प्रसन्न चेहरा, आवाजावर प्रभूत्व आणि संवाद साधण्याची कला असणा-या मंगला खाडिलकर आपल्याला गेली २५ वर्षे सतत दूरदर्शन, आकाशवाणी, रंगमंच, व्यासपीठ आणि लेखन हया माध्यमांद्वारे सुपरिचित आहे. मराठीवर्ल्डने मंगलाताईंशी मारलेल्या गप्पा म्हणजे खरं तर ऐकत राहाव्या अशा…
मंगलाताई तुम्ही सूत्रसंचालन, निवेदन हे करिअर म्हणून निवडलंत तेव्हा इथे फारश्या स्त्रिया नव्हत्या. तुमच्या करिअर बद्दल सांगाल?
खरं सांगायचं तर कवितांचा आणि माझा फारसा काही संबंध नव्हता. कविता मी वाचायचो पण स्वत: कविता करेन असं वाटलं नव्हतं. एकदा मी माझ्या मित्राच्या कविता ऐकल्या आणि वाटलं असं तर मलाही सुचतं, नंतर आसपासच्या जगाकडे पाहून स्फुरलेल्या कविता लिहीत गेलो.
मी वयाच्या सातव्या वर्षापासून शाळेत, आकाशवाणीवर कार्यक्रम करायचे. आकाशवाणी ऐकत मोठी झालेली आमची पिढी आहे. प्रत्यक्षात निलम प्रभू (करूणा देव), माया चिटणीस, लीलावती भागवत हयांचे मार्गदर्शन आकाशवाणीवर काम करतांना लाभले. सुहासिनी मुळगांवकर माझ्या आदर्श होत्या. निवेदन हे सर्वांगांनी अभ्यास करूनच करायचे हे मी त्यांच्याकडून शिकले.
१९७७ साली दूरदर्शनवर आकाशानंदांचा ‘युवदर्शन’ हा कार्यक्रम विशेष गाजत होता. तेव्हा पहिल्यांदा प्रत्यक्ष (live) प्रसारणाच्या एका कार्यक्रमात मी सहभागी झाले होते. चर्चा खूपच रंगली पण त्यात आम्ही इंग्रजी शब्दांचा वापर वरचेवर केला होता व ते श्रोत्यांना खटकले, त्यावेळी मी अत्यंत महत्वाचा धडा शिकले तो म्हणजे ज्या भाषेत निवेदन करायचे आहे त्या भाषेवर आपले स्वामित्व तर हवेच पण दुस-या किंवा इग्रंजी भाषेचा वापर टाळायला हवा, व्यवहार्य शब्द सोडून.
त्यानंतर दूरदर्शनवर ‘आमच्या व्यथा’ हे सदर मी करत असे. त्यातला ‘जिद्द’ नावाचा एपिसोड खूपच गाजला. कार्यक्रमा दरम्यान बस ड्रायव्हर आणि कंडक्टरची मुलाखत होती. कॅमे-याला थोडे भेदरलेले दोघेही जण जरावेळाने मनमोकळे बोलू लागले. आपल्याला शिकायला मिळाले असते तर चांगले झाले असते अशी खंत दोघांनी बोलून दाखवली. त्यावेळेला दूरदर्शनवर फोन करून एका उद्योगपतींनी त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली. आज त्यातला एकजण वकील तर एक जण अकौंटंट आहे.
त्याचवेळेला वृत्तपत्रात बातमी होती, उदयाची आशा बाळगावी अशी निवेदीका ‘मंगला खाडिलकर’. हया कार्यक्रमामुळे मला आत्मविश्वास तर आलाच पण निवेदन हे करिअर म्हणून गांभीर्याने घ्यायला हवं हे मी ठरवलं.
विविध विषयांवरचे निवेदन, मुलाखती आणि सूत्रसंचालन हयांची तयारी तुम्ही कशी करता?
हया तिन्ही भूमिका पार पाडतांना तुम्हाला तुम्ही करत असलेला विषय तर सखोल माहिती पाहिजेच. त्याचबरोबर सामाजिक व व्यावाहारिक ज्ञानपण अत्यावश्यक आहे. दूरदर्शनवर ‘मनोरंजन’, ‘गजरा’, ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ई टिव्हीवर ‘सखी’ असे अनेक कार्यक्रम करतांना अभ्यासू वृत्तीचा खूप उपयोग झाला.
मुलाखत घेतांना आपल्याला मुलाखत देणारा, श्रोते आणि आपलं स्वत:च मत ह्या गोष्टींचे भान ठेवावे लागते. सूत्रसंचालन करतांना ‘स्क्रिप्ट’ जरी तयार असलं तरी खाली बघून तुम्ही सतत ते वाचू शकत नाही. तुम्हाला श्रोत्यांशी संवाद साधता आला पाहिजे.
ह्या सर्व प्रकारात भाषेची समज, दिलेली वेळ वापरण्याचे कसब, छोटे पण समर्पक प्रश्न, माफक अभिनय आणि प्रसन्न व्यक्तिमत्व हे गुण असणं आवश्यक आहे.
निवेदकाला कार्यक्रमाची रंगत चढत नेण्याचे कसब हवे. पण त्याचवेळी तो कृत्रिम वाटता कामा नये. सुरुवातील असलेला आवाजातला उत्साह आणि आपलेपणा शेवटपर्यंत टिकला पाहिजे. मुलाखत घेणारा हा खडीसाखरेसारखा कार्यक्रमात विरघळणारा हवा. ह्या बाबत ‘ओपरा विनफ्रे’ मला आदर्श वाटते. कार्यक्रम तिच्या शिवाय वेगळा काढताच येऊ शकत नाही.
