मासांहारी पदार्थ

फिश फ्राय

fish-fry साहित्य – अर्धा किलो पापलेट किंवा राऊ (कमी काटयाचा मासा), थोडीशी चिंच, १०-१२ लसूण पाकळया, १ इंच आले, १ चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, १ वाटी ज्वारीचे पीठ, तळण्याकरता तेल.

कृती – पॉपलेट स्वच्छ धुवून सुरी उलटया बाजूने फिरवून खवले काढून टाकावेत. डोक्याचा व शेपटीचा भाग वेगळा करून सारख्या आकाराचे आडवे अंदाजे १० तुकडे करावेत. सगळे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. चिंचेचा कोळ काढून घ्यावा. चिंचेचा कोळ, वाटलेले आले, लसूण, १ चमचा तिखट व चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून पॉपलेटच्या तुकडयांना सर्व बाजूने चोळून घ्यावे व ८ ते १० तास झाकून ठेवावे. फ्राय करायच्यावेळी सर्व तुकडे लावलेल्या मसाल्यासकट दोन्ही बाजूने ज्वारीच्या पीठातघोळवून फ्रायपॅनमध्ये पुरेसे तेल घालून एका वेळेला २ किंवा ३ तुकडे लावून दोन्ही बाजूने खरपूस तळावेत. मासा धुतांना लिंबाचा रस पाण्यात खळखळून स्वच्छ धुवावेत म्हणजे माशाचा वास कमी होतो. फिश फ्रायसाठी काळया पाठीचा पॉपलेट चांगला लागतो.

फिश करी

fish-curry साहित्य – अर्धा किलो पॉपलेट, किंवा राऊ (कमी काटयाचा मासा) अर्धी लिंबाचा रस, वाटलेले आले-लसूण १ चमचा गरम मसाला, थोडीशी चिंच कोळून, दोन टोमॅटो चिरून, फोडणीकरिता तेल, अर्धा नारळ खोवून व फोडणीचे सामान, चवीनुसार मीठ, मूठभर कोथिंबीर चिरलेली, २ चमचे लाल तिखट.

कृती – लिंबाचा रस व पाणी लावून मासा धुवून घ्यावा. सुरी उलटया बाजूने फिरवून खवले काढून टाकावेत. डोक्याचा व शेपटीचा भाग वेगळा करून सारख्या आकाराचे थोडे जाडजाड आडवे अंदाजे ८ तुकडे करावेत. जाड बुडाच्या पातेलीत डावभर तेलाची मोहरी, हळद, घालून फोडणी द्यावी. त्यात वाटलेले आले,लसूण परतून घ्यावे. आवडत असल्यास दोन कांदे परतून घ्यावेत.

कांदे खंमग गुलांबी परतले गेले की त्यात माशाचे तुकडे टाकून थोडे परतावे. त्यावर २ चमचे लाल तिखट आणि १ चमचा गरम मसाला घालावा व थोडी चिंच कोळून घालावी. टोमॅटो बारीक चिरून घालावेत. हवे तेवढे (२,३ वाटया) पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे व उकळी आली की आर्धी वाटी नारळ खवून व खवलेला नारळ थोडा वाटून त्यात घालावा. चिरलेली कोथिंबीर घालावी, एक दोन उकळीतच माशाचे तुकडे शिजतील. जास्त शिजवू नये. शिजल्याबरोबर खाली उतरवावे. पांढर्‍या मोकळया भाताबरोबर फिशकरी चांगली लागते.

मटण करी

mutton-curry साहित्य – अर्धा किलो मटण, पाव किलो कांदे, ३-४ टोमॅटो धुवून उकळत्या पाण्यात घालून सोलून चिरून, सुके खोबरे अर्धा वाटी किसलेले, २ चहाचे चमचे बडीशेप, १ टे. चमचा जिरे, ६-७ सुक्या लाल मिरच्या, ५-६ दालचिनीचे तुकडे, ५-६ लवंगा, २ मसाला वेलदोडे, २ टे.स्पून धने, नारळ अर्धी वाटी खवून, अर्धी वाटी तेल, चवीनुसार मीठ, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, १ गड्डी लसूण व १ इंच आले सोलून वाटून, मुठभर चिरलेली कोथिंबीर.

कृती – ताजे मटण साफ करून स्वच्छ धुवून एका भांडयात घेऊन त्याल वाटलेलं निम्म आलं, लसूण, थोडी हळद चोळून लावावे व झाकून ठेवावे. कढईत थोडे तेल तापवूवून त्यात दालचिनी, लवंगा, जिरे, धने, मसाल्याची मोठी वेलची व बडीशेप घालून थोडे परतावे. त्यातच सुक्या लाल मिरच्या, खसखस व किसलेलं खोबरे घालून मसाला खंमग पारतावा व ताटलीत काढून घ्यावा. परतलेला मसाला बारीक‍ वाटून घ्यावा. ओळा नारळ, हिरव्या मिरच्या व निम्मी कोथिंबीर बारीक वाटून घ्यावी. कढईत अथवा पसरट पातेल्यात तेल गरम करावे. त्यात वाटलेला कांदा तेल सुटेपर्यंत खमंग परतावा. कांदा परतला की वाटलेलं आलं, लसूण घालून परतून घ्यावे. हळद व वाटलेला मसाला घालून परतावे. मसाला परतला गेला की, मटण घालून परतावे. चवीनुसार मीठ, चिरलेला टोमॅटो घालून परतावे. ४ वाटया उकळीचे पाणी घालून ढवळावे. हे मटण कुकरमध्ये घालून पूर्ण प्रेशरवर ७ मिनिटे अथवा ३ शिट्टया होऊन शिजवावे. प्रेशर कुकर थंड झाल्यावर मटण काढावे. पूर्ण शिजले की नाही पहावे त्यात वाटलेला नारळ, मिरची, कोथिंबीर घालून एक उकळी द्यावी. हवा असेल तेवढा रस्सा ठेवावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. याप्रकारची मटणकरी, ब्रेड, पोळी, फुलके याबरोबर चांगली लागते.