साहित्य – ४५० ग्रॅम पिकलेल्या कवठाचा गर, ४५० ग्रॅम साखर, ११५ ग्रॅम मनूका, ५५ ग्रॅम लाल मिरच्या (५-६), दोन लसणीचे कांदे, १ मोठा आल्याचा तुकडा (२५ ग्रॅम), ५ कप व्हिनीगर व मीठ चवीनुसार.
कृती – कवठे फोडून, म्याचा गर एकत्र करून तो मोजून घ्यावा. अर्धे व्हिनीगर बाजूला ठेवून, उरलेल्या व्हिनीगरमध्ये कवठाचा गर घालून, हाताने खूप कुस्करून घ्यावा व नंतर गाळणीने गाळून घ्यावा. मनुका स्वच्छ करून घ्यावा, मिरची, आले, लसूण थोडे व्हिनीगर घालून बारीक वाटून घ्यावे. अर्धे व्हिनीगर बाजूला ठेवले होते ते व साखर एकत्र गॅसवर ठेवावे. त्यात वाटलेले आले-लसूण-मिरच्या व मीठ घालून ढवळावे. नंतर त्यात कवठाचा गाळलेला गर घालावा व मिश्रण जरासे घट्ट होईपर्यंत शिजवावे. नंतर खाली उतरवून त्यात मनुका घालाव्यात व बाटलीत भरून ठेवावे.
साहित्य – १०-१२ आमसुले, २ चहाचे चमचे व्हिनिगर, अर्धा चमचा बेदाणा, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा मीठ, ५-६ काळे मिरे, लहानसा आल्याचा तुकडा, १/४ चमचा लाल तिखट, ३ चमचे साखर.
कृती – वरील सर्व साहित्य एकत्र करून पाटयावर बारीक चटणी वाटावी. ही चटणी ७-८ दिवसच टिकते.
साहित्य – दोन चहाचे चमचे उडीद डाळ, ३-४ कढीपत्ता पाने, एक चमचा तेल, एक वाटी दही, चवीपुरती साखर आणि मीठ.
कृती – उडीद डाळ तेलात तळून लालसर होऊ द्यावी. त्यात कढीपत्ता पाने हिरवा रंग कायम ठेवत कुरकुरीत तळावीत. कढीपत्ता पाने आणि उडीद डाळ मिक्सर मध्ये भरडून घ्यावी. मीठ, साखर आणि भरडलेली डाळ दह्यात मिसळावी. एक तास चटणी मुरु द्यावी नंतर खावी.
ही चटणी चवीला छान लागते. उडीद डाळीत प्रोटीन्स भरपूर असतात शिवाय ती मासपेशींना मजबुती देते. कढीपत्ता विटामिन अ ने भरपूर आणि सुवासिक आहे. ही चटणी कोणत्याही डाळीच्या वड्या सोबत फार छान लागते.
साहित्य – २०० ग्रॅम हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम मोहरीची डाळ, १ टेबल चमचा हळद, १ चमचा मेथीचे दाणे, १ चमचा हिंग, १/२ वाटी मीठ, १/२ वाटी तेलाची फोडणी, २ लिंबे.
कृती – मोहरीची डाळ विकत आणावी किंवा मोहरी पाटयावर वाटून घ्यावी व साले पाखडून टाकून घरीच मोहरीची डाळ बनवावी. मोहरीची डाळ चांगली कुटून घ्यावी. थोडया तेलावर मेथी परतून घ्यावी, त्याचीही पूड घ्यावी. मिरच्यांचे पोट फाडून त्यांचे बेताच्या आकाराचे तुकडे करावेत. नंतर मीठ, हळद, हिंग, मेथीपूड, मोहरीपूड व मिरच्यांचे तुकडे सर्व एकत्र करावे. तेलाची फोडणी करून कालवलेल्या मिरच्यांवर गार झालेली फोडणी घालून २ लिंबांचा रस घालून चांगले कालवावे व बरणीत भरून ठेवावे. ४-५ दिवसांनी खायला काढाव्यात. मोठया प्रमाणात करून ठेवल्यास वर्षभरसुध्दा टिकतात.
साहित्य – २ वाटया हरभरा डाळ, ७-८ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, मीठ, साखर चवीप्रमाणे, १ वाटी तेलाची फोडणी.
कृती – हरभर्याची डाळ चार तास भिजवून नंतर रोवळीत उपसून घ्या. जिरे, मीठ व हिरव्या मिरच्या घालून डाळ बारीक वाटा. कढईत भरपूर तेलाची हिंग, हळद, मोहरी व कढीलिंब घालून फोडणी करा. त्यात वाटलेल्या डाळीचा गोळा घालून परता. झाकण ठेवून वाफ आणा. अधूनमधून परतत रहा, म्हणजे डाळ मोकळी होईल. ओले खोबरे व कोथिंबीर पेरून गरम गरम खा.