मुखशुध्दी


जिरागोळी

jeera goli साहित्य – २० ते २५ आमसुले, अर्धा चमचा मीठ, १ चमचा जिरे, १ चमचा साखर, २ चमचे पिठी साखर.

कृती – पिठी साखर सोडून इतर सर्व जिन्नस एकत्र करून चिकट होईपर्यंत वाटावे. नंतर ह्या वाटलेल्या मिश्रणाच्या हाताने छोटया छोटया गोळया कराव्यात. ह्या गोळया एक दिवस उन्हात वाळवाव्यात. नंतर त्या गोळया पिठीसाखरेत घोळवून बाटलीत भरून ठेवाव्यात.

बिब्याची सुपारी

साहित्य – १०० ग्रॅम चिकणी सुपारी, २५० ग्रँम भरडी सुपारी, ५ ग्रॅम लवंगा, १ मध्यम वाटी सुके खोबरे, १ जायफळ, ३-४ बिब्बे, पाव चमचा मीठ, १ चमचा बडीशेप, ४-५ चहाचे चमचे तूप.

कृती – भरडी सुपारी आदल्या दिवशी तुकडे करून १५ ते २० मिनिटे पाण्यात घालून ठेवावी. नंतर ती कपडयावर पसरून वाळवावी. जायफळाची कुटून बारीक पूड करावी. बडीशेप व लवंगा भाजून घेऊन त्यांची बारीक पुड करावी. चिकणी सुपारी कातरून वेगळी ठेवावी. बिब्बेही अडकित्याने फोडून, काचर्‍या करून ठेवावेत. खोबर्‍याचे बारीक काप करावेत. तुपावर दोन्ही सुपार्‍या वेगवेगळया परतून घ्याव्यात. नंतर थोडया तुपावर खोबर्‍याचे काप परतून घ्यावेत व शेवटी थोडया तुपावर बिब्याच्या काचर्‍या परतून घ्याव्यात, नंतर हलक्या हाताने ह्या वस्तू जाडसर कुटून घ्याव्यात, नंतर त्यात जायफळपूड, लवंगपूड, बडीशेप भाजून केलेली पूड व मीठ घालून सर्व एकत्र कालवावे.

ओवा-शोपा

parsley cumin साहित्य – ३ वाटया बडीशोप, पाव वाटी ओवा, पाव वाटी बाळंतशोपा, आर्धी वाटी तीळ, १ छोटा चमचा मीठ, १ वाटी सुक्या खोबर्‍याचा किस, आर्धी वाटी पाणी.

कृती – प्रथम मीठ पाण्यात विरघळून घ्यावे. परातीत बडीशोप, बाळंतशोपा घेऊन त्यांना मीठाचे पाणी लावून रात्रभर ठेवावे. दुसर्‍या दिवशी ते मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे, नंतर ओवा, तीळ, खोबर्‍याचा किस हे पदार्थ मंद आचेवर वेगवेगळे भाजून घेऊन बडीशोप व बाळंत शोपांमध्ये एकत्र करावे. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी.

ह्या शोपांमुळे पोट चांगले रहाते, पोटात गॅस होत नाही. बाळांतीणीसाठी ह्या उपयुक्त असतातच पण त्यांनी तोंडाला चव सुध्दा येते.

आवळा सुपारी

amal betel साहित्य – २५० ग्रॅम डोंगरी आवळे, अर्धा चमचा काळया मिर्‍यांची पूड, अर्धा चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ, २ लिंबाचा रस.

कृती – मोठे डोंगरी आवळे धुवून, पुसून स्टीनलेस रूटीलच्या किसणीवर किसून घ्यावेत. (साध्या किसणीवर किसल्यास आवळे काळे पडतात) नंतर त्यात मीठ, मिरेपूड, जिरेपूड घालून कालवावे. नंतर त्यावर २ लिंबाचा रस घालावा आणि हा कीस उन्हात वाळत घालावा. ही सुपारी पाचक असून उपासाला चालते आणि मुलांना देखील फार आवडते.

मसाला सुपारी

masala betel साहित्य – पाव किलो भरडी सुपारी, १२५ ग्रॅम चिकणी सुपारी, ८ ते १० लवंगा, ८ ते १० वेलदोडे, ४ चमचा खसखस, पाव जायफळ, १ वाटी खोबरे कीस, १ चमचा ज्येष्ठमध पूड, २ चहाचे चमचे साजूक तूप.

कृती – खोबरे किसून भाजून घ्यावे व चुरावे, बडीशेप खसखस भाजून घ्यावी. सुपारी कुटून घ्यावी. लंवग, वेलदोडयाची पूड करून घ्यावी. तुपावर काढलेली सुपारी गरम करून जरा परतून घ्यावी. लालसर झाली की उतरवावी. नंतर बाकीचे सर्व पदार्थ घालून चांगली कालवावी. नंतर गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरावी. मसाला सुपारी बरेच दिवस टिकते.

तीळ ओव्याची सुपारी

sesame parsley betel साहित्य – २५० ग्रॅम बडीशेप, २५० ग्रॅम पांढरे तीळ, २५० ग्रॅम बाळंतशोपा, २५० ग्रॅम धन्याची डाळ, १०० ग्रॅम ओवा.

कृती – ओवा पाण्यात धुवून घ्याव्यात व कपडयावर पसरून उन्हात वाळवाव्यात, वाळल्यावर चांगल्या चोळून घ्याव्यात व भरड कुटून घ्यावा, वरील साहित्यातील बाकीच्या सर्व पदार्थाना मीठ, हळद व थोडे पाणी चोळून ठेवावे व उन्हात वाळवावे. उन्हातून आणल्यावर लगेचच भाजावे. त्यात कुटलेल्या ओवा मिसळाव्यात. सर्व गार झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे.