मासांहारी पदार्थ

खिमा मटार

khima-mutter साहित्य – अर्धा किलां खिमा, पाव किलो मटार, ३ कांदे बारीक चिरून, १०-१२ लसूण पाकळया व १ इंच आले वाटून, ३ मोठे टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, २ चमचे धन्याची पावडर, मुठभर चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी तेल, चवीनुसार मीठ.

कृती – खिमा स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवावा. टोमॅटो उकळत्या पाण्यात घालून साल काढून बारीक चिरून घ्यावेत. कांदे किसून घ्यावेत. प्रेशरकुकरमध्ये तेल तापवावे व त्यामध्ये किसलेला कांदा घालावा. कांदा लाल परतला गेला की. वाटलेले आले, लसूण टाकावे, हळद, तिखट, गरम मसाला, पावडर, धन्याची पावडर घालावी व धुतलेला खिमा टाकावा. खिमा चांगला लाल रंगावर परतावा. खिमा परतला गेला की मटार धुवून टाकावेत. थोडे परतून चिरलेला टोमॅटो टाकावा व चवीनुसार मीठ आणि ३ वाटया पाणी घालावे. प्रेशर कुकर बंद करून गॅसवर ठेवावा. पूर्ण प्रेशरवर आल्यावर गॅस बारीक करून ३ मिनिटे ठेवावा व गॅस बंद करावा. प्रेशरकुकर थंड झाल्यावर खिमा मटार काढून घ्यावेत किंवा प्रेशरकुकरमध्ये न शिजवता जाड बुडाच्या पातेल्यात आधण ठेवून शिजवला तरी चटकन शिजतो.

करंदी मसाला

साहित्य – २ वाटया करंदी, १ मोठा कांदा, १ वाटी ओले खोबरे, ७-८ लसूण पाकळया, अर्धा चमचा हळद, १ चमचा मिरचीपूड, २-३ लंवगा, १ इंच दालचिनी, ५-६ मिरे, २ मसाला वेलची, १ चमचा खसखस, अर्धा चमचा शहाजिरे, चिंच, मीठ व तेल.

कृती – करंदी साफ करून कोरडी करावी. कांदा बारीक चिरावा, मसाल्याचे सर्व साहित्य तेलात भाजून घ्यावे. आले व ३-४ लसूण पाकळया एकत्र वाटाव्यात. चिंच भिजवून कोळ तयार करावा. भाजलेल्या मसाल्याचे साहित्य कांदा व खोबर्‍यासहीत वाटावे. कढईत तेल तापवून त्यात उरलेली लसूण ठेचून घालावी. जरा परतून रंग बदलल्यावर त्यात आले लसूनची पेस्ट घालून थोडावेळ परतावी व उरलेले साहित्य घालावे व पाव कप पाणी घालून करंदी शिजू द्यावी. करंदी मसाला जरा दाटसर असावा. पाणी फार घालू नये. कैरीच्या सिझनमध्ये चिचे ऐवजी कैरी वापरावी.

चिकन मसाला

chicken-masala साहित्य – १ चिकन (अंदाजे १ किलो वजनाचे), अर्धा किलो कांदे, अर्धा किलो टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून साल काढून चिरून, १ वाटी दही, २ मोठे चमचे खसखस भिजवून वाटून, १०-१२ लसूण पाकळया व १ इंच आले वाटून, १ टेबल चमचा गरम मसाला, २ चहाचे चमचे लाल तिखट, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ, मूठभर चिरलेली कोथिंबीर, पाऊण वाटी तेल किंवा तूप.

कृती – चिकन साफ करून त्याचे आठ मोठे तुकडे करावेत स्वच्छ धुवून एका पसरट बाऊलमध्ये घालून त्याला १ वाटी दही, वाटलेल्या आले-लसणीतले निम्मे आले-लसूण, निम्मा गरम मसाला, १ चहाचा चमचा लाल तिखट हाताने लावून १ तास झाकून ठेवावे. कांदे किसून अथवा वाटून घ्यावेत कढईमध्ये तेल गरम करावे व १ चमचा जिरे टाकून कांदा घालावा व कांदा मंद आचेवर लाल होईपर्यंत परतावा. तेल अथवा तूप बाजूला सुटले पाहिजे. परतलेला कांदा, वाटलेलं आलं, लसूण घालून परतावा. उरलेलं लाल तिखट, हळद व गरम मसाला टाकून परतावे. वाटलेली खसखस घालावी. सर्व मसाला खंमग परतला गेला की दही लावून ठेवलेले चिकनचे तुकडे त्यात घालावे. चिकनचे तुकडे गुलाबी होईपर्यत परतावे. साल काढून चिरलेला टोमॅटो त्यात घालावा. सर्व मसाला व चिकन खमंग परतले गेले की चवीनुसार मीठ घालावे व दीड ते दोन वाटी पाणी घालावे. गॅस मंद करून मंद आचेवर झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत शिजवावे अथवा प्रेशर कुकरमध्ये चिकन मसाल्यासकट घालून पूर्ण प्रेशरवर आल्यावर गॅस बारीक करून २ मिनीट शिजू द्यावे व गॅस बंद करावा. शिजल्यावर बाऊलमध्ये काढून वर चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. या कृतीमध्ये तिखट बेताचे आहे. आवडीनुसार कमी जास्त करावे. चिकन मसाल्यात रस्सा अंगासरशी ठेवावा. शिजताना जास्त पाणी घालू नये. चिकन मसाला ग्रेड, पराठा, नान अथवा तंदुरी रोटी बरोबर चांगला लागतो.

वांगी सोडयाची भाजी

fried-prawns-brinjal साहित्य – अर्धा किलो वांगी, १ वाटी सोडे, ४ मध्यम आकाराचे कांदे, ५-६ लसूण पाकळया, अर्धा इंच आले. ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, १ वाटी सुक्या खोबर्‍याचा किस, २-३ लवंगा, १ इंच दालचिनी, २-३ मसाला वेलची, अर्धा चमचा शहाजिरे, १ लाबंट चिरलेला मध्यम आकाराचा बटाटा, चिंच, मीठ व तेल.

कृती – वांगी धुवून भरल्या वांग्याला चिरतो तशी चिरावी. सोडे पाण्यात भिजत घालावे. आले, लसूण, मिरच्या व कोथिंबीर एकत्र वाटावे. २ कांदे लांब चिरलेला कांदा व खोबर्‍याचा किस हे दोन्ही एकत्र भाजावे. त्याच तेलात लवंगा, दालचिनी, शहाजिरे व वेलची जराशी भाजावी. हे भाजलेले साहित्य भाजलेला कांदा व खोबर्‍याबरोबर वाटावे. तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. आले, लसून पेस्ट व सोडे घालून परतावे. तिखट, हळद, मीठ व चिंचेचा कोळ घालून ढवळून खाली उतरवावे व चिरलेल्या वांग्यामध्ये भरावे. तेल तापवून त्यात वांगी शिजताना कढईवर झाकण ठेवून त्यावर थोडे पाणी घालावे ही भाजी आपल्याला आवडेल तशी दाट किंवा पातळ ठेवावी.

ओल्या बागंडयाचे कालवण

साहित्य – ५-६ ओले बांगडे, १ नारळ, ८-१० सुक्या मिरच्या, ७-८ तिरफळ, १ चमचा तांदूळ, थोडी चिंच कोळून, ३-४ आमसुले, तेल, मेथी, मोहरी फोडणीसाठी, चवीनुसार मीठ.

कृती – बांगडे स्वच्छ करून त्याचे २ ते ३ तुकडे करावेत. बांगडयाची तोंडे वाटल्यास काढून टाकावीत किंवा ठेवली तरी रश्श्याला चांगली चव येते. नारळ, हळद, लाल मिरच्या, मिरे, तांदूळ एकत्र बारीक वाटावे, त्यात चिंच कोळून घालावी व तिरफळ ठेचून घालावीत. एका पातेलीत मोहरी व मेथीची फोडणी करावी व त्यात वाटलेला मसाला घालावा. आवश्यकतेनुसार चार पाच वाटया पाणी व चवीनुसार मीठ घालावे. उकळी आली की त्यात बांगडयाचे तुकडे घालावेत. जरा वेळ उकळल्यावर खाली उतरवावे व मग आमसुले घालावीत.