पारंपारिक गाणी

ओवी

सासरी जाते लेकं, आईची ओढाताड
बापाचा जीवं वेडा, अंगी भिडविला घोडा.

सासरी जाते लेकं, मायलेकं गळी पडे,
कोरडया नदीला, ओला पाझर फुटे.

घे गं आई चोळी, मला लहानं काठाची,
मोठं माझं गावं, वस्ती अडाणी लोकांची.

घे गं आई चोळी, मला हिरवीगारं,
मोठं माझं गावं,वस्ती अडाण्याची फारं.

पहाटे दळणं, मायलेकीला साजतं,
सखी पुसती सखीला, कुठं अलगूजं वाजतं.

दुरल्या देशीचं पत्र, घेते मी धावून,
माझ्या गं बाळानं, कायं धाडीलं लिवूनं

दुरल्या देशीचं पत्र, घेते घाई-घाई,
माझ्या गं बाळान, काय लिहिलं बाई.

सपान पडीले, उठून आले दारी,
माझ्या बाळावाणी, मला कोण हाका मारी.

माझ्या गं बाळान, काय कामं केल,
उचलला नांगर, मातीच केल सोन.

जाईनं शेताला, उभी राहीन बांधाला,
माझ्या गं बाळची, जाते कमाई पाहायला.

पंढरीला जाते,पहिली पायरी नामाची,
विठ्ठलाच्या आधी,भेट गरुड खांबाची.

चंद्रभागेला गं पुरं,पाणी लागलं वडाला,
रुख्मिनी म्हनं,माझा पुंडलिकं बुडाला.

चंद्रभागेला गं पुरं,नावेचा घोडा बुड,
राही रुख्मिनं पतीव्रता, व्हय पुढ.

इथून पंढरी, दिसती गं लालं-लालं,
देव विठ्ठलाची, पिकली गं मखमलं.

इथूनं पंढरी, दिसती गं निळी-निळी,
देव विठ्ठलाची, पिकली गं सोनकळी.

पंढरीची वाट,कशान गं काळी झाली,
देव विठ्ठलाच्या,बुक्क्याची गं गाडी गेली.

तुळसं-तुळसं,तुला नाही आई-बाप,
चाल माझ्या वाड्या,जागा देते अंगणात.

जिला नही लेकं,तिनं तुळसं लावावी,
येरंझरा घाली, तिचा गोविंद जावई.

तुळशीचा पाला,गेला सगळा वा-यानं,
देवं विठ्ठलानी,गोळा केला आवडीनं.

तुळसं-तुळसं,झाली वाळूनं कोळं,
देवं विठ्ठलानं,कंठीला केली माळं.

रुख्मिनं म्हनं,देवा आवड कोणाची,
तुळसं गुणाची, दारी तळती उन्हाची.

पंढरीला जाते,संग आईचं पातळं,
चंद्रभागातीरी पाणी,धुवाया नितळं.

पंढरीला जाते,संग आईची गं चोळी,
चंद्रभागातीरी आहे,धुवाया मोठी तळी.

भरताराचं सुखं,नारं सांगते आईला,
शंकर शेल्याची,केली सावली जाईला.

भरताराचं सुखं,नारं सांगते गणगोताला,
शंकर शेल्याची,केली सावली शेताला.

भरताराचं सुखं,सांगते दोघी-तिघी,
गाठ पाषाणाची,मैना माझी दूर उभी.

डोईचा पदरं,माझा वसरी पांगला,
देरं मरंजीचा माझा,नही पायरी यंगला.

नंदई रे भाऊ, तुझं-माझं कायं नातं,
तुला रे दिली ना,चुड्याची रे पाठ .

नणंद परीसं,माझा नंदई चांगला,
चोळी पातळाची घडी,माझा मांडव यंगला.

लाडाची लेकं,लई दिसं नसावी माहेरी,
धन्याची कोथंबिर, वासं मळ्याच्या बाहेरं.

नांद-नांद लेकी,नांदुनं कर नावं,
तुझ्या गं भोवताली,माझ्या सोय-याचं गावं.

दळण दळीते,जसं हरिण पळतं,
आई तुझं दुधं,माझ्या मनगटी खेळतं.

जयश्री विलास गांगुर्डे
मु. पो. खेडगाव, दिंडोरी, नाशिक.