीत ‘क’ व ‘ला’ ही अक्षरे अगदी सूक्ष्मसा फरक सोडल्यास सारखीच आहेत. उदा. – बाजीराव ४०० लोक घेऊन गेले. वरील वाक्यात ‘ल’ ऐवजी ‘क’ वाचला गेल्यास वाचणा-याचा गोंधळ उडू शकतो. असे काही घोटाळे ह्या लिपीत आढळतात. त्यामुळे मोडी लिपीतील कागदपत्रे वाचताना अत्यंत काळजीपूर्वक, एकेक शब्द जुळवत वाचावे लागते. उदा. – रस्त्यात नाच तमासे चालले होते ऐवजी रस्त्यात नाचत मासे चालले होते, असे वाक्य वाचले जाण्याची शक्यता असते. याशिवाय ती कागदपत्रे ज्या प्रांतातील असतील, तेथील प्रांतिक शब्द माहिती असावे लागतात. तारतम्य आणि अनुभवानेच मोडीतील कागदपत्रे वाचणे आणि समजून घेणे शक्य होते.
‘मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळ’ स्थापन होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची तंजावर भेट कारणीभूत ठरली, असे श्री. जागुष्टे सांगतात. २३ सप्टेंबर, १९९० साली डिसेंबर महिन्यात चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे राष्ट्रीय एकात्मता परिषदेला गेले होते. ती सभा आटोपल्यावर तंजावर येथील मराठी बांधवांनी बांधलेल्या ‘महाराष्ट्र समाज’ या वास्तूच्या उद्धाटनाला श्री. शरद पवार आणि लोकसत्ताचे संपादक श्री. माधव गडकरी तिथे गेले होते. वास्तूच्या उद्धाटनानंतर तेथून जवळच असलेल्या सरस्वती महाल ग्रंथालयाला त्यांनी भेट दिली. तेथे त्यांनी मोडी लिपीत लिहिलेले एक हजार रुमाल पाहिले. त्या प्रत्येक रुमालात फुलस्केप आकाराचे ८०० कागद सुंदर मोडी लिपीत लिहिलेले होते. तेथील मोडी लिपी तज्ज्ञ श्री. विवेकानंद गोपाळ यांनी ह्या कागदपत्रांच्या वाचनासाठी आणि अभ्यासासाठी कोणीही व्यक्ती उपलब्ध होत नसल्याची खंत त्यावेळी बोलून दाखवली.
तिथून परतल्यावर आपल्या ‘चौफेर’ सदरात श्री. माधव गडकरी यांनी ‘व्यंकोजीच्या तंजावरचे मराठी हृदगत’ हा लेख लिहिला. त्यामध्ये मोडी लिपीच्या जाणकारांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. लेखातील आवाहनानुसार अनेकांची पत्रे आली. लोकांचा प्रतिसाद पाहून जयहिंद प्रकाशनचे मालक श्री. ग. का. रायकर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मराठी परिषदेची उपशाखा म्हणून १८ जानेवारी, १९९१ ला मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. ह्या मंडळातर्फे मोडीचा पहिला वर्ग ठाकूरद्वारच्या कमला हायस्कूल मध्ये १८ जानेवारी, १९९१ मध्ये घेण्यात आला. पुढे ऑक्टोबर १९९१ मध्ये दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात मोडीचे वर्ग सुरू करण्यात आले. तर ठाणे येथे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये एप्रिल १९९२ पासून सुरू झालेले वर्ग आजतागायत सुरू आहेत. आत्तापर्यंत मोडी प्रशिक्षणाचे दादरला – ११, पार्ले – १, डोंबिवली – ३, विक्रोळी – ३ तर ठाणे येथे प्राथमिकचे ३२ तर प्रगतचे २४ वर्ग श्री. जागुष्टे यांनी घेतले आहेत. गेल्या पंधरा वर्षात श्री. जागुष्टे यांनी विविध ठिकाणी ८५ मोडी लिपीचे वर्ग घेतले आहेत. गेल्या १५ वर्षाच्या कालखंडात सुमारे २५००-३००० लोकांनी श्री. जागुष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. सतत ७ वर्षे मोडी लिपी प्रचार आणि प्रसार याचं कार्य केल्याबद्दल त्यांना ‘गुरुवर्य अ. आ. देसाई पुरस्कार’ १९९७ मध्ये देण्यात आला होता. तसेच ‘कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १९९३’ मधील ठाणे येथील ९व्या अधिवेशनात मोडी लिपीच्या प्रचार आणि प्रसार यांबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
मोडी शिकण्याची इच्छा असूनही हे अभ्यासवर्ग लावणे काही कारणास्तव शक्य होत नाही. अशांकरता घरी अभ्यास करण्याच्या दृष्टीने ‘चला शिकू या मोडी आपण’ हे प्राथमिक अभ्यासक्रमाचे पुस्तकही श्री. जागुष्टे यांनी १९९३ साली तयार केले. २-३ वर्षातच त्याची प्रथमावृत्ती संपली होती. मोडीच्या प्रगत अभ्यासक्रमासाठीचे पुस्तक तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. समाजाच्या सर्व स्तरांतून या विषयीची जागरुकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत श्री. जागुष्टे व्यक्त करतात. आपला इतिहास समजून घेण्यासाठी आणि त्या वैभवशाली इतिहासाचे जतन करण्यासाठी तरी ‘मोडी शिकू या आपण!’
श्रुती डेगवेकर
अ-३, श्री सिध्दिविनायक दर्शन को.हौ. सोसायटी,
महात्मा फुले रोड, विष्णुनगर, डोंबिवली(प.) – ४२१२०२
दूरध्वनी क्र. ९५२५१-२४०६९१२