टीम एफर्टस् चे महत्त्व जाणणारे, मराठी नाटककार, मालिका लेखक व दिग्दर्शक श्री. केदार शिंदे
अभिनयाचं म्हणा, किंवा नाटकाचं बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालं आहे. माझे आजोबा शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या मुलीचा मी मुलगा. माझा जन्म मुंबईत झाला. आम्ही आजोबांना बाबा व आजीला आई म्हणायचो. बाबांची मुक्तनाटय विंगेत बघत मी मोठा झालो. अगदी वयाच्या तिस-या वर्षी मी आमच्या कॉलनीत नृत्य केलं होतं. आणि हे नृत्य माझी मावशी चारूशीला साबळे हिनं बसवलं होतं. ती एक उत्तम नृत्यांगना आहे. मोहिनी आट्टम व कथकलीमध्ये तिनं एम्. ए. केलं आहे. मी शाळेत असताना सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचो. मी सातवीत असताना वैमानिक होण्याचं पक्कं केलं होतं. त्याकरता मी भोसला मिल्ट्री स्कूलच्या परीक्षा देखील पास झालो.
ज्यावेळेस आमचा व्यावसायिक रंगभूमीशी काहीही संबंध नव्हता, त्यावेळेस आम्ही, म्हणजे मी, अंकुश चौधरी, भरत जाधव, संतोष पवार, अरूण कदम एखाद्या मित्राच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला गेलो की, तेथे त्याला विनंती करायचो की आम्ही एखादा पंधरा मिनिटांचा कार्यक्रम सादर करतो. आणि मग आम्ही असे लहान लहान कार्यक्रम करायचो. त्यावेळेस एक नारळ व एकशे एक रूपये द्यायचे. पैसे किती मिळतात, त्याला महत्त्व नव्हतं पण कार्यक्रम सादर करायची आवड होती.
माझ्या दिग्दर्शकीय कारकिर्दीची सुरुवात अगदी नाटयमय म्हणावी अशी आहे. माझे आजोबा नट, व दिग्दर्शकाची भूमिका पार पाडायची जबाबदारी माझ्यावर असा एक अनपेक्षित प्रसंग सामोरा आला. दिग्दर्शनातील पहिलावहिला अनुभव हा असा होता. सतीश दुभाषी व भक्ती बर्वे दोघे ‘अरे चोरा’ हे नाटक करत होते. नाटकाच्या ३५ व्या प्रयोगालाचा दुभाषींचं निधन झालं. ह्या नाटकाचे किमान शंभर प्रयोग व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी भक्ती बर्वेंनी बाबांना, म्हणजे शाहीर साबळे यांना तो रोल करण्याची विनंती केली. तेंव्हा बाबांच्या तालमी मी घेतल्या होत्या. ही गोष्ट १९८०-८१ सालातली आहे. आज आठवण झाली की खूप गंमत वाटते, पण त्यावेळी मी शाळेत होतो.
दरम्यानच्या काळामध्ये, १८८४ साली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ रंगभूमीवर आली व १८८६ साली माझा त्यात प्रवेश झाला. या कार्यक्रमात माझी आई गायिका म्हणून गायची. मी ‘महाराष्ट्राची लोकधारा’चे जवळजवळ अडीच हजार प्रयोग केले. त्यावेळेस भरत, अंकुश, संतोष, अरूण कदम असा आमचा छान ग्रुप झाला होता. पुढे हळूहळु ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली.
आय् एन् टी च्या स्पर्धेकरिता ‘बॉम्बे मेरी जान’ या नाटकाचं दिग्दर्शन मी केलं. त्याच वेळेस भरत व अंकुश ‘ऑल दि बेस्ट’ नाटकात काम करत होते. स्पर्धेत ‘बॉम्बे मेरी जान’ पहिलं आलं. परंतु ‘ऑल दि बेस्ट’ पहिलं का आलं नाही, याबद्दल खूप वादंग झाला. पुढे ‘ऑल दि बेस्ट’चं व्यावसायिक रंगभूमीवर आगमन झालं. हे नाटक तुफान चाललं. एका संस्थेसाठी ‘बॉम्बे मेरी जान’ हे नाटक मी दोन अंकी केलं. परंतु नाटक फारसं चाललं नाही. आय् एन् टीच्या निमित्ताने आमचा प्रवास मात्र सुरू झाला.