मंगलाताई गेल्या पंचवीस वर्षातल्या काही आठवणी सांगाल?
माझ्या ह्या वटचालीत आठवणी तर अनेक आहेत. अनेक ‘मोठी’ माणसं मला जाणून घेता आली. त्यांच्याकडून खूप सारं शिकता आलं. मागच्या वर्षी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक संमेलनात, ऍटलांटा येथे घेतलेली सुनील गावस्करांची मुलाखत मला येथे सांगावीशी वाटते. मुलाखत घेतांना स्वभावत: गंभीर असणारा सुनील कालांतराने खुलत गेला आणि चक्क जोक्स, नकला करणारा सुनील प्रेक्षकांसमोर आला. माझ्याकडून अनवधानानं उल्लेख झालेल्या ३३० धावांची दुरुस्ती ३३४ अशी सुनीलनं लगेच केली. पण पुढील काही क्षणातच सुनीलन स्वत: नमूद केलेल्या ७०० धावांची दुरुस्ती, मी ७७४ केली. सुनीलने दिलखुलासपणे ती मान्य तर केलीच पण मलाही चक्क ‘माफ किया’ म्हणून हारही मानली नाही.
‘तुम्ही पुढच्या पीढीत ‘सुनील गावस्कर’ निर्माण करु शकला नाहीत?’
ह्या माझ्या प्रश्नावर अंतर्मूख झालेला पिता असलेला सुनील समोर आला आपल्या मुलाबद्दल, रोहन बद्दल तो अत्यंत मोकळेपणाने आणि गंभीरपणे बोलला. इतकी प्रदीर्घ मुलाखत देणारा सुनील दिवंगत झालेला आपला मित्र, सहखेळाडू एकनाथ सोलकरवर दोन लेख लिहून वावरतो आहे. हे सांगून सुध्दा खरे वाटले नसते. मुलाखत संपवतांना हा हँगओव्हर तसाच ठेवणे मला महत्वाचे वाटले. सुनीलच्या मुलाखती नंतर लगेचच ‘हम तो तेरे आशिक है’ नाटक होते म्हणून मग मी समारोप केला, ‘सुनीलजी अब हम और क्या करे, हम तो तेरे आशिक है….’
असाच आणखी एक किस्सा! मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये संगीतातले दोन दिग्गज सुधीर फडके आणि अनिल विश्वास ह्यांचा सत्कार होता. षण्मुखानंद मध्ये दीपप्रज्वलन न करता इलेक्ट्रीक समई ऑन करायची प्रथा आहे. पण त्यादिवशी काही केल्या समई ‘ऑन’ होईना. व्यासपीठावरील मान्यवर अस्वस्थ तर प्रेक्षक ‘आता पुढे काय….’ बघायला आतुर. अश्या वेळेला निवेदिका म्हणून प्रसंगावधान राखलं आणि सगळयांना अभिवादन केलं, ‘महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सांस्कृतिक आदराच्या आणि स्नेहाच्या कित्येक ज्योती आपल्या मना मनात तेवल्या आहेतच. आता वीजेच्या तेवण्याची वाट न पाहता आपण पुढील वाटचाल करू या’ टाळयांच्या गजरात माझं स्वागत तर झालंच पण प्रमुख वृत्तपत्रांनी देखील ह्याची दखल घेतली.
आशा भोसले संगीत रजनी, दीनानाथ महोत्सव असे आणि अनेक संगीताचे, राजकीय, सामाजीक अश्या अनेक कार्यक्रमांच्या आठवणी सोबत आहेत.
आरसा आणि कथामंजिरी बद्दल थोडं सांगाल?
निवेदन करतांना निवेदकाला फारसा वाव नसतो. निवेदक कार्यक्रमाची गुंफण करीत असतो. त्यामुळे एक प्रकारची अतृप्तता असते. म्हणून आजवरच्या माझ्या अनुभवांची शिदोरी मी ‘आरसात’ मांडली आहे. तसेच वेगवेगळया भाषेतल्या लेखकांच्या कथा ‘कथामंजिरीतून’ सादर करते. दोन्ही कार्यक्रमांचे श्रोत्यांकडून उत्स्फूर्त स्वागत झाले आहे.
सिनेमा, टेलीव्हिजनच्या ऑफर येऊनही मंगलाताईंनी फक्त निवेदनावरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले. अतिशय ‘फोकस’ असणा-या मंगलताई निवेदनाच्या क्षेत्रात अग्रेसर आहेतच पण गृहिणी आणि आई म्हणूनही कर्तव्यदक्ष आहेत. निवेदनाबरोबरच ह्या क्षेत्रात नवीन येणा-या लोकांसाठी त्या वर्कशॉप्स घेतात तसेच पुस्तकांचं लिखाणही चालू आहे. ‘आपली माणसं’ हे अनिवासीय भारतीय मराठी माणसांचे अंतरंग उलगडून दाखवणारे पुस्तक सध्या विशेष गाजते आहे. खेडयातल्या तसेच परदेशातील श्रोत्यांसमोर अत्यंत तयारीने व अभ्यासाने आपला कार्यक्रम सादर करतात. त्या सादर करत असलेल्या कार्यक्रमानंतरही आपल्याला लक्षात रहातो तो त्यांची गोड आणि आपलीशी करणारी निवेदन शैली व प्रसन्न चेहरा.
मुलाखत व शब्दांकन – भाग्यश्री केंगे