रूईया महाविद्यालयातील सादर केलेली एकांकिका मनाला खूप भावली. ‘एकांकिका’ म्हणजे काय प्रकार आहे हे त्यावेळी मला त्या ‘सती’ नावाच्या एकांकिकेने जानेवारी १९९० साली कळलं. मग आम्ही सर्वानी एकांकिका करण्याचं ठरवलं. परंतु दिग्दर्शन कोण करणार? ही एकांकिका बसवणार कोण? मग सर्वानुमते, ‘केदार बसवेल एकांकिका’ असं ठरलं आणि बाबांच्या ‘बापाचा बाप’ या मुक्त नाटयाचं एकांकिकेत रूपांरत केलं. या नाटकात भरतने पहिल्यांदा पाच रोल्स केले होते. पहिल्या स्पर्धेत या एकांकिकेला एक फुटकळ बक्षिसही मिळालं नाही. त्यावेळेस आम्ही मागे फिरलो नाही तर परिक्षकांना जाऊन विचारले की आम्ही नक्की कुठे चुकलो ? त्यावेळेस आम्हाला परिक्षकांनी एक मोठी लिस्ट दिली. त्यानुसार आम्ही कार्यवाही केली व तिस-या दिवशीच्या स्पर्धेत आमच्या एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळालं. दिग्दर्शक म्हणून माझ्या नावावर शिक्कमोर्तब कधी झालं, ते खरं तर या सा-या कला-कामगिरीच्या नशेत लक्षातही आलं नाही.
पुरूषोत्तम बेर्डेचं टुरटूर नाटक मी केलं. परंतु या नाटकाचे केवळ पन्नासच प्रयोग झाले. १९९४-९५ हे वर्ष माझ्यासाठी खूपच वाईट होतं. विशेष मूड असा कुठे लागत नव्हता. मग १९९६ मध्ये माझं लग्न झालं. तोपर्यंत मी ‘ऑल दि बेस्ट’मध्ये ब-याच रिप्लेसमेंटस् केल्या. लग्नानंतर बायकोने ‘ऑल दि बेस्ट’मधलं काम बंद केलं. माझी पत्नी ही माझी खूप समंजस अशी रसिक सहचर आहे. ती, मी, व आमची मुलगी सना असं आमचं कुटुंब आहे. माझी बायको माझी उत्तम प्रेक्षक आहे. मला काही सुचत असतं तेंव्हा माझ्या संकल्पना मी तिला सांगतो. अगदी अर्ध्या रात्री झोपेतून उठवूनसुध्दा तिला मी माझं लिखाण वाचून दाखवंल आहे. आणि तीदेखील ‘अमूक एक थीम चांगली आहे, किंवा वाईट आहे’ तर कधीकधी नुसतंच हसून ‘आवडलं, किंवा छान’ अशा प्रतिक्रिया देते. परंतु हल्ली कामाच्या व्यापात आमचं बोलणं फारसं होत नाही. अशा वेळी ती एकदम परफॉर्मन्स बघते.
१९९७ साली ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे माझ्यासाठी व माझ्या ग्रुपसाठी यशस्वी पुनरागमन होतं. त्यानंतरच्या नाटय प्रवासाची रसिकजन जास्त दखल घेऊ लागले. १९९८ मध्ये मोहन जोशी सोबत ‘मनोमनी’ तर त्याच वर्षी भरतसोबत ‘श्रीमंत दामोदर पंत’ केलं. नंतर १९९९ ला ‘तू तू मी मी’ हे नाटक आलं.
२००० साली मी मालिका करण्याचं ठरवलं. प्रशांत दामले व विजय चव्हाण या दोघांना घेऊन मी ‘आमच्यासारखे आम्हीच’ ही मालिका केली. या मालिकेचे केवळ ३५ प्रयोग झाले. ‘डिटेक्टिव्ह जयराम’ ही मालिका तर १२ एपिसोडच करू शकली. मला पहिल्यांदा नेहमीच अपयश आलं आहे. आणि मी म्हणतो की ते माझ्यासाठी चांगलंच आहे. कारण त्यातून मला माझ्या चूका समजतात.
अल्फा टिव्ही मराठीवर ज्यावेळेस मी ‘हाऊसफुल्ल’ हा नाटकावर आधारित कार्यक्रम करीत होतो, त्यावेळेस एक गोष्ट मी कटाक्षाने पाळली. ती म्हणजे, जोपर्यंत मी हा कार्यक्रम करत आहे, तोपर्यंत मी एकही नाटक करणार नाही. ‘हाऊसफुल्ल’ करण्याआधी अतुल परचुरे सोबत मी ‘विजय दीनानाथ चव्हाण’ हे नाटक केलं. त्या नाटकाचे केवळ २५ प्रयोगच झाले. ‘हसा चकटफू’ ही मालिका नंतर केली. नोंव्हेंबर २००२ मध्ये ‘गंगाधर टिपरे’ आणि आता ‘घडलंय बिघडलंय’ ह्या मालिका मी करत आहे.
आत्ता कुठे माझ्या करियरची सुरवात आहे, असं मला वाटतं. बरेच जण म्हणतात की त्यांनी इतकी किंवा अमूक एक वर्षे स्ट्रगल केलं आहे. पण मी प्रत्येक सेकंदाला स्ट्रगल मानतो. आम्ही स्ट्रगल करताना सेकंद घालविली आहेत. या सा-या पसा-यात एक आंतरिक सत्य म्हणजे, माझा परमेश्वरावर विश्वास आहे. स्वामी समर्थांवर माझी प्रचंड श्रध्दा आहे. आपण मानतो ना, की अवकाशात ग्रह आहेत, मग त्यांची रिफ्लेक्शन्स आपल्यावर पडत असतीलच ना ? माणसांची माणसांवर रिफ्लेक्शन्स पडतात तसा ग्रहांचा परिणाम आपणांवर नक्कीच होत असतो. माझी ईश्वरावर श्रध्दा आहे. अंधश्रध्दा नाही.
ब-याच वेळा काही काही संकेत मनोदेवता देत असते. ‘सही रे सही’ नाटकाची एक ओळही ज्यावेळेस मी लिहीली नव्हती, त्यावेळेसच मी सांगितलं होतं की हे नाटक, सुपर-डुपर हिट होणार! ‘सही रे सही’ च्या जन्माची कथा थोडक्यात सांगतो. मला भरतसाठी एक नाटक करायचं होतं. त्याआधी म्हणजे जवळ जवळ दीड वर्ष मी टिव्ही मालिकांच्या दिग्दर्शनात इतका व्यस्त होतो की, मी एकही नवीन नाटक रंगभूमीवर आणलं नाही. एका नव्या कथानकाच्या अभिव्यक्ती करिता मला एका व्यासपीठाची गरज होती, की जिथे आम्हाला एक वेगळं समाधान लाभेल. या नाटकाची संकल्पना माझीच आहे. परंतु आमच्या ग्रुपमध्ये असं आहे की मला एक सुचतं आहे, तर भरतला त्याच वेळेस दुसरं काही सुचेल. या नाटकाची आई मी असेल तर बाप भरत आहे, असं म्हणायला हरकत नाही.
या नाटकाबाबत निर्माते थोडे साशंक होते. परंतु आम्हाला आमच्या कलाकृतीबद्दल पूर्ण विश्वास होता आणि आमच्या विश्वासावर निर्मात्यांना विश्वास ठेवावा लागला; आणि तो विश्वास खराही ठरला. शुभारंभाच्या पहिल्या प्रयोगालाच दोन तासाच्या आता हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. मी काही भविष्यवेत्ता किंवा द्रष्टा नाही. परंतु ब-याचदा असं होतं की काही कलाकृतींच्या बाबतीत गणितं इतकी व्यवस्थित जुळून येतात की, आपण त्यांच्या यशस्वीतेचा अंदाज लावू शकतो. ‘गंगाधर टिपरे’ या मालिकेबद्दलही मला विश्वास होता की, ही मालिका मराठी माणसाच्या घराघरात जाणार आणि हीट होणार.
मी काही ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी’ करत नाही, परंतु कोणत्याही मालिकेचा ‘स्क्रीन प्ले’ व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला अनुदिनीच्या पुस्तकाबद्दल खूप विश्वास होता. मी ज्यावेळेस ‘लोकसत्ता’मध्ये त्याचे लेख वाचायचो त्यावेळेस ते वाचताना माझं मला ते जाणवायचं. आणि प्रत्येकाच्या घराघरात ‘गंगाधर टिपरे’मध्ये ज्या गोष्टी दाखवल्या आहेत, त्या घडतातच. आज ही मालिका प्रत्येकाला आपली वाटते. मी नेहमी कथानकाचा विचार करतो. कारण ज्या दिवशी मी एखाद्या भूमिकेच्या प्रेमात पडेन त्या दिवशी त्या मालिकेतील गंमत निघून जाईल.
माझी नाटकं, मालिका ह्या नेहमीच विनोदी असतात. विनोदी करताना मी नेहमीच विविध विषय हाताळतो व वेगवेगळया कलाकारांसोबत काम करण्यास उत्सुक असतो. जो कलाकार गंभीर भूमिका अतिशय चांगली करतो, तो विनोदी भूमिकाही चांगल्या रितीने करू शकतो. आणि स्पर्धा आल्याशिवाय कोणतीही चांगली कलाकृती निर्माण होऊ शकत नाही.
माझ्या नाटकांमध्ये, मालिकांमध्ये संगीत अधिक बोलकं असतं. संगीताचा वारसा आमच्या घराण्यातूनच आला असल्याने माझ्या कलाकृतींमध्ये संगीत जास्त असतं. म्हणूनच असेल कदाचित गुरूदत्त, राजकपूर, सुभाष घई हे माझे आवडते दिग्दर्शक आहेत. कारण त्यांच्या सिनेमांमध्ये संगीत अधिक असतं. मी ज्यावेळेस चित्रपट करीन त्यावेळेस नक्कीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करीन. पण नाटकापुरतं बोलायचं तर, माझं नाटकांवर अतिशय प्रेम आहे. मराठी ही सर्वात प्रगत रंगभूमी आहे. एक क्षण असा येईल की, सर्व क्षेत्रांमध्ये मराठी माणूसच अग्रेसर असेल. मराठीवर्ल्डच्या वाचकांना एवढंच सांगणं आहे की, आनंद घेत राहा. सर्वांचे आशीर्वाद मला राहू देत, जेणे करून माझ्या हातून चांगल्या कलाकृती घडतील.
मुलाखत – मंदार माईणकर, शब्दांकन – अर्चना जोगळे